गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय २
॥ *अध्याय २* ॥
*सांख्ययोग*
विषादाने गलितगात्र झालेल्या अर्जुनाला पुन्हा युद्धासाठी तयार करणे हे जरी भगवान श्रीकृष्णांचे उद्दिष्ट असले तरी ते केवळ एक निमित्त आहे. त्या निमित्ताने एकूणच मानवी अस्तित्व, देहाची नश्वरता, आत्म्याचे अमरपण, पुनर्जन्म, जन्ममरणाचे चक्र, परमेश्वर, मोक्ष किंवा मुक्ती असे अनेक विचार आणि संकल्पना या पुढच्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उलगडून सांगतात. मोक्षाप्रत नेणारे विविध मार्ग, त्यातील अडचणी, कुठलेही कार्य करत असताना किंवा एकंदरीत आयुष्य जगत असताना आवश्यक मनोवृत्ती या साऱ्याच गोष्टी क्रमाक्रमाने उलगडत जातात.
या दुसऱ्या अध्यायाच्या सुरवातीला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाची कडक शब्दात निर्भर्त्सना करतात. त्यावर अर्जुन पुन्हा एकदा आपला संभ्रम भगवान श्रीकृष्णांपुढे मांडतो. त्याला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शरीरात वास करणाऱ्या आत्म्याची संकल्पना सविस्तरपणे समजावितात. पुन्हा एकदा ते त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात आणि जर ते पार पाडले नाही तर कशी दुष्कीर्ती होईल हेही सांगतात.
ज्ञानातून मोक्षाप्रत नेणारा मार्ग सांख्ययोग आणि कर्मातून मोक्षाप्रत नेणारा मार्ग कर्मयोग. अध्यायाचे नाव जरी सांख्ययोग असले तरी भगवान श्रीकृष्ण दोन्हींचे विवेचन या अध्यायात करतात आणि ते करीत असतानाच स्थितप्रज्ञ ही संकल्पना आपल्यासमोर मांडतात. अर्जुन अर्थातच ती अधिक उलगडून सांगण्याची विनंती करतो. भगवान श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ स्थितीचे विस्तृत विवेचन करतात आणि त्या स्थितीपर्यंत पोहोचणे किती दुष्कर आहे हेही सांगतात. त्याने अर्जुन पुन्हा संभ्रमात पडतो.
या अध्यायात आलेल्या संकल्पना आणि विचार भगवद्गीतेत पुढे अनेकवेळा पुनरुच्चारित होतात आणि अधिकाधिक स्पष्टही होत जातात. पण या साऱ्याच तत्वज्ञानाचे प्रवेशद्वार म्हणून या अध्यायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
[अध्याय २ श्लोक १]*
_संजय उवाच_
*तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्* ।
*विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन:* ॥ २.१ ॥
_संजय उद्गारला_
चित्त ते भांबावलेले दु:ख दारुण त्यात मोठे
नेत्र व्याकुळ त्यात केवळ गोठलेले अश्रुसाठे ।
अर्जुनाची ती अवस्था पाहिली अन् सत्वरी
अंतरीच्या चार गोष्टी बोलला तो श्रीहरी ॥ २.१ ॥
[अध्याय २ श्लोक २]*
_श्री भगवानुवाच_
*कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्* ।
*अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन* ॥ २.२ ॥
_श्री भगवान उद्गारले_
हे अर्जुना! हा कुविचार कुठला ।
या संकटी जो चित्ती उमटला ॥
ना मान्य आर्या, ना कीर्तिदायी ।
स्वर्गास जाण्या हा मार्ग नाही ॥ २.२ ॥
[अध्याय २ श्लोक ३]*
*क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते* ।
*क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप* ॥ २.३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
नपुंसकत्वास ना अंगिकारी वृत्ती तुला ही नच शोभणारी ।
मरगळ मनाची झटकून सारी हो सज्ज पार्था! धरुनी उभारी ॥ २.३ ॥
[अध्याय २ श्लोक ४]*
_अर्जुन उवाच_
*कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन* ।
*इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन* ॥ २.४ ॥
_अर्जुन उद्गारला_
भीष्म आणिक द्रोण दोघे पूज्य मानी मी जयांना ।
कसे कृष्णा! या शरांनी रणी मारू आज त्यांना? ॥ २.४ ॥
[अध्याय २ श्लोक ५]*
*गुरूनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके* ।
*हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्* ॥ २.५ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
मारुनी या गुरुजनांना काय कृष्णा! मी करावे?
रक्तलांछित भोग घेता नित्य लज्जित मी रहावे? ।
त्याहुनी हे श्रेष्ठ निश्चित मी स्वतःला आवरावे
अन् भिकेवर जरी जगलो ताठ मानेने जगावे ॥ २.५ ॥
[अध्याय २ श्लोक ६]*
*न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः* ।
*यानेव हत्वा न जिजिविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः* ॥ २.६ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
मार्ग कोठला श्रेष्ठ असे ते माहित नाही आज या क्षणी
युद्धा जिंकू वा ना जिंकू ज्ञात नसे हे इथे या रणी ।
ऐसे बांधव ज्यांस मारुनी उरे न इच्छा जगण्याचीही ।
तेच समोरी उभे केशवा! काय करावे उमगत नाही ॥ २.६ ॥
[अध्याय २ श्लोक ७]*
*कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः* ।
*यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्* ॥ २.७ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
मती गुंग झाली दयाळू स्वभावे ।
खरा धर्म कोठे न चित्तास ठावे ।
असंदिग्ध मार्गा तुला मी विचारी ।
मला सांग कृष्णा! तुझा मी पुजारी ॥ २.७ ॥
[अध्याय २ श्लोक ८]*
*न हि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्* ।
*अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्* ॥ २.८ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
सार्वभौम अन् समृद्धीचे राज्य लाभले भूलोकाचे
आणिक लाभे पद ते उन्नत देवांच्याही अधिपत्याचे ।
तरी शोक जो इन्द्रियांस या करी निवारण त्या दुःखाचे
असे कुठेही मला न दिसते साधन माझ्या उपयोगाचे ॥ २.८ ॥
[अध्याय २ श्लोक ९]*
_सञ्जय उवाच_
*एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप* ।
*न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह* ॥ २.९ ॥
_संजय उद्गारला_
अशा प्रकारे विचार त्याचे सांगितल्यावर श्रीकृष्णाला ।
“लढेन मी ना” अर्जुन वदला आणि नंतरी मौन जाहला॥ २.९ ॥
[अध्याय २ श्लोक १०]*
*तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत* ।
*सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः* ॥ २.१० ॥
_[संजय उद्गारला]_
हे भारता! ते ऐकून सारे शोकात बुडल्या त्या अर्जुनाला ।
ज्या दोन सेना त्यांच्याचमध्ये श्रीकृष्ण बोले हांसून त्याला ॥ २.१० ॥
[अध्याय २ श्लोक ११]*
_श्री भगवानुवाच_
*अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे* ।
*गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः* ॥ २.११ ॥
_श्री भगवान उद्गारले_
शोक ज्याचा ना करावा तू तयाचा शोक करिसी
आणि वरती पण्डितांची प्रौढ भाषा तूच वदसी ।
धर्म तो तू ओळखावा जे खरे ज्ञानी तयांचा
ते कधी ना शोक करिती जीविताचा वा मृताचा ॥ २.११ ॥
[अध्याय २ श्लोक १२]*
*न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः* ।
*न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्* ॥ २.१२ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
असे नव्हे की पूर्वी नव्हतो मी, तू आणिक राजे हे तर ।
भविष्यातही असे नव्हे की नसूच आपण पुन्हा इतःपर ॥ २.१२ ॥
[अध्याय २ श्लोक १३]*
*देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा* ।
*तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति* ॥ २.१३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
देहामध्ये वास करोनी आत्मा भोगी देहाद्वारे
बाल्य, युवा अन् वार्धक्याच्या तीन अवस्था जशाप्रकारे ।
तशाप्रकारे नवदेहाची प्राप्ती त्याला येथे भुवनी
या सत्याला जाणल्यावरी न हो संभ्रमित तेथे ज्ञानी ॥ २.१३ ॥
[अध्याय २ श्लोक १४]*
*मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः* ।
*आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत* ॥ २.१४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
इन्द्रिया संयोग जे ते शीत किंवा उष्ण असती
सुखा देती कधी आणिक कधी केवळ दुःख देती ।
नित्यता त्यांच्यात नाही कधी येती कधी जाती
जाणुनी त्या अर्जुना! तू अंगिकारी सहनशक्ती ॥ २.१४ ॥
[अध्याय २ श्लोक १५]*
*यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ* ।
*समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते* ॥ २.१५ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
हे नरश्रेष्ठा! समान मानी सुखदुःखा जो पुरुष मनस्वी ।
संयोगांचे क्लेश न त्याला मुक्ति साधण्या तोच यशस्वी ॥ २.१५ ॥
[अध्याय २ श्लोक १६]*
*नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः* ।
*उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः* ॥ २.१६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
येथे असत्या अस्तित्व नाही ।
अस्तित्व सत्या ते नित्य राही ॥
विद्वान तत्त्वज्ञानी असे जो ।
सदसद्विवेके निर्णय करी तो ॥ २.१६ ॥
[अध्याय २ श्लोक १७]*
*अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्* ।
*विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति* ॥ २.१७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ज्याने अवघे विश्व व्यापिले त्या अविनाशी तत्त्वा जाणी ।
अक्षय ते तर त्या तत्त्वाचा करू शके ना विनाश कोणी ॥ २.१७ ॥
[अध्याय २ श्लोक १८]*
*अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः* ।
*अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत* ॥ २.१८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
देहामध्ये प्रत्येकाच्या वास करी जो आत्मा तो तर
असे स्वरूपी अविनाशी अन् स्वयंसिद्ध तो नित्य निरंतर ।
देह तयाचे नाशवंत हे असे सांगती सर्व श्रेष्ठजन
म्हणून आता ऐक अर्जुना! युद्ध करी हे आशंकेविण॥ २.१८ ॥
[अध्याय २ श्लोक १९]*
*य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्* ।
*उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते* ॥ २.१९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
म्हणे कुणी जो यास विनाशक कुणी म्हणे वा यास विनाशित ।
उभय अडाणी त्या नच ठाउक हा न विनाशक वा न विनाशित ॥ २.१९ ॥
[अध्याय २ श्लोक २०]*
*न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः* ।
*अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे* ॥ २.२० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
आत्मा कधीही जन्मा न येई त्याला कधीही मृत्यूच नाही
ऐसे नसे की जन्मून आधी देहासवे हा पुन्हा जन्म घेई ।
हा नित्य आहे, प्राचीन आहे, शाश्वत असे हा, या जन्म नाही
हा देह जेव्हा अंतास जाई आत्म्यास तेव्हा परि अंत नाही ॥ २.२० ॥
[अध्याय २ श्लोक २१]*
*वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्* ।
*कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्* ॥ २.२१ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ज्या जन्म नाही, नाही विनाशी, जो नित्य, अक्षय आत्मा तयाला ।
जो जाणतो तो मारी कुणाला? सांगे कुणाला तो मारण्याला॥ २.२१ ॥
[अध्याय २ श्लोक २२]*
*वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि* ।
*तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही* ॥ २.२२ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
हो जीर्ण जेव्हा वस्त्रे स्वतःची माणूस त्यांना टाकून देतो
त्यांच्याच जागी वसने नवी अन् धारण करोनी तो सज्ज होतो ।
त्याच्याच सम तो आत्मा शरीरे टाकून देई ती जीर्ण होता
दुसरी नवी घे आत्मा शरीरे विनाखण्ड चाले हे चक्र पार्था! ॥ २.२२ ॥
[अध्याय २ श्लोक २३]*
*नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः* ।
*न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः* ॥ २.२३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ना तोडिती या शस्त्रे कधीही।
अग्नी न याला जाळी कधीही ॥
ना आर्द्र करिते पाणी तयाला ।
ना शुष्क करितो वारा तयाला ॥ २.२३ ॥
[अध्याय २ श्लोक २४, २५ , २६ ]*
*अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च* ।
*नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः* ॥ २.२४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
अभेद्य हा तर, दहनशील ना, न घे आर्द्रता, न घे शुष्कता ।
सर्वाभूती हाच सनातन, अविचल, स्थिर हा यात नित्यता ॥ २.२४ ॥
*अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते* ।
*तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि* ॥ २.२५ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
असे वर्णिती व्यक्त नसे हा, कल्पनीय ना, हा अविकारी ।
म्हणून याला जाणी आणिक दुःख कशाचे कधी ना करी ॥ २.२५ ॥
*अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्* ।
*तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि* ॥ २.२६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जरी वाटते नित्य जन्मतो ।
किंवा मृत्यू नित्य पावतो ॥
तरी तयाचे दुःख करी ना ।
समज जरा हे वीर अर्जुना! ॥ २.२६ ॥
[अध्याय २ श्लोक २७]*
*जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च* ।
*तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि* ॥ २.२७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जो जन्म घेई तो मृत्यु पावे जो मृत्यु पावे तो जन्म घेई ।
अनिवार्य आहे हे चक्र म्हणुनी तू ना करावा तो शोक काही ॥ २.२७ ॥
[अध्याय २ श्लोक २८, २९ ]*
*अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत* ।
*अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना* ॥ २.२८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जीव या जगी जन्माआधी अव्यक्तच ते सारे असती
निधन तयांचे झाल्यानंतर अव्यक्तच ते पुन्हा राहती ।
केवळ त्यांच्या जन्ममृत्युच्या मधल्या काळी व्यक्त अवस्था
या सत्याला जाणल्यावरी शोक कशाला त्याचा पार्था!?॥ २.२८ ॥
*आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः* ।
*आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्* ॥ २.२९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
काही जन ते या आत्म्याला अद्भुत आहे असे मानिती
कुणी आणखी त्याच्याविषयी आश्चर्याने सतत बोलती ।
कुणी अचंबा मनी ठेवुनी त्याच्याविषयी नित्य ऐकती
जरी ऐकती परी तयांना स्वरूप याचे उमगत नाही ॥ २.२९ ॥
[अध्याय २ श्लोक ३०, ३१, ३२]*
*देही नित्य अवध्योऽयं देहे सर्वस्य भारत* ।
*तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि* ॥ २.३० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ऐक भारता! जो सर्वांच्या देहांमध्ये वसे निरंतर ।
करू नको रे शोक कुणाचा ओळख त्याला अवध्य तो तर ॥ २.३० ॥
*स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि* ।
*धर्म्याध्दि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते* ॥ २.३१ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
कर्तव्याचे भान ठेवुनी ढळू नको तू तयापासुनी ।
न्याय्य युद्ध हे असे क्षत्रिया दुजे न काही श्रेष्ठ त्याहुनी ॥ २.३१ ॥
*यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्* ।
*सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्* ॥ २.३२ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
इथे अर्जुना! या युद्धाला नकोस समजू युद्धच केवळ
सहज समोरी चालत आली आहे मोठी संधी दुर्मिळ ।
स्वर्गलोक जो द्वार तयाचे उघडण्यास ही आहे सक्षम
भाग्यवंत ते क्षत्रिय असती प्राप्त जयांना संधी यासम ॥ २.३२ ॥
[अध्याय २ श्लोक ३३, ३४, ३५]*
*अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि* ।
*ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि* ॥ २.३३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
विचार करिसी तू जर येथे धर्मयुद्ध हे ना लढण्याचा ।
स्वधर्म, कीर्ती दोन्ही जाता धनी मात्र रे तू पापाचा ॥ २.३३ ॥
*अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्* ।
*सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते* ॥ २.३४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
दुष्कीर्तीची चर्चा होईल लोकांमध्ये सदा सर्वदा ।
सभ्य माणसा अपकीर्ती ही मरणापेक्षा अधिक दुःखदा ॥ २.३४ ॥
*भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः* ।
*येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्* ॥ २. ३५ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
महारथी हे तुला मानती महान योद्धा आणि धनुर्धर
उद्या अर्जुना! बोलतील ते उपहासाने तुला खरोखर ।
रणातुनी हा पळून गेला हा तर होता दुर्बळ, भित्रा
त्यांच्या लेखी मूल्यहीन तू नगण्य ठरसी कुन्तीपुत्रा!॥ २.३५ ॥
[अध्याय २ श्लोक ३६, ३७]*
*अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः* ।
*निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्* ॥ २.३६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
अंगी तुझ्या जे सामर्थ्य त्याची अर्वाच्य शब्दी नाना प्रकारे ।
करतील निन्दा तव शत्रु सारे अन् दुःख नाही यावीण दुसरे ॥ २.३६ ॥
*हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्* ।
*तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः* ॥ २.३७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
रणात या जर आला मृत्यू मिळेल तुजला स्वर्ग खरोखर
भोगशील तू राज्य धरेचे जिंकलेस हे धर्मयुद्ध जर ।
समानरीत्या लाभप्रदायक विकल्प दोन्ही येथे समरी
अन् युद्धाचा निश्चय करुनी ऊठ अर्जुना! ऊठ सत्वरी ॥ २.३७ ॥
[अध्याय २ श्लोक ३८, ३९]*
*सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ* ।
*ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि* ॥ २.३८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
सुखदुःखाला लाभहानिला जयास आणिक पराजयाला
एक मानुनी युद्ध करी तू मग पापाचा स्पर्श न तुजला ॥ २.३८ ॥
*एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रुणु* ।
*बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि* ॥ २.३९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
इथवर तुजला जो सांगितला ज्ञानयोग आचरती ज्ञानी
तोच सांगतो भिन्न प्रकारे कर्मयोग जो इथे जीवनी ।
त्या कर्माच्या मार्गावरती चालशील जर तू नेटाने
तेव्हा होसी मुक्त अर्जुना! तुटून जाती कर्मबंधने ॥ २.३९ ॥
[अध्याय २ श्लोक ४०, ४१]*
*नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते* ।
*स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्* ॥ २.४० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
आरंभ नाही ना अंत येथे या कर्ममार्गी ना विघ्न येई ।
थोडे जरी हो कर्तव्यपालन साऱ्या भयाला ते दूर नेई ॥ २.४० ॥
*व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन* ।
*बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्* ॥ २.४१ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
या कर्ममार्गी जो योग्य चाले बुद्धी तयाची एकाग्र पार्था!
स्थिरनिश्चला ती राहून करते निजनिर्णयाला जाणून अर्था ।
परि जे अडाणी चंचल तयांची बुद्धी करी ना ती निर्णयाला
दाही दिशांना ती धावते अन् ना अंत आहे त्या धावण्याला ॥ २.४१ ॥
[अध्याय २ श्लोक ४२, ४३]*
*यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः* ।
*वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः* ॥ २.४२ ॥
*कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्* ।
*क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति* ॥ २.४३ ॥
[श्री भगवान उद्गारले]
वेदांमधल्या शब्दांमध्ये जे जन केवळ गुंतुन पडले
भौतिक गोष्टींविषयी ज्यांची आसक्ती अन् प्रेम न झडले ।
स्वर्गप्राप्तिला अंतिम उन्नत ध्येय मानले ज्या सगळ्यांनी
समज अर्जुना! त्या सर्वांना भरकटलेले मूर्ख अडाणी ॥
ते जन वदती खळखळणाऱ्या शोभिवंत शब्दांची भाषा
कर्माचे फल दाखविणारी आणि दाखवी ती सुख-आशा ।
उपभोगाचा, ऐश्वर्याचा मार्ग दाविते इतरांना ती
त्यायोगे जन विविध तऱ्हांनी कर्मकांडपथ नित आचरती ॥
॥ २.४२ ॥ ॥ २.४३ ॥
[अध्याय २ श्लोक ४४, ४५]*
*भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्* ।
*व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते* ॥ २.४४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ऐश्वर्यात नि भोगांमध्ये अतिआसक्ती असे जयांची
त्या भाषेच्या परिणामाने विचलित होती मने तयांची ।
निर्णय घेण्या सक्षम बुद्धी परी चहुकडे भटकत राही
भरकटलेल्या त्या बुद्धीला कधी समाधी साधत नाही ॥ २.४४ ॥
*त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन* ।
*निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्* ॥ २.४५ ॥
*[श्री भगवान उद्गारले]*
त्रिगुणात्मक जी असे प्रकृती वेद वर्णिती जाण तियेला
नित्य राहुनी परमेशातच शरण न जाई त्या त्रिगुणीला ।
प्राप्तीची तुज नको कामना प्राप्त जे तया जपण्याचीही
सुखदुःखासम अनेक द्वन्द्वे पार करोनी पार्था! राही॥ २.४५ ॥
[अध्याय २ श्लोक ४६, ४७, ४८]*
*यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके* ।
*तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः* ॥ २.४६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
अत्यल्प जल जे कूपात केवळ क्षमता नि गुण जे त्याच्यात असती
संपूर्ण भरल्या जलसंचयाच्या पाण्यातही ते तैसेच दिसती ।
संशोधनाने वेदात सगळ्या ज्ञानी नि पण्डित जो अर्थ पाहे
तैशा प्रकारे जो ब्रह्म जाणी दिसतो तयाला तो अर्थ आहे ॥ २.४६ ॥
*कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन* ।
*मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि* ॥ २.४७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
कर्मावरी तव अधिकार आहे त्याच्या फळावर नाही कधीही ।
फळ हे नसावे जीवनप्रयोजन परि तू कधी ना निष्क्रीय राही ॥ २.४७ ॥
*योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय* ।
*सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते* ॥ २.४८ ॥
*[श्री भगवान उद्गारले]*
योगी बनुनी करिता कर्मे यश वा अपयश सम मानावे ।
कुठेच पार्था! ना गुंतावे समवृत्तीला योग म्हणावे॥ २.४८ ॥
[अध्याय २ श्लोक ४९, ५०]*
*दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय* ।
*बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः* ॥ २.४९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
ज्ञानयोगाहून आहे खूप खाली स्तर जयाचा
अंतरी इच्छा धरोनी लोक करिती कर्म त्याचा ।
फळांच्या नित प्राप्तिसाठी कर्म करती दीन सारे
सांगतो मी ऐक पार्था! ज्ञानयोगा शरण जा रे ॥ २.४९ ॥
*बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते* ।
*तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्* ॥ २.५० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जो ज्ञानयोगी जगण्यात त्याच्या समतोलवृत्ती राखून राही
वृत्तीमुळे त्या तो सुकृताला अन् दुष्कृताला सोडून देई ।
ना सोडिता ती समतोलवृत्ती कर्मांस साऱ्या तो पाहताहे
म्हणुनी रहा तू योगात पार्था! कर्मात प्राविण्य हा योग आहे ॥ २.५० ॥
[अध्याय २ श्लोक ५१, ५२, ५३]*
*कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः* ।
*जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गछन्त्यनामयम्* ॥ २.५१ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
बुद्धिवन्त जे पंडित ज्ञानी।
कर्मफलाचा त्याग करोनी ॥
जन्मबन्धने तुटती त्यांची।
अन् हो प्राप्ती परमपदाची ॥ २.५१ ॥
*यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति* ।
*तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च* ॥ २.५२ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
तव बुद्धीने मोहसागरा पार करोनी जासी तू जर
भूतलावरी मिळणारी जी सुखे ऐकिली इथे आजवर ।
आणिक ती ही भविष्यकाळी ऐकशील जी सुखे इतःपर
सर्वांविषयी उदासीनता असेल पार्था! तुला खरोखर ॥ २.५२ ॥
*श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला* ।
*समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि* ॥ २.५३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
वेगवेगळ्या मतांमुळे जी दूर जातसे श्रुतींपासुनी
विचलित झाल्या त्या बुद्धीला करी नियंत्रित अर्थ जाणुनी ।
करुनी जेव्हा अचल नि सुस्थिर समाधीत तिज करिसी स्थापित
समज अर्जुना! परमात्म्याशी योग तुझा मग आहे निश्चित ॥ २.५३ ॥
[अध्याय २ श्लोक ५४, ५५, ५६]*
_अर्जुन उवाच_
*स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव* ।
*स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्* ॥ २.५४ ॥
_अर्जुन उद्गारला_
जो सदा एकाग्रतेने शांत चित्ती राहतो
अचल बुद्धी ठेवुनी जो स्थितप्रज्ञ म्हणवितो ।
केशवा! तू सांग मजला काय त्याची लक्षणे?
कसा बैसे? कसा चाले? कसे त्याचे बोलणे? ॥ २.५४ ॥
_श्री भगवानुवाच_
*प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्* ।
*आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते* ॥ २.५५ ॥
_श्री भगवान उद्गारले_
पार्था! मनीच्या ज्या सर्व इच्छा झटकून टाकी माणूस जेव्हा ।
अन् तृप्त राही नित अंतरी जो स्थितप्रज्ञ होतो तो मात्र तेव्हा ॥ २.५५ ॥
*दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः* ।
*वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते* ॥ २.५६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
दुःखात कुठल्या उद्विग्न नाही।
समयी सुखाच्या इच्छा न काही ॥
ना क्रोधभीती ना प्रेम ज्याला।
म्हणती मुनी अन् स्थितप्रज्ञ त्याला ॥ २.५६ ॥
[अध्याय २ श्लोक ५७, ५८]*
*यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम्* ।
*नाभिनन्दन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता* ॥ २.५७ ॥
*[श्री भगवान उद्गारले]*
आनंद नाही त्याला शुभाचा।
संक्षोभ नाही अशुभात त्याचा ॥
आहे अनासक्त वृत्ती जयाची।
स्थिरनिश्चला ती प्रज्ञा तयाची ॥ २.५७ ॥
*यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः* ।
*इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता* ॥ २.५८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
त्या कासवाला जर स्पर्श झाला।
चोरून अंगे राखी स्वतःला ॥
पुरुषावरी ये ही वेळ जेव्हा।
त्याची कसोटी असतेच तेव्हा ॥
संपर्क विषयांचा इन्द्रियांना।
खेचून मागे घ्यावे तयांना ॥
ही कूर्मवृत्ती आहे जयाची।
स्थिरनिश्चला ती प्रज्ञा तयाची ॥ २.५८ ॥
[अध्याय २ श्लोक ५९, ६० ,६१]*
*विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः* ।
*रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते* ॥ २.५९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
उपभोगाच्या विषयांना जो दूर ठेवितो पुरुष निग्रही
विषयच केवळ दूर राहती परी तयांची इच्छा राही ।
स्थितप्रज्ञ तो विषयातच जो कधी मनाने गुंतत नाही
परमात्म्याच्या साक्षात्कारे इच्छा त्याला उरतच नाही ॥ २.५९ ॥
*यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः* ।
*इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः* ॥ २.६० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
जरी निग्रही, बुद्धिमान तो, मनापासुनी यत्न तयाचे ।
प्रबल इंद्रिये बळेच करती आकर्षित मन त्या पुरुषाचे ॥ २.६० ॥
*तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः* ।
*वशे हि यस्य इन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता* ॥ २.६१ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
त्या इंद्रियांना अंकित करोनी।
चित्तास जोडी माझ्या ठिकाणी ॥
त्या इंद्रियांवर सत्ता जयाची ।
स्थिरनिश्चला ती प्रज्ञा तयाची ॥ २.६१ ॥
[अध्याय २ श्लोक ६२, ६३]*
*ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते* ।
*सङ्गात्सञ्जायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते* ॥ २.६२ ॥
*क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः* ।
*स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति* ॥ २.६३ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
निजचित्त जेथे विषयात राही आसक्ति उपजे चित्तात त्याच्या ।
आसक्ति निर्मी इच्छांस आणिक इच्छा प्रसवती क्रोधास त्याच्या ॥ २.६२ ॥
क्रोधामुळे हो वेडापिसा तो त्यातून होई स्मृतिभ्रंश त्याला ।
स्मृतिभ्रंश नाशी बुद्धी तयाची अन् सर्वनाशा नेई स्वतःला ॥ २.६३ ॥
[अध्याय २ श्लोक ६४, ६५, ६६]*
*रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन्* ।
*आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति* ॥ २.६४ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
इंद्रिये वश आणि ज्याची प्रेमद्वेषाविना वृत्ती ।
भोगताना विषय तो तर शांत, निर्मल असे चित्ती ॥ २.६४ ॥
*प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते* ।
*प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते* ॥ २.६५ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
चित्तशुद्धिने त्याचे होते समूळ सगळे दुःखनिवारण ।
निर्मलचित्ते बुद्धीचे हो परमात्म्याला शीघ्र समर्पण॥ २.६५ ॥
*नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना* ।
*न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्* ॥ २.६६ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
एकरूप जो झाला नाही माझ्याशी ना स्वतःस जोडी
बुद्धी नाही त्याला आणिक नसे चिंतनी मुळीच गोडी ।
चिंतन माझे मुळी न घडता कशी मिळावी शांती त्याला?
नसेल शांती मनात तर मग मिळेल कैसे सुख पुरुषाला? ॥ २.६६ ॥
[अध्याय २ श्लोक ६७, ६८]*
*इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते* ।
*तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि* ॥ २.६७ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
विषयात रमती ती इन्द्रिये अन् मन शीघ्र धावे त्यांच्याच मागे ।
बुद्धी तयाची अशी भरकटे रे जशी नाव पाण्यावरी वायुवेगे ॥ २.६७ ॥
*तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः* ।
*इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता* ॥ २.६८ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
विषयात रमल्या त्या इंद्रियांना।
मननिग्रहाने बांधी तयांना ॥
रे अर्जुना! ही वृत्ती जयाची।
स्थिरनिश्चला ती प्रज्ञा तयाची ॥ २.६८ ॥
[अध्याय २ श्लोक ६९, ७०]*
*या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी* ।
*यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः* ॥ २.६९ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
विषयात असती ना ब्रह्मतत्त्वी, त्या प्राणिमात्रा म्हणुनी निशा ती
पण योगयात्री मननिग्रहाने जागाच राहे ऐशाच राती ।
गुंतून जेव्हा विषयात सारे सामान्य जन हे असतात जागे
योग्यास कळते ही रात्र आहे त्याच्यानुसारे तो मात्र वागे ॥ २.६९ ॥
*आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविश्यन्ति यद्वत्* ।
*तद्वत् कामा यं प्रविश्यन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी* ॥ २.७० ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
तुडुंब भरल्या महासागरी नद्या ओतिती त्यांचे पाणी
तरी न खवळे अविचल सागर ना सोडी स्तर शांत राहुनी ।
त्या पाण्यासम ज्याच्या इच्छा मनोसागरी प्रवेश करिती
त्या योग्याला लाभे शांती भोगासक्ता प्राप्त नसे ती ॥ २.७० ॥
[अध्याय २ श्लोक ७१, ७२]*
*विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः* ।
*निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति* ॥ २.७१ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
नसे लालसा, माया, इच्छा, अहंकार ना उरला ज्याला ।
या वृत्तीने जगी राहुनी लाभे शांती त्या पुरुषाला ॥ २.७१ ॥
*एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति* ।
*स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति* ॥ २.७२ ॥
_[श्री भगवान उद्गारले]_
स्थिती ब्राह्मी हीच आहे लाभता ती एकदा
मोह नाही उरत कुठला ती असावी सर्वदा ।
मरण दारी उभे पण जो ही स्थिती ना सोडितो
ब्रह्मनिर्वाणास केवळ तोच पार्था! मिळवितो ॥ २.७२ ॥
*|| ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः||*
अशा प्रकारे श्री भगवानांनी गाइलेल्या उपनिषदांतील ब्रह्मविद्येतील योगशास्त्रातील श्रीकृष्ण-अर्जुन संवादात्मक सांख्ययोग नावाचा हा दुसरा अध्याय
