राधेय – भाग ४२

🚩 *राधेय/४२* 🚩

कुंती कर्णापासून दूर जात होती. कर्णाने दिलेले निळे उत्तरीय तिने उंचावलेल्या उजव्या हाती धरले होते. ते दूर जाणारे श्वेतधारी पाठमोरे रूप कर्ण स्थिर नजरेने पाहत होता. प्रखर उन्हाचे त्याला भान नव्हते. आठवत होते फक्त कुंतीमातेचे रूप.

लहानपणी पंडूपुत्रांबरोबर कर्ण राजमहाली जात असे, तेव्हा अनेक वेळा या कुंतीने कर्णाला जवळ घेतले होते. गोंजारले होते. तिच्या दृष्टीतल्या अनोळखी जिव्हाळ्याने कर्णाला मोहित केले होते. पाडंवांच्या राजसूय यज्ञाच्या प्रसंगी दुर्योधनाबरोबर कर्ण कुंतीसमोर गेला होता, तेव्हा तिने दुर्योधनाच्या मस्तकाचे अवघ्राण केले होते; पण त्यानंतर कर्णाकडे पाहून आशीर्वादाचा हात उंचावताना त्या मातेला किती कष्ट पडले असतील! द्रौपदीला जिंकून पांडव स्वगृही गेले असतील, तेव्हा कर्णाच्या अपमानाची वार्ता ऐकून कुंतीला काय वाटने असेल? शस्त्रस्पर्धेच्या वेळी कर्णाचा अपमान झालेला पाहून जिला मूर्च्छा येते, त्या मातेने वैरभावाने चाललेली कर्णनिंदा कशी ऐकून घेतली असेल?
कर्ण त्या विचाराने व्यथित झाला. नकळत त्याचा डावा हात गालावर अलगद स्थिरावला. कुंतीने कर्णाला मिठीत घेतले, तेव्हा तिच्या ओठांचा स्पर्श कर्णाच्या गालाला झाला होता.

कर्णानं पाहिलं.

कुंती नदीकाठावर पोहोचली होती

मग आजच का त्या मातेचं दर्शन घडावं! जे रहस्य आजवर कुंतीनं लपवून ठेवलं तो प्रगट करायला हीच वेळ होती का? कुंतीने मर्यादा पालनात खूप सोसलं. तो संयम आजच का दुबळा ठरावा? पुत्रप्रेमासाठीच का तिनं ही मर्यादा ओलांडली!

कर्णाच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव प्रगटला.

पुत्रप्रेमापोटीच पण, कर्णा, त्यात तुझा समावेश नाही तू फक्त एक निमित्त? पुत्ररक्षणासाठी उभारलेले कर्णाचे नाते कुणी मानले नाही. जाणले फक्त त्याचे दातृत्व त्या विचाराने कर्णमुखावर एक खिन्न स्मित प्रगटले.

कुंतीने नौकेचा आश्रय घेतला होता. नौकेने किनारा सोडला होता…

पुत्रहीन राधाईला प्रवाहपतित कर्ण सापडला आणि तिचे मातृत्व जागे झाले तिला पुत्रप्राप्ती झाली, ती कर्णाच्या पायगुणामुळेच, अशी अधिरथ-राधाईची श्रद्धा. आज माता कुंतीने आपली ओळख दिली आणि त्याच मातेच्या अधिकारात आपली पुत्रसंपदा सुरक्षित राखली. दोघींचीही घरं खऱ्या अर्थाने संपन्न बनली आणि मातेचे दर्शन घडूनही कर्ण पोरकाच राहिला मृत्युखेरीज कर्णाला कोणीच का आपले म्हणणार नाही ?

मी कोण? हा प्रश्न कर्णाला सदैव छळीत आला त्या एका शोधात जीवनाची प्रतिष्ठा, कर्णाचे ध्येय कर्णाला आकांक्षा गुतल्यासारख्या वाटल्या आणि ज्या क्षणी तो गुंता सुटला, त्याच क्षणी जीवनाचे सारे आधारही सुटले. तो क्षण जीवनसमाप्तीचा ठरला. आत्मशोधाची परिणती हीच असते का?

कृष्णाने जन्मरहस्य सांगितले त्या वेळी असली विफलता कर्णाला जाणवली. शत्रूवर मात करण्याची ईर्ष्या जरी हरवली तरी कर्णाला जपलेले पौरुष चैतन्य, निर्भयता, स्वभिमान तसाच टिकून राहिला कर्णाने सहज ठोकरून लावले होते; पण कुंतीच्या दर्शनानंतर ते बळ खचल्यासारखे वाटले होते आत्मसमर्पणाचे सामर्थ देणारे असले मतदर्शन आजवर कोणाला घडले असेल का?

मातेच्या दर्शनाने कर्णाच्या तेजस्वी जीवनाची सांगता घडवली. त्याच्या पौरुषाला, चैतन्याला, निर्भयतेला आता एकच आव्हान लागणार होती. त्यानं कृष्णा समाधान पावेल. पांडव सुरक्षित राहतील कुंतीमातेचे प्रचीती येईल. तो कृतार्थ मृत्यू पाहून दुर्योधनाला मित्रप्रेमाची प्रचीती येईल. तो कृतार्थ मृत्यू गाठण्यापलीकडे कर्णाच्या हाती आता काहीही उरले नाही, कर्ण कुणाचाच नाही. कर्ण कुणाचाच नव्हता. तो एकाकी आहे. सूर्यपुत्राच्या प्राक्तनी हेच असायचं!

कर्ण आपल्या विचारातून सावध झाला. त्याने आजूबाजूला पाहिले.

उन्हाचा दाह चारी बाजुंना जाणवत होता. नदीपात्रात एक नाव दूरवर एक पैलतीर गाठीत होती.

कर्ण एेलतीरावरुन ती नाव निरखीत होता.

नाही तरी जीवन या नावेसारखेच असते जीवनप्रवाहावर केव्हातरी एक नाव साेडली जाते. ऋणबंधाची दोन दुबळी वल्ही हाती दिली जातात. अहंकाराचे शिड उभारलेले असते. पण तेवढयावर थोडाच पैलतीर गाठला जातो? अनुकूल दैवाचे वारे लाभले, तरच पैलतीर गाठता येतो, नाही तर प्रवाहपतित होऊन येईल त्या लाटेवर डोलत राहण्याखेरीज काहीही उरत नाही.

कर्ण आपल्या विचारातून सावध झाला आणि तो रथाकडे चालू लागला. सूर्याच्या दाहात सारे शरीर केव्हाच कोरडे झाले होते. नदीकाठावरून चालत असता उष्ण नि:श्वास त्याला जाणवत होते. तापल्या किनाऱ्यावरून येणारी वाऱ्याची झुळूक कासावीस करीत होती.

कर्ण रथाजवळ पाेहाेचला. त्या वृक्षसावलीत प्रवेश करताच कर्णाला सावलीची शीतलता जाणवली. कर्णाने रथाचे वेग हाती घेतले, ती शीतलतासुद्धा कर्णाला असह्य वाटू लागली. कर्णाने रथाला गती दिला. रथ भरधाव वेगानं कर्णप्रासादाकडे जाऊ लागला.

कर्णाने प्रासादात प्रवेश केला, तेव्हा वृषाली सामोरी आली. तिने कर्णाला विचारले, ‘आज बराच वेळ झाला?’

‘हां!’ कर्णाने विचारले, ‘आज कोणीच कसं दिसत नाही? शत्रुंजय, वृषसेन कुठं आहेत?’

‘ते शस्त्रगृहात गेले. त्यांची शस्त्रं तयार करवून घेत आहेत. त्याखेरीज काही सुचत नाही, जसे काय दागिनेच आहेत ते.’

‘अगदी खरं! वसू, शस्त्रं हीच पुरुषाची खरी लेणी असतात.’

‘पण… आज बराच वेळ झाला?’

कर्णाच्या मुखावर स्मित उजळले. कुंतीचे दर्शन डोळ्यांसमोरून तरळून गेले.

‘आज परमेश्वरदर्शन घडलं.

‘खरं?’

‘हो?’

‘मग काय दिलं परमेश्वरानं?’

‘दिलं काहीच नाही, उलट, जे शिल्लक होतं, तेही तो घेऊन गेला.’

मग तो देव कसला?’ वृषाली म्हणाली, ‘देव देतो, घेत नाही.’

‘तसं नाही, वृषाली…देवानं देऊनच माणसाचं जीवन समृद्ध होता नाही ती कल्पना चुकीची आहे. सामान्यांच्या जीवनात थोडी जरी देवकृपा अवतरली, तरी ते जीवन समृद्ध बनतं. ते खरं असलं, तरी या पृथ्वीतलावर असेही काही महाभाग जन्मतात की, ज्यांच्याकडं परमेश्वर घेण्यासाठी येतो. हक्कानं. त्यातूनच ते जीवन सफल होतं. उजळून निघतं. आज जीवन सफल झाल्याचा आनंद मी भोगीत आहे. सारं ओझं कमी झालं. मनावर काही दडपण राहिलं नाही. वसू, आज मी तृप्त आहे. कृतार्थ आहे.’

वृषालीला त्या बोलण्यातलं काही कळत नव्हतं; पण कर्णाच्या मुखावर प्रगटलेला तृप्ततेचा भाव ती अतृप्तपणे न्याहाळत होती. कर्णाचे समाधानी रूप तिने आजवर कधी पाहिले नव्हते.

पण कर्णाच्या दृष्टीसमोर तरळत होते कुरुक्षेत्र. मृत्यूचं आह्वान देणारं. त्या रणक्षेत्राची चिंता आता कर्णाला राहिली नव्हती. निर्भयतेने तो ते कुरुक्षेत्र पाहत होता.

✍️ *क्रमश:* ✍️