राधेय – भाग 52

🚩 *राधेय/५२* 🚩

 

कर्णाचा रथ रणभूमीतून शिबिराकडे गेला, हे कळताच दुर्योधन शिबिराकडे आला. कर्ण मंचकावर विसावला होता. शिरस्त्राण बाजूला ठेवले होते. मंचकावर मस्तक ठेवून, डोळे मिटून कर्ण बसला होता. शिबिरात प्रवेश करताच दुर्योधन म्हणाला, ‘मित्रा, तू घायाळ होऊन आलास, असं कळलं, म्हणून मी आलो.’

 

‘नाही, युवराज. मी ठीक आहे. थोडा थकलोय् एवढंच.’

 

कर्णाच्या दंडावरच्या घावाकडे पाहत दुर्योधन म्हणाला, ‘निदान लेपण तरी करून ध्यायचं होतंस.’

 

‘सारेच घाव लेपणानं बरे होत नसतात, युवराज. काही घाव आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच राहतात.’

 

‘अंगराज, काल नकुल तुझ्या हाती सापडला होता?’

 

‘हो’

 

‘अन् त्याला सोडून दिलंस?’

 

‘हो’

 

‘आज युधिष्ठिर तुझ्या हाती मिळाला होता, म्हणे!’

 

‘हो’

 

‘त्यालाही सोडून दिलंस!’

 

‘हो’

 

‘भीमानं तुझा पराभव केला?’

 

‘हो’

 

दुर्योधनाचा संताप प्रगट झाला.

 

‘हो काय? कर्णा, शत्रू हाती सापडतो अन् तू त्याला सोडून देतोस?’

 

‘त्यांना मारून का युद्ध थांबणार होतं?’

 

‘मारून नाही. जिवंत पकडून.’ दुर्योधन म्हणाला, ‘कर्णा, द्रोणाचार्यांना मी एकच विनंती केली होती. मला युधिष्ठिर हवा होता. जे आचार्यांना जमलं नाही, ते तू केलं होतंस. मला युधिष्ठिर हवा होता, हे माहीत असूनही तू त्याला सोडून दिलंस’

 

‘तो तुझ्या हाती मिळाला असता, तर युद्ध कसं संपलं असतं?’ कर्णाने विचारले.

 

‘निश्चित संपलं असतं.’ दुर्योधन म्हणाला, ‘कर्णा, या रणात यश नाही, हे मला स्पष्ट दिसू लागलंय्. तो युधिष्ठिर सापडला असता, तर मी त्याला परत द्यूताचं आह्वान दिलं असतं. त्या द्यूतलंपटानं ते मान्य केलं असतं. द्यूतातला विजय आमचा होता. पांडव परत वनवासाला गेले असते.’

 

दुर्योधनाचे ते भाषण ऐकून कर्णाला हसू आवरले नाही.

 

दुर्योधनाने रागाने विचारले, ‘का? खोटं वाटतं? शकुनींच्या साहाय्यानं…’

 

‘युवराज!’ कर्ण थकल्या आवाजात म्हणाला, ‘एका द्युताचा केवढा भयानक परिणाम झाला, ते पाहत असता दुसऱ्या द्युताचं स्वप्न बाळगता? पांडव वनवास भोगायला जातील आणि बारा वर्षांनी परत हेच रण उभं राहील; पण ते झुंजायला एक माणूस तरी राहील का?’

 

‘त्याची मला पर्वा नाही. पृथ्वीतलावर त्या वेळी दोनच जीव असले, तरी चालतील, एक मी आणि दुसरा युधिष्ठिर. त्यासाठी पृथ्वीनाश उभारण्याची माझी तयारी आहे.’

 

‘युवराज, तुम्हांला या युद्धातून हवं तरी काय?’

 

‘कुरूंचा सेनापती हे विचारतो? अंगराज, मला विजय हवा. निखळ विजय हवा.’ दुर्योधनाने उसंत घेतली. ‘पण तो विजय तुमच्या हातून मिळेल, असं वाटत नाही.’

 

‘युवराज, माझ्या निष्ठेवर तुमचा भरवसा नसेल, तर हे सेनापतिपद तुम्ही दुसऱ्यांला द्या. मी त्यात अपमान मानणार नाही.’

 

‘मित्रा!’

 

‘मी रागानं म्हणत नाही. युवराज, मी पितामहांसारखा क्षत्रिय थोडाच आहे, की ज्यानं शस्त्रसंन्यास घ्या, म्हणताच अपमान मानावा! बोलूनचालून मी सूतपुत्र. तुमच्या विजयासाठी मी हवं ते सोशीन. अखेरपर्यंत कुणाच्याही हातांखाली तुमच्यासाठी लढेन. लढता-लढता मरून जाईन.’

 

दुर्योधन त्या शब्दांनी गहिवरला. कर्णाला मिठी मारीत तो म्हणाला, ‘असं बोलू नकोस, मित्रा. निदान तू तरी बोलू नकोस. तुझ्याविना आलेल्या विजयापेक्षा तुझ्यासह मी आनंदानं पराभव स्वीकारीन तुला वगळून मला काणत्याच विजयाचं मोल नाही.’

 

कर्णाच्या मिठातून बाजूला होत दुर्योधन वळला. जाता-जाता म्हणाला, ‘तू विश्रांती घे. मी रणभूमीवर जातो.’

 

दुर्योधन गेला. कर्णाने आपला किरीट उचलला. शल्याला तो म्हणाला, ‘शल्यराज, चला!’

 

‘राधेया! हवी तर विश्रांती घे!’

 

‘आता विश्रांतीला थारा नाही. रणभूमीखेरीज ती इतरत्र लाभायचीही नाही.’

 

कर्ण, शल्य रथारूढ होऊन, चाललेल्या युद्धात सामील इतले. कर्ण अर्जुनरथ शोधीत होता. पण त्या रणधुमाळीत अर्जुनरथ दृष्टीस पडत नव्हता. सूर्य पश्चिमेकडे झुकला असता कर्णरथाला एक रथ येऊन भिडला. कर्णाने पाहिले, तो अश्वत्थामा आला होता. तो उच्च रवाने म्हणाला, ‘कर्णा, उत्तर दिशेला तुझ्या पुत्राला अर्जुनानं गाठलंय्.

 

दिवसभर कर्ण ज्याचा शोध घेत होता, तो अर्जुन उत्तरेला वृषसेनाला भिडला होता.अद्यापि सूर्यास्ताला बराच अवधी होता. कर्णाने अर्जुनाचा रथ गाठण्याचा आज्ञा शल्याला केली.

 

शल्यराजाने तत्परतेने रथ वळवला.

 

कर्णाचा रथ भर वेगाने दौड़त होता. रणांगणा वरून गडगडाट करीत वायुवेगाने येणारा रथ पाहून युद्धामध्ये गुंतलेले वीर क्षणभर युद्ध विसरून भावचकित मुद्रेने त्या रथाला वाट करून देऊन आपले प्राण रक्षण करीत होते. कर्णाची दृष्टी युद्धक्षेत्रावरून फिरत होती. अर्जुनरथाचा कपिध्वज दिसू लागला.

 

अर्जुनाने आपल्या रक्षकदळासह वृषसेनाला वेढले होते. वृषसेनाचा नुकताच पराभव केला होता. त्या युद्धात जखमी, घायाळ झालेला वृषसेन जखमांची क्षिती न बाळगता आवेशाने अर्जुनाबरोबर लढत होता. कर्ण तेथे पोहोचला, तेव्हा वृषसेन आपल्या भात्यातला बाण खेचीत होता. वृषसेनाचे लक्ष क्षणभर पित्याकडे गेले. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. वृषसेन आपल्या प्रत्यंचेला बाणा जोडीत असतानाच आकर्ण प्रत्यंचा खेचलेल्या अर्जुनाचे शब्द कर्णाच्या कानांवर आले, ‘राधेया, योग्य वेळी आलास. मी उपस्थित नसता, तुम्ही सहा वीरांनी माझा अभिमन्यू मारला. आज मी तुझ्या पुत्राचा वध करतो, बघ. सामर्थ्य असेल, तर वाचव त्याला.’

 

त्या शब्दाबरोबरच तो अघोरी बाण अर्जुनाच्या धनुष्यातून सुटला होता. कर्णाच्या विचाराला अवधी मिळण्याआधीच त्या बाणाने आपले लक्ष्य अचूक टिपले होते. बाणाच्या झोताबरोबरच, प्राजक्ताचे फूल गिरक्या घेत भूमीवर उतरावे, तसा सुकुमार वृषसेन रथाखाली ढासळला.

 

कर्णाच्या जीवाचा थरकाप झाला. कर्णाने रथाखाली उडी घेतली. तो धावत पुत्राजवळ गेला. वृषसेनाने जगाचा केव्हाच निरोप घेतला होता. त्याच्या नाजूक कंठातून आरपार गेलेल्या बाणाच्या पात्यावरून रक्ताचे थेंब धरतीवर पडत होते. रक्षणार्थ धावून आलेल्या पित्याला पाहून चेहऱ्यावरचे उमटलेले हास्य तसेच होते. त्या बाणाने वृषसेनाच्या गळ्यातला मोत्याचा सर छेदला होता. मोती ओघळले होते. कर्ण भानविरहित होऊन ते पाहत होता. एका जातिवंत तेजस्वी मोत्याला वेज पडले होते. आता कोणत्याही प्रयत्नाने ते लहान होणार नव्हते.

 

कर्णाने कंपित बोटांनी वृषसेनाचे उघडे डोळे मिटले. आता वृषसेन झोपी गेल्यासारखा भासत होता. कुठल्यातरी स्वप्नात तो गुरफटला होता, त्या चिरविश्रांतीतून त्याला जागे करणे पाप होते.

 

कर्णाच्या मागे पावलांचा आवाज येत होता; पण कर्णाने मागे वळून पाहिले नाही. पेटती लाख जळत ओघळावी, तसे शब्द कानांवर आले, ‘पुत्रवियोगाचं दुःख एवढं वाटतं? अभिमन्यूच्या वेळी मझ्या कोण यातना झाल्या असतील, हे आज तुला कळेल. माझ्या कोवळ्या मुलाचा निर्घृण वध करण्याआधी विवेक सुचला असता, तर आज तुझ्यावर ही पाळी आली नसती. आज मी पुत्रवधाचा सूड उगवून कृतार्थ झालोय्.’

 

वृषसेनाच्या मृत्यूने डोळ्यांत गोळा झालेले अश्रु त्या शब्दांच्या दाहात कुठच्या कुठे आटून गेले. त्याने संतापाने वळून पाहिले. त्या आरक्त विशाल नेत्रांत प्रज्वलित झालेली आग अर्जुनाला जाणवली. कर्णाने कृष्णाकडे पाहिले. कृष्ण रथात अधोवदन बसून होता. तशा परिस्थितीतही कर्णाच्या चेहऱ्यावर कटू हास्य प्रगटले. उभ्या धनुष्याला उजवा हात विसावून पराक्रमाच्या अहंकाराने उभ्या राहिलेल्या अर्जुनाला कर्ण म्हणाला, ‘अर्जुना, कृतार्थ तू नाहीस. आज कृतार्थ मी झालो. आज माझ्या मुलाचा वध करून तू सूड उगवला नाहीस, उलट, मला उपकारबद्ध केलंयस. त्याबद्दल तुझा मी ऋणी आहे. बालवयाचं कौतुक घरी करायचं- रणांगणावर पाठवण्याआधी. रणांगण बालवयाचा, तारुण्याचा, वार्धक्याचा कधीच विचार करीत नाही. ते फक्त शत्रूहातचं खड्ग जाणतं. माझ्या मुलाचं कोवळं वय लक्षात घेऊन तू त्याला सोडून दिलं असतंस, तर या कर्णाला या पृथ्वीतलावर उभं राहायला जागा मिळाली नसती. माझ्या मुलाला स्वर्गाचं द्वार कधीही उघडलं नसतं. मी आज तुझा उपकृत आहे.’

 

अर्जुनाच्या चेहऱ्यावर उमटलेला आश्चर्यभाव पाहून कर्ण उदासपणे हसला, ‘जा, अर्जुना! मी काय म्हणतो, ते तुला समजायचं नाही. ते तू तुझं सारथ्य करणाऱ्या कृष्णाला विचार. तो तुला नीट समजावून देईल.’

 

वृषसेनाकडे दृष्टी वळवीत कर्ण अर्जुनाला म्हणाला, ‘जा, अर्जुना! जा! उद्या निर्णायक युद्ध होईल. तोवर उसंत घे. आज खूप पराक्रम केलाय्स, जा!’

 

वृषसेनावरची आपली दृष्टी ढळू न देता कर्णाने त्याचा शेला अलगद काढला. वृषसेनाचे पडलेले धनुष्य त्याच्या नजीक ठेवले. मुलावर शेला झाकात असता कर्णाचे हात थांबले. थरथरत्या हाताने कर्णाने वृषसेनाच्या मस्तकावरून हात फिरविला. कष्टाने मन आवरीत त्याने पुत्राचे अखेरचे दर्शन घेतले आणि शेला झाकला. साकळलेले अश्रु निपटले. रथाकडे जात असता वृषसेनाचे पडलेले शिरस्राण दिसले. ते शिरस्राण उचलून घेऊन कर्ण रथारूढ झाला. कष्टाने म्हणाला, ‘शिबिर…?’

 

सूर्यबिंब अस्ताचलाला गेले होते. क्षितिजावर अनेक रंगांची दीप्ती रेंगाळत होती.

 

रणांगणावर युद्ध संपल्याच्या नौबती झडत होत्या.

 

शिबिरावर जाताच शल्यराज रथातून उतरला. कर्णाच्या सारथ्याने रथाचा ताबा घेतला. कर्ण काही न बाेलता डाव्या हाताने शिरस्त्राण छातीशी कवटाळून उजवा हात रथाच्या हस्तिकक्षेवर ठेवून रथात उभा होता. शल्यराजाला राहवले नाही. शाेकमग्र अवस्थेत उभ्या असलेल्या कर्णाच्या उजव्या हातावर शल्याने हात ठेवला. कर्णाने शल्याकडे बघितलं.

 

शल्यराज गहिवरल्या आवाजात म्हणाला, ‘राधेया! माणसानं एवढं सोसू नये.’

‘शल्यराज! काही माणसं परनिंदेसाठीच जन्माला आलेली असतात. तशाच काही नुसतं सोसण्या साठीच जन्मलेली असतात. माझ्या दैवी तेवढंच आहे. तेवढंच! सारथी ऽ ऽ…’

 

शल्याचा हात मागे आला.

 

रथ कर्णनिवासाकडे जात होता. कर्णरथामागून ध्वजहीन धावणाऱ्या रथाकडे कर्णाचे लक्ष नव्हते.

 

✍️ *क्रमश:* ✍️