|| हरिरेव जगत ||
एकदा परिक्रमेत असताना मैयाच्या दक्षिण तटावरील मणी नागेश्वर मंदिराच्या प्रांगणातील आश्रमाच्या एका खोलीत आम्ही आसन लावलं होतं. पांच पंचवीस पायऱ्यांचा सुंदर बांधीव घाट आहे. समोरच सुंदर भव्य पिंपळवृक्ष आहे.
नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे ब्राम्ह मुहूर्तावर तीन वाजताच जाग आली पण आज फार लांब जायचं नव्हतं भालोदलाच मुक्काम असणार होता कारण दत्तजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे भालोदच्या एकमुखी दत्तमंदिरात. आपले शरदचंद्र प्रतापे महाराज पुढे जाऊच देणार नाहीत.त्यामुळे झोपावं अजुन थोडावेळ असं म्हणत स्वतःला पांघरुणात गुरफटून घेतलं. पण आता झोप लागणं शक्यच नव्हतं म्हणून उठून थंडीचा जामानिमा सांभाळत खोलीचं दार उघडून बाहेर पडले आणि घाटाच्या थोड्या पायऱ्या उतरुन एका ठिकाणी बसले.
सहज नजर वर गेली आणि तो अश्वत्थ वृक्ष मला उर्ध्वमूल अध:शाखा असाच वाटला. जणू त्याची मुळं अनंत आकाशात पसरली आहेत आणि माझ्या दृष्टीपथात येतंच नाहियेत असं काहीतरी वाटलं म्हणून मी नजरेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नजर फिरवली आणि असं वाटलं की प्रत्येक छोट्या मोठ्या फांदीवर बहार आली आहे. आणि पिकून तेजस्वी झालेली खिरणीची फळे म्हणजे पिंपळी आकाशभर पसरली आहेत.आश्चर्याने बघत असताना माझी नजर खाली वळली तर अहो आश्चर्यम् खाली सुद्धा तसंच दृश्य दिसत होतं. हजारो चांदण्या इथेही चमकत होत्या. अरे! हा तर मैयाचा जल दर्पण आहे. असा आरसा मी कधीच पाहिला नव्हता.
आकाशातील तारकापुंज आपलं सुंदर रुप मैयाच्या जलदर्पणात न्याहाळत होते. वाऱ्याची झुळूक आली की मैयाजलावर शिरशिरी येत होती आणि ते प्रतिबिंबही थंडीमुळे थरथरत होते. अप्रतिम सुंदर प्रभुदर्शन होतं ते.
अरुणोदय होऊ लागला होता पुर्वा उषा राणीच्या स्वागतासाठी सोनेरी केशरी रंगाचा सडा नभांगणात घालु लागली होती. तेव्हा तारकांना वाटलं असावं की अरुणकाका विचारतील इथे काय करताय अजुन? म्हणून एक एक चांदणी हळुच गायब होऊ लागली. मला पत्ताही न लागु देता सगळ्या चांदण्या प्रकाशाच्या पडद्याआड गायब झाल्या.
माझ्या समोर वाहात होती सुंदर नीलश्यामल नर्मदामैया. रात्रीच्या अंधारात झाकलेलं ते अद्भुत रुप सुंदर सोनेरी जरतारी साडीची घडी उलगडावी तसं उलगडून माझ्यासमोर दिसू लागलं. आता कसं वर्णन करुं त्या रुपाचं? शब्दच सुचत नाहीयेत मला. एवढंच समजत होतं की या दृश्याचा कण अन् कण जागा होतोय. माझ्या उजव्या डाव्या दोन्ही बाजुंचे वृक्ष झोपेतुन जागे होत ताजेतवाने होताहेत.त्यांचं एकेक पान थंड हवेच्या झोक्याने खिलखिलुन उठते आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या फांदीवर नवीन जीवन हसू लागलय.
मैयाच्या अतिशुद्ध सुंदर जलालाही स्फुरण चढले आहे आणि एक लाट दुसऱ्या लाटेला धक्का देत गीत गात पुढे जात आहे. जलातील माशांनाही कुणीतरी सांगितलं, सुर्योदय झाला आहे तर तेही पटकन वर येऊन खरंच सुर्योदय झाला आहे हे पाहुन लगेच मैयाच्या कुशीत शिरत होते.
मला वाटलं की मैयाच्या किनाऱ्यावरील रेतीचा कण आणि कण जीवंत झाला आहे. जर मी त्यांच्याशी बोलायला लागले तर तेही माझ्याशी बोलू लागतील. इथल्या तपस्वीं बद्दल त्यांच्या खडतर तपस्ये बद्दल, त्यांच्या इतिहासा बद्दल सांगतील. साधुसंत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रेती,ही वाळु त्या तपस्वी साधुमहात्म्यांच्या नर्मदा पर्यटना बद्दल, त्यांनी केलेल्या परिक्रमांबद्दल,मैयाला मिळणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या सरितां बद्दल वर्णन करुन करुन सांगतील.हा सारा परिसर परिक्रमावासी तपस्वींचे गुणगान करायला लागेल.
हे चैतन्य कसं निर्माण झालं असेल? की प्रारंभापासूनच हे असंच आहे? आणि एकदम संस्कृत शिकत असताना वाचलेलं आठवलं.
” यच्च कश्चित जगत् सर्वम् दृश्यते श्रुयतेs पिवा |
अन्तर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण: स्थित: ||”
जे काही आत बाहेर दिसतं,ऐकू येतं ते सर्व नारायणाने व्याप्त आहे. हरिरेव जगत,हरिरेव जगत.
