गीतेचे मराठी काव्यरूपात – श्रीयुत अनिल बोकील – अध्याय १०

॥ अध्याय १० ॥
विभूतियोग

विभूतियोग नावाच्या या अध्यायात सुरवातीला भगवान श्रीकृष्ण मागच्या अध्यायातील विवेचनाचा त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुनरुच्चार करतात. ते म्हणतात – देवांना आणि महर्षींनाही माझ्या उत्पत्तिविषयी माहीत नाही कारण त्यांचे मूळ देखील मीच आहे. मला जन्मच नाही, मी अनादि आहे.
माणसाच्या वेगवेगळ्या भावना माझ्यातूनच जन्माला येतात. सप्तर्षी आणि चौदा मनू हे माझ्याच इच्छेतून जन्माला आले आणि त्यांच्यापासून ही प्रजा नंतर निर्माण झाली. जे माझ्या ऐश्वर्याला आणि सामर्थ्याला ओळखतात, जे माझ्याशी जोडले जातात, त्यांच्या मनात मी ज्ञानदीप लावतो.
भगवान श्रीकृष्णांचे ते सामर्थ्यवान स्वरूप जाणून अर्जुन अत्यंत प्रभावित होतो. तो म्हणतो – हे जगदीश्वरा! तू कसा आहेस हे केवळ तुलाच ठाऊक आहे. मी कोणत्या गोष्टींनी, कोणत्या भावांनी तुझे चिंतन करू शकेन हे पुन्हा एकदा विस्ताराने सांग.
त्याला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात – माझे वैभव अपार आहे. ते तुला संक्षेपाने सांगतो. सर्व जीवांच्या अंतरातला आत्मा मीच आहे.
त्यानंतर मी कोण आणि कोणकोणत्या रूपात आहे हे भगवान श्रीकृष्ण विस्ताराने सांगतात. त्यात अंतरिक्षातील ग्रहतारे, वेद, देव, रुद्र, वसू, यक्ष, गंधर्व अशा अमानवी गोष्टी; पर्वत, नद्या, सागर, वायू, वृक्ष अशा नैसर्गिक गोष्टी; गज, अश्व, सर्प, जलचर असे प्राणी तसेच पक्षी आणि इतरही अनेक गोष्टी येतात. या साऱ्यात मी कशात आहे हे भगवान सांगतात. केवळ प्रत्यक्ष गोष्टीच नाही तर नारीतील धैर्य, क्षमा इ. गुण, तसेच नीती, शिक्षा, मौन, ज्ञान अशा अप्रत्यक्ष गोष्टीदेखील ते सांगतात.
अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात – माझ्या वैभवाचा असीमित पसारा मी थोडक्यात तुला सांगितला. याहून अधिक विस्ताराने जाणण्याचे तुला काहीच प्रयोजन नाही. इतकेच पुरे की हे विश्व मी माझ्या तेजाच्या केवळ एका अंशाने व्यापिले आहे.

_श्रीभगवानुवाच_
*भूय एव महाबाहो श्रुणु मे परमं वचः* ।
*यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया* ॥ १०.१ ॥

_श्री भगवान उद्गारले_
पुन्हा एकदा नीट ऐक तू सर्वश्रेष्ठ त्या माझ्या वचना ।
हितकारक अन् इष्ट म्हणोनी इथे सांगतो तुला अर्जुना! ॥ १०.१ ॥

*न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः* ।
*अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः* ॥ १०.२ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
देव, महर्षी ते न जाणती रहस्य माझ्या उत्पत्तीचे ।
असे मूळ मी सर्वार्थाने देवांचे अन् महाऋषींचे ॥ १०.२ ॥

*यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम्* ।
*असम्मूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते* ॥ १०.३ ॥

_[श्री भगवान उद्गारले]_
सर्व जगाचा मी परमेश्वर ।
जन्म मला ना अनादि मी तर ॥
मज जाणी जो मनी प्रकाशित ।
पापमुक्ति त्या इथे सुनिश्चित ॥ १०.३ ॥