🚩 *राधेय/५५* 🚩
कर्णाने पाठ फिरवली आणि तो जाऊ लागला. वृषाली पाठमोऱ्या कर्णाकडे पाहत होती. तिचा श्वास गुदमरला होता. भान हरपत होते. वृषालीचे नेत्र भीतीने विस्फारले गेले आणि ती किंचाळली, ‘नाथ S’
त्या हाकेबरोबर कर्णाचे पाय उभ्या जागी थिजले. मनात असूनही त्याला पुढे पाऊल टाकता आले नाही. त्या हाकेच्या सामर्थ्याने कळसूत्री बाहुलीप्रमाणे तो वळला. झंजावाती वारे शरीराला भिडावे, तशी वृषाली रणवेष धारण केलेल्या कर्णाला भिडली होती. कर्णाचे हात तिच्या पाठीवरून नकळत फिरत होते. शक्य तेवढया कठोरतेने कर्णाने हाक मारली, ‘वृषाली…’
वृषालीने मान वर केली. अश्रूंनी भरलेले तिचे नेत्र अस्थिर बनले होते. एक प्रचंड अनोळखी भीती त्या दृष्टीत तरळत होती. साऱ्या अंगावर कापरा खेळत होता. भिजल्या गालांवर, विस्फारलेल्या केसांच्या बटा चिकटल्या होत्या. ती घायाळ नजर, शुष्क थरथरणारे ओठ, स्फुरण पावणारी नासिका पाहून कर्णाचे मन विरघळून गेले. वृषालीचे एवढे विकल, घायाळ रूप त्याने कधीही पाहिले नव्हते. कर्णाने दोन्ही हातांत तिचा चेहरा घेतला. ते गाल कुरवाळीत कर्ण म्हणाला, ‘प्रिये, स्वतःला सावर. तुझ्या या दर्शनानं माझं बळ सरत आहे. योद्धयाच्या हाती निर्धृण बळ असावं लागतं. दिगंत कीर्तीसाठी रणांगणी जाणाऱ्या वीराला असला निरोप साह्यकारी होत नाही. तू वीरपत्नी आहेस. तुला हे शोभत नाही…’
वृषालीला वाचा फुटली. ती कर्णाला बिलगत म्हणाली. ‘नाही, नाथ! मला सोडून तुम्हांला जाता येणार नाही. ती कीर्ती मला माहीत नाही. दातृत्व मी जाणत नाही. मला दिसतात, ते फक्त पाय. तुम्हांला तुमचं शौर्य कीर्ती मिळवून देईल. तुमचे दातृत्च अजरामर राहील. संसारात जे लाभलं नाही, ते जीवनसाफल्य तुम्हांला रणांगणी लाभेल. पण माझ्या नशिबी काय?’
‘वृषाली!’ कर्ण उद्गारला.
‘नाथ! तुम्ही असेपर्यंत माझ्या जीवनाला अर्थ आहे. रणांगणावर माझे भाऊ, मुलं हरवली. ते दुःख मी धीरानं सोसलं. आता ते बळ राहिलं नाही. वैधव्यानंतर स्त्रीच्या जीवनाला अर्थ राहत नाही. नाथ! आयुष्यभर साऱ्यांचं भलं केलंत. काही अपराध नसता मला माझ्या जीवनातून उठवण्याचा तुम्हांला अधिकार नाही. नाथ, मी तुम्हांला जाऊ देणार नाही.’
वृषालीच्या त्या व्याकूळ बोलांनी कर्णाचे बळ सरले. त्याने आवेगाने वृषालीला मिठीत घेतले. क्षणभर कर्णाचे आरक्त नेत्र पाणावले; पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी मिठीतून दूर होत तो म्हणाला, ‘वृषाली, असलं वेडेपण मी तुझ्याकडून अपेक्षिलं नव्हतं, तुझी-माझी सोबत असल्या मृत्युनं तुटणारी नाही. ती अखंड राहील. वेडे, उजव्या हाती शस्र पेलून मृत्यूचं आह्वान स्वीकारीत शत्रूला भिडत असता, वीराचा डावा हात कमरेच्या शेल्याचा आधार शोधीत असतो. पती, पत्नी ही का दोन रूपं? दोन भिन्न रूपांत काया, वाचा, मनानं गुंतलेला एकच आत्मा असतो, म्हणून तर पत्नीला अर्धांगी म्हणतात. आज मृत्यूचं भय न बाळगता मी रणांगणी जातोय्. म्हणूनच मी तुला आवडतोय् ते भय बाळगून मी घरी बसलो, तर तुला माझ्याकडं पाहवणारही नाही. खोटया भीतानं तू व्याकुल होऊ नकोस.’
‘नाथ… पण…’
‘काही बोलू नकोस. असली ताटातूट फार काल राहणार नाही. सप्तवनांनी वेढलेली ही कुरुक्षेत्राची पुण्यभूमी आहे. या भूमीवर अनेकांची तपं सफल झाली आहेत. गुरुदेव परशुरामांनी याच भूमीवर स्वमंतपंचक नावाचा जलाशय निर्माण केला. वृषाली हीच ती भूमी, की जिथं पुरूरवा-उर्वशींची विटालोनंतरची भेट घडली. दीन जीवाची ताटातूट करणारी ही भूमी नाही. आपली ताटातूट करण्याचं बळ विधात्यालाही होणार नाही. वसू, मला पोहोचवायला तू खाली येऊ नकोस. तू इथंच सौधावर उभी राहा. दूर जाईपर्यंत मला तुझं दर्शन घडेल. आजवर मी तुला कधी आज्ञा केली नाही. ही माझी आज्ञा समज.’
कर्णाने बोलणे केंव्हा संपवले आणि तो केव्हा गेला, हेही वृषालीला समजले नाही. कर्णाला परत हाक मारण्याचे बळ वृषालीला राहिले नाही. कर्ण गेलेल्या मोकळ्या द्वाराकडे पाहत ती तशाच उभी राहिली. रथाच्या आवाजाने तिला सावध केले. ती सौधाच्या काठावर धावली. कर्णरथ भरधाव वेगाने जात होता.
कर्णाने मागे वळून पाहिले.
पहाटेच्या प्रकाशात पश्चिम क्षितिजाकडे वर निस्तेज चंद्रकडा उभी ठाकावी, तशी सौधावर वृषाली उभी होती.
✍️ *क्रमश:* ✍️
