राधेय – भाग २०

🚩 *राधेय/२०* 🚩

दुर्योधनाचे भाकीत खरे ठरले. इंद्रप्रस्थाहून विदुराबरोबर पांडव आपल्या परिवारासह हस्तिनापुराला आले. कौरवांच्या राजप्रासादातच पांडवांचे वास्तव्य होते. यज्ञासाठी आलेल्या राजांना पांडव-कौरवांचे ते सख्य पाहून समाधान वाटत होते. पांडवांच्या सुखसोयींत कोणतीच कमतरता ठेवली नव्हती. सुग्रास भोजनाच्या सामुदायिक भव्य पंक्ती, नृत्यगायनांची करमणूक यांत पांडव सुखी होते.

यज्ञाची सांगता झाली आणि त्या रात्री पांडव आपल्या शयनगृहात सुश्राव्य गायन ऐकत शय्येवर पडून राहिले. स्त्रियांच्या सहवासात त्यांनी ती शुभ रात्र सुखाने घालवली.

उषःकाली वैतालिक स्तुतिपाठ करू लागले असता पांडव जागे झाले. आह्निक आटोपून ते धृतराष्ट्राच्या भेटीसाठी राजगृहात गेले. राजसभेत भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर यांखेरीज दुर्योधन, विकर्ण तेथे होते. क्षेमकुशल झाल्यानंतर धृतराष्ट्र म्हणाले, ‘युधिष्ठिरा, युवराज दुर्योधनानं या यज्ञाबरोबरच तोरणस्फटिका नावाचं द्यूतगृह उभारलं आहे. त्या द्यूतगृहात जाऊन आज त्या सुखाचा आस्वाद घ्या.’

युधिष्ठिराने संमती देत म्हटले, ‘आपली आज्ञा! द्यूतगृहा बद्दल मीही ऐकलंय्. द्यूताचं आमंत्रण स्वीकारूनच मी इथं आलोय्.’

जेव्हा युधिष्ठिराच्या समवेत धृतराष्ट्र द्यूतगृहात गेला, तेव्हा तेथे सारे राजे, मानकरी, प्रतिष्ठित नागरिक सभेमध्ये आपापल्या आसनांवर बसले होते. धृतराष्ट्राचा हात धरुन संजय त्यांना सभाग्रहात नेत होता, द्युगृहाची रचना समजावून सांगत होता. द्यूतगृहात अनेक कुशल द्यूतकार तो द्यूत पाहण्यासाठी गोळा झाले होते. या सर्वांचा परिचय युधिष्ठिराशी करून देण्यात आला.

धृतराष्ट्र महाराज सिंहासनावर बसताच सारे परत आपआपल्या जागी बसले. द्यूतगृहात शांतता पसरली.

दुर्योधन उभा राहिला आणि म्हणाला, ‘तात, आपल्या आशीर्वादानं द्यूतगृह द्यूतासाठी सिद्ध झालं आहे. हा अलौकिक द्यूत पाहण्यासाठी आमंत्रित राजे, राजनगरीचे प्रतिष्ठित नागरिक, कौरववीर गोळा झाले आहेत. या द्यूतात भाग घेण्यासाठी राजसूय यज्ञ करून सम्राट बनलेले युधिष्ठिर महाराज आपल्या बांधवांसह इथं आले आहेत. या द्यूताला आशीर्वाद देण्यासाठी पितामह भीष्म, महात्मा विदुर, द्रोणाचार्य, कृपाचार्यांच्यासारखे श्रेष्ठ इथं आले आहेत. द्यूताला अधीर बनलेल्या या सभागृहाला आपली आज्ञा व्हावी.’

धृतराष्ट्रचा गंभीर स्वर उमटला, ‘मुलांनो, द्यूत म्हणजे कलहाचं मूळ आहे. मृत्यूचं द्वार आहे, असं मला अनेकांनी सांगितलंय्. पण द्यूत राजमान्य, धर्ममान्य असल्यानंच मी या द्यूताला अनुमती दिली आहे. तेव्हा स्नेहबुद्धीनं आणि मोकळ्या मनानं हा द्यूत खेळा.’

दुर्योधनाची दृष्टी युधिष्ठिरावर गेली.

युधिष्ठिर उभा राहिला. त्याने दुर्योधनाला विचारले, ‘माझं द्यूत कुणाशी होणार व मी जिंकलेल्या पणाची हमी कोण देणार, हे प्रथम मला समजायला हवं. त्यानंतर मी द्यूतगृहात उतरेन.’

दुर्योधनाने स्पष्ट शब्दांत सागितले, ‘हे भूपते, तुला आधीच सांगितल्याप्रमाणं माझे मातुल सुबलपुत्र गांधारदेशाधिपती शकुनिमहाराज आपल्यासह द्यूत खेळतील अन् आपण द्यूतात जे पण जिंकाल, ते मी पुरवीन. या माझ्या वचनाला ही सभा साक्ष आहे.’

शकुनि आपल्या आसनावरून उठले. ते युधिष्ठिराला म्हणाले, ‘युधिष्ठिरा, मी तुझ्यासह द्यूत खेळायला तयार आहे. सर्व सिद्धता झाली आहे.’

युधिष्ठिराने एकदा सभेवरून दृष्टी फिरवली. तो म्हणाला, ‘शकुनिमहाराज, सम्राटांनी सुरुवातीलाच सांगितलंय् की, द्यूत हे पापाचं मूळ आहे. द्यूतकार नेहमीच कपटाचा अवलंब करतात.’

शकुनि हसले, ‘राजा, तू ज्ञानी आहेस. या जगातलं आह्वान असंच असतं. विद्वान अविद्वानाला, अस्त्रज्ञ अकृतास्त्राला अन् बलवान दुर्बलाला असंच आह्वान देत असतो. तुला माझी भीती वाटत असेल, तर याच वेळी द्यूतातून परावृत्त हो!’

क्षणात युधिष्ठिराची मान ताठ झाली. आपले उत्तरीय सावरीत तो पायऱ्या उतरत द्यूतपटाकडे जात असता म्हणाला, ‘मी द्यूताला तयार आहे.’

शकुनीच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद प्रगटला आणि तोही पटाकडे चालू लागला.

सभास्थानासमोर ठेवलेल्या द्यूतपटाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. जेथे द्यूतपट मांडला होता, ती भूमी उर्णावस्त्राने आच्छादलेली होती. युधिष्ठिराने आपली जागा घेतली. त्याच्यामागे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव चिंताक्रांत मुद्रेने बसले. पटाच्या दुसऱ्या बाजूला शकुनीने जागा घेतली.

शकुनीने एकदा सभास्थान निरखले. युधिष्ठिरावरची नजर न काढता शांतपणे आपल्या बोटांतील अंगठ्या काढल्या आणि त्या जवळच्या आसनावर ठेवल्या. सभास्थानाच्या खाली पटानजीक बसलेल्या विदुरांकडे पाहून पटावरचे फासे हाती घेतले. उलटी मांडी घालून शकुनीने फासे घेतलेले हात कानाजवळ नेले आणि ते फासे हातात घोळवू लागला. शकुनीचा आवाज उमटला, ‘बोल, राजा, तुझा पण बोल…’

युधिष्ठिराचा हात गळ्याशी गेला होता. त्या हाताचा स्पर्श गळ्यातल्या अमूल्य हाराला झाला. युधिष्ठिर म्हणाला, ‘हा मूल्यवान हार मी पणाला लावतो.’

शकुनीने फासे घोळवले आणि पटावर फेकले. साऱ्यांचे डोळे पटाला भिडले आणि शकुनीचा आवाज उठला, ‘राजा, मी डाव जिंकला…’

दुर्योधनाच्या मुखावर विजयी स्मित उमटले. त्याने जवळ बसलेल्या कर्णाकडे पाहिले. कर्णाचे कुतूहल वाढले होते. त्याच्या चेहऱ्यावर स्मित प्रगटले होते.

पर्वतावरून शिलाखंड सुटावा आणि पर्वत उतारावरून जात असताना अनेक शिलाखंड त्याने सोबत न्यावेत, तसे गळ्यातल्या हारापाठोपाठ दास, दासी, गोधन, ऐश्वर्य, यांसह आपले राज्यही हरून युधिष्ठिर मोकळा झाला; पण तिथे त्याचे पतन थांबणारे नव्हते. सारे हरल्यावर युधिष्ठिराची दृष्टी आपल्या पाठीशी बसलेल्या भ्रात्यांवर खिळली आणि एकापाठोपाठ पणाला लावलेले नकुल, सहदेवही जिंकले गेले. युधिष्ठिराला काय पणाला लावावे, हे सुचेना. शकुनि म्हणाला, ‘राजा, थांबलास का? सावत्र भावांना पणाला लावलंस आणि भीम, अर्जुन सुरक्षित ठेवलेस. हाच तुझा धर्म?’

युधिष्ठिर त्या बोलांनी संतापला आणि भीम-अर्जुनांनाही पणाला लावून मोकळा झाला; पण ते जिंकताच शकुनि म्हणाला, ‘राजा, तू सारं हरलास.’

‘नाही, मी सर्वस्व हरलो नाही. अजून मी इथं आहे. या देहानं आणि मनानं फक्त धर्मच आचरला आहे. आता मी स्वत:ला पणाला लावतोय्. माझ्या पूर्वपुण्याईवर मी द्यूतात गमावलेलं परत मिळवीन.’

पण तीही युधिष्ठिराची भ्रांतच ठरली. द्यूताचे फासे युधिष्ठिराच्या विरुद्ध पडले होत.

ते पाहून सभेत खळबळ निर्माण झाली. सभागृहाला भरपूर वातायने असूनही प्रत्येकाचा जीव कासावीस होऊ लागला.

हताशपणे युधिष्ठिर त्या फाशांकडे पाहत होता.

‘राजा!’ शकुनि म्हणाला, ‘तुझ्याजवळ तुझं धन शिल्लक असता, ते तसं राखून ठेवून स्वत:ला पणाला लावायला नको होतं. ते पाप आहे.’

‘माझं धन हरवलंऽ ऽ… काही शिल्लक नाही…’

‘नाही कसं? अद्याप तुझी प्रिय भार्या अवशिष्ट राहिली आहे ना? ती पांचाली तुझं धन नाही?’

साऱ्यांचे श्वास जिथल्या तिथे थांबले. खोटी प्रतिष्ठा आणि ईर्ष्या यांना बळी पडलेला युधिष्ठिर ते एकून सरसावला. आपल्या रूक्ष आवाजात त्याने विचारलं, ‘पांचाली…?’
‘हां? ती अजून शिल्लक आहे. ती पणाला लावलीस आणि तू पण जिंकलास, तर, राजा, तू आमच्या दास्यातून मोकळा होशील. आम्ही पण जिंकला, तर द्रौपदी आमची दासी होईल. आहे मान्य?’
देहभान विसरलेला युधिष्ठिर म्हणाला, ‘हां! आहे मान्य! ऐक, शकुने, जिचे नेत्र शरदऋतूतील कमलदला सारखे आहेत, जिच्या अंगाला शरत्कालीन कमलांचा गंध येतो, जिचे काळे व कुरळे केस विपुल व सुदीर्घ आहेत, जिचा मध्यभाग यज्ञवेदीप्रमाणे रेखीव आहे अन् जिच्या अंगावर विरळ केस आहेत, अशा बुद्धिमती, कलंकविधुरा सर्वांगसुंदर द्रौपदीचा पण लावून मी तुझ्याशी द्यूत खेळतो.’

युधिष्ठिराच्या त्या बोलण्याने साऱ्या सभेला घृणा आली आणि सभेचा संकेत लक्षात न घेता ‘धिक्कार असो’ असे तिरस्काराचे शब्द सभेमध्ये उमटू लागले. भीष्म, द्रोण, कृप यांच्या अंगांना दरदरून घाम सुटला. विदुर दोन्ही हातांत मस्तक धरून बसला. चेतनाशून्य झाल्याने त्याच्या नेत्रांत अश्रूही दिसत नव्हते.

शकुनीचे हात उंचावले गेले आणि भयाण शांतता पसरली.

दुर्योधन उठून उभा राहिला होता.

प्रलयासाठी आतुर झालेल फासे शकुनीच्या बोटांच्या पिंजऱ्यात करकरत होते…

✍️ *क्रमश…* ✍️