|| अष्टविनायक दर्शन पदयात्रा प्रेरणा व प्रारंभ ||
मोरया मोरया मी बाळ तानहे |
तुझीच सेवा करु काय जाणे |
अन्याय माझे कोट्यानुकोटी |
मोरेश्वरा बा तू घाल पोटी ||
परिक्रमा बंधू श्री.मोहन केळकर आणि परिक्रमा भगिनी अनुपमा देवधर यांनी अष्टविनायक दर्शन पदयात्रा केली व एक छोटेसे पुस्तक लिहून प्रकाशित केले. नाशिकच्या एका पुस्तक प्रदर्शनात मी ते घेतले आणि ठरवले ही यात्रा करायची. मोरया आणि नर्मदामैया, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांची प्रार्थना करुन परवानगी मागितली त्यांनीही लगेच होकाराचा कौल दिला. मोहनभाऊ आणि त्यांच्या बरोबर ज्यांनी ही पदयात्रा केली होती त्या साठे यांच्याशी फोनवर बोलले.पुस्तकात जे फोन नंबर दिलेले होते त्यांना फोन करुन आम्ही पदयात्रा करणार आहोत असे सांगितल्यावर सर्वांनी अगदी मनापासून या,स्वागत आहे असे सांगितले.
आमचा मित्र बंधू श्री. रविंद्र पवार आमच्या बरोबर येणार म्हणाला. आम्ही महड येथील वरदविनायक गणपतीचा आशिर्वाद घेऊन तिथूनच पदयात्रा उचलायची असे ठरवले. आणि मग भुसावळ – पुणे हुतात्मा एक्स्प्रेसचे ८ जानेवारी २०१७ चे तिकीट केले. आमची परिक्रमेची सॅक तर नेहेमी तयारच असते. चला आपण सर्वजण आता २०२६च्या भाद्रपद महिन्यात दुर्गामातेच्या पवित्र शुक्रवारी ही मानसिक पदयात्रा उचलूया.
अष्टविनायक दर्शन पदयात्रा – दिवस पहिला – महड ते जांभुळपाडा.
आम्ही पदयात्री – श्री. रत्नाकर परांजपे,सौ. वंदना रत्नाकर परांजपे, श्री. रविंद्र पवार.
पहाटे सर्व आवरुन सॅक घेऊनच मंदिरात गेलो. निवांतपणे दर्शन झाले. प्रदक्षिणा करेतो श्री.अशोक तट्टू गुरुजी आले त्यांनी छान संकल्पपुजा करवून घेतली व एक नारळ दिला प्रत्येक गणपती समोर तो ठेवून प्रार्थना करायची व पुन्हा उचलून घ्यायचा असे सर्व अष्टविनायक स्थानी करायचं व पुन्हा महाडला येऊन संकल्प पुर्ति करायची असं सांगितलं. जय हो मोरया की,नर्मदे हर, सद्गुरु नाथ महाराज की जय,जय जय रघुवीर समर्थ.असा जयजयकार करुन सॅक पाठीवर घेऊन पहिले पाऊल उचलले. गुरुजींच्या घरा जवळूनच पुढचा मार्ग आहे म्हणून त्यांच्याच बरोबर घरी गेलो आणि चहा प्रसाद घेऊन निघालो तेव्हा घड्याळात सकाळचे सात वाजले होते.
धाकटी पंढरी. इथे भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे.दर्शन घेऊन पुढे निघालो. ताकई, पाली फाटा, सारसन,इसंबाफाटा, आठ वाजले होते म्हणून एका टपरीत बसून चहा घेतला.पुढे पुण्याला जाणारा एक्स्प्रेस वे क्रॉस करुन पाली कडे जाणाऱ्या रोडने पुढे निघालो. देवन्हावे इथे श्री. नितिन चौधरी यांनी हाक मारली व बालभोग चहा प्रसाद घेण्याचा आग्रह केला. मनात असलेला मोरया म्हणाला, फक्त आमची भगिनी नर्मदा हिची परिक्रमा करत असतानाच सेवाभावी लोक भेटतात असं नाही बरं.इथे माझे भक्त ही तितकेच सेवाव्रती असतात. मानलं बाबा मानलं. मी मनोमन मोरयाला दंडवत घातला. आणि पोहे, चहा प्रसाद घेतला. बालभोग स्वादिष्ट होता.
आमची तीन डब्यांची विनोबा एक्स्प्रेस निघाली तेव्हा घड्याळात सकाळचे नऊ वाजले होते. ठाणे न्हावे,सांदडा,मिरगुटवाडी नंतर सांगडीघाट सुरु झाला. दुतर्फा छान मोठे मोठे वृक्ष असल्याने उन लागत नव्हते पण खडा घाट असल्याने दमछाक मात्र होत होती. घाटमाथ्यावर कोकणतडका नावाचा ढाबा लागला. साडेदहा वाजले होते.ढाब्या पुढच्या अंगणातील खुर्च्यांवर बसलो. विनोबा एक्स्प्रेसच्या पोटरुपी इंजिनमधे चहारुपी इंधन भरले आणि ग्रिन सिग्नल दिला.
घाटातील चढ उतार उंबरखिंडी पर्यंत चालूच होता. उंबर खिंडीत उजवीकडे श्री महाकाली, श्री हनुमानाचे सुंदर मंदिर आहे. प्रांगणात बसलो. जवळचे फराळाचे खाल्ले. शेजारीच राहणाऱ्या शेवंताबाई साळुंके यांनी थंडगार पाणी दिले.त्या शेतातली हळकुंडे बियाण्यांसाठी निवडत होत्या मला दिली पांच सहा हळकुंडे. मी नंतर पावसाळ्यात ती कुंडीत लावली छान आली रोपे.मग हळदीच्या पानांवरचे पातोळे,मोदक वगैरे केले होते. साडेबारा वाजता पुढे निघालो.तुकसई, दुरशेत,सुरांडा,नानोसे,दुधाणे वाडी, कासारवाडी फाटा,परळी मजल दर मजल करत जांभुळपाडा येथे पोहोचलो तेव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते. इथल्या गावदेवी मंदिराचे पुजारी निवास व भोजनप्रसाद व्यवस्था करतात. पण माझा चुलतभाऊ बाबा अभ्यंकर याचे घर आणि त्याचे मुलगे विजय, वासुदेव ह्यांनी आपल्या शेतात बाबाच्या नांवाचे यशवंत कृषि पर्यटन केंद्र सुरु केले आहे म्हणून आधी बाबाच्या घरी गेलो.वहिनीला बऱ्याच वर्षांनी पाहिले. खूप आनंद झाला. विजय,वासुदेव, रामकृष्ण हे तिघे माझे भाचे आधुनिक तंत्रज्ञान वापरत उत्तम शेती करतात आणि कृषि पर्यटन केंद्राचा व्यवसाय ही उत्तम चालतो. खूप बरं वाटलं सर्व पाहुन. खूप गप्पा चहापाणी नंतर सुग्रास जेवण झाले.आता निद्रादेवीची आराधना. आज २५ किलोमीटर चालणे झाले.
अष्टविनायक दर्शन पदयात्रा दिवस दुसरा
सोलरच्या गरम पाण्याने स्नान करुन नर्मदाष्टकादि नित्यपाठ केला व चहा प्रसाद घेऊन प्रस्थान केले तेव्हा पहाटेचे साडेपाच वाजले होते. जांभापाडा,कानसळ,पेडली,भोमसुल,तिवरे इथे अंबामैया पुलावरुन पार केली. क्षणभर पुलावर उभे राहिलो.शांत हिरवट झाक असलेले अंबाजल,त्यावर पडलेली सोनेरी कोवळी सुर्य किरणे. दोन्ही किनाऱ्यावर असलेली वृक्षराजी गवतावर फुललेली रंगीबिरंगी छोटी छोटी रानफुले सारंच खूप सुंदर. खुरावला फाटा बसस्टॉप जवळ श्री.नरेंद्र मोरे यांची चहाची टपरी होती त्यांनी पायी जात असलेले पासुन हाक मारली. मोरया पुन्हा मनात गुणगुणला, इथे या माझ्या दर्शन पदयात्रेतही परिक्रमे सारखेच आदरातिथ्य मिळणार आहे बरं. मी हसून मनोमन हात जोडून नमस्कार केला.चहा घेऊन पुढे निघालो तेव्हा घड्याळात सकाळचे साडेआठ वाजले होते.
चिवफाटा, मजरेफाटा,वावे, घोड्याचा डोह, इथे शिवाजी महाराज व मावळे सुधागडावर जाता येता या डोहावर घोड्यांना पाणी पाजत विश्रांती देत. पुढे रासळ,आंबोले आणि पाली. मोहनभाऊ केळकर यांनी सांगितलेले श्री.प्रदीप मेहता यांचे घर वाटेतच होते. ह्या प्रदीप मेहता यांच्या नांदगांव येथील घरी आज आमचा मुक्काम असणार आहे. हे प्रदीप मेहता आमच्या जांभुळपाड्याच्या डॉ.गोगटे यांचे जावई असल्याचे काल वहिनीने सांगितले होते. चहा पाणी झाल्यावर आम्ही मोरयाच्या दर्शनासाठी निघालो. जवळ जवळ दोन वर्षांनी माझा मोरया मला असा मंदिरात भेटणार होता. मोरया! माझा देव,माझा सखा,माझं सर्वस्व.मन उचंबळून आलं होतं. प्रथे प्रमाणे आधी धुंडिराज विनायक मंदिरात गेलो अजिबात गर्दी नव्हती. हा मोरयाचा मोठा भाऊ, दर्शन घेऊन नमस्कार केला आणि त्याला अष्टविनायक पदयात्रा संपन्न करवून घे अशी प्रार्थना केली आणि त्याला उजवी घालुन बल्लाळेश्वर मंदिरात गेलो.मी उंदीर मामांच्या कानात मी आल्याचा निरोप दिला आणि सरळ गाभाऱ्यात शिरले आणि मोरयासमोर बसून घेतलं डोळ्यातुन घळा घळा अश्रू वाहात होते.मोरयाशी काय बोलू कसं बोलू काही समजत नव्हतं. मोरयाचा कृपाहस्त माझ्या डोक्यावरुन पाठीवरुन हळूवार फिरत असल्याचे जाणवत होते. कितीवेळ गेला माहीत नाही.ह्यांनी भानावर आणले व मग मी त्यांनी आणलेल्या पुजेच्या थाळीतली फुले दुर्वा मोरयाच्या चरणी वाहिल्या आणि नमस्कार केला. यांनी व रविने पंडीतजींना आमच्या पदयात्रेबद्दल सांगितलं व म्हणून आणलेला नारळ मोरयाच्या चरणी लावून परत घेतला.
ऑफिसमध्ये जाऊन अभिषेकाची व भोजन प्रसादाची पावती केली व मंदिरा शेजारीच असलेल्या माझ्या अक्काच्या माझ्या सर्वात मोठ्या बहिणीच्या घरी गेलो. माझी अक्का तर १९९७ सालीच गेली पण भाचा राजा रानडे व त्यांचे कुटुंब आहे. आम्ही येणार म्हणून राजा घरीच होता. राजा आणि मी वयाने बरोबरीचे आहोत. पण मी मावशी आणि तो भाचा.तसे त्याचे नांव श्री.भालचंद्र विनायक रानडे आहे. आज आम्ही त्याच्या घरी भोजन न करता प्रसादालयात भोजन प्रसाद घेणार व इथे न राहता पुढे नांदगांवला मुक्कामाला जाणार हे ऐकल्यावर थोडा नाराज झाला पण पदयात्री असल्याने प्रसादालयात प्रसाद घ्यायला हवा हे त्याला पटले.
दुपारी एक वाजता पुढे प्रस्थान केले. झाप फाटा,वावळोली, सिद्धेश्वर हे टेकडीवर मंदिर आहे पण तिथे कुणीच नव्हते मंदिर बंद होते. खाली एकवीस गणपती मंदिर आहे पण तेही बंद होते. देवांची विश्रांती चालली होती.
शरदवाडीफाटा, घाटात नांदगांवला जाणारे प्रदीप मेहता भेटले त्यांनी आमच्या सॅक गाडीतुन नेल्या. थोड्याच वेळात घाट उतरणे सुरु झाले.घाट गर्द वनराईने नटलेला आहे. गोगुलवाडी,पोटलुस नंतर नांदगांव आले तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते.
प्रदीप मेहता यांच्या घरी पोहोचलो.प्रदीप पालीला राहतात इथे श्री. व सौ. दक्षता दर्शन मराठे व त्यांची दिव्या व विनायक ही मुले असे केअरटेकर राहतात. चहापाणी झाल्यावर प्रदीप पालीला परत गेले.
मोरया! छानच व्यवस्था झाली. स्वादिष्ट भोजन प्रसाद मिळाला. आता विश्रांती.आज ३० किलोमीटर चालणे झाले.
अष्टविनायक दर्शन पदयात्रा, दिवस तिसरा – नांदगांव ते कोंडेथर.
स्नान नित्य पाठ करुन चहा घेऊन दक्षताचा निरोप घेऊन पहाटे सहा वाजता प्रस्थान केले.
कोलशेत फाटा येथून घाट सुरु झाला. तसा खडा घाट आहे पण सकाळची वेळ, घनदाट झाडी त्यामुळे सहज चढून उतरलोही.ओताणे नंतर रवाळजे येथे हॉटेल साई मधे चहा,वडापाव असा बालभोग घेतला. हॉटेल मालक श्री. शिवाजी रामचंद्र दळवी हे पालीचे राहणारे आहेत. नर्मदे हर.
पुढे भिरा उन्नयी डॅम,कुंडलिका कॅनॉल खूप सुंदर निसर्गरम्य साइट आहे.दुरालीवाडी,साज,साज आदिवासी वाडी येथून विळे घाट सुरु झाला.घाटात दुतर्फा गोल्ड कोकण व्हॅली ही श्रीमंतांच्या मोठमोठ्या सुंदर सुंदर बंगल्यांची कॉलनी आहे. दुसरे लवासाच म्हणा ना. जंगलात असे बंगले बांधायला परवानगी तरी कशी मिळते?
या घाटातुन पश्चिमेकडचा रोड महाडला जातो तर पुर्वेकडील पुण्याला.आपल्याला पुण्याकडेच जायचं आहे. घाट उतरुन विळे परसगांवनाका येथे पोहोचलो तेव्हा साडेदहा वाजुन गेले होते. सौरभ हॉटेलमध्ये तिथेच भेटलेल्या श्री.नामदेव ताम्हनकर यांनी बटाटेवडे, भजी, चहा असा पोटभर बालभोग खाऊ घातला व तिथेच असलेल्या सुंदर भव्य दत्तमंदिरात घेऊन गेले. सुंदर तेजस्वी दत्तमहाराजांचे दर्शन घेऊन पुढे निघालो. इथे पदयात्रींची निवास व्यवस्था करु असे श्री. नामदेव ताम्हनकर यांनी सांगितले. नर्मदे हर.
भागाड MIDC खूप मोठा इंडस्ट्रीयल एरिया आहे. विळे सणसवाडी येथे सुभाष म्हस्के हा निरंकारी बाबा भक्त भेटला त्याने आग्रहाने त्यांच्या चहाच्या टपरीवर नेले.थंडगार जलपान केल्यावर एवढ्या भर उन्हात चहा घ्यावाच लागला. मैयाच्या परिक्रमेची आठवण झाली. दर एक दोन किलोमीटरवर असा चहा प्रसाद घ्यावाच लागतो. नर्मदे हर.
इथून म्हणे डोंगरातील पायवाटेने फक्त सात किलोमीटर अंतरावर ताम्हिणी आहे. पण डोंगर म्हणजे सह्याद्री आहे. बेलाग कडे असलेला माहीतगार नसताना आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांनी हे धाडस करणे योग्य नाही असा विचार करून आम्ही हायवेनेच जायचे ठरवले. जय हो मोरया की.नर्मदे हर.
घाट सुरु झाला. पुणे महाड जोडणारा हायवे असला तरी ट्रॅफिक फारशी नव्हतीच. जंगल म्हणावे अशी झाडीही नव्हती. उन तापले होते. पण जीवन चलनेका नाम चलते रहो सुबह शाम.
खड्या चढाईचा एक डोंगर संपत आला की वळणावर वाटायचं आता घाट उतरायचा असेल पण sss वळण पार केले की समोर दुसरा डोंगर उभा ठाकलेला असायचा.
हा घाट एवढा खडा आणि मोठा लांबलचक तर तो प्रसिद्ध ताम्हणीघाट किती कठीण असेल असा विचार करत उठत बसत जवळचे पाणी पुरवून पुरवून पित,लिमलेटच्या गोळ्या चघळत नुसते चढतच होतो. चढतच होतो. संध्याकाळचे पांच वाजले होते आणि आम्हाला हवी असलेली कोंडेथर ही पाटी दिसली.
या कोंडेथर गावातच आमचा मुक्काम आज होणार होता. रस्त्यावर एकजण काम करत होता त्याला विचारलं कोंडेथर गांव हेच आहे ना? त्याने खाली दरीत वसलेल्या गांवाकडे बोट दाखवले. बाप रे! आता एवढा डोंगर उतरुन जायचं? रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीच्या गार्ड सिमेंट ओट्यावर तिघांनीही बसून घेतलं.मोरया!मैया!
आम्हाला मोहनभाऊ केळकर यांनी पुस्तकात सांगितलेल्या शिवराज ढाबा इथे जायचं होतं. त्या कामगार भाऊला विचारले तर शिवराज ढाबा ह्याच रस्त्यावर सरळ पुढे अजून दोन किलोमीटरवर होता.
संध्याकाळ झाली होती.काळोख पडायला लागला होता. परांजपे आणि पवार दोघे पुढे चालत होते रस्त्याच्या कडेला एक मंदिर होते पुजारी दिवाबत्ती करुन चालले होते त्यांना विचारले की आम्ही इथे या मंदिरात आज मुक्काम करु का? उद्या लवकरच पुढे जाऊ.पुजारी म्हणाले हा जंगल एरिया आहे मी परवानगी देऊ शकत नाही.नर्मदे हर.
आता घाट चढणे मात्र संपले होते.आम्ही घाट माथ्यावर होतो. चला निघूया. दीड किलोमीटर वर पोलिस चौकी लागली. पोलिस चौकीत राहण्यासाठी विचारले पण ते म्हणाले अशी परवानगी देता येत नाही. काय करणार? चला पुढे. इथे रायगड जिल्हा संपून पुणे जिल्हा सुरु झाला होता.
थोड्याच वेळात रस्त्याच्या डावीकडे शिवराज ढाबा आला. संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते. कॅश काऊंटर वर बसलेल्या श्री. अनंत पवार यांनी आमच्या पाठीवरील सॅक आणि आमचा दमलेला अवतार पाहून ओळखलं हे पदयात्री आहेत ते लगेच उठून पुढे आले व आम्हाला खुर्चीवर बसायला सांगून प्यायला पाणी दिले व म्हणाले, चहा घ्या आणि समोर काम चालू असलेल्या बंगल्यात जाऊन फ्रेश व्हा. तासाभरात ढाबा बंद होईल मग टेबल बाजुला करुन तुमची झोपायची सोय करतो. नर्मदे हर.
चहा घेऊन समोर गेलो. बांधकाम सुरु असल्याने सगळीकडे दगड वीटा,वाळू, सिमेंट पसरलेले होते. जवळच आवारातच छोटेसे मंदिर बांधून पुर्ण झालेले होते. शेजारी नळ होता. मंदिराच्या ओट्यावर सॅक ठेवून हातपाय धुतले व दर्शन घेऊन ओट्यावर बसलो.
आठ वाजता वेटरने जेवायला बोलावले. मटार पनीर,दाल फ्राय, तंदुरी रोटी आणि जिरा राइस असा पोटभर भोजन प्रसाद घेतला. काम करणाऱ्या मुलांनी भरभर टेबल बाजुला करुन झाडून लादी पुसून दिली. अंथरुण पांघरुण आमच्याकडे होतेच.
अनंत पवार भेटायला आले. म्हणाले पुन्हा याल तेव्हा इथे राहावे लागणार नाही बंगला तयार असेल स्वागतासाठी. आजही घरी चला म्हटलं असतं पण घर खाली गांवात आहे आणि तुम्ही फार दमलाही आहात म्हणून इथे व्यवस्था केली आहे. हरकत मुळीच नाही.आपला सेवाभाव उच्च प्रतीचा आहे आणि आम्हाला असे राहण्या झोपण्याची अशा पदयात्रा व परिक्रमा यामुळे सवय आहे. नर्मदे हर. आमचा निरोप घेऊन अनंतराव घरी गेले. आता मात्र कधी अंथरुणावर पाठ टेकतो असे झाले होते. नर्मदे हर. जय हो मोरया की.
आजही ३० किलोमीटर चालणे झाले.
अष्टविनायक दर्शन पदयात्रा दिवस चौथा
कोंडेथरच्या शिवराज ढाब्यावर काल रात्री विश्रांती झाली पण झोप म्हणावी तशी नाही झाली. पहाटे पाच वाजता उठून प्रातर्विधी केले पण तिथल्या बाथरूममध्ये स्नान करणे शक्य नव्हते. स्टाफ मेंबर झोपलेलेच होते त्यांना डिस्टर्ब न करता आम्ही निघालो तेव्हा पहाटेचे साडेपाच वाजले होते.
रस्त्याच्या दुतर्फा जंगल असल्याने व उजाडायला अजुन अवकाश असल्याने किर्र काळोखच होता. टॉर्चच्या प्रकाशात वाटचाल करणाऱ्या फक्त आम्हा तिघांच्या पावलांचा काय तो आवाज होता बाकी सर्व शांत शांत. जानेवारी महिना आहे थंडी प्रचंड आहे आणि म्हणूनच की काय पक्षीही अजुन आपापल्या घरट्यात पंखांच्या उबेत गुरफटून झोपले होते. निरव शांतता अनुभवत चालत असताना आदलवाडी गांवाचा बोर्ड दिसला गांव अर्थातच खाली डोंगराच्या पायथ्याशी होतं.
रस्त्याच्या कडेला श्री स्वामी समर्थ मंदिर आहे पण तेही बंद होते. बाहेरुन नमस्कार केला आणि पुढे निघालो. गरुडमाची इथे डोंगररांगेतुन एक तांबड्या मातीचा कच्चा रस्ता जात होता एका कुठल्यातरी रेसॉर्ट कडे. आता थोडे झुंजूमुंजू व्हायला लागलं होतं. पक्षी किलबिलाट करत जणू एकमेकांना उठवत सांगत होते की उठा उषाराणी आणि तिच्या पाठोपाठ सुरजचाचु यायला लागले आहेत. आता पोटापाण्याच्या कामाला लागायला हवं.
डोंगरवाडी फाटा आला. टाटा पॉवर प्रोजेक्टचा एका नाल्यावरील बंधारा वजा पुल आला खालुन खळाळत वाहणारे पाणी लिफ्ट करुन वीजनिर्मिती केली जाते.सभोवताली असलेल्या घनदाट जंगलाचे जीवनदाता जल असलेले हे जलब्रम्ह. माणसाने त्यालाही हवेतसे वाकवले आहे.अतिशय सुंदर परिसर एक बंद पडलेल्या रेसॉर्टच्या जवळील सिमेंटच्या बाकड्यावर बसलो थोडावेळ.
साडेसात वाजता पुढे निघालो. आता घाट सुरु झाला होता. आज सकाळचा पहिला चहाही झाला नव्हता. कालच्या सारखीच खडी चढाई होती. रस्त्याच्या दुतर्फा दरीत घनदाट जंगल असल्याने थंडी चांगलीच जाणवत होती. घाट माथ्यावरील पठारावर एकुलते एक चंद्रमौळी घर आणि ढाबा दिसला. श्री. लक्ष्मण गोर्हे यांनी आम्हाला पाहिल्यावर चटकन तीन खुर्च्या मांडल्या आणि हसुन आमचं स्वागत केलं.
आमच्याशी गप्पा मारत सुंदर कडक चहा करुन आम्हाला दिला. पदयात्रींच्या राहण्याची भोजनाची व्यवस्था त्यांच्याकडे होऊ शकते असेही सांगितले. आधी आम्ही पदयात्री आहोत म्हणून चहाचे पैसे घेतच नव्हते पण बोहणीची वेळ आहे म्हणून आम्ही आग्रहाने त्यांना पैसे घ्यायला लावले.आणि त्यांचा निरोप घेऊन प्रस्थान केले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.
आता घाट उतार सुरु झाला होता. आडगांव बार्पे, लोणावळा फाटा नंतर आले निवे. बसस्टॉपवर बसलो. रस्त्याच्या पलिकडे जिल्हा परिषद शाळा होती आणि मागच्या बाजुला मुळशी धरणाच्या बॅक वॉटरचा विस्तिर्ण जलाशय होता.
स्वच्छ निर्मळ निळेशार शांत पाणी. जणू निळा गालिचा अंथरला आहे. असं वाटलं की धावत जाऊन त्या मखमली गालिच्यावर लोळण घ्यावी. हात जोडून डोळे मिटून जलदेवतेला प्रणाम केला आणि क्षणभरच मकरवाहिनी नर्मदामैया हसतमुखाने आशिर्वाद देत आहे असं जाणवलं.
मुळशी धरणाच्या पाण्यावर टाटा पॉवर प्रोजेक्टची विज निर्मिती केली जाते. जलाशयाला वळसा घालून पुढे निघालो थोड्याच वेळात पुन्हा घाट सुरु झाला. सारोळे इथे विठ्ठल कामत रेसॉर्ट आणि रेस्टॉरंट आले. सव्वा अकरा वाजले होते आणि भुकही लागली होती म्हणून गेलो आतमधे.
आधी साबुदाण्याची खिचडी नंतर उत्तपा आणि मग मलईदार गोड लस्सी अशी पोटपुजा केली आणि बारा वाजता पुढे निघालो. घाटातुन वाटचाल असली तरी आता उन्हाचा तडाखा चांगलाच बसत होता. अंगातले स्वेटर तर डोंगरवाडीहुन पुढे निघालो तेव्हाच अंगावरुन उतरवुन कंबरेला बांधले होते.
रमत गमत चाललो होतो तेवढ्यात समोरून एक मोटारसायकल आली आणि आमच्या समोर उभी राहिली. आडगांवबार्पे येथील श्री. विजय साकरे उर्फ विजू पहलवान गाडीवरुन उतरले आणि आमची चौकशी करुन आम्हाला शेतातुन नुकतीच काढुन आणलेली लालबुंद 🥕 गाजरं दिली. फोन नंबर दिला आणि अगदी पौड पर्यंतही काही मदत लागली तर फोन करा असं सांगितलं. मोरया कानाशी कुजबुजला मग काय? आहेत ना भगिनी नर्मदाजवळील सेवाव्रती इथे माझ्या परिसरातही? क्षणभर हात जोडून मोरयाला हो आहेत असं म्हणत प्रणाम केला.नर्मदे हर.
साडेबारा वाजता दावडी आले आणि घाट उतारही सुरु झाला. दीड वाजता ताम्हिणी गांव आले. आज आमचा मुक्काम इथेच असणार होता रस्त्याच्या कडेला एका टपरीवर एक बुजुर्ग बाबाजी बसलेले होते त्यांना आम्ही अण्णा राळेभात यांच्या बद्दल विचारले कारण आजच्या मुक्कामाला आम्हाला अण्णा राळेभात यांच्याकडे जायचं होतं. ज्यांना विचारले तेच स्वतः अण्णा राळेभात होते. आम्ही आमच्या पदयात्रे बद्दल सांगितलं आणि त्यांच्याकडे निवास भिक्षा मागितली. नर्मदे हर.
रस्त्याच्या पलिकडे असलेल्या शाळे जवळून अण्णांबरोबर जवळ जवळ एक किलोमीटर अंतरावरील विंध्यवासिनी विंझाईमाता मंदिरात आलो. एका छोट्या नदीमैयाच्या काठावर हे बऱ्यापैकी मोठे मंदिर असुन भव्य सभामंडप आहे. दर्शन घेऊन मंदिरा मागे असलेल्या भक्त निवासात एका खोलीत आसन लावलं. खोली स्वच्छ आहे. बाजुलाच स्वच्छ बाथरुम वगैरे सोय आहे. सोलर गिझर होता. सकाळी स्नान झाले नव्हते म्हणून आधी स्नाने करुन कपडे धुवून वाळत घातले आणि थोडावेळ विश्रांती घेतली.
संध्याकाळी चार वाजता शेजारी असलेल्या विंझाई हॉटेल मधे चहा बिस्किटे घेतली आणि रात्रीच्या भोजनाची ऑर्डर दिली आणि मग नदीमैयाच्या काठावर जाऊन बसलो. मैयाच्या पलिकडच्या काठावर हिरवेगार शेत वाऱ्यावर हळुवार डुलत होतं. दोन्ही तीरांना जोडणारा छोटासा वसंत बंधारा आहे. अवखळ लहान लहान मुलं पाण्यात उड्या मारत खेळत होती. हसत होती. निरागस बालपण. तुकाराम महाराज म्हणालेच आहेत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. मुलांची गंमत पहात बसलो थोडावेळ. नर्मदे हर.
संध्याकाळी सात वाजता मंदिरात सायं आरतीमधे सहभागी झालो आणि नंतर रुमवर येऊन आमचा सायं नित्यपाठ केला आणि मग हॉटेल विंझाईमधे जाऊन पिठलं भाकरी बटाट्याचा रस्सा आणि भात असा भोजनप्रसाद घेतला आणि रुममध्ये परत आलो.
काल शिवराज ढाब्यावर नीटशी झोप लागली नव्हती.आज मात्र पलंग गादी उबदार ब्लॅंकेट मधे गुरफटून निद्रादेवीची आराधना करणार. आज तेवीस किलोमीटर चालणे झाले. नर्मदे हर.
आम्ही पदयात्री
श्री. रत्नाकर परांजपे,सौ. वंदना रत्नाकर परांजपे, श्री. रविंद्र पवार.
