चाहूल गुलाबी थंडीची: ऋतू बदलाचा मनमोहक प्रवास
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीतील गुलाल आणि ढोल-ताशांचा गजर शांत झाला की, निसर्गात एक गूढ पण सुखद शांतता पसरू लागते. आभाळातून सतत कोसळणाऱ्या पावसाने आता निरोप घेतलेला असतो आणि एका नव्या ऋतूचे पाऊल हळूच उंबरठ्यावर पडू लागते. हा काळ म्हणजे केवळ कॅलेंडरचे पान बदलणे नव्हे, तर आपल्या अवती भोवतीच्या जगण्याचे रंग, गंध आणि चव बदलण्याचा सुंदर उत्सव असतो.
सकाळच्या हवेत आता तो परिचित ओलसर दमटपणा नसतो, तर त्वचेला सुखावणारा एक हलकासा गारवा जाणवू लागतो. रात्री पंख्याचा वेग मंदावतो आणि एसी ची घरघर शांत होते. कित्येक महिने दारापाशी किंवा हातात सोबत असणार्या छत्र्या आता कपाटाच्या वरच्या कप्प्यात विश्रांतीसाठी जातात. रस्त्यावरचा चिखल सुकू लागतो, नद्यांचे उग्र रूप शांत होऊन पूर ओसरतो आणि धुवून निघालेल्या सृष्टीवर हिरवागार गालिचा उठून दिसतो. इतके दिवस काळ्या ढगां मागे लपलेले आकाश आता स्पष्ट दिसू लागते; दिल्ली सारख्या महानगरात देखील नीळे स्वच्छ आकाश ह्या दिवसात बघायला मिळते.
अपराजिता, चमेली , चांदणी,मोगरा जास्वंदाचा तो उन्हाळा – पावसाळ्यातला बहर आता मंदावतो तर पारिजातकाच्या फुलांचा मोहक सुगंध वातावरणात दरवळू लागतो.
निसर्गातल्या या बदलाची सर्वात मोठी साक्ष आपल्या भाजी मंडया देतात. ताज्या मेथीच्या जुड्या, मुळे, फुलगोभी, वाल्याच्या शेंगा, लाल गाजर वगैरे हळूहळू दिसू लागतात, आणि फळांच्या दुकानांवर संत्रे, मोसंबी, डाळिंब, शिंगाडे इत्यादी हजेरी लावताना दिसायला लागतात. आहाराची ही नवी रंगत स्वयंपाक घराला एक वेगळीच चव देते.
ऋतूच्या या संधि काळात आणखीन काही गोष्टीही अनुभवास येतात. संध्याकाळी बागेत शतपावली करताना पायाला चावणारे डास माणसाला एका जागी उभे राहू देत नाहीत व घराच्या बाहेर खुर्चीवर पण सावकाश बसू पण देत नाही,तरीही उकाड्याचा त्रास संपल्यामुळे संध्याकाळी घराबाहेर पडण्याचे, मित्रांसोबत टपरीवर गप्पा मारण्याचे आणि वीकेंडला बाहेर फिरण्याचे बेत पुन्हा आखले जाऊ लागतात.
हवेतील हा गारवा नुसता निसर्गात बदल घडवत नाही, तर मनाला उत्सवाचे वेध ही लावतो. पावसाच्या निरोपा नंतर आता गरब्याच्या तालावर थिरकण्या साठी नवरात्राची चाहूल लागते. त्याचसोबत रात्रीच्या गारव्यात एकत्र येऊन केशरी दूधाच्या पेल्या बरोबर ‘कोजागिरी’च्या मैफिलीची आखणी होऊ लागते,
वातावरणात एक प्रकारचा नवा उत्साह, नवचैतन्य उत्पन्न होते.
निसर्गाचे हे चक्र माणसाला शिकवते की बदल नेहमीच सुंदर असतो. पावसाने सृष्टीची तृष्णा भागवली आणि आता ती तृप्त सृष्टी हळूच अंगावर धुक्याची शाल ओढायला तयार होत आहे. मंडईतील ताजी भाजी, हवेतला मंद गारवा आणि आगामी सणांची लगबग हे सगळे आवर्जून सांगत आहेत— सज्ज व्हा, तो आल्हाददायक आणि हवाहवासा वाटणारा ‘गुलाबी थंडी’चा मौसम आता अगदी उंबरठ्यावर आला आहे!🙂
