🚩 *राधेय/१८* 🚩
सूर्याचे तेज आकाशात चढत होते. हस्तिनापूरच्या दिशेने दुर्योधनाच्या रथातून कर्ण दुर्योधन भेटीसाठी जात होता. शकुनीने सुचवलेला आणि दुर्योधनाने मानलेला द्यूताचा बेत रहित व्हावा, असे कर्णाला वाटत होते. सम्राटांना पुत्रप्रेम असले, तरी विदुरांच्या सल्ल्याखेरीज ते निर्णय घेत नाहीत, हे कर्णाला पुरते ठाऊक होते. विदुर द्यूताला कधीही संमती देणार नाही, याची खात्री होती. कदाचित द्यूताचा बेत फसल्याने दुर्योधनाने रथ पाठविला असण्याची शक्यता होती.
रथ राजप्रासादाच्या उद्यानात शिरला. उद्यानातून फिरणारे मोरांचे तांडे, झाडीतून उठणारे त्यांचे आवाज कर्णाला मोहवीत नव्हते. रथ राजप्रासादासमोर थांबला.
कर्ण उतरला. पाहतो, तो दुर्योधन प्रसन्न मुद्रेने प्रासादाच्या पायऱ्यांवर उभा होता. कर्ण रथातून उतरताच तो भरभर पायऱ्या उतरून कर्णाजवळ आला. कर्णाचा हात धरीत तो म्हणाला, ‘मित्रा, चल खूप बोलायचंय्.’
कर्णासह दुर्योधन महालात आला. सर्व दासदासींना त्याने बाहेर घालवले आणि तो म्हणाला, ‘मित्रा तातांनी द्यूताला संमती दिली.’
‘खरं?’
‘एवढंच नव्हे तर, वैभवशाली, अलौकिक असं द्यूतगृह उभारण्याची त्यांनी आज्ञा दिली आहे.’
‘या बेताला विदुरांनी संमती दिली?’
‘छान! काका याला कधी संमती देतील? त्यांच्यापासून हा बेत तर संपूर्ण गुप्त राहायला हवा. सर्व सिद्धता होईल, तेव्हाच ते त्यांना कळेल.’
‘युवराज, माझं थोडं ऐकता का?’
‘सांग! मला माहीत आहे, तू विरोध करणार. तेही ऐकायला माझी तयारी आहे.’
‘ठीक आहे. मी काही बोलणार नाही.’
‘हे विरोधापेक्षाही भयानक आहे. एवढा राग माझ्यावर करू नकोस.’
‘नाही, युवराज. माझा राग नाही; पण असल्या चोरवाटांचा आश्रय वीरांनी घेऊ नये, असं वाटतं.’
‘चोरवाट कसली? मित्रा, द्यूत राजमान्य आहे.’
‘संपत्तीचा मोह सोडून, ती उधळण्याची ताकद यावी, इतपतच. राजांनी द्यूत जिंकण्यासाठी खेळायचा नसतो. करमणूक व्हावी, आश्रितांना धनलाभ व्हावा, एवढाच त्याला अर्थ. त्यापलीकडं जाऊ नये.’
‘ठीक आहे. आपण द्यूताचा बेत रद्द करू.’
कर्ण आनंदला. त्या उत्तराची त्याची अपेक्षा नव्हती. ‘युवराज, मला तुमचा अभिमान वाटतो.’
‘निदान एका मित्राला तरी असं वाटावं, हे का थोडं झालं? आता त्यापुढं त्यावरच समाधान मानायला हवं. पांडवांची सत्ता हळूहळू वाढत जाईल. ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहू अन् त्यांच्या वाढत्या सामर्थ्याबरोबर कौरवसाम्राज्य ग्रासलं जाईल, तेव्हा निर्लज्जपणे, पर्वणी आली, असं समजून पदरी पडलेलं दान घेऊन तृप्त होऊ. आपल्या दोघांच्या पराक्रमाची, बलवत्तर इच्छेची तीच सांगता असेल, तर त्याला पायबंद घालणार कोण?’
‘पण द्यूताखेरीज दुसरा काही उपाय नाही का?’
‘तू सांगतोस? तुला दिसतो?’
‘नाही, हे खरं; पण तरीही हा जुगार मला पटत नाही.’
‘कमकुवत मनाला जुगार नेहमीच भेडसावतो.’
‘कमकुवत मन? माझं?’ कर्ण छाती रुंदावत म्हणाला, ‘मित्रा, अजून या कर्णाची पारख झाली नाही! मित्रा, सांग की, त्या इंद्रप्रस्थावर चालून जायचं, म्हणून. बरोबर दळ किती आहे, याचा विचार माझ्या मनात येणार नाही. शत्रू प्रबळ आहे, हे मी ध्यानी घेणार नाही. हा कर्ण शत्रूवर तुटून पडला, एवढंच तुला दिसेल.’
दुर्योधन हसत होता.
कर्णाने संतापून विचारले, ‘का ? खोटं वाटतं?’
‘नाही. खोटं नाही वाटत!’ दुर्योधन गंभीर झाला, ‘पण, मित्रा, जुगार आणखी काय वेगळा असतो?’
‘जुगार?’
‘नाहीतर काय? शत्रू बलवत्तर असताही त्यावर तुटून पडणं हा जुगार नाही?’
कर्ण चकित झाला होता.
‘मित्रा, या जीवनात अशी कोणती गोष्ट आहे की, जी जुगार नाही? रणांगणात कोणता शत्रू समोर येणार आहे, त्याच्या खेचलेल्या प्रत्यंचेला कोणता अघोरी बाण जोडला आहे, हे का माहीत असतं? जय-पराजय माहीत नसता, शत्रूवर वीर चालून जातो, तो जुगार नसतो? तुझा जन्म होताच तुड्या मातेनं तुला जलप्रवाहावर सोडून दिलं, तो तुझ्या जीवनातील खेळलेला जुगारच नव्हे का? संसारात जोडलेली पत्नी, मानलेला मित्र, तोडलेला संबंध हा हरघडी खेळल्या जाणाऱ्या द्यूताचाच भाग नाही का? मित्रा, उभं आयुष्य पावलोपावली जुगार खेळण्यात जातं. ती दानं टाकत जाण्यात भय वाटत नाही. पटावरच्या जुगाराचं भय वाटतं?’
‘युवराज, बोलून चालून जुगार. त्याचं दान कुणाच्या बाजूनं पडणार, याची ग्वाही कोण देणार?’
‘अरे, जुगार म्हणजे जिंकणं, नाहीतर हरणं. या दैवाच्या फाशांनी हरवलेलं जिंकू किवा असलेलं हरू. दोन्हीलाही माझी तयारी आहे.’
‘ठीक! द्यूत, तर द्यूत!’ कर्ण म्हणाला.
‘तू चिंता करू नकोस. या द्यूतात जय आपलाच आहे. आता लौकरात लौकर द्यूतगृह कसं उभारल जाईल, तिकडं लक्ष द्यायला हवं. हे द्यूतगृह मयसभेपेक्षा श्रेष्ठ असेल. तिथं पाणी दिसत असता पाणीच राहील, भूमी असणार नाही. भिंत दिसत असता द्वार राहणार नाही. स्फटिकभूमी स्फटिकाचीच राहील. त्यावर पाय ठेवला असता जलस्पर्श घडणार नाही.’ दुर्योधनाच्या डोळ्यांत सूडाचे तेज प्रगटले होते. चेहऱ्यावर हसू होते. ‘कर्णा, त्या मत पांडवांना माझ्या द्यूतगृहात पाय टाकू दे. डोळ्यांसमोर पाणी दिसत असता आपल्या पावलांनी गटांगळ्या खाव्या लागतील. भिंत माहीत असून तीवर मस्तक फोडून घ्यावं लागेल. स्फटिकभूमीवर उभं राहूनही पायांचं बळ सरल्यानं त्याच भूमीवर ढासळावं लागेल. चल, मित्रा, आता अवधी फार थोडा आहे. द्यूतगृहाची जागा मामांनी निश्चित केली आहे. ते पुढं गेले आहेत. ती जागा पाहायला आपल्याला जायचंय्.’
दुर्योधनासह कर्ण द्यूतगृहाची संकल्पित जागा पाहायला गेला. रात्री कर्ण आपल्या शय्यागृहात मद्यपान करात बसला होता. अधीरथाबरोबर द्रुम, वृषकेतु, शत्रुंजय यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्याने कर्णाच्या मनावरचे दडपण खूप कमी झाले होते. तोच वृषाली शय्यागृहात आली. कर्णाने तिच्याकडे पाहिले.
कर्णाने विचारले, ‘वेळ झाला?’
‘हो! सासूबाईंचे पाय चेपीत होते.’
‘आई झोपली?’
‘नाही. जाग्या आहेत.’
‘मग झोपेपर्यंत थांबायचं, की नाही?’
‘त्याच नको म्हणाल्या.’
‘का? आई काय म्हणाली?’
वृषाली उभ्या जागी लाजली.
कर्णाने कलते होऊन वृषालीचा हात पकडला. तिला आपल्या शेजारी बसवीत त्याने विचारले, ‘सांग ना!’
‘अं हं!’ वृषाली आणखी लाजली.
‘सांगावं लागेल!’ कर्णाने हट्ट धरला. ‘काय म्हणाली आई?’
वृषालीचा चेहरा गोरामोरा झाला. ती कष्टाने म्हणाली, ‘त्या म्हणाल्या… तो वाट पाहत असेल.’
कर्ण मोठ्याने हसला आणि वृषाहलीला जवळ आेढत असता धक्का लागून मंचकावरचा मद्याचा पेला कलंडला. मद्य सांडले.
वृषाली म्हणाली, ‘पेला सांडला ना?’
‘जुगारातला एक पेला सांडला, म्हणून झारी रिती होत नाही.’
‘कसला जुगार?’
‘साराच जुगार! तुझा-माझा विवाह हाही एक जुगारच!’
‘काय बोलता?’
‘आजच मला ते ज्ञात झालं.’ कर्ण हसून म्हणाला, ‘वसू, आपण शय्यागृहात हसतो आहोत. आनंदात आहोत. आणखी काही वेळानं भांडणार नाही कशावरून? हा जुगारच नाही का?’
‘फार ऐकलं. उठा! ‘वृषाली म्हणाली, ‘रात्र फार झाली.’
कर्ण उठत म्हणाला, ‘जुगाराचं काय?’
‘त्याचा विचार तुम्ही करू नका.’ वृषाली हसून म्हणाली, ‘शय्यागृहात फासे स्त्रीच्या हाती असतात, पुरुषाच्या नव्हे.’
कर्णाने पाहिले.
वृषाली शय्यागृहाची समई शांत करीत होती. उजेड मंदावत होता…
✍️ *क्रमश…* ✍️
