गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ४
॥ *अध्याय ४* ॥
*ज्ञानकर्मसंन्यासयोग*
या अध्यायात भगवान श्रीकृष्ण योगमार्गाचे तत्त्वज्ञान पुढे नेतात. आरंभी ते योगमार्गाची दीर्घ परंपरा सांगतात. ते म्हणतात – ” मी स्वतः हे ज्ञान सूर्याला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकूला दिले होते आणि परंपरेने ते राजर्षींना माहीत होते. मात्र नंतर अनेक वर्षे उलटून गेल्यावर ते ज्ञान पृथ्वीवरून नष्ट झाले. तेच उत्तम ज्ञान मी तुला आता सांगतो आहे.” अर्जुनाला प्रश्न पडतो की सूर्यजन्म तर अती पुरातन आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्म तर त्यानंतरचा. मग भगवान श्रीकृष्णांनी सूर्याला हे शिकविले यावर कसा विश्वास ठेवणार?
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण त्यांचे दिव्य जन्म आणि कर्म याविषयी सांगतात आणि त्यामागचे कारणही उलगडून दाखवितात. परमात्म्याचे हे सत्यस्वरूप ज्ञानयज्ञाने जो जाणतो त्याची कर्मबंधने तुटून जातात आणि तो माझ्याशी एकरूप होतो हेही ते समजावितात.
चातुर्वर्ण्य, कर्म, अकर्म, विकर्म अशा अनेक संकल्पना उलगडून सांगताना भगवान श्रीकृष्ण ज्ञानी किंवा पंडित कोणाला म्हणावे आणि कशा मनोवृत्तीने कर्म करणाऱ्या पुरुषाला कर्माचे बंधन होत नाही ते स्पष्ट करतात.
यज्ञ ही संकल्पना पुन्हा एकदा इथे येते. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ आणि ज्ञानयज्ञ यातील भेद समजाविताना ज्ञानयज्ञाची पर्यायाने ज्ञानाची श्रेष्ठता भगवान श्रीकृष्ण पटवून देतात. जो श्रद्धावान, जितेंद्रिय आणि ज्ञानरत आहे त्यालाच हे ज्ञान प्राप्त होते आणि त्याचे सर्व संशय नष्ट होऊन तो कर्मबंधनातून मुक्त होतो. अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या मनात ठाण मांडून बसलेला संशय ज्ञानाच्या तलवारीने छिन्न करून टाक असा उपदेश करतात.
श्री भगवानुवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ ४.१ ॥
श्री भगवान उद्गारले
अविनाशी हा योगमार्ग जो तो मी कथिला त्या सूर्याला ।
सूर्याने तो कथिला मनुला आणि मनूने इक्ष्वाकूला ॥ ४.१ ॥
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४.२ ॥
[श्री भगवान उद्गारले]
योगमार्ग हा राजर्षींना परंपरेने माहित होता ।
नष्ट जाहला पृथ्वीवरुनी अनेक वर्षे सरता सरता॥ ४.२ ॥
स एवायं मया तेऽद्य प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ४.३ ॥
[श्री भगवान उद्गारले]
तूच प्रियसखा आणि भक्तही म्हणून तुज मी आज खरोखर ।
त्याच सनातन मार्गा कथिले रहस्य उत्तम आहे ते तर ॥ ४.३ ॥
_अर्जुन उवाच_
*अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः* ।
*कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति* ॥ ४.४ ॥
_अर्जुन उद्गारला_
सूर्यजन्म तर अती पुरातन तुझा जन्म तर नंतर झाला ।
कसे खरे मी मानू कृष्णा! योग तयाला तूच शिकविला? ॥ ४.४ ॥
_श्री भगवानुवाच_
*बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन* ।
*तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप* ॥ ४.५ ॥
_श्री भगवान उद्गारले_
कित्येक माझे जे जन्म झाले अन् अर्जुना! जे झाले तुझेही ।
ते जन्म सारे मज ज्ञात असती त्यांची तुला ना जाणीव काही ॥ ४.५ ॥
*अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्* ।
*प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया* ॥ ४.६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जरी न असला जन्म मला अन् जरी असे मी नित्य अनश्वर
प्राणिमात्र जे भूतलावरी जरी असे मी त्यांचा ईश्वर ।
तरी असे जी शक्ती माझी त्या शक्तीच्या सामर्थ्याने
जन्म घेतसे या पृथ्वीवर पुन्हा पुन्हा मी निजमायेने ॥ ४.६ ॥
*यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत* ।
*अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्* ॥ ४.७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
धर्म जेव्हा विकल होतो अधर्माचा पूर येतो ।
त्या स्थितीला योग्य करण्या मी स्वतःला जन्म देतो ॥ ४.७ ॥
*परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्* ।
*धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे* ॥ ४.८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
सुष्ट जनांचे करण्या रक्षण ।
नाश तयांचा जे जे दुर्जन ॥
स्थापन करण्या धर्म या जगी ।
अवतरतो मी सदा प्रतियुगी ॥ ४.८ ॥
*जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः* ।
*त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन* ॥ ४.९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
दिव्य माझिये जन्म, कार्य ते पूर्णार्थाने ज्याला अवगत ।
देह सोडिता पुनर्जन्म ना, मजजवळी तो येतो निश्चित ॥ ४.९ ॥
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४.१० ॥
[श्री भगवान उद्गारले]
नसे प्रीती, नसे भीती अंतरी ना क्रोध राहे
मी असे आधार ज्यांचा मनी ज्यांच्या मीच आहे ।
आचरोनी ज्ञानतप ते बहू जन जे होत पावन
जवळ माझ्या येउनी एकात्म होती सर्व ते जन ॥ ४.१० ॥
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४.११ ॥
[श्री भगवान उद्गारले]
पूजिती जन ज्याप्रकारे सापडे मी त्याप्रकारे ।
माणसे ती मार्ग माझा चालती साऱ्याप्रकारे ॥ ४.११ ॥
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४.१२ ॥
[श्री भगवान उद्गारले]
कार्यसिद्धिच्या इच्छेने जन इथे पूजिती इष्टदेवता ।
त्याने होई लवकर सिद्धी मनुष्यलोकी कार्ये करिता॥ ४.१२ ॥
*चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः* ।
*तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्* ॥ ४.१३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
मीच निर्मिले चातुर्वर्ण्या गुणकर्मांच्या आधारावर ।
जरी असे मी त्यांचा कर्ता समज अकर्ता मला अनश्वर ॥ ४.१३ ॥
*न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा* ।
*इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते* ॥ ४.१४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
स्पर्श कधी ना मज कर्मांचा इच्छाही ना कर्मफलाची ।
अशा मला जो पूर्ण जाणतो कर्मबंधने तुटती त्याची ॥ ४.१४ ॥
*एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः* ।
*कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्* ॥ ४.१५ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
हेच जाणुनी त्या पूर्वीच्या मोक्षेच्छूंनी कर्मा केले ।
म्हणुनी पार्था! कर्म करी जे पूर्वसुरींनी पूर्वी केले ॥ ४.१५ ॥
*किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः* ।
*तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्* ॥ ४.१६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
कर्म कशाला म्हणती आणिक कशास म्हणती अकर्म पार्था!
ज्ञानवंतही भ्रमात पडती या प्रश्नाच्या समोर येता ।
ऐक अर्जुना! तुला सांगतो या प्रश्नाचे उत्तर आता
सत्य उलगडे मिळेल तेव्हा अशुभापासुन तुला मुक्तता ॥ ४.१६ ॥
*कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः* ।
*अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः* ॥ ४.१७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
कर्माचे जे स्वरूप पार्था! त्या रूपाला तू जाणावे
कर्माचा अन् अभाव जेथे असे अकर्मही तुला कळावे ।
विकर्म म्हणती निषिद्ध कर्मा त्यालासुद्धा तू जाणावे
गूढ निराळी कर्मगती अन् रीत तिची ना कुणास ठावे ॥ ४.१७ ॥
*कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः* ।
*स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्* ॥ ४.१८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
कर्मामध्ये अकर्म बघतो अकर्मात जो कर्म पाहतो ।
सकलकर्मकर्ता तो योगी जनात साऱ्या बुद्धिमान तो ॥ ४.१८ ॥
*यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः* ।
*ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः* ॥ ४.१९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
नसे अपेक्षा नाही इच्छा साऱ्या कर्मांमध्ये ज्याला ।
ज्ञानाग्नीने कर्मे जळती “पण्डित” म्हणती ज्ञानी त्याला ॥ ४.१९ ॥
*त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः* ।
*कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः* ॥ ४.२० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
तृप्त सदा, ना परावलंबी, कर्मफलाची आशा नाही ।
जरी करी तो कर्मे सारी नसे तरीही करीत काही ॥ ४.२० ॥
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् ॥ ४.२१ ॥
[श्री भगवान उद्गारले]
मनी नियंत्रित, आशाविरहित, साधनसंग्रह वर्ज्य मानुनी ।
करितो केवळ कर्म शरीरी त्यास न लागे पाप त्यातुनी ॥ ४.२१ ॥
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४.२२ ॥
[श्री भगवान उद्गारले]
विना याचना मिळे त्यास जे त्याच्यातच जो हो आनंदी
सुखदुःखासम जी जी द्वन्द्वे नसे तयांचा कधीच बंदी ।
न मत्सरी जो, यश वा अपयश समान वाटे दोन्ही ज्याला
कर्म करुनही बंधन त्याचे होतच नाही त्या पुरुषाला ॥ ४.२२ ॥
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४.२३ ॥
[श्री भगवान उद्गारले]
साऱ्यात ज्याची आहे विरक्ती, जो मुक्त आहे, परमात्मज्ञानी ।
जो कर्म करितो यज्ञाचसाठी कर्मे तयाची जाती विरोनी ॥ ४.२३ ॥
*ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्* ।
*ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना* ॥ ४.२४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
यज्ञात जे साधन तेच ब्रह्म, यज्ञात अग्नी तो रूप ब्रह्म
जी आहुती दे ती ब्रह्म सारी, दे आहुती तो यजमान ब्रह्म ।
ब्रह्माचसाठी एकाग्रचित्ती जो यज्ञ करिसी तो एक ब्रह्म
साऱ्यातुनी या जावे जिथे अन् ते स्थान आहे अत्युच्च ब्रह्म ॥ ४.२४ ॥
*दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते* ।
*ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति* ॥ ४.२५ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जे यज्ञ करिती देवाचसाठी असे कर्मयोगी असतात काही ।
अपुलेच आपण होती समर्पित परब्रह्मरूपी अग्नीत काही ॥ ४.२५ ॥
*श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति* ।
*शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति* ॥ ४.२६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
कोणी असा की सुख-इन्द्रियांना जो संयमाच्या अग्नीत टाकी ।
दुसरा असा की विषयास साऱ्या जो इन्द्रियांच्या अग्नीत टाकी ॥ ४.२६ ॥
*सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे* ।
*आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते* ॥ ४.२७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
स्वनिग्रहाचा योगाग्नी जो आत्मज्ञाने असे प्रज्वलित ।
प्राण, इन्द्रिये यांची कार्ये कोणी करितो त्यात समर्पित ॥ ४.२७ ॥
*द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे* ।
*स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः* ॥ ४.२८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
द्रव्ययज्ञ तो कोणी करती ऐहिक वस्तू सर्व त्यागुनी
कोणी करिती तपोयज्ञ तो निजव्रताचे नियम पाळुनी ।
योगाने वश चित्ता करुनी करिती कोणी योगयज्ञ तो
करिती कोणी यत्ननिग्रहे वेदाध्ययने ज्ञानयज्ञ तो ॥ ४.२८ ॥
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४.२९ ॥
[श्री भगवान उद्गारले]
प्राणायामा नित करणारे यत्नशील जे योगी असती
श्वासाची अन् उच्छ्वासाची दोन्हीचीही गती रोखती ।
श्वासामध्ये उच्छ्वासाला विलीन करती योगी काही
आणिक दुसरे विलीन करती उच्छ्वासातच श्वासालाही॥ ४.२९ ॥
अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४.३० ॥
[श्री भगवान उद्गारले]
दुसरा कोणी प्राणायामी आहाराने असे नियंत्रित
प्राणांचे जे वारे त्यांना प्राणातच तो करी विसर्जित ।
सारे हे तर योगी असती पूर्ण जाणती त्यागी वृत्ती
त्यागयुक्त पूजेने मिळते पापांमधुनी त्यांना मुक्ती ॥ ४.३० ॥
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतो अन्यः कुरुसत्तम ॥ ४.३१ ॥
[श्री भगवान उद्गारले]
यज्ञात आहे जी त्यागवृत्ती ।
ती अंगिकारी, ती नित्य चित्ती ॥
त्यागून यज्ञी जे अल्प उरते ।
बहुमूल्य ते तर अमृत जणू ते ॥
त्याचाच केवळ जो भोग घेई ।
ऐशा नराला फल प्राप्त होई ॥
शाश्वत सनातन जे ब्रह्म आहे ।
त्याचीच प्राप्ती नर तोच पाहे ॥
ही त्यागवृत्ती नाही जयाची ।
हा लोक नाही जागा सुखाची ॥
हो अन्य लोकी मग काय त्याचे ।
कुरुश्रेष्ठ पार्था! मंथन फुकाचे ॥ ४.३१ ॥
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४.३२ ॥
[श्री भगवान उद्गारले]
हे यज्ञ असती नाना तऱ्हांचे ।
वेदात विस्तृत वर्णन तयांचे ॥
कर्मातुनी हे जन्मास येती ।
ती सर्व कर्मे अनिवार्य असती ॥
सहभाग तेथे असतो मनाचा ।
काया तियेचा अन् इंद्रियांचा ॥
जाणून पार्था! हे यज्ञ सारे ।
तू मुक्त होसी कर्मातुनी रे ॥ ४.३२ ॥
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४.३३ ॥
[श्री भगवान उद्गारले]
द्रव्ययज्ञ जो त्याच्यापेक्षा ज्ञानयज्ञ नित असे महत्तर ।
होत समर्पित सारी कर्मे ज्ञानामध्ये पार्था! ती तर ॥ ४.३३ ॥
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४.३४ ॥
[श्री भगवान उद्गारले]
म्हणोनी तू जाणुनी घे ज्ञान आणिक रूप त्याचे
शरण जा ज्ञानी जनांना जाणती जे सत्य याचे ।
विचारी तू प्रश्न त्यांना मोकळ्या साध्या मनाने
मनोभावे करी सेवा प्राप्त हो उपदेश त्याने ॥ ४.३४ ॥
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४.३५ ॥
[श्री भगवान उद्गारले]
ज्ञान सारे जाणुनी मग भ्रमित ना होसी पुन्हा तू ।
अंतरी तुझिया नि माझ्या प्राणिमात्रा पाहसी तू॥ ४.३५ ॥
*अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः* ।
*सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि* ॥ ४.३६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
पाप्यांमध्ये सर्वाधिकही अससी पापी कधी तू जरी ।
या ज्ञानाच्या नौकेमधुनी तरून जासी पापसागरी ॥ ४.३६ ॥
*यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन* ।
*ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा* ॥ ४.३७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जसा प्रज्वलित अग्नी करतो भस्मसात साऱ्या समिधांना ।
तसाच हा ज्ञानाग्नी करतो भस्मसात सगळ्या कर्मांना ॥ ४.३७ ॥
*न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते* ।
*तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति* ॥ ४.३८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
या पृथ्वीवर ज्ञानासम ना दुसरे काही पवित्र असते ।
चित्त शुद्ध हो योगाने मग सत्य अंतरी सहजच दिसते ॥ ४.३८ ॥
*श्रद्धावॉंल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः* ।
*ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति* ॥ ४.३९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ज्ञान लाभते श्रद्धाळूला, ज्ञानरताला, जितेन्द्रियाला ।
आत्मज्ञाने त्वरित लाभते मुक्तिरूप जी शान्ती त्याला ॥ ४.३९ ॥
*अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति* ।
*नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः* ॥ ४.४० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जो अज्ञानी मनी संशयी ना श्रद्धा तो विनाश पावे ।
इहलोकी वा परलोकी त्या जागा नाही ना सुख ठावे ॥ ४.४० ॥
*योगसन्न्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्* ।
*आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय* ॥ ४.४१ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
योगाभ्यासे अर्पण करितो सगळी कर्मे परमात्म्याला
आणि जयाचा संशय सगळा आत्मज्ञाने नष्ट जाहला ।
आत्मनिष्ठ जो सदा राहतो अशा कर्मयोगी पुरुषाला
धनंजया! ना बांधू शकती त्याची कर्मे कधीच त्याला ॥ ४.४१ ॥
*तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः* ।
*छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत* ॥ ४.४२ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
मनात तुझिया हा जो संशय ठाण मांडुनी बसला आहे
जन्म तयाचा केवळ तुझिया अज्ञानाने झाला आहे ।
म्हणून हाती ज्ञानखड्ग घे छिन्न करी त्या पूर्णपणाने
अंगिकारुनी योगसाधना ऊठ भारता! ऊठ त्वरेने ॥ ४.४२ ॥
|| *ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः* ||
अशा प्रकारे श्री भगवानांनी गाइलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील श्रीकृष्ण-अर्जुन संवादात्मक ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा हा चौथा अध्याय
