राधेय – भाग ४१

🚩 *राधेय/४१* 🚩

नदीच्या विशाल प्रवाहावर मध्यान्हीच्या सूर्याचे किरण उजळले होते. सूर्यदाहाची तमा न बाळगता पूर्वकडे, मुख करून, गंगेच्या पात्रात उभा राहून कर्ण आपली सूर्योपासना करीत होता. आदित्याच्या तेजाशी तद्रूप झालेल्या मुखातून वेद स्त्रवत होते. त्याचे विशाल बाहू उंचावले होते. मान कलल्यामुळे मानेवर उतरलेला केशसंभार अधिक स्पष्टपणे दिसत होता. अपराह्‌ण काळी आपली पूजा संपवून कर्णाने सूर्यवंदन केले. गंगेची ओंजळ हाती घेतली आणि ती उंचावत कर्णाची हाक उमटली, ‘कोणी याचक आहे?’

काही क्षण तसेच गेले. हाकेला उतर येत नाही, हे पाहून कर्णाने ती ओंजळ मस्तकी लावली आणि गंगेच्या चमकणाऱ्या पाण्यात त्या ओंजळीचे पाणी मिसळने. कर्ण शांतपणे वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली पादत्राणे घातली आणि जेथे उत्तरीय ठेवले होते, तिकडे चालू लागणार, तोच त्याची पावले थांबली.

वाळूकिनाऱ्यावर जेथे उत्तरीय ठेवले होते, त्या जागी एक श्वेतवस्त्रधारी व्यक्ती कर्णाचे निळे उत्तरीय घेऊन त्याचीच छाया आपल्या मस्तकावर करून उभी होती. त्या व्यक्तीचे श्वेतवस्त्र वाऱ्यावर हेलावत होते. दोन्ही हातांनी मस्तकावर धरलेल्या फडफडणाऱ्या उत्तरीयामुळे त्या व्यक्तीचा चेहरा सावलीने झाकाळला होता. विशाल वाळवंटाच्या समईवर आपली काजळी फडकावीत सुवर्णज्योत उभी ठाकावी, तशी ती व्यक्ती भूमीवरून अलगद वावरत आहे, असा भास होत होता.

स्थिर पावले टाकीत कर्ण चालू लागला. पायांखालच्या वाळूचा आवाज पावलागणीक उठत होता. किनाऱ्यावरील ती व्यक्ती न्याहाळण्याचा तो प्रयत्न करीत होता. श्वेतवस्त्राने ती आकृती रेखाटली होती. पण चेहरा, ती जागा तशीच मोकळी होती. भर उन्हात धरलेल्या छायेमुळे ते रूप दिसत नव्हते. कर्णाच्या मनात विचार तरखून गेला : ‘मृत्यूचं दर्शन घडलं, तर ते असंच असेल का? रूपहीन, श्वेतवस्त्रधारी, शांत, स्थिर…’

जरा नजीक जाताच त्या व्यक्तीने डोक्यावरून पदर घेतला आहे हे कर्णाच्या ध्यानी आले. ती स्त्री आहे, हे ध्यानी येताच उन्नत असलेली कर्णाची दृष्टी पायांशी खिळली. उत्तरीयाचा विचार न करता तो त्या व्यक्तीजवळून जाऊ लागला. त्याच वेळी, त्याच्या कानांवर शब्द आले, ‘जरा थांब, कर्णा!’

‘कोण?’ म्हणत कर्णाने मान वर केली.

त्या व्यक्तीने मस्तकी घेतलेले उत्तरीय खाली घेतले होते. त्या व्यक्तीची ओळख पटताच कर्ण जागच्या जागी थिजून गेला.

अर्जुनाची आई कुंती! शत्रुपक्षाची माता! अन् तीही एकाकी!!

भारल्यासारखा कर्ण कुंतीचे सात्त्विक सौंदर्य डोळ्यांत साठवीत होता. त्या रूपाने अनेक वेळा त्याला भारले होते. ते रूप एवढया जवळून तो प्रथमच पाहत होता.

कुंतीच्या चेहऱ्यावर क्षीण हास्य उमटले. तिनेच शांततेचा प्रथम भंग केला : ‘ओळखलंस?’

कर्णाला तिचा आवाज कंपित वाटला. भानावर येत हात जोडीत तो म्हणाला, ‘आपल्याला कोण ओळखत नाही? पांडवांची माता! वीर अर्जुनाची आई! राजमाता कुंतीदेवी, अधिरथ सूतपुत्र आपल्याला वंदन करतोय्.’

त्या नतमस्तक कर्णाला पाहून कुंती व्यथित झाली… ‘कर्णा, तुला एवढीच का माझी ओळख आहे?’

कर्णाने कुंतीकडे पाहिले, त्याने विचारले, ‘राजमाते! वीरपत्नी, वीरमाता, एवढा लौकिक पुरेसा नाही का? उद्या रंगणाऱ्या रणांगणाच्या छायेत कशासाठी हे दर्शन? कोणता हेतू आपल्याला ह्या भर माध्यान्ही, एकाकी इथवर घेऊन आला?’

कुंतीच्या चेहऱ्यावरचे उरलेले स्मित लोपले. ती निश्चयपूर्वक म्हणाली, ‘कर्णा, तुझ्या लौकिकानं मला इथवर आणलं. तुझ्या दातृत्वाला जोड नाही, असा लौकिक. तो खरा, की खोटा, हे अजमावण्यासाठी मी इथवर आले.’

‘मी समजलो नाही.’

‘त्यात न समजण्यासारखं काय आहे? आता मी तुझ्या समोर राजमाता म्हणून उभी नाही. आज मी एक सामान्य याचक म्हणून उभी आहे.’

कुंतीच्या बोलण्याने चकित झालेला कर्ण स्वतःला सावरीत म्हणाला, ‘याचक! आपण? राजमाता, आपण थट्टा तर करीत नाही अपूर्णता भरून काढण्यासाठी याचना करावी लागते; पण जे जीवन मुळातच समृद्ध आहे त्यानं याचना कशासाठी करावी? शक्तिशाली भीम, धनुर्धर अर्जुन, धर्मबुद्धी युधिष्ठिरासारखी आपली पुत्र संपदा आहे. कृष्णासारखा महापुरुष आपल्या पाठीशी असता, पांडवांच्या राजमातेनं सूतपुत्राकडं काय मागायचं? साक्षात अग्नीला प्रसन्न करून घेऊन, त्याच्या कृपेनं गांडीव धनुष्य हस्तगत करण्यासाठी अर्जुनाची माता, सूतपुत्र कर्णाकडं याचक म्हणून येते; यावर कुणी विश्वास ठेवील का? आपण राजमाता आहा. राजमाता म्हणूनसुद्धा ही कृती योग्य होणार नाही. या दुर्दैवी कर्णाच्या निष्कलक दातृत्वाची अशी क्रूर थट्टा तुम्ही तरी करू नका.’

‘कर्णा! थट्टा मी करीत नाही. करतो आहेस तू! मी कोण, हे तुला ज्ञात नाही का?’

कर्ण आवंढा गिळीत म्हणाला, ‘राजमाता, कुंतीदेवी… अर्जुनजननी…’

‘पुरे झालं!’ कुंती थकून म्हणाली, ‘कर्णा, हे अज्ञानाचं खोटं आवरण किती काळ घेणार आहेस? तुला सारं माहीत आहे. कृष्णानं तुला सारं काही सांगितलंय्, हे मी जाणते. तुझं-माझं नातं तुला माहीत नाही का?’

तिच्या व्याकूळ बोलांनी कर्णाचे मन घायाळ झाले. खिन्नपणे तो हसला. ‘नातं! जे नातं प्रत्यक्ष मातेला सहन झालं नाही, त्याचा उच्चार करण्यात तरी काय अर्थ आहे?’

‘कर्णा, मी सांगितलं ना, याचक म्हणून मी उभी आहे.’

‘राजमाते, तुला काय हवं? माझं पौरुष अन् धर्म वगळून, हवं ते माग. मी आनंदानं ते तुझ्या चरणी अर्पण करीन.’

‘खरं?’ कुंतीने साशंकपणे विचारले.

कर्ण निश्चयी स्वरात म्हणाला, ‘आजवर कोणीही याचकानं कर्णाकडं येताना मनात शंका बाळगली नाही. पांडवांच्या भावी विजयासाठी साक्षात देवेंद्र माझ्या कवचकुंडलांच्या याचनेसाठी आला होता, तो माझ्या दातृत्वाच्या विश्वासावरच. त्यालासुद्धा हवं ते मिळालं.’

‘तुझ्या शत्रूंना तुझा पराभव हवा असेल. त्यांनी तुझ्याकडून कवचकुंडलं नेली असतील. तुझ्या पराजयासाठी मला तुझं दान नकोच आहे. तुझ्या यशाच्या इच्छेनं मी याचक बनले आहे. मला तुझं यश पाहायचं आहे त्यासाठी मी अतृप्त आहे.’

‘जे हवं, ते मागा! दात्या कर्णानं याचकाला कधीही कारण विचारलं नाही. हा सूर्यदाह तुम्हांला सहन व्हायचा नाही. या उन्हात तुम्ही फार काळ उभं राहणं योग्य होणार नाही.’

‘ज्या दाहानं उभं जीवन करपून गेलं, त्या सूर्यदाहाची मला भीती नाही. माझी चिंता करू नकोस.’

‘माझं ऐकावं.’ कर्णाचे लक्ष नदीतीरापासून थोडया अंतरावर, त्या परिसरात एकाकी उभ्या असलेल्या कदंब वृक्षाकडे गेले. तिकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला, ‘कृपा करून आपण त्या छायेखाली चलावं. तिथं आपल्याला निवांतपणे बोलता येईल.’

कुंतीच्या होकाराची वाट न पाहता कर्ण कदंबाच्या छायेकडे जाऊ लागला. मागून कुंती चालत होती. दोघे वृक्षच्छायेत आले आणि कुंतीने आपल्या हातचे उत्तरीय कर्णाच्या हाती दिले. विचारात गढलेल्या कर्णाने कुंतीकडे पाहिले आणि त्याने विचारले, ‘आपल्याला काय हवं?’

कुंती निश्चयी स्वरात बोलली, ‘मला तू हवास, कर्णा! तुला नेण्यासाठी मी आले आहे.’

‘मला नेण्यासाठी? कुठं?’

कर्णाने नदीकाठी निरखले. नदीच्या पात्रात दूरवर एक नाव उभी होती. एकाकी.

ती पाहत असतानाच कुंतीचे शब्द कानांवर आले, ‘आई मुलाला कुठं नेणार? हृदयाखेरीज दुसरी जागा आहे कुठं?’

‘महादेवी! मी असं ऐकलंय् की, सहवासापोटी जिव्हाळा निर्माण होतो. आता मला नेऊन तो जिव्हाळा लाभेल का?’

त्या शब्दांनी कुंतीचे मन घायाळ झाले. आपली स्वाभिमानयुक्त नजर वळवीत ती म्हणाली, ‘कर्णा, तुला हे कुणी सांगितलं? युधिष्ठिर, भीम, अर्जुन माझे. नकुल, सहदेव माद्रीचे, त्या दोघांना तू विचार, त्या तिघांना जे मातृप्रेम मिळालं, तेच त्या दोघांनाही मिळालं, असंच ते सांगतील.’

‘गैरसमज होतोय्! मी सापत्नभावाबद्दल बोलत नव्हतो. जिव्हाळ्याबद्दल बोलतोय्.’

‘रक्ताचं नातं एवढं दुर्बल नसतं.’

‘नातं!’ कर्ण हसला, ‘सांगून का नाती कळतात? नातंदेखील सहवासानंच वाढतं, तुझ्या कुशीत मी वाढलो असतो, तुझ्या स्तनातून स्त्रवणाऱ्या दुग्धधारेवर माझं पोषण झालं असतं, तरच आई या शब्दाचा खरा जिव्हाळा कळला असता. नदीपात्रातून वाहणाऱ्या ओघवत्या पाण्याला किनाऱ्याची ओढ कुठून कळणार? तो हट्ट किनाऱ्यानं धरला, तर तो प्रवाह तर थांबत नाहीच, उलट, किनाऱ्याला तडे जातात. एवढया प्रौढपणी ते नातं जाणून, आईला मिठी मारण्याचं बळ कसं येणार?’

‘कर्णा, मातृत्व कधीही पराधीन नसतं…’

‘नसेलही! मातृत्वाचा अपमान मी कसा करू धजेन नदीपात्रावरून वाहत असलेल्या एका अर्भकाला पाहून जर पुत्रहीन राधेला पान्हा फुटत असेल, तर जन्मदात्या मातेची थट्टा मी कशी करीन? मला पाहून तुमचं मन उचंवळून येत असेलही.’ कर्णाने काही क्षण उसंत घेतली. कुंतीला निरखीत तो म्हणाला, ‘पण मला तू… तुम्ही… अर्जुनाची. माझ्या शत्रूची माताच दिसता.’

‘कर्णा!’ कुंती उद्गारली.

‘राजमाते! तू देऊ केलेल्या जिव्हाळ्याबद्दल मी तुझा सदैव ऋणी राहीन! मर्यादेनं ज्ञात असलेलं ज्ञान माणसाला वरदायी ठरतं; पण अमर्यादेतून अवतरलेलं ज्ञान माणसाला विनाशाकडंच नेतं.’

‘अमर्यादा… कर्णा, मातृप्रेमाला मर्यादा नसते. तिला फक्त आपलं एवढंच माहीत असतं. कर्णा, तू… तू माझा आहेस. तुझ्यावर दुसऱ्या कोणाचाही हक्क नाही. पहिल्या मुलाबद्दल आईला काय वाटत असेल, ते फक्त माताच…’

‘नको! त्या कलंकित मातृत्वाचा तुम्ही तरी उच्चार करू नका.’

‘कर्णा, मातृत्व कधीच कलंकित नसतं.’

‘ते तुम्ही सांगता?’ कर्णाचा संयम ढळत होता, ‘तो दिवस आठवा! नुकत्याच जन्मलेल्या अश्राप जीवाला नदीच्या विशाल प्रवाहावर सोडून दिलं, तो दिवस आठवा! अद्याप ज्याला आपल्या इवल्याशा मुठी उघडण्याचं बळ लाभलं नाही, त्याला लाटांचा आधार दिला. ज्याच्या दृष्टीला अद्यापि रूपाची ओळख नाही, त्याला नक्षत्रमाळांशी खेळण्याचं सुख दिलंत. त्या जीवानं कोणता अक्षम्य अपराध केला होता? त्या जीवाला लाटांच्या स्वाधीन करताना हे वात्सल्य कुठं गेलं होतं? मातृप्रेमानं ओथंबलेलं हे मन त्या वेळी कठोर का झालं? पाण्याच्या चार थेबांनीही ते जीवन समाप्त झालं असतं, त्याची जाणीव का नव्हती?’ कर्णाने निःश्वास सोडला. ‘सुदैवानं तसंझालं असतं, तर किती बरं झालं असतं! या कर्णाच्या जीवनाचं पोरकेपणा, येईल त्या लाटेवर तरंगत राहणं, ते तरी संपलं असतं. माते! कोणत्या अपराधास्तव मी ही शिक्षा भोगतोय्?’

डोळ्यांतले अश्रू थोपवीत कुंती म्हणाली, ‘अपराध तुझा नाही. माझा आहे. नाहीतर तुझे ते कठोर बोल ऐकण्याचं बळ मला राहिलं नसतं. कर्णा, तू पुरुष आहेस. तुझा तर्क तुझ्या पिंडाला साजेसा आहे; पण माझी मर्यादा भिन्न. मी स्त्री आहे. माझी बंधनं मला पाळावीच लागली.’

कर्णाच्या ओठांवर कटू हास्य विसावले. ‘कसली बंधनं… पापाचं समर्थन करता कशाला? उलट, बंधनं पाळली नाहीत, म्हणूनच…’

‘हां कर्णा! मर्यादा!!’ कर्णावर नजर स्थिरावत कुंती बोलत होती, ‘स्त्रीची बंधनं माझ्या कर्माला कारणीभूत आहेत. तुझ्या ध्यानी येत नाही. स्त्री ही सदैव परनिष्ठेवर जगणारी. ती तुम्हां पुरुषांसारखी कधीच स्वतंत्र नस

✍️ *क्रमश:* ✍️