गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ७

*॥ अध्याय ७ ॥*
*ज्ञानविज्ञानयोग*

ज्ञानविज्ञानयोग नावाच्या या अध्यायात भगवान श्रीकृष्ण त्यांचे स्वरूप आणि प्रचीती याविषयी अर्जुनाला समजावून सांगतात – पंचमहाभुते, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारांनी दृष्टिगोचर होणारी व्यक्त प्रकृती आणि त्याच्याही वर सर्वाभूती वसलेली आणि या जगाची चालनशक्ती असलेली चैतन्यरूपी अव्यक्त प्रकृती अशी माझी दुहेरी प्रकृती आहे. त्यातूनच हे विश्व निर्माण झाले आहे आणि त्यात असणाऱ्या साऱ्याचाच प्रभव आणि प्रलय मीच आहे. हे सगळे एखाद्या माळेसारखे माझ्यात गुंफले आहे.

माझी अव्यक्त प्रकृती कशी अनुभवाला येते ते सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात – पाण्यातले माधुर्य, रविचंद्रांची प्रभा, वेदातील ॐकार, आकाशीचा शब्द, पुरुषातील पौरुष, पृथ्वीतील गंध, भास्कराचे तेज, सर्व प्राण्यातील जीव, तपस्व्यांचे तप, बुद्धीवंतांची बुद्धी, समर्थांचे सामर्थ्य – हे सारे मीच आहे.

प्रकृतीतून उद्भवणाऱ्या त्रिगुणयुक्त भावांचे कारण जरी मी असलो तरी मी त्यांच्यात नाही आणि तेही माझ्यात नाहीत. या त्रिगुणयुक्त भावांमुळे सर्वजण भ्रमित होतात आणि या भावांच्या पलिकडे असलेल्या मला ओळखत नाहीत.

हे अर्जुना! चार प्रकारचे लोक माझी पूजा करतात. जिज्ञासू, धनाभिलाषी, दुःखीकष्टी आणि ज्ञानी. त्यातही माझी भक्ती करणारा ज्ञानी मला सर्वात अधिक प्रिय असतो.

सामान्य जन मनात विविध इच्छा धरून श्रद्धेने अनेक देवदेवतांची पूजा करतात. मी त्यांची श्रद्धा दृढ करतो, त्यांना त्या पूजेचे फळ मिळते पण त्यांना हे माहीत नसते की मीच त्या फळाचा दाता आहे. मी अव्यक्त आहे, अविनाशी आहे पण अज्ञानाने भ्रमित झालेले जन मला व्यक्त समजतात. भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळातील सर्वांनाच मी जाणतो पण ते मात्र मला जाणत नाहीत.

जरामरणातून सुटण्यासाठी जे यत्नशील असतात तेच खरे ब्रह्मस्वरूप – अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ यांच्यासहित – जाणतात. अगदी मरणाच्या दारातही ते माझ्याच रूपात समर्पित राहतात.

श्री भगवानुवाच
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छ्रुणु ॥ ७.१ ॥

श्री भगवान उद्गारले
योगाभ्यासे माझ्यातच मन आणिक माझ्या आधाराने ।
ऐक कसा मज जाणशील तू आशंकेविण सर्वार्थाने ॥ ७.१ ॥

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥ ७.२ ॥

[श्री भगवान उद्गारले]
हे अर्जुना! मी सांगेन तुजला अनुभवसमेता या सर्व ज्ञाना ।
जाणून घेता ते ज्ञान येथे मग जाणण्याचे काही उरे ना ॥ ७.२ ॥

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।
यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः ॥ ७.३ ॥

[श्री भगवान उद्गारले]
सहस्रात एखादा मानव या ज्ञानास्तव प्रयत्न करतो ।
प्रयत्न करिती त्यांच्यामध्ये एखादा मज पूर्ण जाणतो ॥ ७.३ ॥