गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ५

॥ *अध्याय ५* ॥
*कर्मसंन्यासयोग*

ज्ञानमार्ग किंवा सांख्ययोग आणि कर्मयोग या दोन्हीचे विवेचन ऐकल्यावर अर्जुनाला पुन्हा एकदा प्रश्न पडतो की या दोन्हीतला श्रेष्ठ मार्ग कोणता? यावर उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण समजावितात की हे दोन्ही मार्ग मोक्षाप्रत नेणारेच आहेत. संसारात राहूनही जो सुखदुःख, प्रेमद्वेष अशी द्वन्द्वे ओलांडून जातो तो नित्यसंन्यासीच असतो. म्हणून जे खरे ज्ञानी असतात ते हे दोन्ही मार्ग वेगळे मानतच नाहीत.

कर्मयोग्याने अलिप्त वृत्ती कशी जोपासली पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण सांगतात. पाहणे, ऐकणे अगदी श्वास घेणे अशा साध्या क्रियातदेखील “मी न कर्ता” हीच भावना असली पाहिजे. सारीच कर्मे अनासक्तीने करून ती परमात्म्याला समर्पित केली पाहिजेत. इथे एक अतिशय महत्त्वाचा विचार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. देव कधीही माणसाची कर्मे आणि त्यांचे कर्तेपण जन्माला घालत नाही. केवळ प्रकृतीमुळे कर्म आणि त्याचे फळ यांचा संयोग घडतो. माणसे अज्ञानामुळे संभ्रमित होतात. एकदा ज्ञानाने परमात्म्याचा साक्षात्कार झाला की सर्वत्र समानरूपे वसलेल्या त्या ईश्वररूपाला माणूस ओळखतो आणि त्या ब्रह्मातच रममाण होतो.

विषयातून जन्माला आलेले जीवनातले भोग, येतात आणि जातात आणि म्हणूनच ज्ञानी त्यांच्यात कधीच गुंतत नाही. जो अंतरातले ज्ञानप्रकाशित ब्रह्म पाहतो, जो जितेन्द्रिय आहे, ज्याचे काम आणि क्रोध विरून गेले आहेत तोच खरा योगी, तोच खरा यती आणि तोच मोक्षाचा अधिकारी.

अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणतात – मीच यज्ञतपांचा पालक, सर्वांचा सखा, अखिल ब्रह्माण्डाचा अधिनायक हे जो पूर्णपणाने जाणतो त्याला शांतिदायक मोक्ष अवश्य प्राप्त होतो.

॥ *अध्याय ५* ॥
** कर्मसंन्यासयोग**

_अर्जुन उवाच_
*संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि* ।
*यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्* ॥ ५.१ ॥

_अर्जुन उद्गारला_
आधी वदसी सांख्ययोग अन् कर्मयोगही वदसी नंतर ।
कृष्णा! एकच निश्चित करुनी सांग मला तू जो श्रेयस्कर ॥ ५.१ ॥

_श्री भगवानुवाच_
*संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ* ।
*तयोस्तु कर्मसन्न्यासात्कर्मयोगो विशिष्यते* ॥ ५.२ ॥

_श्री भगवान उद्गारले_
सांख्ययोग अन् कर्मयोगही मोक्षाप्रत ते नेती दोन्ही ।
पण कर्माच्या त्यागापेक्षा कर्मयोग तो श्रेष्ठ कधीही ॥ ५.२ ॥

*ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्‍क्षति* ।
*निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते* ॥ ५.३ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
द्वेष नसे ज्या, नसे लालसा, द्वन्द्वे सारी पार करी जो ।
बंध तयाचे सहजच तुटती नित संन्यासी खरोखरी तो ॥ ५.३ ॥