भविष्यातला गणेशोत्सव – श्री सुधीर एरंडे

भविष्यातला गणेशोत्सव

सन २०५० चा भाद्रपद महिना. आजोबा दिवाणखान्यात आरामखुर्चीत बसून जुन्या आठवणींत हरवले होते, तर त्यांचा १४ वर्षांचा नातू अद्विक आपल्या डोळ्यांवर ‘ 3 डी व्हर्च्युअल रिॲलिटी’चा चष्मा चढवून हवेतच हातवारे करत होता.

“अरे अद्विक, आज रविवार ; बाप्पाची स्थापना झाली ना रे मंडळांमध्ये?” आजोबांनी विचारले.(बर्याच वर्षांपासून लोकांची सवड बघून रविवारी सुट्टी च्या दिवशी च एक दिवसाचा गणपती उत्सव करायची प्रथा चालू झाली होती).

अद्विक ने चष्मा कपाळावर सरकवला आणि म्हणाला, “हो आजोबा! सकाळी ९:०० वाजता झूम वर प्रतिष्ठापना झाली. मी मोबाईल स्क्रीन वरच अक्षता टाकल्या. सुपर डूपर लाईव विडिओ होता, खुप वायरल झाला व त्याला जबरदस्त लाईक्स मिळाले,आणि हो, संध्याकाळी ६:०० वाजता मंडळाची आरती आहे, लिंक आलीय व्हॉट्सॲपवर. तुम्ही लॉग-इन करणार ना?”

आजोबांनी कपाळावर हात मारून घेतला. “अरे काय चाललंय हे? आमच्या काळात गणपती असा एका दिवसात, तोही मोबाईल वर उरकला जात नव्हता. पूर्ण पांच दिवस सगळीकडे नुसता जल्लोष असायचा!
“पांच दिवस”?” अद्विक चे डोळे विस्फारले, “एवढा फावला वेळ कोणाकडे असायचा आजोबा?

आणि मग मुलांचा अभ्यास आणि मोठ्यांच्या ऑफिस चे काय?

आता तर एक दिवसाचा सार्वजनिक उत्सव करायचा ठरवला तर स्थानिक प्रशासना कडून बर्याच परवानग्या, साउंड डेसिबल कंट्रोल, वाटर कंजंम्शन अंडरटेकिंगस्, ग्लोबल वार्मिंग टेक्स इत्यादी फार्मेलिटीस् कराव्या लागतात.

आजोबा मिश्कीलपणे हसले, “अरे वेड्या, आम्ही दहा दिवस मंडपात च असायचो. तिथेच चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व, फॅन्सी ड्रेस व इतर सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे.लहान मुली, बायका सुंदर रांगोळ्या काढायच्या. रोज रात्री वेगवेगळ्या मेन्यू चे स्वादिष्ट जेवण असायचे, आणि महाप्रसाद? त्याचा थाट तर विचारूच नको,पंगतीत बसून गरमा गरम मसालेभात आणि जिलेबी खायची जी मजा होती, ती आता कुठे?”

“बापरे! म्हणजे गर्दीत जाऊन एकत्र जेवत होता तुम्ही लोक्स! भलतेच काही तरी?” अद्विक ने आश्चर्याने विचारले, “आता तसं काही नसतं. आपल्या मंडळाने थेट झोमॅटो शी टाय-अप केलंय. बरोबर दुपारी १२:३० वाजता ‘ड्रोन’ने बाप्पाचा मोदक-प्रसाद बाल्कनीत ड्रॉप केला, आणि स्पर्धा तर आमच्या इन्स्टा-रीलवर होतात, ज्याच्या व्हिडीओला जास्त लाईक्स तो वीनर!”

आजोबा: आमच्या वेळेस पण कोरोना मुळे‌ व नंतर भाग घेणारी मुले कमी झाल्या वर आँनलाईन स्पर्धा सुरू झाल्याच होत्या म्हणा.

“आणि विसर्जन कस करणार बाप्पा चे ?” आजोबांनी हताश होऊन विचारले.

“ते तर एकदम सिम्पल आहे आजोबा! नदी किंवा समुद्रात जायला बंदी आहे ना, आजकाल मातीच्या मूर्ती कोणी बनवतच नाही ,त्यामुळे मंडळात एकच पंचधातूची मूर्ती आहे. संध्याकाळी गुरुजी कॅमेऱ्या समोर मंत्र म्हणून ताम्हणात विसर्जन उरकतील, आम्ही घरात बसून ‘इमोजी’ पाठवून ‘पुढच्या वर्षी लवकर या’ टाईप करणार. संपला विषय! रस्त्यावर मिरवणूक काढण्यास ट्रेफीक जाम च्या समस्ये मुळे परवानगी मिळणे कठीण आहे, व गणपती बाप्पा मोरया वगैरे धार्मिक स्लोगनस् वर पण सरकारच्या धर्मनिरपेक्ष धोरणानुसार बंदी आहे, अद्विक ने अगदी प्रॅक्टिकल उत्तर दिले.

हे ऐकून आजोबांच्या छातीत धस्स झाले. ढोल-ताशांचा तो गजर, गुलाल, बाप्पाच्या पाया पडताना जाणवणारा तो भक्तिभाव… सगळं काही स्क्रीन च्या काचे आड बंदिस्त झालं होत, देवही डिजिटल झाला होता आणि लोकांच्या भावना कोरड्या झाल्या होत्या.
“देवा बाप्पा, काय ही दशा!” आजोबांचा श्वास अडकला, त्यांच्या अंगातून भीतीने घामाची धार वाहू लागली…

…….आणि अचानक जोरात ‘ताशाचा’ आवाज कानावर पडला. धडपडत आजोबांचे डोळे उघडले. समोर बघतात तर काय, ‌बाळ अद्विक खिडकीत उभा राहून खाली रस्त्यावरून जाणाऱ्या गणपतीच्या आगमनानिमित्त पथकाची गाथा बाज्याची मिरवणूक बघून खुश होत होता.

घरात उकडीच्या मोदकांचा खमंग सुवास दरवळत होता आणि सोसायटीच्या मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी गोळा करण्यासाठी हातात पावती पुस्तक घेऊन दारात उभे होते.

आजोबांनी सुटकेचा मोठा निश्वास सोडला.ते केवळ एक भयंकर दुःस्वप्न होतं! त्यांनी हात जोडले आणि बाप्पाच्या फोटोकडे पाहत मनातल्या मनात म्हणाले, “देवा, बाकी काहीही बदलू दे, पण माणसां मधला हा जिवंत उत्सव आणि भक्ती अशी मोबाईल च्या स्क्रीन मध्ये कधी ही कैद होऊ देऊ नकोस!”

गणपती बाप्पा मोरया 🌹 🙏

सुधीर एरंडे

अध्यक्ष
पूर्वांचल महाराष्ट्र मंडळ