गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय १
नमस्कार मंडळी,
आपल्या पूर्वांचल परिसरातले श्रीयुत अनिल बोकील यांनी गीतेचे मराठी काव्यरूपात भाषांतर केले आहे. गेल्या वर्षीच्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमात आपण त्याचा काही भाग त्यांच्याच मुखे ऐकला होता. बऱ्याच लोकांना ते सौभाग्य लाभले नाही म्हणून आम्ही श्री अनिल बोकील यांना विनंती केली कि त्यांनी जर रोज थोडा थोडा करून आपल्या ग्रुप वर तो अनुवाद मराठीतून टाकला तर रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. गीता हा एक असा धर्म ग्रंथ आहे की त्याचे कितीही वेळा पारायण केलं तरी दरवेळी काहीतरी नवीन त्यात शिकायला मिळतं.
महाकवी कालिदास यांनी रचलेले मेघदूत हे संस्कृत साहित्यातील एक अजरामर खंडकाव्य आहे. निसर्गाचे रमणीय वर्णन, विरहाची उत्कट भावना आणि कवीची कल्पनाशक्ती यांमुळे हे काव्य जग प्रसिद्ध आहे.
श्री अनिल बोकील हे मेघां पेक्षा जास्त गुणवंत ज्ञानावंत संदेशवाहक आहेत. मंडळाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी भाषांतर केलेले कालिदासाचे मेघदूत हे काव्य पण मराठीतून आपल्यापर्यंत व्हाट्सअपदूत द्वारे पोहोचविण्याचे मान्य केले आहे आपण ते वाचून दर रविवारी त्याचा हीआनंद घेऊ. 🙂🙏
*अध्याय १*
*अर्जुनविषादयोग*
_भगवद्गीतेचा पहिला अध्याय राजा धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादातून सुरू होतो. कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या घटना संजय दृष्टीहीन धृतराष्ट्राला इथे वर्णन करून सांगतो आहे. त्यात दुर्योधनाची स्थिती आणि विचार, दोन्ही सैन्यातील सामर्थ्यवान योद्धे, त्यांची वैशिष्ट्ये, सैन्याची व्यूहरचना, योद्ध्यांच्या शंखांची नावे असे अनेक तपशील आपल्यासमोर येतात. पण ही सगळी केवळ पार्श्वभूमी आहे._
_कुणाबरोबर युद्ध करायचे आहे या उत्सुकतेपोटी अर्जुन श्रीकृष्णाला दोन्ही सैन्यांच्या मधल्या जागेत रथ उभा करायला सांगतो आणि तिथे गेल्यावर मात्र अर्जुनाची स्थिती केविलवाणी होते. समोर सगळेच स्वजन, भाऊबंद, गुरुजन, सुहृद…त्यांना कसे मारणार? या विषादाच्या भावनेने अर्जुन इतका ग्रासून जातो की त्याची शारीरिक स्थिती ढासळते. तो युद्ध न करण्याचा मनात निश्चय करतो. त्या निर्णयाचे समर्थन म्हणून तो परंपरा, स्वजनवधाचे पाप, कुळधर्म असे अनेक मुद्दे श्रीकृष्णासमोर उपस्थित करतो. अशा विषादभरल्या मनःस्थितीत अर्जुन हातातील शस्त्रे टाकून रथात मटकन खाली बसतो. हा अर्जुनाच्या विषादाचा विषय जरी अध्यायाच्या शेवटी येत असला तरी तो या अध्यायाचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणूनच या अध्यायाला अर्जुनविषादयोग हे नाव आहे._
_जरी कुरुक्षेत्रावरील घटना आणि अर्जुनाची झालेली स्थिती प्रत्यक्षपणे इथे येत असली तरी जरा खोलवर पाहिले तर या अध्यायात दुर्योधनाच्या मनात दडलेली भीती, तत्कालीन नातेसंबंध, सामाजिक संबंध, कुळधर्म, परंपरा या साऱ्यांचेही प्रतिबिंब पडलेले दिसते. अर्जुनाला आलेला विषाद अगदी खराखुरा आणि खोलवर आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांना त्याला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी तर्क आणि तत्त्वज्ञानाचा आधार घेत एकूणच मानवी अस्तित्वाविषयी आणि जीवनाविषयी अनेक संकल्पना पुढच्या काही अध्यायात उलगडून सांगाव्या लागतात._
[अध्याय १ श्लोक १]
_धृतराष्ट्र उवाच_
*धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः* ।
*मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय* ॥ *१.१* ॥
_धृतराष्ट्र उद्गारला_
धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री जमा झाले युद्धकांक्षी
आंधळा मी संजया! अन् जे घडे त्या तूच साक्षी ।
पुत्र माझे पण्डुचेही युद्ध करण्या सज्ज झाले
तूच आता सांग मजला उभयतांनी काय केले ॥ १.१ ॥
[अध्याय १ श्लोक २ ]
_सञ्जय उवाच_
*दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा* ।
*आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्* ॥ १.२ ॥
_संजय उद्गारला_
भूपती दुर्योधनाने दृष्टि जेव्हा टाकिली
पाण्डवांची व्यूहमण्डित सर्व सेना पाहिली ।
त्या क्षणी त्याच्या गुरूंच्या जवळ थोडे जाउनी
बोलला तो त्या गुरूंशी शब्द जे होते मनी ॥ १.२ ॥
[अध्याय १ श्लोक ३ ]
*पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्* ।
*व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता* ॥ १.३ ॥
_[संजय (दुर्योधन) उद्गारला]_
हे गुरो! ही पाहुनी घ्या पाण्डवांची भव्य सेना ।
छात्र धृष्टद्युम्न त्याची हुशारीची व्यूहरचना ॥ १.३ ॥
* [अध्याय १ श्लोक ४ ]*
*अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि* ।
*युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः* ॥ १.४ ॥
_[संजय (दुर्योधन) उद्गारला]_
येथे अर्जुन भीमासम जे शूर धनुर्धर रणात असती ।
युयुधानासह विराट येथे महारथी तो द्रुपद भूपती ॥ १.४ ॥
[अध्याय १ श्लोक ५ ]
*धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्* ।
*पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः* ॥ १.५ ॥
_[संजय (दुर्योधन) उद्गारला]_
धृष्टकेतुसह चेकितान अन् महावीर तो काशिराजही
पुरुजित् आणिक कुन्तिभोज अन् नरश्रेष्ठ जो असा शैब्यही ॥ १.५ ॥
[अध्याय १ श्लोक ६ ]
*युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्* ।
*सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः* ॥ १.६ ॥
_[संजय (दुर्योधन) उद्गारला]_
महाविक्रमी युधामन्यु अन् वीर उत्तमौजाही दिसती ।
अभिमन्युसह द्रौपदेयही महारथी हे सारे असती ॥ १.६ ॥
[अध्याय १ श्लोक ७]
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १.७ ॥
[संजय (दुर्योधन) उद्गारला]
हे आचार्या! आपण जाणा विशेष योद्धे इथे आपुले ।
तुमच्यास्तव मी वर्णन करितो नायक माझ्या सैन्यामधले ॥ १.७ ॥
[अध्याय १ श्लोक ८]
भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १.८ ॥
[संजय (दुर्योधन) उद्गारला]
आपण आणि भीष्म पितामह कृपाचार्य अन् कर्णही आहे ।
समितिञ्जय अन् अश्वत्थामा सौमदत्ति अन् विकर्ण आहे ॥ १.८ ॥
[अध्याय १ श्लोक ९ ]
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविता: ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १.९ ॥
[संजय (दुर्योधन) उद्गारला]
अनेक दुसरे युद्धविशारद नाना शस्त्रे त्यांच्या हाती ।
माझ्यासाठी युद्धामध्ये प्राण त्यागण्या तत्पर असती ॥ १.९ ॥
[अध्याय १ श्लोक १० ]
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥ १.१० ॥
[संजय (दुर्योधन) उद्गारला]
सैन्य आपुले समर्थ नाही भीष्माने जे केले रक्षित ।
परी तयांचे समर्थ भासे भीमे केले ज्यास सुरक्षित॥ १.१० ॥
[अध्याय १ श्लोक ११ ]
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १.११ ॥
[संजय (दुर्योधन) उद्गारला]
व्यूहामध्ये ज्या मोक्याच्या जागा तेथे उभे राहुनी ।
पितामहांचे रक्षण केवळ सदा करावे तुम्ही या रणी ॥ १.११ ॥
[अध्याय १ श्लोक १२]
तस्य सञ्जनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥ १.१२ ॥
[संजय उद्गारला]
भीष्मे केली सिंहगर्जना पराक्रमी त्या ज्येष्ठकुरूने
केला मोठा शंखनादही दुर्योधन हो हर्षित ज्याने ॥ १.१२ ॥
[अध्याय १ श्लोक १३]
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥ १.१३ ॥
[संजय उद्गारला]
शंख सारे फुंकिले अन् वाजल्या भेरी रणी
पणव, आनक, गोमुखांची गर्जना हो तत्क्षणी ।
गडगडाटी समरवाद्ये ध्वनी त्यांचे मिसळुनी
ध्वनी एकच कर्णकर्कश होतसे त्या कारणी ॥ १.१३ ॥
[अध्याय १ श्लोक १४]
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १.१४ ॥
[संजय उद्गारला]
अश्व पांढरे ज्यास जोडले महान ऐशा रथी बैसले ।
अर्जुन माधव या दोघांनी दिव्य आपुले शंख फुंकिले ॥ १.१४ ॥
[अध्याय १ श्लोक १५, १६]
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १.१५ ॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १.१६ ॥
[संजय उद्गारला]
केशवाने पांचजन्या, देवदत्ता अर्जुनाने
पौंड्र नामे महाशंखा फुंकिले त्या भीमसेने ।
फुंकिले अन् धर्मराजे जो अनंतविजय तयाला
नकुल सहदेवे तयांच्या सुघोषा मणिपुष्पकाला ॥ १.१५ ॥ ॥ १.१६ ॥
[अध्याय १ श्लोक १७, १८]
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १.१७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक् पृथक् ॥ १.१८ ॥
[संजय उद्गारला]
वीर धनुर्धर काशीराज अन् शूर शिखण्डी महारथी जो ।
विराट आणि धृष्टद्युम्नही वीर सात्यकी अपराजित जो ॥ १.१७ ॥
द्रौपदेय अन् द्रुपद भूपती महाबाहु अभिमन्यू यांनी ।
वेगवेगळे शंख फुंकिले हे धृतराष्ट्रा! त्या सर्वांनी ॥ १.१८ ॥
[अध्याय १ श्लोक १९]
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥ १.१९ ॥
[संजय उद्गारला]
गगनधरेला भेदी ऐसा घुमणारा तो घोष ऐकुनी ।
धृतराष्ट्राच्या पुत्रांची ती हृदये गेली छिन्न होउनी ॥ १.१९ ॥
[अध्याय १ श्लोक २०, २१]
अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १.२० ॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते । (श्लोकः १.२१ – प्रथमा पङ्क्तिः)
[संजय उद्गारला]
पाहुनी ती व्यूहरचिता सर्व सेना कौरवांची
वेळ आली जवळ जेव्हा आयुधांच्या प्रहारांची ।
ध्वजावरती कपि जयाच्या असा अर्जुन त्या रणी
बोलला तो हृषीकेशा धनुष्याला उचलुनी ॥ १.२० + १.२१ पहिली ओळ ॥
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ (श्लोकः १.२१ – द्वितीया पङ्क्तिः)
अर्जुन उद्गारला
उभय सैन्यांच्यामध्ये तू रथा नेई अच्युता ॥ १.२१ दुसरी ओळ ॥
[अध्याय १ श्लोक २२]
*यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्* ।
*कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे* ॥ १.२२ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
पाहू दे मज युद्धा करण्या कोण उपस्थित येथे समरी ।
आणि कुणाशी मला लढावे लागणार हे, थांब तोवरी ॥ १.२२ ॥
[अध्याय १ श्लोक २३]
*योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः* ।
*धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः* ॥ १.२३ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
अतिदुष्टबुद्धी दुर्योधनाचे जे जे शुभेच्छू निरखीन मी त्या ।
त्याच्याचसाठी युद्धात लढण्या एकत्र आले सारे रणी या ॥ १.२३ ॥
[अध्याय १ श्लोक २४]
सञ्जय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥ १.२४ ॥
संजय उद्गारला
धृतराष्ट्रा! तो अर्जुन जेव्हा असे बोलला श्रीकृष्णाला ।
तेव्हा दोन्ही सैन्यांमध्ये उभे करोनी सज्ज रथाला ॥ १.२४ ॥
[अध्याय १ श्लोक २५]
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति ॥ १.२५ ॥
[संजय उद्गारला]
बोले केशव, पहा अर्जुना! भीष्मद्रोण हे ज्यांचे नेते
असे भूपती सगळे आणिक कौरव सारे जमले येथे ॥ १.२५ ॥
[अध्याय १ श्लोक २६]
तत्रापश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातॄन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥ १.२६ ॥
[संजय उद्गारला]
समोरी जे कौरवांचे सैन्य युद्धा सज्ज होते
अर्जुनाने पाहिले मग तिथे जे जे उभे ते ते ।
गुरू, मातुल आणि बंधू पितामह अन् वडिलधारे
पुत्र तेथे, पौत्र तेथे आणि तेथे मित्र सारे ॥ १.२६ ॥
* [अध्याय १ श्लोक २७,२८ ]*
*श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि* ।
*तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान्* ॥ १.२७ ॥
*कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्* ।
_अर्जुन उवाच_
*दॄष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्* ॥ १.२८ ॥
श्वशुर होते, सुहृद होते आप्त होते त्या रणी
उभय सैन्ये त्यात साऱ्या बांधवांना निरखुनी ॥ १.२७ ॥
विषादे तो पार्थ बोले दाटली करुणा मनी
_अर्जुन उद्गारला_
युद्ध करण्या सज्ज सारे स्वजन कृष्णा! पाहुनी॥ १.२८ ॥
* [अध्याय १ श्लोक २९]*
*सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति* ।
*वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते* ॥ १.२९ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
अवयव सारे शिथिल जाहले शरीर माझे कंपित होई ।
तोंडालाही कोरड पडली सर्वांगावर काटा येई ॥ १.२९ ॥
* [अध्याय १ श्लोक ३०]*
*गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते* ।
*न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः* ॥ १.३० ॥
_[अर्जुन उद्गारला]_
सुटे हातातून धनु हे या त्वचेचा दाह होई ।
मी उभा राहू शकेना चित्त माझे भ्रमित राही ॥ १.३० ॥
* [अध्याय १ श्लोक ३१]*
*निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव* ।
*न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे* ॥ १.३१ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
इथे केशवा! मजला दिसती अशुभाचे संकेत सर्वही ।
रणांगणी या स्वजन मारणे मला वाटते प्रशस्त नाही ॥ १.३१ ॥
* [अध्याय १ श्लोक ३२]*
*न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च* ।
*किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा* ॥ १.३२ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
मजला इच्छा नच विजयाची ।
ना राज्याची नसे सुखांची ॥
काय प्रयोजन मज राज्याचे ।
वा भोगांचे वा जगण्याचे ॥ १.३२ ॥
* [अध्याय १ श्लोक ३३]*
*येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च* ।
*त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च* ॥ १.३३ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
राज्य किंवा भोगकांक्षा ज्या जनांसाठी करावी
मी सुखांची तीव्र इच्छा ज्या कुणासाठी धरावी ।
तेच येथे युद्धक्षेत्री मजसमोरी आज आले
प्राण आणिक वित्त दोन्ही त्यागण्या हे सज्ज झाले ॥ १.३३ ॥
* [अध्याय १ श्लोक ३१]*
*निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव* ।
*न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे* ॥ १.३१ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
इथे केशवा! मजला दिसती अशुभाचे संकेत सर्वही ।
रणांगणी या स्वजन मारणे मला वाटते प्रशस्त नाही ॥ १.३१ ॥
* [अध्याय १ श्लोक ३२]*
*न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च* ।
*किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा* ॥ १.३२ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
मजला इच्छा नच विजयाची ।
ना राज्याची नसे सुखांची ॥
काय प्रयोजन मज राज्याचे ।
वा भोगांचे वा जगण्याचे ॥ १.३२ ॥
* [अध्याय १ श्लोक ३३]*
*येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च* ।
*त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च* ॥ १.३३ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
राज्य किंवा भोगकांक्षा ज्या जनांसाठी करावी
मी सुखांची तीव्र इच्छा ज्या कुणासाठी धरावी ।
तेच येथे युद्धक्षेत्री मजसमोरी आज आले
प्राण आणिक वित्त दोन्ही त्यागण्या हे सज्ज झाले ॥ १.३३ ॥
* [अध्याय १ श्लोक ३४]*
*आचार्याः पितर: पुत्रास्तथैव च पितामहाः* ।
*मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा* ॥ १.३४ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
पितापुत्र अन् ज्येष्ठ पितामह, जमले सारे येथे गुरुजन ।
मामा, नातू, श्वशुर, मेव्हणे नातलगांचे हे संमेलन ॥ १.३४ ॥
* [अध्याय १ श्लोक ३५]*
*एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन* ।
*अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते* ॥ १.३५ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
आज इथे मी या भूमीवर प्राण स्वतःचा जरी गमविला
या स्वजनांच्या हत्येची ती मुळीच नाही इच्छा मजला ।
उपभोगास्तव जरी लाभले राज्य माधवा! त्रैलोक्याचे
मी ना हत्या करेन यांची काय मोल मज भूराज्याचे ॥ १.३५ ॥
* [अध्याय १ श्लोक ३६]*
*निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन* ।
*पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः* ॥ १.३६ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
पुत्र मारुनी धृतराष्ट्राचे हर्ष कसा हो हे जनार्दना! ।
युद्धखोर हे यांस मारुनी लागे केवळ पाप आपणा ॥ १.३६ ॥
* [अध्याय १ श्लोक ३७]*
*तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान्* ।
*स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव* ॥ १.३७ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
म्हणून नाही योग्य मारणे बंधु आपुले अशा कौरवा ।
स्वजन मारुनी होऊ आपण सुखी कसे रे सांग माधवा!? ॥ १.३७ ॥
* [अध्याय १ श्लोक ३८,३९]*
*यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः* ।
*कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्* ॥ १.३८ ॥
*कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्* ।
*कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन* ॥ १.३९ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
कुळनाशाचा दोष लागतो ।
पापच केवळ मित्रद्रोह तो ॥
अतिलोभाने अंध जाहले ।
म्हणून त्यांनी हे न पाहिले ॥ १.३८ ॥
परी केशवा! कुलक्षयाचा ।
दोष जाणतो आपण त्याचा ॥
तरी आपणा का न कळावे ।
पापापासुनी दूर वळावे? ॥ १.३९ ॥
* [अध्याय १ श्लोक ४०]*
*कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः* ।
*धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत*॥ १.४० ॥
_[अर्जुन उद्गारला]_
जेव्हा होतो ह्रास कुलाचा धर्म कुळाचे लोप पावती ।
अधर्म पसरे कुळात साऱ्या लयास जाता परंपरा ती ॥ १.४० ॥
* [अध्याय १ श्लोक ४१]*
*अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः* ।
*स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः* ॥ १.४१ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
अधर्माने कुलस्त्रियांची नीतिमत्ता ढासळे ।
त्यामुळे हो वर्णसंकर, व्यवस्था ही कोसळे ॥ १.४१ ॥
* [अध्याय १ श्लोक ४२]*
*सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्यच* ।
*पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः* ॥ १.४२ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
वर्णसंकरे कुलसंहारक कुलही नरकामध्ये जाई
श्राद्धतर्पणाविना तयांचे पितर न होती मुक्त कधीही ॥ १.४२ ॥
* [अध्याय १ श्लोक ४३]*
*दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः* ।
*उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः* ॥ १.४३ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
कुलसंहारक जे जन असती संकरकारक दोष तयांचे ।
त्या दोषांनी हो उच्चाटन जातिधर्म अन् कुळधर्मांचे ॥ १.४३ ॥
* [अध्याय १ श्लोक ४४]*
*उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन* ।
*नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम* ॥ १.४४ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
अशी माणसे ज्यांच्या आहे नाश जाहला कुलधर्माचा ।
ऐकतोच की आपण सारे नरकामध्ये वास तयांचा ॥ १.४४ ॥
* [अध्याय १ श्लोक ४१]*
*अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः* ।
*स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः* ॥ १.४१ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
अधर्माने कुलस्त्रियांची नीतिमत्ता ढासळे ।
त्यामुळे हो वर्णसंकर, व्यवस्था ही कोसळे ॥ १.४१ ॥
* [अध्याय १ श्लोक ४२]*
*सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्यच* ।
*पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः* ॥ १.४२ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
वर्णसंकरे कुलसंहारक कुलही नरकामध्ये जाई
श्राद्धतर्पणाविना तयांचे पितर न होती मुक्त कधीही ॥ १.४२ ॥
* [अध्याय १ श्लोक ४३]*
*दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः* ।
*उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः* ॥ १.४३ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
कुलसंहारक जे जन असती संकरकारक दोष तयांचे ।
त्या दोषांनी हो उच्चाटन जातिधर्म अन् कुळधर्मांचे ॥ १.४३ ॥
* [अध्याय १ श्लोक ४४]*
*उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन* ।
*नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम* ॥ १.४४ ॥
_[अर्जुन उद्गारला]_
अशी माणसे ज्यांच्या आहे नाश जाहला कुलधर्माचा ।
ऐकतोच की आपण सारे नरकामध्ये वास तयांचा ॥ १.४४ ॥
