राधेय – भाग 54

🚩 *राधेय/५४* 🚩

 

पहाटेच्या वेळी कर्ण एकटाच प्रासाद सौधावर उभा होता. वातावरणात नीरव शांतता नांदत होती. आकाशातील नक्षत्रे पहाटेच्या चाहुलीने निष्प्रभ होत होती. ती शांतता निरखीत कर्ण उभा होता. तशा थंड वेळीही मस्तकीचे शिरस्त्राण, छातीवर रौप्यकवच यांमुळे तो गारवा जाणवत नव्हता. काही वेळाने निर्णायक युद्धाचा दिवस चालू होणार होता.

 

निर्णायक युद्ध! केव्हा आणि कुठं घडणार! युद्धाचा शेवट ठरलेला होता. पण तो कसा होणार? पण आता ते अधिक लांबणीवर जाऊ नये. आता अधिक सोसण्याचं बळ राहिलं नाही जितक्या लवकर ते घडेल, तेवढं बरं: शस्त्रस्पर्धेच्या वेळी अर्जुनाला दिलेलं आह्वान! त्या अपमानातून उद्भवलेली ईर्ष्या.. अर्जुनवधाचं अखंड चिंतन करीत जीवन वाढलं. कवचकुंडलं दान करताना ते भंगेल, असं वाटलं नाही उलट, त्या वेळी आत्मबलाचा साक्षात्कार झाला. दुर्योधनाला युद्ध अटळ असल्याची जाणीव मीच करुन दिली. अर्जूनानं कृष्णाचं सख्य पत्करल्याचं कळलं तेव्हाही प्रतिज्ञापूर्तीत खंड पडले, असं वाटलं नाही. पण कृष्णानं जन्मरहस्य सांगितलं आणि वज्राघात झाला.

 

ते आधीच कळलं असतं, तर?

 

कृष्णाला माहीत होतं तर त्यानं आधी का सांगितलं नाही?

 

भीष्म-विदुरांना ते माहीत होतं योग्य वेळी हा विनाश टाळण्याचं त्यांच्या हाती होतं मी कोण? कुणाचा? कुठून आलो? कुठं जाणार? या प्रश्नांनी जीवनभर उच्छाद मांडला त्या प्रश्नांनी उत्तर मिळताच शांतता लाभण्याऐवजी भयानक अशांतता पदरात यावी? आत्मशोध म्हणजेच का जीवनाचा अंत आहे? नाहीतर कृष्णानंं जन्मरहस्य सांगताच ती अखंड धगधगत राहिलेली सुडाची आग विझली नसती. यशाची आकांक्षा जिथल्या तिथं विरली नसती. उदंड कीर्तीच्या रुपाला तडे गेले नसते राहिली फक्त पराजयाची जाणीव अटळ पराक्रमाची! दैवानं असला जीवघेणा खेळ खेळायला नको होतं…

 

खेळ मी मांडला नाही देवानंच मांडला एवढा भयानक खेळ अन्यत्र दिसणं कठीण! एकाच मातेच्या उदरी जन्मलेले जीव; पण त्यांची जन्मत:च ताटातूट झाली एकमेकांच्या प्रेमभावांत ज्यांनी वाढावं, ते भाऊ एकमेकांशी वैरभावानं पाहत वाढले दैवाला हा खेळ अपुरा वाटला, म्हणून की काय, त्या भावांच्या हाती प्राणघातक शस्त्रास्त्रं देऊन रणांगणावर एकमेकांच्या समोर उभं करण्यात आलं अन् आता शेवट ठरलेला…दैवानं तरी संयम पाळायला हवा होता.

 

कर्णाचे लक्ष आकाशातल्या नक्षत्रांवरून फिरत होते आणि अचानक एक तेजस्वी तारा वेगाने खाली येताना दिसला.

 

कर्णाच्या ओठांवर एक स्मित उमटले.

 

लक्ष ताऱ्यांतील एक तारा ढळला, म्हणून तारांगण थोडंच मोकळं पडणार? त्यात उणीव थोडीच राहणार? आकाशात जडवलेल्या ताऱ्यांना सुद्धा एक ना एक दिवस निखळावं लागतं. त्यांनी कोणतं पाप-पुण्य केलं? शुद्ध तेज असा अग्नि शांत का होतो? सदैव मर्यादा पाळणाऱ्या समुद्राला गंगाजलाची चव का नसावी. अचल पर्वतांना भूकंप का जाणवावा त्यांनी कोणती पापं केली हे पाप-पुण्य आहे तरी काय?

 

अपमानाचा सूड! निर्मळ जीवनाची इच्छा; पराभवाचं दुःख हेच का पाप! कुणीतरी आपलं असावं, कुणाला तरी आपलं मनोगत कळावं, कुणाच्या तरी मायेच्या हातांनी डोळ्यांतल्या अश्रूंनी जगण्याचं बळ लाभावं, असं वाटलं, तर तो का स्वार्थ? परमार्थाला सुद्धा स्वार्थाचं बळ असावं लागतं.

 

मानवरूपाला कधीच मुक्तपणे जगता येत नाही. अवयवांनी जेवढं शरीर बद्ध असतं. तेवढंच मनही. नेत्रांना दिसलेलं सौंदर्य मनाला मोहवतं. हाताला झालेला स्नेहमय स्पर्श लक्ष वीणांसारखा मनाच्या गाभाऱ्यात झंकारत राहतो. दानासाठी पुढं केलेल्या हाताबरोबरच संकटनिवारण केल्याचा आनंद उद्भवतो. दान तरी कुठं एकांगी असतं? दिलेल्या मित्रप्रेमासाठी या जीवनात ऐश्वर्य लाभलं, सत्ता हाती आली, सूतपुत्राच्या हाती आधिपत्य आलं; पण त्याच वेळी उभं जीवन त्या प्रेमात गुंतून गेलं जीवनाची बद्धता वाढविण्यासाठीच का दातृत्वाचा उपयोग, मग त्याच मनात सौंदर्याची अभिलाषा, दातृत्वाचा अहंकार, स्नेहमय अखंड दास्य आलं तर आश्चर्य कसलं? तृषार्त असणं हे पुण्य, तृप्त होणं हे पाप! जरूर काही तरी गल्लत आहे.

 

दर्पणासमोर उभं राहून रणवेष धारण करीत असता स्वतःच्या रूपाकडं पाहण्याचा धीर कर्णाला झाला नाही डोळ्यांसमोर येत होता वृषसेन!

 

रणांगणावर चिरनिद्रा घेणारा, गाढ झोपी गेलेला! जे रूप हाताखांद्यांवर खेळत मोठं झालं, ते रूप तसंच होतं. अनेक वेळा निद्राधीन झालेला वृषसेन तसाच दिसत होता. रूप होतं तेच परिचित शरीर. मग गेलं ते काय? ते चैतन्य! त्याची कधीच जाणीव झाली नाही. ती ओळख कधी घडणार होती का? हे जाणं म्हणजे कुठं जाणं, हे कळलं असतं, तर या मृत्यूची भीती वाटली नसती. रूपाच्या मोहात माणूस एवढा बद्ध झाला नसता. चैतन्यानं केलेला जडत्वाचा त्याग म्हणेच का मृत्यू! मग या रूपाचा मोह कशासाठी?

 

रूप! ते तरी नेहमीच कुठं सहन होतं? अश्रुपूर्ण नजरेनं पाहणाऱ्या बालकाकडं कुठं पाहवतं? राधाईच्या मोकळ्या कपाळाकडं कुठं पाहता आलं? दृष्ठी असूनसुद्धा माणसाला फार थोडं पाहता येतं. पाहण्याचा मोह टाळणं म्हणजेच जगणं.

 

जगणं! त्याचा विचार आता फार काळ करावा लागणार नाही.

 

कर्णाचे लक्ष पूर्वक्षितिजाकडे गेले.

 

धूसर प्रकाशक उमटली होती अंधार प्रकाशात मिसळत होता. मोरांचा आर्त आवाज कानांवर येत होता.

 

कर्ण वळला मागे उभ्या असल्या वृषालीला पाहून तो भानावर आला ‘वृषाली! केव्हा आलीस?’

 

‘बराच वेळ झाला. आपण कसल्यातरी विचारात होता. आपल्याला हाक मारावी, असं वाटलं नाही.’

 

‘रणांगणावर जाणारा वीर दुसरा कसला विचार करणार… रणांगणावर समोर येणारा शत्रू कोण असेल? कोणत्या ऋणानुबंधानं ती गाठ पडते? हे अज्ञात शत्रूबद्दल वाटतं. मग त्याचा ऋणानुबंध … माहीत आहे, त्या शत्रूशी युद्ध करायला जाताना केवढा मनाचा गोंधळ वाढत असेल?’

 

‘कसला ऋणानुबंध?’

 

गडबडीने कर्ण म्हणाला ‘माणुसकीचा! दुसरा कसला वृषाली, युद्धात ज्या ज्या वेळी कृष्ण समोर आला, तेव्हा चंपानगरीतला कृष्णभेटीचा दिवस आठवत असे. तो शत्रुपक्षाचा सारथी, असं कधीच वाटलं नाही.’

 

वृषाली काहीच बोलली नाही. तिने हातावरचा शेला उचलला.

 

कर्णाने ते पाहताच आपले हात उंचावले. पण वृषालीने नेहमीप्रमाणे कमरेला शेला बांधला नाही. तो शेला तिने कर्णाच्या हातात दिला.

 

आश्चर्याने कर्णाने विचारले ‘आज शेला हाती दिला?’

 

‘ते बळ आता राहिलं नाही.’ वृषालीला हुंदका फुटला.

 

कर्ण पुढे झाला. त्याने वृषालीला जवळ घेतले. आपल्या भावना आवरीत तो म्हणाला,

 

‘वृषाली, या कर्णाच्या जीवनात राधाईच्या हातची माया आणि तुझा सहवास सोडला, तर फार थोडे सुखाचे क्षण लाभले. तुझ्या रूपाच्या द्वारे माझं सुख अवतरलं, अस वाटतं. आज रणांगणावर जात असता जीवनातील कुठलीच इच्छा अपुरी राहिली आहे, असं वाटत नाही. वृषाली, ते अश्रु आवर. रणांगणावर जाणाऱ्या पतीच्या बाहूंना निर्धृण बनायची आवश्यकता असते. अनुकंपेला तिथं अवसर नसतो. मी जातो.’

 

कर्णाच्या शेवटच्या वाक्याने ती भयभीत झाली. ‘रणांगणावर जाताना नेहमी ‘मी येतो’ असं आपण म्हणता, मग आजच…’

 

‘चुकून बोलून गेलो असेन. तू खाली येऊ नकोस. कृष्णानं सांगितलं, ते अगदी सत्य आहे. निरोप मंद गतीनं घेऊ नये. तो चटकन संपवावा. वृषाली, रणांगणावरून परत येणं यातच जीवनाची कृतकृत्यता थोडीच असते? युद्धभूमीवरून माघारी आलो, तर पराजय ठरेल. रणभूमीवर हरवलो गेलो, तर विजयी झालो, असं निश्चितपणं समज. वृषाली, तू इथंच थाब. तो बघ, पृथ्वीचा अंधकार दूर होऊ लागला आहे. साऱ्या दिशा प्रकाशमान होत आहेत. त्या अंधाराच्या नाहीसं होण्याबरोबर उगवत्या सूर्यकिरणांत साऱ्या सृष्टीला नवं रूप लाभेल, चैतन्य प्रगटेल. गेला काळोखानं दिलेल्या विश्रांतीचं भान कुणालाही उरणार नाही. वृषाली, हा चमत्कार बघत तू उभी राहा.

 

✍️ *क्रमश:* ✍️