राधेय – भाग 56

🚩 *राधेय/५६* 🚩

 

कर्ण कौरव शिबिरात आला. शल्यराज कर्णाचीच वाट पाहत होता. कर्ण आपल्या रथातून उतरला. दुर्योधनाला भेटून तो शल्याकडे वळला.

 

शल्यराज नव्या रथाकडे पाहत म्हणाला,

‘कर्णा, बघ, रथ कसा सज्ज केलाय्. तो! हा रथ तेजानं अभिमंत्रित केला आहे. राधेया, या रथाला जुंपलेले शुभ्र घोडे जातिवंत आहेत. विजेचा वेग आणि चपलता त्यांच्या खुरांत दडलेली आहे. या रथाला लावलेल्या सुवर्णदंडावर तुझा कमल चिह्नांकित, सुवर्णशृंखलायुक्त यशोध्वज माध्याह्नाच्या सूर्यतेजाप्रमाणं झळाळतो आहे. हे सुतपुत्रा, रथपरीक्षेत तू निपुण आहेस, असं मी ऐकतो. तुलादेखील या सुवर्णसंपन्न रथात दोष काढणं कठीण आहे. कर्णा, तुझा रथ सज्ज झाला आहे.’

 

कर्णाने रथाकडे पाहिले. त्याच्या मुखावर वेगळेच स्मित उमटले. खरंच रथ सिद्ध झाला होता. नियतीनंच तो सिद्ध केला होता! गुरुकपेनं लाभलेल्या दोन उमद्या, जातिवंत शापांचे अश्व जीवनरथाला जोडले होते. दैवचक्राच्या कुण्या केव्हाच खेचून घेण्यात आल्या होत्या. ज्याला परमेश्वरी अंश मानले, त्यानेच एक कुणी काढून घेतली होती, तर दुसरी जन्मदात्या आईनं. दिल्या वचनाचा दुबळा आसूड हाती आला होता. आता कोणत्या क्षणी दैवचक्र फसते आणि कलंडलेल्या रथाखाली किती काळ फरफटत जावे लागते, तेवढेच शिल्लक होते. बाकी सर्व रथ सिद्ध इतला होता.

 

‘अंगराज!’ शल्यने हाक मारली.

 

‘अं!’ कर्णाचा विचार तुटला. त्याने शल्यकडे पाहिले. ‘शल्यराज, खरोखरच रथ सुरेख सिद्ध झाला आहे. रणभूमीची नौबत वाजत आहे. आता वेळ नाही. या रथाचं चापल्य पाहायला मीही उतावीळ आहे. शल्यराज, रथारूढ व्हा.’

 

कर्ण-दुर्योधन रथ युद्धभूमीवर पोहोचले. कर्ण रणभूमीचे अवलोकन करीत होता. शल्य म्हणाला,

‘सूतपुत्रा! तुला विजय मिलावा, म्हणून मी तुझा रथ सिद्ध केला. माझ्या सारथ्यातही कसलीच कमतरता पडणार नाही, पण एवढं होऊनही तुला विजय मिळेल, असं वाटत नाही. त्या अर्जुनाच्या पुढं तुझ्या पराक्रमाला जागा नाही.’

 

कर्णाने संतापाने शल्यकडे पाहिले. न राहवून तो म्हणाला, ‘शल्यराज! ते भाकीत सांगायला तुमच्यासारख्या ज्योतिष्याची गरज नाही. रणांगणाची कुंडली मी जाणतो. अर्जुनाला विजय मिळेल, हेच ज्याचं उद्दिष्ट आहे, असा तो सारथी कृष्ण कुठे अन् माझ्या पराजयाचं स्वप्न पाहणारे तुम्ही कुठं!’

 

‘तुझा पराजय माझा काय फायदा?’

 

‘शल्यराज! माझा तेजोभंग करण्यासाठी पांडवांच्या वतीनं तुम्ही सारथ्य पत्करलंत, हे का मला माहीत नाही? मी सेनापती बनताच ते पांडव तुला भेटले, हे मला माहीत आहे.’

 

शल्याचे हास्य विरले, त्याने वळून कर्णाकडे पाहिले.

 

‘शल्यराज, मी कुरूंचा सेनापती आहे. असल्या गोष्टी समजावून घेणं फारसं अवघड नाही.’

 

‘अन् तरीही माझं सारथ्य स्वीकारलंस?’ शल्याने विचारले.

 

‘हो! माझ्या दृष्टीनं ते अन् तुमच्यांत काही फरक नाही. शल्यराज! तुम्ही कुळाचा अहंकार बाळगता. विश्वासघात, असत्याचरण अन् परनिंदा हेच त्या श्रेष्ठ कुळाचे गुण असतील, तर ते कुल तुम्हांला लखलाभ होवो! शल्यराज, तुमचा हेतू सफल होणार नाही, कारण सूर्यपुत्राचा तेजोभंग होत नसतो.’

 

कर्णाने शांतपणे आपला शंख उचलला आणि युद्धाला सुरुवात झाल्याचे सांगण्यासाठी तो शंख तोडाला लावला.

 

सूर्यबिंब प्रगटले होते. युद्धाला सुरुवात झाली होती…

 

कुरुक्षेत्रावर भयंकर रणसंग्राम चालू होता. कौरव-पांडवांकडचे शेकडो हत्ती, घोडे, स्वार, हजारो रथ, पारादळांनी व्यापलेल्या रणभूमीत संचार करीत होते. ते रणांगण खवळलेल्या सागरासारखे दिसत होते. मत्त गज आणि रथांचे ध्वज मेघांसारखे रणभूमीवर फिरत होते. वीरांनी धारण केलेली शिरस्त्राणे लाटांसारखी रणसागरावर उसळत होती. तळपत्या सूर्यकिरणांत खड़्ग, तोमर, नाराच यांची टोके दृष्टीच्या कक्षेपर्यंत विस्तारलेल्या युद्धभूमीवर चमकत होती. रणभेरींच्या आवाजाबरोबर उठणारे हत्तींचे चीत्कार, रथांच्या गर्जना, खड्‌गांचे आवाज यांच्या नादावर हेलावणारा तो रणसागर अतर्क्य भासत होता.

 

सूर्योदयापासून युद्ध करण्यात गुंतलेला कर्ण त्या रणभूमीत आपल्या रथावर स्थिर उभा राहून वीरश्रीने तुटून पडणाऱ्या आपल्या सैन्याकडे पाहत होता. पांडवांच्या अनेक वीरांचा पराभव वरूनही त्याचे मन शांत झाले नव्हते. त्याची गरुडदृष्टी अर्जुनासाठी रणांगणावरून फिरत होती. युद्धामध्ये अंगावर झालेल्या जखमांची पर्वा न करता रणांगण पाहत तो उभा होता. रणामध्ये मेरु पर्वतासारख्या उभ्या ठाकलेल्या त्या कर्णाच्या मुखावर दिसणारे वेगळे तेज पाहून शल्यराज म्हणाला,

कर्णा, आज तुझ्या पराक्रमानं शर्थ केली. सुसाट वाऱ्यानं पालापाचोळा उधळावा, तशी तुझ्या पराक्रमानं पांडवांच्या दलाची अवस्था झाली आहे. रुधिरस्नान घडलेली ही भूमी मला पूर आलेल्या नदीची आठवण करून देते. यामध्ये तरंगणारी रथछत्रं जलौघात पोहणाऱ्या हंसनावांसारखी भासतात. धारातीर्थी पडलेले योद्धे त्या तामजलावरून वाहणाऱ्या महान वृक्षासारखे वाटतात. ते योद्धयांचे विखुरलेले हार बघ. या संहारकारी प्रवाहावर ते कमलासारखे दिसत नाहीत का? ही विखुरलेली शिरोभूषणं जणू या जलावरचा फेसच आहेत. ही भयंकर नदी निर्माण करण्याचं साहस फक्त तुझंच आहे. हे तुझंच कर्तृत्व आहे.’

 

शलास्तुतीने कर्ण सुखावला नाही.

 

‘शल्यराज! हा पराक्रम मला समाधान देत नाही. मी काल अर्जुनाला निर्णायक युद्धाचं आह्वान दिलं आहे. युद्ध सुरू झाल्यापासून माझी दृष्टी त्याचा कपिध्वज शोधते आहे; पण तो दिसत नाही. मध्याह्नकाळाचा समय जवळ येऊनही अर्जुन भेटीचा योग दिसत नाही. शल्यराज, तुम्ही खरोखरच माझ्या पराक्रमावर प्रसन्न असाल, तर त्या अर्जुनाचा रथ गाठा. त्या अर्जुनाचा वध करून मला आज या संहारयज्ञाची समाप्ती करावयाची आहे.’

 

‘हे राधेया, तुझी इच्छा मी जाणतो, पण तू धर्मराजाला विरथ करून घायाळ केलंस. शिखंडी, सात्यकी, युधामन्यू, नकुल, सहदेव यांसह त्यात शक्तिशाली भीमालाही जर्जर केलंस. हा तुझा पराक्रम पाहून अर्जुनाचं सारथ्य करणारा कृष्ण नेहमीच अर्जुनाचा रथ दूर ठेवण्याची सावधगिरी बाळगतो. तू आता उत्तरेला युद्धात गुंतलेला पाहून कृष्णानं अर्जुनाचा रथ दक्षिणेला नेला आहे. ते मी हेरून ठेवलं आहे. कर्णा, समुद्राची सीमा त्याचा विरोध करते, तसा क्रोधायमान अर्जुनाला विरोध करण्यास समर्थ असा तुझ्याविना एकही वीर या लोकांत मला दिसला नाही.’

 

‘शल्यराज! हे साधायचं असेल, तर विलंब करू नका. शक्य तेवढया लौकर माझा रथ अर्जुनरथाला भिडवा.’

 

‘कर्णा, माझ्या सारथ्याकलेवर विश्वास ठेवूनच तू माझं सारथ्य स्वीकारलंस ना? मग माझ्या वचनावर विश्वास ठेव! चाललेल्या रणघुमाळीतून वाट काढीत युद्धभूमीच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या अर्जुनरथाला गाठणं एवढं, सोपं नाही. तो प्रयत्न करीत असता अर्जुनरक्षणार्थ सदैव सावध असलेले पांडववीर तुझ्या मार्गी आडवे येतील. त्या सर्वांचा पराजय करीत तुला जावं लागेल. केवढा अवधी मोडणार, हे कोण सांगणार?’

 

कर्ण-शल्य युद्धभूमीचा पसारा पाहत होते. कर्णाची दृष्टी दक्षिणेला जडली असता तो म्हणून,

‘शल्यराज, युद्धभूमीला वळसा देऊन बाहेरून रथ नेता येणार नाही का?’

 

‘अंगराज! आपण सेनापती आहात! युद्धभूमीवरून साखळदंड चिह्न असलेला रथध्वज दिसेनासा झाला, तर त्या बळावर लढणाऱ्या या कौरवसेनेचं धाष्टर्य निघून- जाईल, त्याचा विचार केला आहेस का?’

 

‘शल्यराज, त्याची चिंता करू नका. हा कर्ण रणभूमी सोडून पळाला, असं शत्रुलाही वाटणार नाही. कौरवसेनेच्या अग्रभागी वीरश्रेष्ठ दुर्योधनाचा गजचिह्नांकित ध्वज फडकत असता कौरववीरांचं धाष्टर्य कधीच खचणार नाही. ती शंका मनात न बाळगता रथ वळवा अन् अर्जुनरथाला गाठा.’

 

शल्यराजाने रथ वळवला, रक्षकदल बरोबर न घेता युद्धभूमीबाहेर येताच रथाने वेग घेतला. कुरुक्षेत्रावरच्या सीमेवर वालुकामय प्रदेशावरून तो भर वेगाने दौडत होता. रथाच्या ध्वजस्तंभाचा आधार घेऊन कर्ण रणसंग्राम न्याहाळीत होता. दक्षिणेला युद्धात फिरणाऱ्या अर्जुनरथावर कर्णाची दृष्टी पडली. साऱ्या अंगावर एक रोमांच खेळून गेला. सुवर्णाने मढवलेल्या बळकट धनुष्याच्या माथ्यावर ठेवलेला हात त्या आवेगाने दाबला गेला. तणावलेली प्रत्यंचा दुबळी बनली. कर्णाचे लक्ष पायांशी ठेवलेल्या सुवर्णभात्याकडे गेलं. तीक्ष्ण बाणांनी ते भाते भरलेले होते. क्षणाक्षणाला अंतर कमी होत होते. अर्जुनरथ स्पष्ट दिसू लागला होता.

काळ्या भुसघुशीत जमिनीत नांगर घुसावा, तसा आवाज उठला. रथ किंचित कलंडल्याचा भास झाला आणि रथाची गती थांबली. शल्यराजाने आसूड उंचावला. आसुडाचे आवाज उठत होते. बळकट अश्वांच्या पाठीवर फुटत होते. त्या वेदनेने उसळणाऱ्या त्या उमद्या जनावरांचे स्नायू ताठरले होते, पण रथ तसूभरही हलत नकता.

कर्णाच्या मनात धस्स झाले. भयशंकित होऊन त्याने विचारले, ‘शल्यराज! रथ का थांबला? काय झालं?’

 

‘जे घडू नये, तेच घडलय् रथाचं डावं चक्र भूमीत रुतलं आहे.’

 

तशा स्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर खिन्न हास्य प्रगटलं, ‘जीवनाचे बंध तोडता येतात, तसे नियतीचे बंध तोडता येत नाहीत. गुरुदेव परशुरामांकडं ब्रह्मास्त्र ग्रहण करण्यासाठी गेलो असता, एके दिवशी एका ऋषींची गाय माझ्या हातून मारली गेली. ऐन रणांगणावर तुझ्या रथाचं चक्र पृथ्वी ग्राशील, असा त्यांनी दिलेला शाप आज खरा होत आहे. रक्षक दळ जवळ असतं, तर चाक सहज काढता आलं असतं. शल्यराज, आपण मला मदत केलीत, तर वाळूत रुतलेलं हे चाक आपण काढू.’

 

शल्याने बसल्या जागी नि:श्वास सोडला. शल्य रथाखाली उतरलेला पाहताच कर्णाला आनंद झाला. गडबडीने रथातून उतरण्याच्या तयारीत असतानाच शल्याचे शब्द त्याच्या कानांवर पडले,

‘राधेया! खाली उतरण्याचा त्रास घेऊ नकोस. तुला एकट्याला ते खोल रुतलेलं अवजड चक्र निघणार नाही.’

 

‘पण आपण मला मदत कराल, तर…’

 

‘तरी मी त्या दुर्योधनाला सांगत होतो. त्याच्या आग्रहास्तव मी तुझं सारथ्य पत्करलं. हीन कुलाच्या संगतीचा दोष असाच प्रगट व्हायचा. नाहीतर, मी शल्यराज आहे, हे विसरून तू मला ही विनंती केली नसतीस.’

 

कर्ण विस्फारित नेत्रांनी पाहत होता. शल्यराज रथाचे घोडे सोडीत होता.

 

‘शल्यराज! आपण काय करत आहात?’

 

कर्णाकडे पाहत शल्य म्हणाला ‘जे योग्य, तेच करतोय्, मी रथाची घोडी घेऊन जात आहे. रथाचं चाक काढण्यात तुला यश लाभलं, तर शंखनाद कर. मी अश्वासह येऊन परत तुझं सारथ्य करीन. दुर्दैवी राधेया, तुझ्या जीवनाची गती खुंटली आहे, असं मला दिसतंय. रथाला वेग लाभण्याचं आता प्रयोजन दिसत नाही. तो बघ, अर्जुनाचा कपिध्वजांकित सुवर्णरथ तुझ्याच शोधार्थ येत आहे.’

 

कर्णाकडे न पाहता मद्रराज घोडी घेऊन जात होता. ते दृश्य हताशपणे पाहत असता कानांवर आलेल्या घनगंभीर आवाजाने कर्णाला सावध केले. त्याने पाहिले, तो अर्जुन-रथ कर्ण-रथाच्या दिशेने येत होता. कर्णाने क्षणात स्वत:ला सावरले आणि त्याने रथाखाली उडी घेतली. रथचक्राच्या आऱ्यांना हात घातला. सारी शक्ती पणाला लावून तो चक्र काढण्याचा प्रयत्न करू लागला. दंडाचे स्नायू तटतटले, पण चक्र तसूभरही हलले नाही

कर्णाचे मन व्याकुल झाले. त्याच्या कोणत्याच प्रयत्नाला यश येत नव्हते. तप्त वाळूत रुतलेले चक्र तसेच अचल होते. कर्णाचे डोळे सुवर्णकाम केलेल्या त्या चक्रावर खिळले होते…

रथचक्र!

 

या धर्मचक्राला काहीतरी अर्थ आहे का? धार्मिक पुरुषाला धर्म राखतो. त्याचं रक्षण करतो, असं म्हणतात. आयुष्यभर धर्माचं पालन केलं असत्याची कास धरली नाही. दातृत्वात कधीही हात मागं आला नाही. चारित्र्यसंपन्न जीवन कंठलं, ते याच विदारक क्षणासाठी? रक्षण तर दूरच राहिलं. उलट, मी पाळलेला धर्मच आज माझा नाश करण्यासाठी येत आहे. या धर्माबद्दल मला शंका येते.

वाळूचा भयानक करकरणारा आवाज येत होता. संतापाने त्याने मागे पाहिले. अर्जुनरथ दौडत येत होता.

कर्ण सावध झाला. त्याने मागे पाहिले. तो अर्जुनरथ समोर आला होता. त्या रथाच्या शुभ्र अश्वांच्या मुखांतून फेस उसळत होता. अश्वांचा वेग आवरण्यासाठी कृष्ण मागे कलला होता.

 

अर्जुनाने आपल्या धनुष्याला घातलेला हात पाहून कर्ण म्हणाला, ‘अर्जुना, थोडा थांब! माझ्या रथाचं चक्र या भूमीत फसलंय्? ते काढण्याचा अवधी मला दे. रथचक्र भूमीनं ग्रासलं असता युद्ध करणं हा धर्म नव्हे! माझा रथ सज्ज होऊ दे. म्हणशील त्या आयुधानं आपण युद्ध करू. ते युद्ध धर्ममान्य असेल. त्यात लाभलेला जय अथवा पराजय कीर्तिरूपच होईल.’

 

कर्णाची ती अवस्था अर्जुनाला दिसत होती. त्या नि:शस्त्र कर्णावर शरसंधान करण्याचं धाष्टर्य अर्जुनाला होईना. कृष्णाने अर्जुनाची ती अवस्था जाणली. प्रसंगाचे गांभीर्य ध्यानी आले. कर्णाला तो उच्चरवाने म्हणाला, ‘राधेया, फार लौकर तुला धर्माची आठवण झाली! जेव्हां एकवस्त्रा द्रौपदी राजसभेत खेचून आणली, तेव्हा विवस्त्र करण्याचा संकेत करताना ही धर्मबुद्धी कुठं गेली होती?… कपटद्युतामध्ये धर्मराजाला जिंकलं, तेव्हा हा धर्म कुठं लपला होता?… द्रौपदीला कुलटा म्हणताना त्या जिव्हेला धर्माचं भान राहिलं होतं?… अभिमन्यूचा वध करताना धर्माचं बळ सरलं होतं?’

 

कर्ण ऐकत होता. कृष्णाचे ते आसुडासारखे शब्द कर्णावर पडत होते. कर्णाने संतापाने कृष्णाकडे पाहले. कृष्णाच्या अग्निस्फुलिंगाप्रमाणे प्रगटणाऱ्या शब्दांनी कर्णाच्या मनाचा दाह वाढत होता. कर्णाची मनःशांती ढळत होती. मनात अनेक ऊर्मी उठत होत्या. पण त्यांना शब्दरूपाने प्रगट होता येत नव्हते.

 

कृष्णाकडे पाहत असता मनात कल्लोळ माजला होता.

 

हे कृष्ण बोलतो? मला?

 

कृष्णा, त्या दुबळ्या अर्जुनाच्या हातांना बळ यावं म्हणून हे आरोप?

 

कृतहस्त आणि अतिदेवी असा लौकिक असणाऱ्या कपटनीतिमध्ये अत्यंत कुशल अशी कीर्ती लाभलेत्न्या शकुनिबरोबर द्यूत खेळला जाणार आहे, हे का त्या युधिष्ठिराला माहीत नव्हतं? तरीही त्यानं द्यूताचं आह्वानं स्वीकारलं, हा धर्म; अन् द्यूतात तो सर्व हरला, हे मात्र आमचं पाप…

रजस्वला द्रौपदीला राजसमेत येण्याचा आग्रह युधिष्ठिरानं धरला, ते त्याच्या धर्मस्वभावाचं प्रतीक, अन् पाची पाडवांत वाटल्या गेलेल्या द्रौपदीला दासी बनल्यानंतर संतापाच्या भरात विवस्र करण्याची आज्ञा दिली, तर ते मात्र धर्माचं अधःपतन…?

 

कृष्णा, भीष्माच्या् अंगावर सुदर्शन घेऊन धावून जाताना तुलाच आपल्या प्रतिज्ञेचा विसर पडला असा तुझा संयम. मग ज्याला पतित कुलामुळं सदैव आघात सोसावे लागले, त्या माझ्या स्वाभिमानानं काय करावं?

 

अभिमन्यूचा मृत्यु हे आमच्या हातून घडलेलं अघोरी कर्म! संपन्न कुलात जन्म घेऊनही दैवगतीनं पोरकं जीवन कंठणाऱ्या या कर्णानं, आपल्या हातांनी वाढलेली मुलं रणागणाच्या वेदीवर अर्पण करताना कुणाला शाप दिले नाहीत. अभिमन्यूचं बालवय अनुकंपेला पात्र होतं अन् माझ्या मुलाचं वय ते का पराधीन होतं? नाही कृष्णा, निदान असले खोटे आरोप करण्याचं तू तरी धाष्टर्य दाखवू नकोस.

विजय हवा ना? अर्जुनाला सुरक्षित राखून विजय हवा ना? तो तुमचाच आहे. विजयाची राजवैभवाची वासनापूर्तीची आसक्ती असती, तर तुझ्या एका विनंतीचा स्वीकार करून मी सारं मिळवलं नसतं का? ज्येष्ठ म्हणून जगता आलं असतं, सम्राटपदाचा अभिषेक माझ्या मस्तकावर झाला असता अन् द्रौपदीवर माझा प्रथम अधिकार राहिला असता हे तूच सांगितलं होतंस ना? जीवनाचं मोल मला वाटत असे; पण तूच फुंकर घातलीस अन् त्यानंच ते नाहीसं झालं: मृत्युचं भय मला वाटत नाही, जीवरक्षण करायचं असेल तर ते या क्षणीही करता येईल, सहज करता येईल त्या अर्जुनाला मी जर सांगितलं ‘हे पार्था तुझ्या धनुष्याची प्रत्यंचा खेचण्याआधी त्या कृष्णाला तुझं-माझं नातं विचार,’ तर तेवढ्यानंसुद्धा हा संहार थांबेल.

 

नाही, कृष्णा, मी थकलो जगण्याची इच्छा मला मुळीच राहिली नाही. फक्त एकच इच्छा आहे. मृत्यु यावा… वीराला साजेसा. लढता लढता…

 

कर्णाच्या कानांवर कृष्णाचे शेवटचे शब्द पडले.

‘अर्जुना, पाहतोस काय; ज्यानं भरसमेत द्रौपदीचं लज्जाहरण करण्याचा प्रयत्न केला, तोच हा राधेय! पाच वीरांच्या मदतीनं तुझ्या पुत्राचा वध केला, तोच हा सूतपुत्र! या कुरुक्षेत्राच्या रणाला सर्वस्वी कारणीभूत असलेला, हाच तो कर्ण! इथं विचाराला अवधी नाही. क्षमेला थारा नाही, दयेला वाव नाही. इथं तुझं एकच कर्तव्य आहे. याचा वध! या पाप्याचा वध करून विजयी हो!’

 

‘पापी?’ कर्णाची मुद्रा उग्र बनली.

अर्जुनाचा बाण कानाजवळून घोंगावत गेला. कर्णाचा सारा संताप उसळला. कृष्णवर्ण मेघाआडून सूर्य प्रगटावा, तसं त्याचं तेज भासलं. रथचक्र ग्रासलेल्या त्या रथावर कर्ण आरूढ झाला. त्वेषाने त्याने आपले धनुष्य पेलले आणि अर्जुनाच्या शरवर्षावाला तो उत्तर देऊ लागला. रत्नखचित सुवर्णालंकारांनी, रक्तचंदनाची उटी दिलेले कर्णाचे बाहू मोठ्या वेगाने बाण सोडीत होते. अर्जुन भयाण अस्त्रांचा वापर करीत होता. कर्णही तसेच प्रत्युतर देत होता. त्या भयानक युद्धात अर्जुनाचे शिरस्त्राण पडले. कर्णाचे कवच विछिन्न झाले. दोन्ही वीर असंख्य जखमांनी पीडित झाले होते. भर मध्याहनीच्या सूर्यकिरणांत फुललेल्या रक्तवर्ण पलाशवृक्षांसारखे ते दोन्ही योद्धे आपल्या जखमांची, त्यांच्या वेदनांची दिक्कत न बाळगता सर्वस्व पणाला लावून लढत होते. वाढत्या जखमांबरोबरच कर्णाचा त्वेष वाढत होता. बाहुबलांत अघोरी ईर्ष्या वाढत होती.

 

कर्णाने एक अत्यंत तीक्ष्ण असा बाण निवडला. तो साक्षात अग्री भासणारा बाण आपल्या धनुष्याला जाेडून कणाने आकर्ण प्रत्यंचा खेचली, अर्जुनाच्या छातीचे लक्ष्य धरून कर्णाने बाण सोडला. वारुळात नाग शिरावा, तसा तो बाण अर्जुनाच्या छातीत शिरला. त्या आघाताने अर्जुन हतबुद्ध हाेऊन उभ्या जागी कापू लागला. त्याच्या हातचे गांडीव धनुष्यही गळून पडले आणि तो रथात ढासळला.

कर्णपराक्रमाने चकित झालेल्या कृष्णाने कर्णावर एकदा क्रुद्ध दृष्टी टाकली आणि मूर्च्छित पडलेल्या अर्जुनाला सावध करण्यासाठी तो वळला.

 

कर्णाने आपल्या भात्यातला दुसरा बाण खेचला. प्रत्यंचा खेचीत असता त्याचे लक्ष अर्जुनावर स्थिरावले,

अर्जुनाच्या कमरेचा शेला काढून कृष्ण त्याने वारा घालत होता. तो नीलवर्ण शेला कर्णाला परिचित होता.

 

कुंतीला दिलेला तो शेला अर्जुनाच्या कमरेला…

 

ब्रह्मास्त्राचा विसर पडावा, असाच तो क्षण होता.

 

त्या शेल्याच्या दर्शनाने कर्णाचे सारे बळ सरले. संताप नाहीसा झाला. दिल्या वचनाची आठवण झाली. हाताने धनुष्य केव्हा सुटले, हेही त्याच्या ध्यानी आले नाही.

 

अहंकाराच्या अभिमानापोटी कसलं भयानक कृत्य हातून घडणार होतं…

 

माते! योग्य वेळी सावध केलंस!

तू निवडलेले पाचच तुला मिळतील.

 

सहावा पाचवा कसा बनेल…

 

पहिला असूनही, सहावा बनण्याचा पराजय मी तुझ्यासाठी आनंदान पत्करीन.

 

कर्णाचा सारा त्वेष नाहीसा झाला. असंख्य जखमांनी जर्जर बनलेल्या कर्णाच्या मुखावरचे सारे भाव पालटले. भर रणांगणातही शांत जलाशयावर कमल उमलावे तसा त्याने चाक काढण्याचा प्रयत्न केला. दोन्ही हात जमिनीला टेकवून रथाच्या कण्याला त्याने मान दिली. सारे बळ एकवटून तो रथ उचलण्याचा प्रयत्न करीत असतां अर्जुन सावध झाला. कृष्णाने शेला टाकला आणि मागे वळून न पाहता कर्णरथाकडे बोट दाखवीत तो म्हणाला,

 

‘अर्जुना, सावध हो! त्या राधेयाचा वध करण्याची हीच वेळ आहे, जर का कर्णानं रथ काढण्यांत यश मिळवलं, तर तुझ्यासह माझाहि भरवसा देणं कठीण…! सावध हो, अर्जुना…’

 

जखमांनी त्रस्त झालेल्या, मूर्च्छा येऊन अपमानित झालेल्या अर्जुनाने गांडीव उचलले. एक तीक्ष्ण बाण निवडून त्याने धनुष्याला लावला.

 

रथचक्र काढण्यात गुंतलेल्या कर्णाने ते पाहिले. अर्जुन प्रत्यंचा खेचीत होता. कर्णाच्या मुखावर स्मित झळकले. त्याने पाहिले…

 

मध्याह्न ढळली होती. अशा अपराह्न काळी कर्ण नदीतीरावर पुरश्चरण संपवून दानाला उभा राहत असे. याचकांच्या बाबतीत शत्रु, मित्र असा भेद त्याने कधीच मानला नाही. जीवनातील सर्वात मोठे दान करण्यासाठी कर्ण सिद्ध झाला होता. अर्जुनाचा नेम चुकू नये म्हणून त्याने आपली रुंद छाती किंचित कलती केली.

 

‘स S प SS’

 

विद्युल्लता दिसावी, तसे त्या बाणाचे दर्शन झाले, एक भयंकर वेदना मानेतून आरपार गेली. रथ उचलण्यासाठी जमिनीला टेकवून तणावलेले हात सैल पडले. रथछायेत पडलेल्या कर्णाने पाहिले, तो अर्जुनाचा रथ वेगाने दूर जात होता. निळा शेला वारयावर तरंगत रणभूमीवर उतरत होता.

 

त्या शेल्याकडे पाहत-पाहत थकलेल्या कर्णाने नेत्र मिटले.

 

✍️ *क्रमश:* ✍️