गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय ११

॥ अध्याय ११ ॥
विश्वरूपदर्शनयोग

या अध्यायाच्या आरंभी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विनंती करतो – हे पुरुषोत्तमा! तुझ्याच मुखाने तुझे सामर्थ्य आणि ऐश्वर्य ऐकून मी धन्य झालो. माझा संभ्रम दूर झाला. पण मला तुझे ते दिव्य आणि ऐश्वर्यासह असलेले रूप पाहण्याची इच्छा आहे. त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात – तुझ्या सामान्य नयनांनी ते रूप पाहणे तुला शक्य नाही. त्यासाठी मी तुला दिव्यचक्षू प्रदान करतो. त्यांनी तुला माझे महान विश्वरूप पाहता येईल.
घडणाऱ्या चमत्काराचे आणि भगवानांनी दाखविलेल्या अद्भुत विश्वरूपाचे प्राथमिक वर्णन इथे पुन्हा संजयाच्या तोंडून येते. त्यानंतर ते रूप पाहून रोमांचित, अचंबित आणि नतमस्तक झालेल्या अर्जुनाच्या मुखाने त्या अतिविशाल, प्रखर तेजस्वी आणि भयभीत करणाऱ्या रूपाचे वर्णन महर्षी व्यास करतात.

अर्जुन म्हणतो – अनेक बाहू, अनेक मुखे, अनेक नेत्र असलेले, स्वर्गधरेच्या मधल्या अवकाशाला व्यापून टाकणारे हे रूप मी पाहतो आहे. त्याचा आदि, अंत किंवा मध्य मला कुठेच दिसत नाही. तुझ्या हातात अनेक शस्‍त्रे आहेत. हे तुझे रूप इतके रौद्र आहे की ते पाहून तीन्ही लोक चिंतित झाले आहेत. सिद्धजन आणि महर्षी स्तोत्रांनी तुझी स्तुती करीत आहेत. देव, दानव, यक्ष, गंधर्व या तुझ्या रूपाकडे विस्मयाने पाहत आहेत. अनेकदंती, अनेकवदनी ही तुझी कराल मुद्रा पाहून सारेच चिंतित झाले आहेत. माझीही स्थिती तशीच आहे. माझे चित्त कंप पावते आहे, त्याचा धीर सुटला आहे. हे तुझे प्रखर तेज मला सहन होत नाही. भीष्म, कर्ण, द्रोण अशा योद्ध्यांना, इतर कौरवांना आणि आपल्याकडील अनेक वीरांना तुझ्या मुखात प्रवेश करताना मी पाहतो आहे. पण तुझे खरे मूळरूप कसे आहे?

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावितात – साऱ्या चराचराच्या उत्पत्तीचे आणि लयाचे कारण मीच आहे. त्यामुळे या योद्ध्यांचा संहार तुझ्याविनाही होणारच आहे. त्यासाठी तू फक्त निमित्तमात्र असणार आहेस. म्हणून शोक न करता युद्ध करून या शत्रूंना जिंकणे तुझे कर्तव्यच आहे. यावर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना वंदन करून त्यांची स्तुती करतो आणि त्यांच्या विशाल विश्वरूपाला न ओळखल्यामुळे आजपर्यंत त्यांना मित्र समजून एकेरी नावाने जो उल्लेख केला त्याविषयी क्षमायाचना करतो. अर्जुन पुढे म्हणतो – पूर्वी कधीच कुणीच न पाहिलेले हे विश्वरूप माझ्यावर प्रसन्न होऊन तू मला दाखविलेस पण आता कृपया पुन्हा एकदा सौम्य रूपात यावे ही विनंती.

अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण सौम्य रूपात परत येतात आणि अर्जुनाला पुन्हा एकदा उपदेश करतात – विषयात आसक्ती न ठेवता सारी कर्मे निष्ठेने मला समर्पित करून जो एकाग्रचित्ते मला भजतो तोच माझ्यापाशी येतो.

अर्जुन उवाच
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम् ।
यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ ११.१ ॥

अर्जुन उद्गारला
कृपा कराया माझ्यावरती अती गुपित जे अध्यात्माचे ।
तू मज कथिले त्याने सारे संभ्रम झाले दूर मनाचे ॥ ११.१ ॥

भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ ११.२ ॥

कसा होतसे संभव, मृत्यू या जीवांचा तू सांगितले ।
आणिक तव ते अक्षय वैभव विस्ताराने मीच ऐकिले ॥ ११.२ ॥

एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर ।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ११.३ ॥

परमेश्वरा! तव ऐश्वर्य सारे जे वर्णिले तू नाना प्रकारे ।
त्या भव्य रूपी तुजला पहावे ऐसी मनीषा पुरुषोत्तमा! रे ॥ ११.३ ॥

मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥ ११.४ ॥

तरी हे प्रभो! त्या रूपातच तुला पाहणे शक्य असे जर ।
दिव्य तुझ्या त्या अव्यय रूपा दावी मजला हे योगेश्वर! ॥ ११.४ ॥