🚩 *राधेय/१९* 🚩
दुर्योधनाच्या संकल्पित यज्ञाच्या आणि द्यूतगृहाच्या कामाला सुरुवात झाली. राजप्रासादा समोर पांडवांचा यज्ञमंडप फिका पडावा, असा भव्य मंडप उभारण्यासाठी काम सुरू झाले. राजप्रासादाच्या विस्तीर्ण उद्यानाच्या एका भागात द्यूतगृहाच्या उभारणीला सुरुवात झाली. शेकडो निष्णात कारागीर, शिल्पी त्या कामावर होते. द्यूतगृहाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी हुशार आणि तत्पर सेवकांची नेमणूक झाली होती. दुर्योधनाला त्याखेरीज काही सुचत नव्हते.
द्यूतगृह तयार झाले. शेकडो कोरीव स्तंभांनी ते द्यूतगृह तोलले होते. त्यांच्या कमानींवर सुवर्णामध्ये वैडूर्यरत्ने जडवून चित्रविचित्र वेलपत्ती चितारली होती. त्या सभागृहाला अनेक द्वारे आणि अनेक वातायने ठेवली होती. सभागृहाचे महाद्वार रत्नांकित सुवर्णाने मढवले होते. द्यूतगृहाच्या भिंतींवर द्यूतपटाची सुबक चित्रे चितारली होती, प्रवेशद्वारावर द्यूत खेळतानाचे शिवपार्वती चितारले होते. सभागृहाच्या बैठकीची जागा अर्धचंद्राकृती आयोजली होती. सभागृहाच्या जमिनीपासून थोड्या उंचीवर ती बैठक होती. त्या बैठकीवर शेकडो सुवर्णासने चढत्या पायऱ्यांनी मांडली होती. मध्यभागी सम्राटांसाठी मोतीलगाचे छत्रचामर असलेले, रत्नजडित सुवर्णसिंहासन ठेवले होते. चढत्या पायरीने मांडलेली ती अर्धचंद्राकृती बैठक अशी होती की, कोणत्याही स्थानावरून द्यूतगृहात मांडलेला पट स्पष्ट दिसावा. सभागृहात जाताच सम्राटांच्या सिंहासनामागे स्फटिक-भिंतीवर चितारलेले भव्य चित्र डोळ्यांत भरे. त्या चित्रात पंख पसरून नागावर झेपावणारा गरुड दाखविला होता.
त्या अर्धचंद्राकृती बैठकीच्या समोर चकचकीत स्फटिक भूमीवर हस्तदंती, कोरीव काम केलेली, नक्षीदार, मोठी आसने ठेवलेली होती. चंदनाचे चौरंग ठेवले होते. त्यांवर पसरलेले द्यूतपट, सोंगट्या, फासे दिसत होते.
द्यूतगृह आता पुरे झाले होते.
दुर्योधन कर्णासह समाधानाने ते द्यूतगृह पाहत होता. ते द्यूतगृह पाहत असताना दुर्योधनाच्या चेहऱ्यावरचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. तो कर्णाला म्हणाला, ‘कर्णा, या द्यूतगृहात काही कमतरता वाटते?’
‘नाही, युवराज! द्यूतगृह सर्वार्थानं परिपूर्ण आहे. द्यूतगृहाबद्दल माझ्या मनात मुळीच आकर्षण नाही; पण हे द्यूतगृह पाहिल्यावर आपणसुद्धा फासे घोळवावेत,असं वाटतं.’
दुर्योधन हसला. ‘आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. मामांनी सप्तमीचा मुहूर्त निवडला आहे.’
‘एवढ्या नजीकचा?’
‘त्यात काय अवघड आहे? यज्ञाची सर्व तयारी झालीच आहे. कालच तातांनी विदुरांना इंद्रप्रस्थाला जाऊन पांडवांना घेऊन यायला सांगितलं आहे.’
‘विदुरांच्या करवी आमंत्रण?’
‘हो, राजसूय यज्ञात पांडव थकले आहेत. इथं येतील, चार दिवस राहतील. त्यांचा श्रमपरिहार होईल… नृत्य, गायन, द्यूत यांत त्यांचं मनोरंजन होईल.’
मागे पावलांचा आवाज झाला. दुर्योधनाने वळून पाहिले. दुर्योधनबंधू विकर्ण आत येत होता. त्याने सांगितले, ‘महात्मा विदुरकाका येत आहेत.’
दुर्योधनाने कर्णाकडे पाहिले, ‘पाहिलंस, मित्रा, आमच्या काकांना केवढं आयुष्य आहे, ते!’ विकर्णाकडे वळून दुर्योधन म्हणाला, ‘येऊ देत; पण इंद्रप्रस्थाला ते जाणार आहेत ना?’
‘हो! सर्व तयारी झाली आहे. मीही बरोबर जात आहे; आज भोजन झाल्यानंतर…’ विकर्णाला पुढे बोलता आले नाही.
महाद्वारातून विदुर आत येत होते. विदुरांचा चेहरा चिताक्रांत होता.
दुर्योधनाने वंदन केले. कर्णाने दुर्योधनाचे अनुकरण केले.
दुर्योधन म्हणाला, ‘काका, बरं झालं, तुम्ही आलात, ते! तुम्ही एकदा हे द्यूतगृह पाहायला हवं होतं.’ विदुरांचा हात धरून अर्धचंद्राकृती सभास्थानापुढे नेत तो म्हणाला, ‘पाहा, काका! या सर्व सुवर्णसिंहासनांवर आमंत्रित राजे बसतील. कौरवश्रेष्ठ असतील. समोर पायऱ्यांवर मध्यभागी जे सिंहासन दिसतं ना, तिथं सम्राट बसतील. त्यांच्या जवळच्या सुवर्णसिंहासनावर भीष्माचार्य असतील. तुमच्यासाठी मात्र नेहमीची तातांच्या जवळची जागा ठेवली नाही. द्यूत स्पष्ट दिसावा, म्हणून द्यूतालगत हे सुवर्णासन मंडल आहे…’
थकलेले विदुर म्हणाले, ‘युवराज, धृतराष्ट्र महाराजांनी पांडवांना आमंत्रण देण्यास मला आज्ञा केलीय्.’
‘ते मला माहीत आहे, काका! किंबहुना मीच तो आग्रह धरला. मी तातांना आवर्जून सांगितलं की, तुमच्याखेरीज दुसऱ्या कुणाला पाठवू नका.’
‘असल्या गोष्टीत मला रस नाही.’
‘का? रस नसायला काय झालं? पांडवांच्या राजसूयात तर तुमचा आनंदरस ओसंडत होता. इथं ही यज्ञ होणार आहे. मयसभेऐवजी द्यूतगृह आहे.’
‘हा तुमचा द्यूत आणि यज्ञ खरा असता, तर मी हर्षानं इंद्रप्रस्थाला गेलो असतो.’
‘मग हा खरा यज्ञ नाही? ऐक, कर्णा, काका काय म्हणतात, ते!’ दुर्योधन हसला.
विदुर म्हणाले, ‘दुर्योधना, माझं ऐक. हा द्यूत तू घडवू नकोस. निदान पांडवांना इथं आणण्याचं मला सांगू नकोस.’
‘काका, मी तुम्हांला कोण सांगणार? तातांनी सांगितलं. मी नुसतं सुचविलं.’
‘तेच ते! पण हा माझा आग्रह कशाला धरतोस?’
काका, तुम्हांला आमच्यापेक्षा पांडवांचं प्रेम अधिक. तुम्ही त्यांचे पाठीराखे.’
‘मी कसली पाठराखण करणार?’
दुर्योधनाचे हास्य क्षणभर विरले; पण क्षणभरच. ‘वा, काका! तुम्ही पाठीशी नसता, तर लाक्षागृहातून ते वाचले नसते. तुम्ही नाव ठेवली नसती, तर ते गंगापार कसे गेले असते? मला सगळं माहीत आहे, काका!’
‘अन् तरीही मला पाठवतोस?’
‘हो! जसे तुम्ही पांडवांचे हितकर्ते, तसेच तातांचे सल्लागार. तुम्ही पांडवांपासून काही लपवून ठेवणार नाही… अन् माझ्यावर विश्वासघाताचा आरोप येणार नाही.’
‘कर्णा, हा सल्ला तुझा का?’ विदुरांनी विचारले.
‘त्याचा काही यात संबंध नाही, काका.’
‘कर्णा, हा तुझा सल्ला का?’ परत विदुरांनी विचारले. ‘अन् हो म्हणून उत्तर दिलं, तर!’
विदुर मान हलवीत म्हणाले, ‘मला पटायचं नाही तू असा द्यूताचा मार्ग अवलंबणारा नव्हेस. तू युद्ध पत्करशील; पण द्यूत…’
‘मग मला कशाला प्रश्न विचारलात?’ कर्ण म्हणाला.
‘काका, तातांनी सांगितल्यप्रमाणं तुम्ही इंद्रप्रस्थाला जा. सम्राट युधिष्ठिरांना सर्व सांगा. द्यूताचं आमंत्रण द्या. त्यांना म्हणावं, यज्ञ हे निमित्त आहे. द्यूत हे आह्वान आहे. यज्ञभूमीतल्या सुग्रास भोजनासाठी त्यांना बोलावलं नसून, द्यूत खेळण्यासाठी त्यांना पाचारण केलंय्. त्यांना सांगा, म्हणावं, सुबलपुत्र गांधारदेशाधिपती शकुनि महाराज द्यूताला बसणार आहेत. अक्षविद्येत निपुण अशी त्यांची कीर्ती आहे. ते कृतहस्त म्हणजे आपल्या इच्छेनुसार फासे टाकण्यात निपुण आहेत. अतिदेवी-म्हणजे मर्यादेचं उल्लंघन करून द्यूत खेळणारा- असाही त्यांचा लौकिक आहे. त्यांच्याबरोबर द्यूत खेळणं म्हणजे साक्षात पराजय भोगणं. हे सारं त्या युधिष्ठिराला सांगा आणि द्यूताचं आमंत्रण द्या. सन्मानानं त्या सर्वांना घेऊन या.’
दुर्योधनाच्या बोलांनी कर्ण आश्रचर्यचकित झाला होता. दुर्योधनाने द्यूताचे सारे रहस्यच विदुरांना सांगितले होते. तो न राहवून म्हणाला, ‘युवराज, असा निरोप पाठविला, तर कोणता सुज्ञ द्यूत खेळायला आपणहून येईल!’
‘सुज्ञ येणार नाही; पण तो येईल. आपल्या हातानं आपलं सर्वस्व हरेल. हरावंच लागेल. कारण तो द्यूताचा व्यसनी नव्हे, तर खोटा सम्राटही आहे. त्या सम्राटपदासाठी तरी त्याला द्यूतात उतरावंच लागेल.’
‘सम्राटपदाचा काय संबंध?’
‘काय संबंध? मित्रा, तो युधिष्ठिर एकदा हे आह्वान नाकारू दे… अन् मौज बघ. क्षत्रिय कधीही द्यूताचं आह्वान नाकारीत नाही… अन् जो क्षत्रिय नाही, त्याला सम्राट बनण्याचा अधिकार नाही. नाही, मित्रा, त्या युधिष्ठिराला यावंच लागेल.’
दुर्योधन मोठ्याने हसत होता. विदुर द्यूतगृहाबाहेर जाईपर्यंत तो हसतच होता…
✍️ *क्रमश…* ✍️
