मंडळाचे प्राण श्री बोरवणकर काका – श्री सुधीर एरंडे

मंडळाचे प्राण बोरवणकर काका

मंडळाचा कोणताही कार्यक्रम असो वा गणेशोत्सवाचा गजबजलेला मांडव, बोरवणकर काका म्हणजे त्या संपूर्ण व्यवस्थेचा अढळ कणा. त्यांच्या उपस्थिती शिवाय उत्सवाची कल्पना करणे ही अशक्य आहे.

गणेशोत्सवात पाची दिवस, सकाळ उजाडल्या पासून ते रात्री मंडपाची शेवटची दिवाबत्ती विझे पर्यंत काकांची अखंड धावपळ सुरू असते. काही महिन्या अगोदरच कार्यक्रमासाठी मंदिराची उपलब्धता निश्चित करणे, मंदिराच्या व्यवस्थापनाशी समन्वय राखणे हे काम तेच बघतात . कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार मंचाची उभारणी करवून घेणे यात त्यांचा हातखंडा. टेंट हाऊस चे कोणते, किती सामान , भांडी कोणत्या दिवशी लागणार आहे हे तर त्यांच्या बाएं हाथ का खेल. बाहेरून येणाऱ्या कलाकारांशी संपर्क साधून त्यांच्या वेळा ठरवणे असो, वा त्यांच्या आदरातिथ्याची, चहा-पाण्याची,राहण्या खाण्याची,जाण्या येण्याची चोख व्यवस्था करणे असो, पाहुण्यांना घरा सारखा पाहुणचार मिळतो तो केवळ काकांच्या दक्ष नजरे मुळेच. त्यांच्यातील कलासक्त मनाची झलक त्यांनी स्वताच्या हाताने तयार केलेल्या दर वर्षी वेगवेगळ्या गणपतीच्या देखण्या आराशीतून नेहमीच उठून दिसते. त्यात कोणाची ढवळाढवळ त्यांना पसंत नसते, मदती बद्दल विचारल्यास ते म्हणतात तुम्ही येथून जाल तेव्हा च मला सुचेल.

ते उत्तम अभिनय पण करतात हे त्यांनी आपले आपण कार्यक्रमात एक पात्री प्रयोग करून पुनः सिद्ध केले आहे.

रोजच्या जेवणासाठी हलवाईला लागणाऱ्या किराणा सामानाची व्यवस्था करणे, मंडपात योग्य ठिकाणी बेनर्स लाववणे,सजावट करवणे ह्या कामा व्यतिरिक्त मोदक-खिरापती ची व्यवस्था अश्या छोट्या-मोठ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची बारीक नजर असते. जे काम इतर कोणाला जमत नाही तिथे काका स्वतः लक्ष घालून ते पूर्ण करून घेतात. काका म्हणजे वेळेचे पक्के . एका मिनिटाचा ही उशीर झालेला त्यांना अजिबात चालत नाही. ठरलेली वेळ टळली की त्यांचा पारा चढतो आणि समोरच्याला त्यांच्या तीव्र नाराजीला सामोरे जावेच लागते. मात्र, नारळा सारखा हा स्वभाव बाहेरून जितका कडक वाटतो, आतून तितकाच गोड आणि निर्मळ असतो. मंडळाच्या हितासाठी व्यक्त झालेला हा राग फार वेळ टिकत नाही; थोड्याच वेळात काका पुन्हा पूर्ववत होऊन सगळ्यांशी हसून बोलू लागतात.

थकून कधीतरी ते सहज उद्गारतात, “आता पुरे बुवा, मला मोकळं करा या सगळ्यातून! पुढच्या वेळी तुम्हीच सांभाळा.” पण हा केवळ एका क्षणाचा थकवा असतो. तो उत्सव संपायचा अवकाश, की पुढच्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी काका पुन्हा त्याच अफाट उत्साहाने आणि जोमाने पुढे उभे ठाकलेले दिसतात.

मंडळा विषयीची निस्वार्थ निष्ठा, कामाची विलक्षण धडपड यामुळे बोरवणकर काका केवळ एक कार्यकर्ते उरत नाहीत, तर ते संपूर्ण मंडळाचे आधारस्तंभ आणि जिवंत प्राण ठरतात.

 

सुधीर एरंडे

अध्यक्ष,

पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ