राधेय – भाग १७

🚩 *राधेय/१७* 🚩

दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुर्योधनच्या महालात दुर्योधन, शकुनि आणि कर्ण आले होते. दुर्योधनाचा संताप निवळला नव्हता. तो कर्णाला म्हणाला, ‘मित्रा, तुझ्या चंपानगरीमध्ये मला आश्रय मिळेल?’

‘युवराज, नगरी आपली आहे. तिथं आश्रय शोधण्याचं काहीच कारण नाही. पण संतापाच्या भरात….’

‘संतापाच्या भरात नव्हे. या नगरीत मला आता राहावंसं वाटत नाही.’

‘पण एवढी निरवानिरवीची भाषा कशाला?’ शकुनीने विचारले.

‘आणखी काय व्हायचंय? काल काय प्रकार झाला, माहीत आहे ना?’

‘आहे! साऱ्या प्रासादात तीच चर्चा चालू आहे.’

‘ती चर्चा अखंड चालली, तरी मला त्याचं सोयर-सुतक नाही.’ दुर्योधन उद्विग्न होऊन म्हणाला, ‘साध्या निद्रेला देखील मी मुकलोय. स्वप्नातही तो यज्ञ, ती मयसभा उभी राहते. अनर्थाला तुम्ही कारणीभूत झाला आहात, मामा.’

‘मी? भले… हा चांगला न्याय!’

‘हो, तुम्ही! तरी मी, या राजसूयाला जाऊ नये, असं म्हणत होतो; पण तुम्ही आग्रह केलात अन् अपमान सोसण्याची पाळी आली. नजरेआड काहीही घडलं असतं, तरी त्याचं दुःख एवढं वाटलं नसतं.’

‘दुर्योधना, शांत हो!’ शकुनि म्हणाले, ‘मी तुझा संताप जाणतो; पण सत्याकडं दुर्लक्ष करू नकोस. तू राजसूयाला गेला नसतास, म्हणून तुझ्याविना तो यज्ञ थांबणार होता? शत्रुपक्षाच्या बळाकडं डोळेझाक करून चालत नाही. ते उघड्या डोळ्यांनी अन् सावध मनानं पाहावं लागतं. राजसूय यज्ञात त्यांनी घडवलेलं आपल्या सत्तेचं दर्शन तुला घडलं नाही का? आजवर जे राजे कौरवेश्वरांच्या पुढं नमले होते, तेच राजे युधिष्ठिरावर सुवर्णपुष्पं उधळीत होते ना? सत्तेचं बळ आणि सुडाची इच्छा नसती, तर मयसभेत तुझी-माझी फजिती करण्याचं धाडस त्यांचं झालं नसतं. दुर्योधना, युधीष्ठिरानं राजसूय यज्ञ करून तुमच्या कौरव-साम्राज्याला आह्वान दिलंय्.’

‘कौरवांचं बाहुबळ अजून त्यांना माहीत नाही.’ दुर्योधन उसळला.

‘बाहुबळ खरं, पण कुणाचं…? शकुनि उजव्या हातातल्या अंगठ्या डाव्या हाताच्या बोटांनी चाळवीत म्हणाले, युधिष्ठिरावर छत्रचामरं ढाळली गेली. सर्व राजांनी आपल्या वैभवानिशी पांडवांपुढं मान झुकवली. पितामहांनी कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. नाही, दुर्योधना, या घटकेला तरी बाहुबळ त्यांचंच आहे.’

कर्ण शांतपणे म्हणाला, ‘शकुनि महाराज, आपण एक गोष्ट विसरता. त्या यज्ञानं आपण दिपला असाल, पण त्यामुळं कौरवांना दुबळे समजण्याचं काहीच कारण नाही. भीष्मांनी अग्रपूजेचा मान कृष्णाला दिला किंवा द्रोणाचार्यांनी यज्ञभूमीची सांगता केली, म्हणून एवढं, भ्यायला नको. उद्या प्रसंग आलाच, तर हेच भीष्माचार्य, द्रोणाचार्य, विदुर, कृपाचार्य प्राणपणानं आमच्या बाजूला उभे राहतील, यात मला यत्किंचितही संशय नाही. सम्राट धृतराष्ट्रमहाराजांच्या नुसत्या आज्ञेनंही…’

शकुनि शांतपणे म्हणाले, ‘फार लहान आहेस तू. अशी आशा करू नका. कौरवसम्राट अंध आहेत… अन् राजमातेनं पतिनिष्ठेची पट्टी डोळ्यांवर बांधली आहे.’

‘म्हणून कौरवपुत्र अांधळे आहेत थोडेच?’ दुर्योधनाने विचारले.

‘उत्तर हवं?’ शकुनीने विचारले.

‘हो!’

‘कौरवपुत्रांच्या डोळस चालीला विदुरांच्या निःसत्त्व नीतीचे लगाम घातलेत अन् अंध सम्राटांचा राजरथ विदुरांच्या सारथ्यानं शतकौरवांच्या अश्वांनी ओढला जातो.’

‘मामा!’ दुर्योधन उठत म्हणाला.

‘थोडं मद्य पी! राग शांत होईल. युवराज, संतापानं काही सिद्ध होत नाही. पांडवांच्या राजसूय यज्ञात, त्यांच्या कोषागाराची रत्नं मोजण्यात हे हात गुंतले होते, तेव्हा तो संताप व्यक्त व्हायला हवा होता. मयसभेत पाय घसरून पडला अन् पांडवस्त्रियांचं हसणं उठलं, तेव्हा भिजल्या वस्त्राची लाज वाटायला हवी होती.

‘अंधपुत्रांनों’ म्हणून भीमानं वाट दाखवली तेव्हा डोळे उघडायला हवे होते…’

‘मामा, तुम्हीसुद्धा…’

‘नाही, दुर्योधना, ते दुःख मला तुझ्या इतकंच सलतंय्.’

‘याला काहीच का उपाय नाही?’ वैतागाने दुर्योधनाने विचारले.

‘शोधला, तर आहे. जरूर आहे.’

‘कोणता?’

‘सांगतो.’

शकुनीने तीन मद्यपात्रे भरली. आपले मद्यपात्र उचलून त्यचा आस्वाद घेतला. आपल्या तांबूस-पातळ ओठांवरून जीभ फिरवीत शकुनि म्हणाला,

‘मद्य सुरेख आहे घे!’

दोघांनी पेले उचलले.

कर्णाने विचारले, ‘युद्ध?’

‘नाही.’

‘सामोपचार?’

‘नाही.’

‘घात?’ मूर्तिमंत भीती कर्णमुखावर तरळली.

‘नाही.’

‘सांगा, मामा!’ दुर्योधन उतावीळपणे म्हणाला, ‘हे तीन मार्ग सोडून कोणताही उपाय सांगा.’

‘मी खूप विचार केला. एकच उपाय मला दिसतो.’

‘बोला.’

‘द्यूत!’ शकुनीने सांगून टाकले.

‘द्यूत!’ कर्ण-दुर्योधन एकाच वेळी उद्‌गारले आणि एकमेकांकडे पाहू लागले.

‘असे पाहता काय?’ फासे खेळवावेत, तसा हातांचा चाळा करीत शकुनि म्हणाले, ‘दुर्योधना, तो पांडवश्रेष्ठ युधिष्ठिर द्यूताचा व्यसनी आहे. त्याला द्यूताचं आह्वान दे. तो क्षत्रिय आहे… अन् क्षत्रिय द्यूताचं आह्वान कधीही टाळीत नाही.’

‘पण कोणत्या निमित्तानं?’

‘त्यात विचार कसला पुण्यप्राप्तीसाठी एखादा यज्ञ कर. त्या निमित्तानं मयसभेसारखं सभागृह उभार. धृतराष्ट्रमहाराज त्याला जरूर अनुमती देतील. द्यूताचा पट मांडला जाऊ दे अन् मग शकुनीचं कौशल्य बघ.’

‘महाराज! क्षमा असावी.’ कर्ण म्हणाला, ‘आपण वयानं मोठे. आपण पुष्कळ पाहिलेले, अनुभवलेले… हस्तिनापुरापासून गांधार देशापर्यंतच्या अमोल वस्तुंचं मूल्यमापन, व्यापार करण्यात आपण निष्णात. माणसांची परीक्षा आपल्याइतकी दुसऱ्या कुणाला! तरीही या द्यूताचा विश्वास…’

‘निश्चित बाळगा.’ आपले उत्तरीय सावरीत शकुनि उभा राहिला. त्याच्या वेधक घाऱ्या डोळ्यांत एक वेगळाच आनंद प्रगटला. ‘राधेया, मी नुसता व्यापारी नाही. मी सुबल राजाचा पुत्र- गांधार देशाधिपती आहे, हे विसरू नकोस. हस्तिनापुरापासून गांधार देशापर्यंत मी जो प्रवास करतो, तो व्यापारासाठी नव्हे. द्यूत हेच ते कारण आहे.’

‘द्यूतासाठी प्रवास?’ दुर्योधन म्हणाला.

‘हो, द्यूतासाठी! या भूतलावरच्या सम्राटांची, ऐश्वर्यसंपन्न लोकांची रत्नघरं अधिक संपन्न करण्यासाठी, वस्त्रलंकारांची दीप्ती वाढविण्यासाठी, भूलोकीची रत्नं, तलम वस्त्रं, सुवर्णाचे सुबक नक्षीदार नाजूक दागदागिने, रूपवती दासी यांच्यासह या देशात येणाऱ्या व्यापाऱ्यांचे तांडे यांची वर्दळ गांधार-हस्तिनापुरच्या बिकट वाटेनंच होते.’

कर्ण-दुर्योधन शकुनीकडे पाहत होते. शकुनीचा अति-गौर वर्ण अधिकच उजळला होता. कृश अंगलटीची ती उंच व्यक्तिरेखा आपल्या तंद्रीत मग्र होती. डाव्या खांद्यावरचे रेशमी उत्तरीय डाव्या मनगटावर पटबंध होऊन रुळत होते. त्याच्याशी चाळा करीत शकुनि बोलत होता: ‘हिमालयाच्या पर्वतदऱ्यांच्या, कडेकपारींच्या अरुंद वाटेनं हा प्रवास जातो. मौल्यवान नाना वस्तूंच्या ओझ्यांनी लादलेल्या उंटांच्या अखंड रांगा या वाटेवरून चालत असतात. चोरांच्या भीतीनं सदैव सावध असणारे धनुष्यबाण, खड़्गधर रक्षक डोळ्यांत तेल घालून आजुबाजूच्या प्रदेशांवरून टेहळणी करीत असतात. सायंकाळी सुरक्षित जागा पाहुन मुक्काम पडतो. पाली, राहुट्या उभारल्या जातात. सेवकांची धावपळ, उंटांचं ओरडणं, घोड्यांची खिंकाळीणी यांच्या आवाजानं वातावरण गजबजून उठतं, शेकोट्या प्रज्वलित होतात अन् प्रकाशानं रात्र उजाडते. दिवसभराच्या प्रवासानं थकलेले जीव शेकोट्यांच्या उबाऱ्यात अन् पर्वतराईवरून येणाऱ्या अंगबोचऱ्या गारव्यानं सावध होतात. उंची मद्याच्या सेवनानं आरक्त बनलेल्या नेत्रकडांवर एक वेगळीच धुंदी प्रगटते… अन् मग द्यूताचा पट मांडला जातो.’
‘द्यूत… बोलून चालून जुगार. त्याचा भरवसा कुणी द्यायचा? कर्ण उद्विग्न होऊन म्हणाला.

कर्णा, मी सावध द्यूती नाही. या नाना देशींच्या द्यूतींबरोबर मी फासे घोळवले आहेत. प्रियकराला आपल्या सखीची अंगप्रत्यंगं जशी जाणवतात, तशा फाशांवर कोरलेल्या मुद्रा माझ्या सरावलेल्या हातांना रात्री अंधारातही जाणवतात.’

‘द्यूतात यश मिळेल?’ दुर्योधनाची आशा प्रगटली.

शकुनि उत्तर देणार, तोच कर्ण म्हणाला, ‘युवराज, जुगाराज्या साहाय्यानं यशाची आकांक्षा फक्त मूर्ख आणि व्यसनीच बाळगतात. जुगार हा करमणुकीचा खेळ आहे. मनोरंजनासाठी त्याचा वापर व्हावा, राजकारणात त्याला वाव नाही. राजकारणात बुद्धी अन् बाहुबलाचाच पराक्रम हे विजयाचं साधन असतं. वीरांनी त्याचाच अवलंब करावा, हे ठीक.’

‘राधेया, योग्य तेच बोललास, तुझं अगदी बरोबर आहे.’ शकुनि म्हणाला, ‘राजकारणात बुद्धी आणि बाहुबलच श्रेष्ठ. तू योद्धा आहेस. वीर आहेस, बुद्धिमान आहेस. राजसूय यज्ञात पांडवांच्या मागे उभी राहिलेली कृष्णाची चतुरंग सेना तू पाहिलीस. हजारो नरेंद्र आज आपल्या बळानिशी पांडवांचं सामर्थ्य वाढवीत आहेत. जरासंधासारख्या कौरवांच्या शक्तींचा पराभव झालाय. आज पांडवांचा रणांगणातला पराजय तुला सहजसाध्या वाटतो? वाटला, तरी त्याला धृतराष्ट्रमहाराज संमती देतील? येणाऱ्या प्रत्येक घटकेबरोबर पांडवांचं बळ वाढतंय्, हे न समजण्याइतका का तू मूर्ख आहेस? आता राहिली बुद्धी. तिचाच उपयोग कराराला हवा.’

‘महाराज, बुद्धीची दानंसुद्धा परहातांनी पडत नसतात.’ कर्ण स्पष्टपणे म्हणाला, ‘दुबळ्या अन् अस्थिर हातांनीच फासे खेळले जातात.’

शकुनीने कर्णाकडे रोखून पाहिले. त्याच्या नेत्रांत निराळाच विश्वास उमटला. आपले हात उंचावत, ते हात निरखीत शकुनि म्हणाला, ‘दुबळे हात! हे हात दुबळे? या हातांची किमया माहीत नाही, म्हणूनच हे उद्गार तुझ्या मुखातून निघाले. या शकुनीच्या हस्तलाघवावर विश्वास ठेव. मद्यानं अस्थिर बनलेल्या या हाती जेव्हा फासे धरले जातात ना, तेव्हा ते पर्वतासारखे स्थिर बनतात. हे हात साधे जुगारी नाहीत, या हातांचा लौकिक कृतहस्त, अतिदेवी असा आहे. द्यूत म्हणजे अठरा व्यसनांतील सर्वश्रेष्ठ व्यसन. बाहुबला इतकंच श्रेष्ठ. या हस्तस्पर्शात करकरणारे फासे पटावर घरंगळून तक थै थै नाचू लागतात, तेव्हा राजसभागृहात नृत्य करणाऱ्या नर्तकीच्या पदन्यासाची आठवण होते. एकदा का ते पिंगट रंगाचे फासे पटावर फेकले जाऊन त्यांचा पदन्यास सुरू झाला की, एखादी जारिणी स्त्री अनिवार ओढीनं संकेतस्थळी यावी, तशी जुगाऱ्याच्या मनाची अवस्था होते. तो जुगारी युधिष्ठिर या फाशांच्या नादावर आपलं भान हरेल… अन् सर्वस्व पणाला लावून मोकळा होईल. हे तू लक्षात ठेव.’

‘या फाशांचा भरवसा एवढा देता?’ दुर्योधनाने विचारले.

‘मी ब्रह्मास्त्र जाणणारा कर्णासारखा योद्धा नाही, की ज्यानं कवचकुंडलांच्या भरवशावर शत्रूंना सामोरं जावं. वीरांचा रथ हवा तसा नेऊन शत्रू गाठण्याइतपत माझं सारथ्य नाही. तुला मदत करण्यास फक्त हीच विद्या माझ्याजवळ आहे. माझ्या जीवनात ज्याचा विश्वास देता येईल, अशी एकच कला मला ज्ञात आहे. तिचा लाभ घ्यायचा, की नाही, हे तू ठरव.’

‘फाशांचं सामर्थ्य एवढं बलवत्तर असतं?’

‘बलवत्तर…? युवराज, हे फासे पडतात खाली; पण फुरफुरतात सर्वांवर. यांना हात नाहीत, तरी हात असणाऱ्या पुरुषांना ते दीन बनवतात. भूलोकीच्या पटावर विखुरणारे हे फासे दिव्य लोकीचे निखारेच असतात. हस्तस्पर्शाला शीतल करणारे हे फासे प्रतिपक्षांचं काळीजच थंड करवून टाकतात. यांचं बळ रणांगणावरच्या योद्ध्यापेक्षा, प्रबळ शस्त्रापेक्षा अमोघ आहे. दुर्योधना, त्या द्यूतलंपट युधिष्ठिराला द्यूताचं आह्वान दे आणि या हातांचं लाघव बघ. राजसूय यज्ञानं प्रमत्त झालेल्या त्या पांडवांचे पाची राजमुकुट माझ्या द्यूताच्या सोंगट्या करून, त्यांचं विस्तारलेलं राज्य तुझ्या पायांखालचा पट केला नाही, तर या शकुनीला विचार!’

‘अन् हेच त्या युधिष्ठिरानं केलं, तर!’

‘अशक्य!’ तेवढ्याच खंबीरपणे शकुनीने सांगितले, ‘राधेया, या द्यूतात तू नवखा आहेस. अनभिज्ञ आहेस. चार बाण सोडता आले, खड्गाचे चार वार जमले की, साऱ्यांनाच आपण योद्धे आहो, असं वाटू लागतं; पण ते धैर्य रणांगणावर टिकत नाही. नौबतींच्या आवाजानं, रणभूमीच्या दर्शनानं अशा वीरांचा थरकाप होऊन जातो. योद्ध्याला मृत्यूचं भय असून चालत नाही. मृत्यूला समोर पाहताच त्याला वाढावं लागतं. तो संस्कार त्याला जपावा लागतो. रणनौबतीच्या आवाजानं योद्धयाला स्फुरण चढतं. मृत्यूचा विचार न करता तो शत्रूला भिडतो, ते त्यानं जोपासलेल्या संस्कारानं. पंचकल्याणी उमद्या घोड्यावर दुबळा जीव कधी स्वार होईल का? या फाशांना संस्कार असतात. मी अक्षविद्येत निपुण आहे. असलेलं घालवण्यापेक्षा गमावलेलं जिंकण्याची ज्याची बलवत्तर इच्छा असते, त्यालाच हे फासे वश होतात. पापपुण्याची मडकी शोधीत पोट भरणाऱ्या या दुबळ्या युधिष्ठिराला या द्यूतात यश कसं लाभेल? ते माझंच आहे.’

कर्ण निरुत्तर बनलेला पाहून आनंदाने दुर्योधनाने विचारले, ‘मामा, पण तात याला संमती….’

‘कालच्या तुझ्या पराक्रमानं त्यांचे डोळे उघडले आहेत. कदाचित ते संमती देतीलही; पण कोणत्याही परिस्थितीत ही सारी गोष्ट तू तुझ्या पित्याच्या कानांवर घालणं इष्ट आहे. त्यांची अनुमती मिळाली, की जय आपलाच!’

दुर्योधन सलगीने म्हणाला, ‘मामा, आता तुमच्याखेरीज आधार नाही. तुम्हीच ही गोष्ट तातांच्या कानांवर घाला. आपल्याला ते चांगलं सांगता येईल. मला पटवून देणं कठीण जाईल.’

‘ठीक आहे. तू चिंता करू नकोस. यज्ञ अन् द्यूत राजमान्य आहेत. राजनीतीला ते धरूनही आहे. धृतराष्ट्रमहाराज त्याला निश्चितपणे संमती देतील. ते काम तू माझ्यावर सोपव. उद्या सूर्योदयानंतर त्यांच्या सल्लागारांनी त्यांना भेटण्याआधी तुला सम्राटांचं बोलावणं येईल, तेव्हा तू जरूर तिथं ये. त्या वेळी द्यूताची भूमिका मी तयार करून ठेवलेली असेल.’

दुर्योधनाला आश्वासन देऊन शकुनि निघून गेला.

दुर्योधनाने समाधानाने कर्णाकडे पाहिले.

कर्ण सचिंत दिसत होता.

‘मित्रा…’

कर्णाने वर पाहिले. उठत तो म्हणाला, ‘युवराज, हा द्यूत मला पटत नाही. हा मार्ग वीराचा नव्हे.’

‘दुसरा काही मार्ग सुचतो?’ दुर्योधनाने विचारले.
‘सुचला असता, तर द्यूताचा सल्ला मी ऐकत बसलोच नसतो; पण सांगावंसं वाटतं, परत एकदा विचार कर. संपूर्ण विचाराखेरीज यात पाऊल टाकू नकोस. जुगार अन् चारित्र्य या अशा दोन गोष्टी आहेत की, यांत पाय टाकण्याआधी विचार करावा. नंतर पाय माघारी घेता येत नाही. येतो मी.’

दुर्योधनाचा निरोप घेऊन कर्ण स्वगृही गेला, तरी द्यूताचा विचार त्याच्या मनातून जात नव्हता.

✍️ *क्रमश* ✍️