गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ८
*॥ अध्याय ८ ॥*
*अक्षरब्रह्मयोग*
सातव्या अध्यायाच्या शेवटच्या दोन श्लोकात भगवान श्रीकृष्ण “ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ” असे शब्द उच्चारतात आणि अर्जुन त्याविषयीचे स्पष्टीकरण या अध्यायाच्या सुरवातीला विचारतो. भगवान श्रीकृष्ण त्या शब्दांचा अर्थ उलगडून सांगतात आणि हेदेखील समजावितात की अंतकाळी हे शरीर सोडून जाताना माणूस ज्या गोष्टींचे चिंतन करतो त्याच त्याला प्राप्त होतात.
जे अंतिम ध्येय आहे ते परमपद कसे आहे, तिथे कसे पोहोचता येईल याविषयीचे ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या अध्यायात विशद करतात.
प्रजापती ब्रह्मदेवाच्या अव्यक्त रूपापासून – त्याचा दिवस उगवला की सर्वजण जन्माला येतात आणि त्याची रात्र पसरली की त्याच्यातच विलय पावतात.
परमपद किंवा “ब्रह्म” हे एका परमपुरुषाच्या प्रतीकात्मक रूपात इथे कल्पिलेले आहे. जो सदासर्वकाळ त्या परमात्म्याचाच विचार एकाग्र चित्ताने करतो तो निश्चित त्या परमपदापर्यंत पोहोचतो. ते ब्रह्म अक्षय, चिरंतन, सर्वज्ञ, तेजस्वी आणि अचिन्त्य आहे. हा देह सोडताना शारीरिक आणि मानसिक स्थिती कशी असावी हे भगवान श्रीकृष्ण उलगडून सांगतात. ब्रह्मलोकापर्यंत न पोहोचता इतर लोकात जाणाऱ्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो पण जेव्हा “ब्रह्म” प्राप्त होते तेव्हा माणसाला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात – हे अनश्वर ब्रह्म प्रजापतीच्याही वर आहे आणि तेच माझे निवासस्थान आहे.
हा देह सोडताना कोणते दोन मार्ग आहेत आणि त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यावर मोक्ष आणि कोणत्या मार्गाने गेल्यावर पुनर्जन्म मिळतो याचे विवेचन भगवान श्रीकृष्ण अध्यायाच्या शेवटी करतात.
_अर्जुन उवाच_
*किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम* ।
*अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते* ॥ ८.१ ॥
*अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन* ।
*प्रयाणकालेच च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः* ॥ ८.२ ॥
अर्जुन उद्गारला
ब्रह्म आहे कसे आणिक कर्म अन् अध्यात्म आहे? ।
काय ते अधिभूत असते? काय ते अधिदैव आहे ?॥ ८.१ ॥
आणि कुठला याच देही तो कसा अधियज्ञ आहे? ।
जीवनांती कसा योगी केशवा! तुज जाणताहे?॥ ८.२ ॥
_श्रीभगवानुवाच_
*अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते* ।
*भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः* ॥ ८.३ ॥
_श्री भगवान उद्गारले_
अत्युच्च अव्यय ते “ब्रह्म” राहे देहात आत्मा “अध्यात्म” आहे ।
जे जीव त्यांचा उद्भव जयाने तो यज्ञ करणे हे “कर्म” आहे ॥ ८.३ ॥
*अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्* ।
*अधियज्ञोऽहमेवमात्र देहे देहभृतां वर* ॥ ८.४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
“अधिदैव” वदती त्या ब्रह्मदेवा, जे नष्ट होई “अधिभूत” आहे ।
नरश्रेष्ठ पार्था! देहात साक्षी तो मीच केवळ “अधियज्ञ” आहे ॥ ८.४ ॥
