🚩 *राधेय/४०* 🚩
पहाटेच्या वेळी कर्ण रथशाळेकडे गेला. रथशाळेसमोर कर्णाचा रथ सिद्ध केला जात होता. हवेत गारवा वाढला होता. दूरवर नदीकिनारा दिसत होता. पहाटेचे विरळ घुके धरतीवर उतरत होते. आपला सुवर्णरथ कर्ण निरखीत होता. कारागीर त्या रथावरून हात फिरवीत होते.
कर्णाने विचारले, ‘रथाची परीक्षा घेतली?’
‘हो! कालच.’
‘तातांची परीक्षेची पद्धत अगदी भिन्न होती.’
‘ती त्यांनाच जमत असे.’ कारागीर म्हणाला, ‘पण तो अपघात कसा घडला, याच नवल वाटतं.’
कर्ण काही बोलला नाही. कारागीर आपल्या सहायकांसह रथशाळेत निघून गेला. कर्ण रथा शेजारी एकटा उभा होता. रथाचे काळे घोडे फुरफुरत एका जागी सूर नाचवीत होते.
पाठीमागून आलेल्या पावलांच्या आवाजाने कर्ण सावध झाला. त्याने मागे पाहिले.
राधाई उभी होती.
‘आई, तू! अन् बरोबर कुणी नाही?’
‘कशाला कोण हवं! पूजा आटोपली. तुझी चौकशी केली. कळलं, तू रथशाळेकडं गेला आहेस.’
‘तू चालत आलीस? एवढया दूर!’
राधाई प्रसन्न हसली.
‘केवढी काळजी करतोस, रे? अरे, अंगराज राधेयाची आई बनण्याआधी मी सूतकुलाचीच कन्या होते.’
अभिमानाने आपल्या रथाकडे पाहत कर्णाने सांगितले, ‘बघ, आई, रथ कसा झाला आहे, तो!’
‘रथ सुरेख झाला आहे, त्यात नवल नाही. सारथ्य अन् रथपरीक्षा हे आपले कुलाचे गुणच आहेत!’
राधाई रथशाळेकडे जात होती. कर्ण तिच्या पाठोपाठ जाऊ लागला. रथशाळेच्या भव्य प्रवेशद्वारातून राधाईने प्रवेश केला. समोरचा मोठा चौक त्यात उभे असलेले रथ, सारे पाहत असता राधाई म्हणाली, ‘हे रथशाळेचे प्रमुख असूनही कधी मी इथं आले नव्हते.’
राधाईचे लक्ष शुभ्र चौथऱ्यावर ठेवलेल्या सुबक चंदनी आसनावर गेले. एक व्यथा तिच्या चेहऱ्यावर उमटली. तिकडे बोट दाखवीत तिने विचारले, ‘ते आसन…’
‘तातांचं! जेव्हा महत्त्वाची पाहणी नसेल, तेव्हा ते तिथंच बसत. तिथून सारी रथशाळा दिसते. आता ते आसन मोकळंच आहे. नजीकच्या काळात त्यावर बसण्याची योग्यता कुणाला लाभेल, असंही वाटत नाही. तातांचा रथपरीक्षेचा अधिकार मोठा होता.’
नि:श्वास सोडीत राधाई त्या आसनाजवळ गेली. त्या आसनावरून हळुवारपणे हात फिरवीत ती म्हणाली, ‘माणसं जातात. माघारी राहतं, ते त्यांचं आसन. ते तसंच मोकळं राहतं. राहावं! तरच जीवनाला अर्थ! कर्णा, माणसानं एवढं कीर्तिवंत व्हावं की, त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं ती जागा व्यापण्याचं धाष्टर्य कुणाला होऊ नये.’
राधाई सावकाश रथशाळेबाहेर आली. त्या सज्ज झालेल्या रथाकडे ती पाहत होती. एकदम ती वळली. तिचे नेत्र अश्रूंनी भरले होते.
कर्ण तिच्याजवळ जात म्हणाला ‘आई! तुझ्या डोळ्यांत अश्रू!’
डोळे पुशीत, स्मित करीत ती म्हणाली, ‘कुणी सांगितलं, की दुःखाच्याच वेळी डोळ्यांतून अश्रू झरतात, म्हणून! आनंदाच्या वेळीही ते येतात.’
‘कसला आनंद?’
‘तुझा हा रथ बघ ना! उद्या युवराजांबरोबर सुवर्णरथातून तू जाशील, भीष्म, द्रोण, कृप यांच्या मालिकेत रणांगणात उभा राहशील. सूतकुलात वाढलेल्याचं आणखी भाग्य कोणतं? कर्णा, जरा वाक, रे.’
कर्ण वाकला. राधाईचे हात उंचावले गेले. ती थरथरती बोटे कर्णाच्या गालांवरून फिरत होती.
कर्ण राधाईच्या कृतीने चकित झाला होता. भारावला होता. ‘आई, असं का करतेस?’
‘तुझं रूप डोळ्यांत साठवून घेते. कर्णा, मी तुझा निरोप घ्यायला आले आहे.’
‘कसला निरोप?’ कर्ण कासावीस झाला.
‘मुला, दुःखानंतर सुखाचे दिवस आले, तर आनंद वाटतो. पण आनंदानंतर दुःख आलं, तर ते सहन करणं कठीण होतं, तुझ्या पावलांनी आनंद, समाधान पूरेपूर लाभलं. उद्या तू रणांगणावर जाणार. रणांगणाचं भवितव्य कुणी सांगावं? कदाचित सुखरूप माघारी येशील वा न येशील. रणांगणात विजयी होऊन आलास, तर तुझं स्वागत करण्यात आनंदच वाटेल, पण नाही आलास, तर… ते दुःख सहन करण्याची आता शक्ती राहिली नाही. ते त्राणही आता नाही.’
कर्णाच्या डोळ्यांतले अश्रू पाहताच राधाईने त्याला जवळ घेतले. ‘तू वीर आहेस. ज्ञानी आहेस. त्यागाची महती तुला कळली आहे. आता माझ्या जिण्याला अर्थ नाही. सारी कर्तव्यं संपली आहेत. येणाऱ्या अकल्पित दुःखाखाली सापडण्यापेक्षा केव्हा ना केव्हा तू जिथं जाणार आहेस, तिथंच तुझ्या स्वागतासाठी आधी जावं, असं वाटतं. तुझ्या तातांनाही एकटं वाटायचं नाही.’
‘तुझा विचार काय आहे? काय करणार आहेस, आई, तू?’
‘अरे, असा भिऊ नकोस. ज्या नदीच्या लाटांनी तुला सुखरूप माझ्या हाती दिलं, त्याच लाटा मला चिरविश्रांती मिळवून देतील. नदीला आपण आई मानतो, ते का उगीच! ती जरूर मला आपल्या कुशीत घेईल. येते मी. वसूला जप!’
कर्ण एकदम गुडघ्यांवर बसला. त्याने राधाईच्या चरणांवर मस्तक ठेवले तिची पावले अश्रूंनी भिजवीत तो म्हणाला, ‘माते, आशीर्वाद दे!’
‘मी कसला आशीर्वाद देऊ? माझा प्रत्येक श्वास हा तुझ्यासाठी सोडलेला आशीर्वादच होता.’
‘जयाची आकांक्षा माझ्या मनात नाही. पराजयाची भीती मुळीच राहिली नाही. माते, एकच आशीर्वाद देऊन जा. ज्या सहजपणे तू मृत्यूला सामोरी जात आहेस, ते बळ मला लाभावं. मृत्यूचं भय मला वाटू नये.’
कर्ण उठला. त्याच्या नेत्रकडांवर गोळा झालेले अश्रू राधेने आपल्या बोटांनी निपटले. तिच्या ओठांवर स्मित उमटले आणि काही न बोलता, वळून न पाहता ती धुक्यातून नदीकडे जाऊ लागली. क्षणा-क्षणाला दूर जाणाऱ्या राधाईला पाहून कर्णाला वाटत होते की, धावत जावे, तिला माघारी वळवावे; पण तसे करण्याचे सामर्थ कर्णाठायी राहिले नव्हते. राधाई पाहता-पाहता धुक्यात हरवून गेली.
कर्णाच्या कानांवर रथाचा गडगडाट आला. रथशाळेकडे दुर्योधनाचा रथ भरधाव वेगाने येत होता. कर्णाजवळ येऊन रथ थांबला. दुर्योधन आनंदाने रथाखाली उतरला. कर्णाने त्याला वंदन केले. कर्णाजवळ जात असता दुर्योधनाचे हास्य विरले. कर्णाच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. त्याची घायाळ मुद्रा पाहून दुर्योधनाने चिंतेने विचारले, ‘मित्रा, तुझ्या डोळ्यांत अश्रू! काय झालं?’
कर्ण हसला. अश्रू न पुसता म्हणाला, ‘युवराज, दुःखाच्या वेळीच अश्रू येतात, असं नाही. आनंदाच्या वेळीही ते येतात.’
‘आनंद?’
‘यापेक्षा आनंदाचा क्षण कोणता सूतकुलात मी वाढलेला, तुमची मैत्री लाभली. अंगदेशाचं आधिपत्य आलं. यापेक्षा सामान्यांचं आणखी काय भाग्य असतं?’
‘मित्रा, तुला आनंदाची बातमी सांगायला धावत तुझ्या गृही गेलो होते. तिथं कळलं की, तू इथं आहेस. म्हणून तसाच इकडं आलो.’
‘कसली आनंदाची बातमी?’
‘शल्यराज आपल्या विपुल दळासह पांडवांच्या मदतीला जात होते. त्यांना मी वळवून आपल्या बाजूला आणलंय्.’
‘पण ते पांडवांचे आप्त…’
‘तरीही शल्यराज लढतील, ते आपल्याच बाजूनं! नगराच्या उत्तरेला कौरवदळ एकत्रित होत आहे. आज ते युद्धभूमीकडं जाणार आहे. त्या दळाला निरोप देण्यासाठी आपल्याला तिकडं जायला हवं,’
‘युवराज, रथारूढ व्हा! आता युद्धाखेरीज राहिलंय् काय?’
दुर्योधनापाठोपाठ कर्ण आपल्या रथात चढला. रथाचे वेग हाती घेतले आणि दोन्ही रथ भरधाव दौडू लागले.
✍️ *क्रमश:* ✍️
