गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ३

*अध्याय ३*
*कर्मयोग *

ज्ञानयोग आणि कर्मयोग दुसऱ्या अध्यायात प्रस्तावित केल्यावर संभ्रमित झालेला अर्जुन पुन्हा भगवान श्रीकृष्णांना विचारतो – “तुझी विधाने खूपच संदिग्ध आहेत म्हणून तुला कुठला मार्ग श्रेष्ठ वाटतो ते सांग.” त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण कर्ममार्गाशी संलग्न साऱ्याच गोष्टी अर्जुनाला समजावून सांगतात.

सुरवातीला कर्माची अनिवार्यता ते विशद करतात. प्रकृतीतून जन्माला येणारे गुण आणि त्यांच्यातून निर्माण होणारी कर्मे. ती सोडून देऊन काहीच साध्य होत नाही. अगदी माणसाचे शरीरसुद्धा कर्माशिवाय चालत नाही हा विचार ते मांडतात. केवळ कर्मेंद्रियांना नियंत्रित करून मनात मात्र विषयांना चिकटून राहणारा माणूस दांभिक असतो हेही ते सांगतात.

या अध्यायात यज्ञ ही संकल्पना येते ती त्यातील कर्मकांडाच्या संदर्भात न येता त्यातील त्याग भावनेसाठी येते. जन्म-अन्न-पर्जन्य-यज्ञ-कर्म-वेद-ब्रह्म अशी शृंखलात्मक कारणमीमांसा “यज्ञकर्म म्हणजेच अक्षर ब्रम्हाची उपासना” हे सत्य आपल्याला सांगते. म्हणूनच प्रत्येकाने आपली नियत कर्मे कुठल्याही हेतूशिवाय किंवा इच्छेशिवाय करत राहिले पाहिजे हा विचार मांडताना भगवान श्रीकृष्ण जनक इत्यादींचे उदाहरण देतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वतःचे उदाहरण देतात. “माझ्यासाठी कुठलेच नियत कर्म नाही किंवा मला काहीच मिळवावयाचे नाही. असे जरी असले तरी मी स्वतः निरंतर कार्यरत असतो. मी जर माझे कार्य थांबविले तर सारी भुवने लयाला जाऊन विश्वगोंधळ होईल.” असे ते स्पष्ट करतात.

प्रकृतीच्या गुणांतून जन्माला येणारी कर्मे अलिप्तपणे करताना ती मला समर्पित कर असा उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. ज्यांना हे समजले ते ज्ञानी. तरीही विषयाविषयीच्या आवडीनिवडी कशा नैसर्गिकपणे निर्माण होतात हे समजाविताना ते स्वकर्तव्याची श्रेष्ठता आणि ते करण्याचे महत्त्व अर्जुनाला सांगतात.

“हे सारे कळत असूनही माणूस पापाच्या मार्गाने का जातो?” असा प्रश्न अर्जुन पुन्हा विचारतो आणि त्याला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण काम/लालसा यांचे स्वरूप स्पष्ट करतात आणि ती लालसा माणसाच्या विवेकाला दूर सारून मोहात पाडते हे सांगून तिला पराभूत करून जिंकून घे असा उपदेश अध्यायाच्या शेवटी ते अर्जुनाला करतात.

[अध्याय ३ श्लोक १, २]*

_अर्जुन उवाच_
*ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन* ।
*तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव* ॥ ३.१ ॥

_अर्जुन उद्गारला_
ज्ञानमार्ग जर तुला केशवा! श्रेष्ठ वाटतो कर्मापेक्षा ।
क्रूरकर्म हे मीच करावे अशी कशी रे तुझी अपेक्षा? ॥ ३.१ ॥

*व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे* ।
*तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्* ॥ ३.२ ॥

_[अर्जुन उद्गारला]_
संमिश्र असती तव ती विधाने ।
कोड्यात पडते बुद्धी तयाने ॥
जे एक निश्चित ते मज वदावे ।
जे श्रेष्ठ आहे ते मज मिळावे ॥ ३.२ ॥

[अध्याय ३ श्लोक ३, ४, ५]*

_श्री भगवानुवाच_
*लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ* ।
*ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्* ॥ ३.३ ॥

_श्री भगवान उद्गारले_
या आधी मी तुज सांगितले इथे जीवनी दोन मार्ग जे ।
सांख्यांसाठी ज्ञानमार्ग अन् योग्यांसाठी कर्ममार्ग हे ॥ ३.३ ॥

*न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते*।
*न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति* ॥ ३.४ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
ना जरी आरंभ केले कर्म कुठले माणसाने
कर्ममुक्ती त्यास नाही तेवढ्या त्या कारणाने ।
आपुली जी नियत कर्मे सोडुनी राहे म्हणोनी
आत्मज्ञानाचा तयाला लाभ ना हो तूच जाणी ॥ ३.४ ॥

*न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्* ।
*कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः* ॥ ३.५ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
कर्मे न करिता कोणी कधीही क्षण एकसुद्धा राहू शकेना ।
गुण प्रकृतीचे ज्या जन्म देती अनिवार्य होई ते कर्म त्यांना ॥ ३.५ ॥

[अध्याय ३ श्लोक ६, ७, ८]*

*कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्* ।
*इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते* ॥ ३.६ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
कर्मेन्द्रियांना ओढून मागे मन मात्र ज्याचे विषयात रमते ।
सोडी विवेका, फसवी स्वतःला दांभिक म्हणावे त्या माणसाते ॥ ३.६ ॥

*यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन* ।
*कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते* ॥ ३.७ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
त्याच्या स्वतःच्या मननिग्रहाने जो इंद्रियांना बांधून राहे ।
ना गुंतता जो कर्मेन्द्रियांनी कर्मे करी तो अतिश्रेष्ठ आहे ॥ ३.७ ॥

*नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः* ।
*शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मण:* ॥ ३.८ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
काही न करणे त्याहून येथे जे कर्म करिसी ते श्रेष्ठ आहे
म्हणुनीच पार्था! निश्चितपणाने तुजला दिलेले जे कर्म आहे ।
निःशंक चित्ती ते तू करावे, कर्माअभावी काही घडेना
साधीच काया ही माणसाची चालन तियेचे कर्माविना ना ॥ ३.८ ॥

[अध्याय ३ श्लोक ९, १०]*

*यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः* ।
*तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर* ॥ ३.९ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
भगवंताला प्रसन्न करण्या जी जी कर्मे जन हे करिती
त्या कर्मांचे बंधन नाही बाकी सारी बंधक ठरती ।
कर्मबंध हा प्रपंच अवघा घट्ट बांधतो सकल जनांना
म्हणून कर्मे विना गुंतता देवासाठी करी अर्जुना! ॥ ३.९ ॥

*सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः* ।
*अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्* ॥ ३.१० ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
निर्माण केले आधी जगाला निर्माण केले मग मानवाला
दे यज्ञ त्यागासह त्या प्रजेला अन् सृष्टिकर्ता ब्रह्मा म्हणाला ।
यज्ञातली जी ती त्यागवृत्ती समृद्ध जीवन तुम्हास देवो
त्यानेच तुमच्या इच्छा मनीच्या साफल्य त्यांना संप्राप्त होवो ॥ ३.१० ॥

[अध्याय ३ श्लोक ११, १२, १३]*

*देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः* ।
*परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ* ॥ ३.११ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
त्यागेच तुष्टी देवा मिळावी त्यांच्या प्रसादे तुम्ही तुष्ट व्हावे ।
अन् एकमेका देवून तुष्टी सर्वोच्च श्रेयस तुम्हा मिळावे ॥ ३.११ ॥

*इष्टान्भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः* ।
*तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः* ॥ ३.१२ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
सश्रद्ध भावे यज्ञा करोनी त्यातून देवा नेमे पुजावे
संतुष्ट झाल्या देवांकडोनी जे जे मनी ते सुख प्राप्त व्हावे ।
त्या त्या सुखाचा उपभोग घेता ऐसे न व्हावे त्यागा विसरला
त्यागाविना जो भोगी सुखाला नक्की म्हणावे मग चोर त्याला ॥ ३.१२ ॥

*यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः* ।
*भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्* ॥ ३.१३ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
यज्ञातुनी जे मागे उरे ते भक्षी तयाची हो पापमुक्ती ।
जो अन्न शिजवी स्वार्थाचसाठी ना अन्नभक्षण ती पापभुक्ती ॥ ३.१३ ॥

[अध्याय ३ श्लोक १४, १५, १६]*

*अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः* ।
*यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः* ॥ ३.१४ ॥
*कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्* ।
*तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्* ॥ ३.१५ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
अन्नामुळे जन्म प्राण्यास लाभे अन्नास त्या जन्म पर्जन्य देई ।
यज्ञातुनी जन्म त्या पावसाचा कर्मातुनी यज्ञ जन्मास येई ॥ ३.१४ ॥
ती यज्ञकर्मे वेदांत असती अन् वेदकर्ता तो देव आहे ।
म्हणुनीच सर्वत्र जे ब्रह्म आहे ते यज्ञकर्मी स्थिरनित्य राहे ॥ ३.१५ ॥

*एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः* ।
*अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति* ॥ ३.१६ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
पार्था! जगी या संपूर्ण चक्रा ना आचरी जो समजून अर्था ।
आयुष्य त्याचे पापात जाई ते व्यर्थ केवळ अन् इन्द्रियार्था ॥ ३.१६ ॥

[अध्याय ३ श्लोक १७, १८, १९]*

*यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः* ।
*आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते* ॥ ३.१७ ॥
*नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन* ।
*न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः* ॥ ३.१८ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
जेव्हा स्वतःतच रममाण होतो ।
जी आत्मतृप्ती ती प्राप्त करितो ॥
संतुष्ट ठेवी त्याच्या मनाते ।
त्या मानवाला ना कार्य उरते ॥ ३.१७ ॥
जे कर्म केले अथवा न केले ना अर्थ त्याला किंवा न हेतू ।
त्या माणसाचा नसतो कुणाशी संबंध स्वार्थी समजून घे तू ॥ ३.१८ ॥

*तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर* ।
*असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पूरुषः* ॥ ३.१९ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
म्हणुनीच पार्था! ना गुंतता तू कर्तव्य जे जे नेमे करी ते ।
सोडून इच्छा कर्मे करी जो तो प्राप्त करतो अंतिम पदाते ॥ ३.१९ ॥

[अध्याय ३ श्लोक २०, २१]*

*कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः* ।
*लोकसङ्‍ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि* ॥ ३.२० ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
करुनच कर्मे सफल जाहले जनक आणखी इतर मान्यवर ।
या जगताची कार्यव्यवस्था टिकण्यासाठी सदा कर्म कर ॥ ३.२० ॥

*यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः* ।
*स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते* ॥ ३.२१ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
श्रेष्ठांचे जे असे आचरण ।
अनुसरती ते सदा इतरजन ॥
मान्य असे जे श्रेष्ठ जनांना ।
मान्य होतसे ते इतरांना ॥ ३.२१ ॥

[अध्याय ३ श्लोक २२, २३, २४]*

*न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन* ।
*नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि* ॥ ३.२२ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
माझ्यासाठी त्रिलोकात ना ।
कर्म कोठले असे अर्जुना! ॥
मिळवायाचे मला न काही ।
तरी कार्यरत मीच सदाही ॥ ३.२२ ॥

*यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः* ।
*मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः* ॥ ३.२३ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
दक्ष कार्यरत नित्य निरंतर ।
ऐक अर्जुना! नसेन मी जर ॥
त्या मार्गावर जाती सारे ।
अनुसरणाने सर्वप्रकारे ॥ ३.२३ ॥

*उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्* ।
*सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः* ॥ ३.२४ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
केले ना मी कार्य कधी जर ।
पावतील लय भुवने सत्वर ॥
विश्वगोंधळा मी निष्कारण ।
प्रजाविनाशा ठरेन कारण ॥ ३.२४ ॥

[अध्याय ३ श्लोक २५, २६]*

*सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत* ।
*कुर्याद्विद्वांसस्तथासक्तः चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्* ॥ ३.२५ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
स्वतःचसाठी कर्मे करिती सदा भारता! मूर्ख अडाणी
तशीच कार्ये सतत करावी ज्ञानवन्त अन् विद्वानांनी ।
परंतु दोन्ही भिन्न अर्जुना! पहिले केवळ स्वार्थापोटी
दुसरे आहे विनालालसा विश्व संतुलित होण्यासाठी ॥ ३.२५ ॥

*न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्* ।
*जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्* ॥ ३.२६ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
जे अडाणी कार्य करिती गुंतुनी कार्यात त्यांच्या
बुधजनांनी ना करावे बुद्धिभेदा अडाण्यांच्या ।
ज्ञानियांनी योग करुनी सर्व कार्ये ती करावी
त्यातुनी त्या अडाण्यांना प्रेरणा निश्चित मिळावी ॥ ३.२६ ॥

[अध्याय ३ श्लोक २७, २८, २९]*

*प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः* ।
*अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते* ॥ ३.२७ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
जरी घडती सर्व कार्ये प्रकृतीच्या निजगुणांनी ।
“मीच कर्ता” असे म्हणतो अहंकारी अन् अडाणी ॥ ३.२७ ॥

*तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः* ।
*गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते* ॥ ३.२८ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
जो गुणांचे अन् क्रियांचे मर्म जाणी तोच ज्ञानी ।
इन्द्रिये विषयात रमती लिप्त नाही तो तयांनी ॥ ३.२८ ॥

*प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु* ।
*तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्* ॥ ३.२९ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
प्रकृतीच्या निजगुणांनी ।
गोंधळे जो तो अडाणी ॥
सर्वदा चिकटून राही ।
तोच कर्मा अन् गुणाही ॥
परि असे जो सकलज्ञानी ।
प्रकृतीचे मर्म जाणी ॥
तो कधी ना अडाण्यांचे ।
करी विचलित मन तयांचे ॥ ३.२९ ॥

[अध्याय ३ श्लोक ३०, ३१, ३२]*

*मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा* ।
*निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः* ॥ ३.३० ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
आत्मनिष्ठ हो आणिक मजला करी समर्पित कर्मे सारी ।
नकोच आशा, ममता, भयही युद्ध अर्जुना! करी सत्वरी ॥ ३.३० ॥

*ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः* ।
*श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः* ॥ ३.३१ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
ज्याच्या मनी ना तिळमात्र शंका अन् अर्जुना! जो सश्रद्ध राही ।
उपदेश माझा जो नित्य पाळी कर्मातुनी मुक्त होतोच तो ही ॥ ३.३१ ॥

*ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्* ।
*सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः* ॥ ३.३२ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
उपदेश माझा ज्या चूक वाटे जाई स्वमार्गे ना पाळिता तो ।
सोडी विवेका, ना ज्ञान काही, हरवून मार्गा तो नष्ट होतो ॥ ३.३२ ॥

[अध्याय ३ श्लोक ३३, ३४]*

*सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि* ।
*प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति* ॥ ३.३३ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
स्वभावाप्रमाणे कृती माणसांच्या सदा दास सारे निजप्रकृतीचे ।
इथे ज्ञानियांचा न अपवाद आहे जराही न चाले तिथे निग्रहाचे ॥ ३.३३ ॥

*इन्द्रियस्येन्द्रिस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ* ।
*तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ* ॥ ३.३४ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
ज्ञानेन्द्रिये अन् कर्मेन्द्रियेही नाना तऱ्हांच्या विषयात असती
त्यातील काही विषयांसवे त्या त्याच्या मनाला जडतेच प्रीती ।
अथवा तिरस्कार दुसऱ्याच काही विषयी तयाला वाटे स्वभावे
मार्गात धोंडे या दोन गोष्टी त्या भावनांचा ना दास व्हावे ॥ ३.३४ ॥

[अध्याय ३ श्लोक ३५, ३६]*

*श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्* ।
*स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः* ॥ ३.३५ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
पालन अगदी उत्तम केले अन्य जनांच्या कर्तव्याचे
तरी श्रेष्ठ ते पालन अपुल्या गुणविरहित त्या कर्तव्याचे ।
पाळत असता निजकर्तव्या मृत्यू आला तरी श्रेष्ठ तो
अन्य जनांच्या कर्तव्याला भीतीचा तो वेढा असतो ॥ ३.३५ ॥

_*अर्जुन उवाच*_
*अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः* ।
*अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित:* ॥ ३.३६ ॥

_अर्जुन उद्गारला_
जरी तयाला नसते इच्छा पुरुष तरी का पाप आचरे? ।
बलप्रभावे जणू वागतो सांग मला तू वार्ष्णेया! रे ॥ ३.३६ ॥