सत्यम् शिवम् सुंदरम् – सौ. वंदना रत्नाकर परांजपे

सत्यम् शिवम् सुंदरम्

नर्मदामैया दरवर्षी नुतन होत असते. गेल्या वर्षी होती तशीच यंदा असत नाही. गेल्या वर्षी जिथे वालुकामय प्रदेश होता तोच भाग यंदा जलमय झालेल्या दिसतो. गेल्या वर्षी या मोठ्या वृक्षाखाली विश्राम केला असेल तो त्या जागी असणारच नाही, पुराच्या पाण्यात वाहुन गेला असणार. तिथून थोड्या अंतरावर एखादे लहानसे झाड तुम्हाला बोलावत असेल. सृजन आणि संहार उभयविध सामर्थ्य आहे नर्मदामैयाचं. आपल्या या सामर्थ्याने आपल्या दोन्ही तटांवर मैया दरवर्षी नवीन सृष्टी रचना करत असते.

एकाच वर्षात तिची विविध रुपे बघायला मिळतात. उन्हाळ्यात भल्या पहाटेच मैयाच्या दोन्ही तीरांवर लोकांची गर्दी व्हायला लागते. स्त्री पुरुष, मुलं मुली, वृद्ध सगळेच सुखदायी स्वच्छ निर्मल मैया प्रवाहात स्नानाचा आनंद लुटत असतात. परिक्रमावासींनी मैयापात्रात पोहायचं नसतं तर त्यांनी किनारपट्टीवर,घाटाच्या पायरीवर बसुनच स्नान करायचं असा अलिखित नियम आहे. साधारणपणे आपण पाहू शकतो की महिला नि: संकोचपणे स्नान करत असतात. त्यांना विश्वास असतो,खात्री असते की पुरुष त्यांना सिर्फ माता भगिनी रुपानेच बघत असतात त्यामुळे लज्जा संकोच करण्याची मुळी आवश्यकताच नसते.

पावसाळ्याच्या दिवसात? खूप दुरुन अगदी एक दोन किलोमीटर अंतरावरुन धीर गंभीर ध्वनी कानावर पडत असतो.अति गंभीर अति सखोल नादब्रह्म. मैयाच्या किनाऱ्यावर उभे राहून पाहावं तर समोर दिसत असतो अति विशाल अति विस्तीर्ण प्रचंड जलप्रवाह. अति वेगवान रोंरावत पुढे पुढे जात असलेला जणू फोंफावत फुत्कारत झेपा टाकणारा लालेलाल असलेला नागाधिराजच.मार्गात येणारे मोठमोठी झाडे झुडपे, लहानमोठे काही प्राणी, कुडाकचरा, किनाऱ्यावरील घाटांवर असलेली छोटी मोठी दुकाने टपऱ्या सगळं अगतिक होऊन वाहात जात असतात. मैयाचा हा भयंकर संताप पाहुन उरात धडकीच भरते.

दूर उभे राहून आपण तिची प्रार्थना करत राहतो. मैया! मैया! तुझा संताप अगदी योग्यच आहे. आम्ही माणसांनीच असंख्य अपराध केले आहेत.अनेक जंगलं तोडुन जाळुन पोळुन, गांवा गांवांतील सांडपाणी भरलेले नाले तुझ्या प्रवाहात सोडुन घाण गंदगी पसरवून आम्हीच तुझा निरंतर अपमान अपराध करत असतो.तेव्हा पुराच्या रुपाने आम्हाला तू शिक्षा देणं उचितच आहे. तरिही आम्ही तुझी लेकरं आहोत तू आमची आई आहेस. क्षमा कर मैया आता घरोघरी,गांवोगांवी जन जागरण करत घाणीचं साम्राज्य नष्ट करण्याचा,अविघटनशिल प्लास्टिक सारख्या गोष्टींचा वापर न करण्याचा प्रयत्न करत आहोत. मैया! मातेश्वरी क्षमा कर. क्षमा कर.

शरद ऋतुचं आगमन होताच जलस्तर कमी होऊ लागतो. प्रतिक्षण जल स्वच्छ,शुद्ध होऊ लागतं. दिवसागणिक जलमाधुर्य वाढू लागतं, तेजस्वी होऊ लागतं.रुपही थोडं हिरवट निळसर दिसू लागतं.

थंडीच्या दिवसात किनाऱ्यावर जावं तर असं दिसतं की की मैयाला थंडी बाधू नये म्हणून सृष्टीमातेने तिला धुक्याची दुलई पांघरली आहे. मैया दिसतचं नाही. थोडावेळ वाट पहा, अरुणोदय होऊ दे मग पहा, अंगावरची धुक्याची दुलई बाजुला सारुन गुलाबीसर,भगवी छटा असलेली सोनेरी जरीवर्खाची साडी नेसलेली मैया भगवान सुर्यदेवाचं आपल्याला सुखद शीतल जलाने अर्घ्य देत स्वागत करत प्रणाम करत आहे.

मैया किनाऱ्यावरील हिरवळीवर जणू मोत्यांचा सडाच पडला आहे असं दिसतं. जसा जसा दिवस वर येऊ लागेल तसं तसं स्पष्ट दिसू लागेल. नर्मदामैयाचं दर्शन होताच आपण म्हणू की असं सुंदर जल आम्ही कधी पाहिलचं नव्हतं. इतकी सुंदर प्रभात, प्रभावशाली परममंगला रेवामैया. आपला सगळा अहंकार नष्ट होतो. नर्मदे हर.

दुपारच्या वेळी एखाद्या झाडाखाली बसून बघा, किनाऱ्यावरील रेती अशी चमकत असते की जणू आकाशातील असंख्य तारे जमिनीवर आले आहेत.अप्रतिम सुंदर वर्णनातित दृश्य किती पाहू अन् कुठे कुठे पाहू असं होऊन जातं.

फक्त प्रति क्षण नवीनता. घनदाट वृक्षराजीने नटलेले दुर्गम पहाड, मधुर गाणारे रंगीबिरंगी पक्षी, निरनिराळे प्राणी, हरेभरे खेत खलिहान, रेवांचलचे कष्टकरी शेतकरी, आतित्थ्यशिल नागरिक सर्वच खूप सुंदर.

पण फक्त एवढ्यामुळेच मला मैया सुंदर दिसत नाही तर या रेवांचलात अनेक ऋषिमुनींनी तपश्चर्या केली आहे. अजुनही करत आहेत. या तपस्वी पुण्यवंतांच्या असण्यामुळे हा रेवांचलाचा परिसर,आसमंत पवित्र झाला आहे. त्यांच्या तप: सामर्थ्याने ही भूमि सुजलाम सुफलाम पुण्य दामिनी झाली आहे.म्हणून मला मैया सुंदर दिसत असते. सत्यम् शिवम् सुंदरम्. माझी,तुमची सर्व सजीव निर्जीव सृष्टीची माता नर्मदा.

सौ. वंदना रत्नाकर परांजपे

नाशिक. महाराष्ट्र.