तुझे थोर व्यक्तिमत्व पाहुनी
हेवा वाटे आदर्शला ।
टाका टाका वीण घालुनी
समर्थ केले संसाराला ।
दु:ख लोपले, चिंता सरली,
कर्तृत्वाला भीती हरली ।
तुझ्या कीर्तीच्या गाथा ऐकून
तुला बिलगते तुझी चिमुकली ॥
चल आजी खेळू भातुकली ॥
भातुकलीच्या ह्या खेळातच
आजी झाली तुझी भावली ।
तिच्या चिमुकल्या संसारावर
माया केलीस बनून माऊली ।
विश्वासाची कडी गवसली,
आजीने ती भांडी जपली ।
घरकुलात आईस शिकवली
संसाराची ऊन – सावली ॥
चल आजी खेळू भातुकली ॥
याच चुलीची ऊब घेऊनी
आईने अनुभवले शैशव ।
घरकुलात या तिला लाभले
संसाराचे सारे वैभव ।
तुझ्यासारखी मज घडवाया
तिने थाटले तुझेच घरकुल ।
देवाहुनीही भाग्यवान मी,
तुझी संपदा मला मिळाली ॥
चल आजी खेळू भातुकली ॥
ये आजी, बघ तुझी खेळणी,
गोष्ट सांगती त्या दिवसांची ।
गहिवरली मी आठवणीने
बालपणीच्या त्या स्पर्शाची ।
चल, एकसष्टीला मांडू घरकुल,
तू बन माझी सखी-सहेली ।
कर्तृत्वाचा प्रकाश तुजवर,
मला बनू दे तुझी सावली ॥
चल आजी खेळू भातुकली ॥
