राधेय – भाग 53

🚩 *राधेय/५३* 🚩

 

संध्याछायेतून कर्णाचा रथ निवासाकडे जात होता. कर्णाचे लक्ष कुठेच नव्हते. आपल्या दुःखाला आवर घालण्याचा प्रयत्न करीत तो रथात उभा होता.

 

अचानक रथ थांबला. कर्णाने विचारले, ‘रथ का थांबला?’

 

मागे पाहत सारथी म्हणाला, ‘मागून रथ येतोय्.’

 

कर्णाने मागे पाहिले.

 

पाठीमागे वृषसेनाचा रथ होता. त्यामागून तिसरा रथ येताना दिसत होता. वृषसेनाच्या रथाला बगल देऊन तो रथ पुढे आला. दुर्योधनाचा रथ ओळखताच कर्ण रथाखाली उतरला. दुर्योधन रथातून उतरलेला पाहताच कर्णाच्या मनाचे बांध फुटले. कर्णाचे एवढे विकल रूप दुर्योधनाने केव्हाही पाहिले नव्हते. त्याने कर्णाला जवळ घेतले.

 

भरल्या आवाजात दुर्योधन म्हणाला, ‘कर्णा, शिबिरावर येताच ते कळलं. तोवर तू शिबिर सोडलं होतंस. राहवलं नाही, म्हणून धावत आलो. त्या अर्जुनाला प्रायश्चित जरूर भोगावं लागेल.’

 

दुर्योधनमिठीतून दूर होत कर्ण म्हणाला, ‘युवराज, माझ्या मनात सूड नाही. मृत्यू टळतो कुणाला? जन्माबरोबरच त्याची गाठ मारलेली असते. वृषसेनानं कृतार्थ मृत्यू मिळवला आहे. योद्धयाला त्यापेक्षा श्रेष्ठ मरण नाही. युवराज, वृषसेन गेला, त्याचं दुःख मला नाही; पण त्याचबरोबर माझ्या जीवनाचा मृत्यू झाला, त्याचं दुःख आहे.’

 

‘तुझा मृत्यू?..’

 

‘हो, युवराज! मुलं ही आपला वारसा. त्यांच्या रूपानं आपलं जीवन पुढं जात असतं. आपलं जीवन संपलं, तरी आपल्या पाठीमागंही आपलं जीवन अखंड चालणार आहे, याची जाणीव मृत्यूचं अस्तित्व विसरायला लावते. वृषसेनाच्या मृत्यूनं तो जीवनप्रवाह खंडित झाला, याची वेदना मोठी आहे. एक वेळ मी गेलो असतो, तरी चाललं असतं, पण तो राहायला हवा होता.’

 

अंधार दाट बनत होता.

 

कर्ण दुर्योधनाला म्हणाला, ‘युवराज, रात्र होत आहे आपण शिबिरावर चला. युवराजांनी रात्री-अपरात्री युद्धभूमीवर वावरू नये.’

 

‘मी तुला पोहोचवायला येईन.’

 

‘नको! वृषालीसमोर मी एकटा जाणंच इष्ट. उद्या निर्णायक युद्ध होईल. मित्रा, उद्या हे भयानक युद्ध संपून जाईल.’

 

‘खरं?’

 

‘हो! उद्या संपायलाच हवं.’

 

दुर्योधनाने कर्णाचा निरोप घेतला. कर्ण आपल्या रथातून निवासाकडे जात होता. त्याच्या डोळ्यांसमोर वृषाली दिसत होती. ती वार्ता सांगायला घरी जाण्यापेक्षा हा रथ घेऊन असेच कुठेतरी दूर निघून जावे, असे कर्णाला वाटत होते.

 

रथ थांबला, कर्णाने पाहिले. निवासाच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या पायरीवर वृषाली उभी होती. कर्ण रथाखाली उतरला. वृषालीकडे पाहावयाचा धीर त्याला होत नव्हता. वृषाली कर्णाकडे पाहत होती. पायऱ्या चढत येणाऱ्या कर्णाकडे पाहत असता त्याच्या कमरेला शेला नाही, हे वृषालीच्या ध्यानी आले. कर्णरथामागून आलेला ध्वजहीन मोकळा रथ आणि अधोवदन पायऱ्या चढणारा कर्ण पाहून वृषालीच्या मनाचा धीर सुटला. कष्टाने ती म्हणाली, ‘नाथ ऽऽ’

 

कर्णाने एकदम वर पाहिले. वृषालीची अवस्था पाहून तो झरझर पायऱ्या चढला. वृषालीने विचारले, ‘आपण आलात, पण माझा वसू कुठाय्?’

 

वृषालीच्या अस्थिर, भयशंकित दृष्टीला पाहणे पण कठीण होते. बळ एकवटून कर्ण म्हणाला, ‘आपला वृषसेन आज अमर झाला. रणांगणात, अर्जुनाच्या हातून त्याला वीरगती मिळाली. वृषाली, त्याच्यातर पराक्रमाला जोड नाही.’

 

डोळ्यांत भरलेले अश्रु सांडत असता थरथरणाऱ्या ओठांनी ती उद्‌गारली, ‘कसला पराक्रम? जिवंत राहून पराक्रम सिद्ध होत नाही का?’

 

कर्णाने वृषालीला कवटाळले. वृषाली अश्रु ढाळीत होती. आपल्या नेत्रांत गोळा झालेले अश्रु आवरीत कर्ण म्हणाला, ‘वसू, रडू नकोस. ज्यात आनंद वाटावा, असं मरण आपल्या वृषसेनानं जिंकलंय्. पराक्रम दाखवूनही जिवंत राहता येतं, पण त्यानं आयुष्याच्या अखेरीला वीरगती मिळेल, असं सांगता येत नाही. वीरगती मिळणं दुर्लभ असतं. वृषसेनासाठी दुबळे अश्रु ढाळू नकोस. आजवरच्या युद्धात कमी का जिव्हाळे हरवले? रणभूमीचा पट मांडला आहे, लागणाऱ्या विलंबाबरोबर अधिक मोहरी खर्च पडणार आहेत. वाढत्या रणांगणाबरोबर दु:ख सोसण्याचं बळही वाढायला हवं.’

 

‘नाथ ऽऽ’ वृषाली पुढे बोलू शकली नाही.

 

‘सावध हो, वृषाली! शोक आवर. या रणांगणावरची मोहरी आज जरी वेगवेगळी उधळली गेली, तरी त्या विधात्याच्या एकाच संदुकीतील ती सोबती आहेत. कुणास ठाऊक, कदाचित याच वेळी स्वर्गात अभिमन्यू आणि वृषसेन सोंगट्यांचा पट मांडून बसले असतील.’

 

कर्णाने वृषालीला सावरले. आपल्या हाताचा आधार देऊन कर्ण वृषालीसह शय्यागृहात आला. वृषसेन गेला, यावर वृषालीचा विश्वास बसत नव्हता. दोनच दिवसांपूर्वी त्याच वृषसेनानं आपल्या पराक्रमाची कथा सांगितली होती. ती सांगताना त्याच्या चेहऱ्यावर विलसणारा अभिमान केवल मोहक होता! होता! न राहवून वृषालीनं विचारले, ‘पण हे झालं कसं?’

 

‘मी रणांगणावर दुसऱ्या बाजूला गुंतलो होतो. आपल्या वृषसेनानं नकुलाचा पराभव केला आणि त्याच वेळी अर्जुन सामोरा आला. अर्जुनाच्या रूपाला आपला वृषसेन थोडाही घाबरला नाही. त्याच बलानं तो युद्ध करीत होता. अर्जुनानं वृषसेनाला वेढल्याचं कळताच मी तिकडं धावलो; पण फार वेळ झाला होता. माझ्या डोळ्यांदेखत अर्जुनाचा सुटलेला बाण मी पाहिला. रणभूमीवर चिरानिद्रा घेणाऱ्या आपल्या वृषसेनाजवळ मी गेलो. त्याच्या रूपात कोणताच बदल पडला नव्हता. मला आलेलं पाहून चेहऱ्यावर उमललेलं स्मित तसंच त्याच्या ओठांवर विलसत होतं.’

 

‘काही बोलला नाही?’ गुदमरलेल्या स्वरात वृषालीन विचारलं.

 

नकारार्थी मान हलवीत कर्णा म्हणाला, ‘नाही! तेवढी उसंत त्याला मिळाली नाही. अर्जुनाचं शरसंधान अचूक असतं. क्लेशविरहित असतं. जाणाऱ्याची क्लेशापासून सुटका होते; पण मागं राहणारे… नुसत्या वृषसेनाचं दुःख घेऊन मी आलो नाही…’

 

वृषालीने वर पाहिले.

 

कर्णाचे नेत्र भरून आले होते. ‘वसू, या सोसण्याचा मला उबग आला आहे. माझ्या मनाला वेदना होत नाहीत, असं का तुला वाटतं? आज एकटया मुलाचंच दु:ख घेऊन आलो नाही.

 

‘भावोजी ऽऽ’

 

‘हो, वसू! आज माझा कटिबंध हरवला. त्याच्या पाठीत कुणीतरी उभी कुऱ्हाड घातली. तशा स्थितीत मला शोधीत तो आला. वसू, हसतमुखानं, अतीव दु:खसुद्धा कसं सहन करावं, हे त्यानंच मला शिकवलं. वृषसेन गेला, त्या वेळी अर्जुनाच्या कृत्याचा संताप आला नाही. अभिमन्यूच्या वेळी त्यानं कोणतं दुःख भोगलं असेल, त्याची तीव्र कल्पना मला त्या वेळी आली. दात्या कर्णाच्या जीवनातलं एक सर्वांत मोठं देणं दिलं गेलं, असंच त्या क्षणी मला वाटलं. वसू, आता अश्रू्ंना थारा नाही मी अर्जुनाला निर्णायक युद्धाचं उद्याचं आह्वान दिलंय्. उद्या एक कर्ण तरी राहील किंवा अर्जुन. उद्याचा सूर्यास्त कुणीतरी एकच पाहील. दुसरा साक्षात सूर्याच्या तेजात मिसळून जाईल.’

 

त्या शेवटच्या वाक्यान वृषालीच नेत्र कोरडे बनले. भीतीने कर्णाला ती अधिकच बिलगली. ‘असं बोलू नये. आपण विजयी व्हाल! त्या अर्जुनाचा पराभव तुम्ही सहज कराल.’

 

‘ती माझी योग्यता असेलही; पण, वृषाली, नुसत्या योद्धयाच्या कौशल्यावर युद्ध जिंकलं जात नाही. सारथ्याला तेवढंच बळ असावं लागतं. दुबळ्यांनाही वज्रबळ मिळवून देणारा सारथी तो कृष्ण कुठं अन् आपल्या निंदेनं सूर्यालाही झाकळू पाहणारा शल्य कुठं! वृषाली, मी उद्या नसलो, तरी चालेल. माझ्यामागं मला जाणून घेणारं कुणी भेटेल, असं वाटत नाही. मला संपूर्ण समजून घेणारी तू…तू तरी मागं राहशील, त्याचा आनंद मला आहे.’

 

‘नाहीऽ नाथ… जगण्याला अर्थ राहायचा नाही.’

 

‘वसूऽऽ’ कर्णाने वृषालीला एकदम कवटाळले. तिचा चेहरा उंचावून त्या नेत्रांचे अश्रू आपल्या ओठांनी टिपीत कर्ण म्हणाला, ‘वसू निदान माझ्यासाठी एक कर. तेवढं वचन दे मला.

 

‘कसलं वचन!’

 

‘मी उद्या परतलो नाही, तर… तर… मागं राहील, त्याला निदान शाप देऊ नकोस. ते सोसण्याचं बळ त्याला राहणार नाही. त्यापासून त्याला वाचवणं कृष्णालाही जमायचं नाही’

 

रात्री वृषाली कर्णाच्या मिठीत झोपी गेली होती. झोपेतसुद्धा वृषालीचे हुंदके उमटत होते. तिच्या मिठीची तीव्रता कर्णाला जाणवत होती. कर्णाचे नेत्र सताड उघड़े होते.

 

✍️ *क्रमश:* ✍️