वही पुस्तकात कधी – बोबडे बोल – संदीप बोबडे

वही पुस्तकात कधी
गुलाब ठेवला होता
कारण वेग वेगळे
तेंव्हा तोही ताजा होता…

तोच तजेला सुगंध
पानांना आजही येतो
उघडताच पुस्तक
त्या काळात पुन्हां नेतो

सुकलेल्या पाकळ्यात
भावना आजही ताज्या
जपल्या त्या गुलाबाने
हृदयी कप्यात माझ्या

रक्ताच्या नात्यात तीच
ओढ सापडत नाहीं
पाकळ्यात पानावर
आसवे टिपून राही

ती माया ममता नाती
भ्रम मनाचा वाटतो….
पुन्हां पुन्हां मग मी ही
पुस्तकास त्या भेटतो…..

मनगटावर काल
धागा बांधलेला होता
हाथ माझा आता मात्र
कोरडा राहिला होता

वही पुस्तकात कधी
गुलाब ठेवला होता
कारण वेग वेगळे
तेंव्हा तोही ताजा होता…

॥ बोबडे बोल ॥©

@ संदीप बोबडे