गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ९
*॥ अध्याय ९ ॥*
*राजविद्याराजगुह्ययोग*
या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतःविषयी – म्हणजेच निर्गुण निराकार आणि सगुण साकार ब्रह्म – याविषयी विस्ताराने विशद करतात.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात – ते अतिगुप्त आणि अतिश्रेष्ठ ज्ञान आहे म्हणूनच ते राजगुह्य आणि राजविद्या आहे. मीच हे ब्रह्मांड अव्यक्तरूपाने व्यापिले आहे. मी कुठल्याच कार्यात गुंतत नाही आणि कुठलेही कार्य मला बांधू शकत नाही. या साऱ्या प्राणिमात्रांना मीच त्यांच्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्माला घालतो. हे चराचर, त्याचा उद्भव, पोषण आणि नाश ही सारी माझी अद्भुत माया आहे.
जेव्हा मी मानवी स्वरूपात दिसतो तेव्हा अज्ञानी माझ्या दिव्य रूपाला ओळखत नाहीत. पण जे निश्चयी आणि यत्नशील असतात ते त्या रूपाला ओळखून सतत माझेच एकचित्ताने चिंतन करतात. कुणी व्यक्त रूपात तर कुणी अव्यक्त रूपात.
मीच या जगाचा मातापिता आणि पालनकर्ता आहे. मीच सारे वेद, मीच ब्रह्मरूप ॐकार, मीच शुभाशुभाचा द्रष्टा, मीच कर्मफल, मीच जन्ममरणाचा हेतू आणि मीच या सृष्टीचे बीज. यज्ञातही मंत्र, हवन, आहुती सारे काही मीच आहे.
जे मनात इच्छा धरून यज्ञ करतात ते त्या पुण्यामुळे स्वर्गलोकी सुखाचा भोग घेतात आणि पुण्यसंचय संपला की पुन्हा मर्त्यलोकात जन्म घेतात. पण जे केवळ माझेच चिंतन करतात त्यांचा योगक्षेम मी चालवितो. कुणीही भक्तीने मला पान, फूल, फळ अगदी जल देखील अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो कारण त्यामागे त्याची भक्ती असते.
हे अर्जुना! प्रत्येक कर्म भक्तीने मला समर्पित केलेस, कर्मफलाचा त्याग केलास तर सगळ्यातून मुक्त होऊन तू माझ्यापाशी येशील. माझ्या भक्तांचा कधीच ह्रास होत नाही.
अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात – माझे रूप निरंतर चित्तात असू दे. अनन्य भक्तीने माझे वंदन, पूजन कर. त्याने तू सहजपणे माझ्यापाशी पोहोचशील.
श्रीभगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ ९.१ ॥
श्री भगवान उद्गारले
ऐक अर्जुना! ईर्षारहिता! तुला सांगतो अती गुपित जे
निर्गुण आणिक निराकार जे त्या ब्रह्माचे ज्ञान असे हे ।
आणिक तेही सगुणाच्या अन् साकाराच्या उपासनेचे
अशुभ कधी ना शिवेल तुजला जाणशील जर रहस्य याचे ॥ ९.१ ॥
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ ९.२ ॥
[श्री भगवान उद्गारले]
हे ज्ञान आहे अतिश्रेष्ठ विद्या ती राजविद्या म्हणुनीच आहे
अतिगुप्त आहे हे राजगुह्य त्याची प्रतीती सुस्पष्ट पाहे ।
अत्यंत पावन, सर्वात उत्तम धर्मानुसारे अतियोग्य आहे
या नाश नाही उपयोग याचा करणे कधीही सोपेच राहे ॥ ९.२ ॥
*अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप* ।
*अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि* ॥ ९.३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ज्ञानात ज्यांना श्रद्धा नसे त्या पुरुषांस माझी प्राप्ती न येथे ।
ते जीव पार्था! मार्गी परतती संसार मृत्यू हे चक्र जेथे ॥ ९.३ ॥
*मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना* ।
*मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः* ॥ ९.४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ब्रह्माण्ड सारे अन् जीव जे जे अव्यक्तरूपे मी व्यापिले हे ।
सामावलेले माझ्यात सारे परि मी न तेथे त्यांच्यात आहे ॥ ९.४ ॥
