गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ६
॥ अध्याय ६ ॥
ध्यानयोग
या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग ही संकल्पना पूर्णपणे उलगडून सांगतात – संन्यास आणि योग एकच असतो. केवळ गृहस्थधर्म सोडून कुणी संन्यासी होत नाही किंवा आपली नियत कर्मे सोडून कुणी योगी होत नाही. जो ऐहिकाशी गुंतत नाही, कर्मफलावर अवलंबून न राहता कर्म करतो, जो विषयसुखांच्या विचारांवर मात करतो तोच खरा योगी, तोच “योगारूढ”.
मन विषयातून मुक्त असावे नाहीतर स्वतःचा नाश निश्चित असतो. भगवान श्रीकृष्ण पुढे योग्याची लक्षणे अर्जुनाला समजावितात – जो सुखदुःख, द्वेषप्रेम अशा द्वन्द्वांच्या पलिकडे जातो; जो माती, सुवर्ण, पाषाण अशा साऱ्यांना समान मानतो; जो सर्वांनाच समबुद्धीने पाहतो; ज्याच्या समाधीत केवळ परमात्मा असतो तो खरा योगी. भगवान श्रीकृष्ण ध्यानाची स्थिती कशी असावी, योग्याचा आहार, निद्रा, व्यवहार कसे असावे हेही सांगतात.
ही योगस्थिती साध्य झाली तर त्यातले सुख दैवी असते. त्याला दुःखाचा स्पर्शही होत नाही. ऐहिकांच्या लालसांना सोडून देऊन, इंद्रियांना अंकित करून, विवेकाने मन शांत करून परमेश्वराशी एकाग्र होऊन त्या सुखमय योगस्थितीला प्राप्त करता येते.
जो योगी असतो तो सर्वाभूती परमेश्वर आणि परमेश्वरात सर्व काही पाहतो, ही समदृष्टी प्राप्त करतो. यावर अर्जुनाला प्रश्न पडतो की मुळात माणसाचे मन चंचल आणि हट्टी असते तर ते वश करणे कसे शक्य आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण त्याला समजावितात की निरंतर प्रयत्नाने आणि योगाभ्यास करून ते शक्य करता येते. तरीही अर्जुनाला प्रश्न पडतो – जो सश्रद्ध आहे पण योगसिद्धी साधू शकत नाही त्याची परिणती काय होते? त्याचा नाश होतो का? भगवान श्रीकृष्ण त्याला समजावितात – अशा माणसाचा नाश न होता सज्जन लोकांच्या तर क्वचित योग्यांच्या किंवा ज्ञानी जनांच्या कुळात तो पुनर्जन्म घेतो. त्याच्यात योगवृत्ती कायम राहते. तो त्या जन्मातही पुन्हा प्रयत्न करतो. प्रत्येक जन्मी तो शुद्ध होत जातो आणि शेवटी परमगती प्राप्त करतो.
श्री भगवानुवाच
अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।
स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ ६.१ ॥
श्री भगवान उद्गारले
विसंबून ना कर्मफलावर नियत कर्म जो सततच करतो
तो संन्यासी असतो आणिक तोच खरोखर योगी असतो ।
संसाराला त्यागे म्हणुनी कुणी होतसे ना संन्यासी
ना समजावे योगी त्याला बसे सोडुनी निजकार्यासी ॥ ६.१ ॥
यं सन्न्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।
न ह्यसंन्यस्तसङ्कल्पो योगी भवति कश्चन ॥ ६.२ ॥
[श्री भगवान उद्गारले]
संन्यास सारे म्हणती जयाला ।
तू योग पार्था! मानी तयाला॥
जो ऐहिकाशी गुंतून राही ।
योगी कधीही तो होत नाही ॥ ६.२ ॥
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ६.३ ॥
[श्री भगवान उद्गारले]
ज्ञानाच्या त्या सोपानावर मननशील जो चढू इच्छितो
अपेक्षेविना कर्म करोनी प्रथम पायरी चढून जातो ।
जेव्हा नंतर दूर ठेवितो विषयविचारा मनापासुनी
तो योगी मग बैसे तेथे योगावर आरूढ होउनी ॥ ६.३ ॥
*यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते* ।
*सर्वसङ्कल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते* ॥ ६.४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
विषयी कुठल्या रमत नसे तो ।
कर्मामध्ये ना गुंते तो ॥
विचार ऐहिक दूर जाहला ।
म्हणती “योगारूढ” तयाला ॥ ६.४ ॥
*उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्* ।
*आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः* ॥ ६.५ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
विषयी न गुंते ऐशा मनाने उद्धार अपुला आपण करावा
गुंतून विषयी होतोच नक्की जो नाश अपुला तो आवरावा ।
जेव्हा कुणाचे मन मुक्त राही होई स्वतः तो बंधू स्वतःचा
अडकेल जेव्हा विषयात तेव्हा तो मात्र होई शत्रू तयाचा ॥ ६.५ ॥
*बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः* ।
*अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्* ॥ ६.६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
मन-इन्द्रियांना जिंकून घेई त्याचे स्वतःचे मन मित्र होई ।
अन् तेच वागे शत्रूप्रमाणे जेव्हा स्वतःच्या ताब्यात नाही ॥ ६.६ ॥
