🚩 *राधेय/५१* 🚩
दुसऱ्या दिवशी पहाटे कर्ण कौरवशिबिरात आला, तेव्हा दुर्योधन आनंदाने पुढे आला. कर्ण रथाखाली उतरताच तो म्हणाला, ‘कर्णा, तुझं इच्छित सफल झालं.’
‘कसलं?’
‘मद्रराज शल्यांनी तुझं सारथ्य करण्यास मान्यता दिली आहे.’
‘युवराज, आता माझ्या पराक्रमाबद्दल चिंता वरू नका.’
‘चल, कर्णा, मद्रराज तुझी वाट पाहत आहेत.’
कर्ण दुर्योधनासह शिबिरात प्रवेश करता झाला. आसनावर बसलेला मद्रराज उठलाही नाही. तो बसल्या आसनावरूनच कर्ण व दुर्योधन यांच्याकडे पाहत होता. कर्ण शल्याच्या समोर गेला.
‘मद्रराज, अंगराज कर्ण आपल्याला वंदन करतोय्’
‘सूतपुत्र राधेया, तुझा विजय असो.’ शल्याने बसल्या जागेवरून कर्णाचे स्वागत केले.
कर्णाने दुर्योधनाकडे पाहिले.
कर्णाच्या चेहऱ्यावर उठलेला अपेक्षित संताप पाहून, आनंदाने शल्याने विचारले, ‘राधेया, माझं संबोधन आवडलं नाही, वाटतं?’
‘शल्यराज! राधेय म्हणवून घेण्यात मी धन्यता मानतो; पण त्या नावानं हाक मारण्याचा अधिकार फार थोड्यांना आहे. तेवढी जवळीक आपली नाही. तो आपला अधिकारही नाही.’
‘ठीक! सूतपुत्र म्हणूनच यापुढं मी तुला हाक मारीन. झालं?’
‘मी सूतपुत्र आहे, तसाच अंगदेशचा अधिपतीही आहे.’
‘हं! अंगराज! कर्णा, ती उपाधी आहे. राज्य देऊन कोणी राजा होत नसतं. तसं झालं, तर सारेच राजे होतील. कुलवंत होतील.’
‘शल्यराज!’ कर्ण खड़गावर हात ठेवीत म्हणाला,
शल्य आसनावरून एकदम उठला. कर्णाच्या दृष्टीला भिडवत तो म्हणाला, ‘खड्गावरचा हात मागं घे! कर्णा, माझं सारथ्य हवं असेल, तर माझं अप्रिय बोलणं तुला ऐकून घ्यावंच लागेल. त्याच अटीवर मी तुझं सारथ्य मान्य केलं आहे. अन् लक्षात ठेव, शूद्रांच्या भावनेला मी किंमत देत नसतो.’
कर्णाने आश्चर्याने दुर्योधनाकडे पाहिले.
दुर्योधनाच्या डोळ्यांत आर्जव उमटले होते. तो म्हणाला, ‘मित्रा, शल्यराज म्हणतात, ते खरं. माझ्यासाठी एवढं तू सहन कर. तुइया संतापाला माझ्यासाठी आवर घाल.’
कर्णाने आवंढा गिळला. ‘ठीक आहे.’ कर्ण म्हणाला, शल्यराज, तुम्ही माझं सारथ्य करता, यात मला धन्यता वाटते. कृष्णापेक्षाही श्रेष्ठ असलेल्या आपल्या सारथ्याचा अनुभव घेण्याला मी उत्सुक आहे. त्यासाठी मी आपली दूषणं भूषणावह मानीन.’
कर्ण, दुर्योधन, शल्य शिबिराबाहेर आले. कर्णासाठी शल्याने खरोखरच एक सुरेख रथ सिद्ध केला होता. तो रथ अवलोकन करून, महारथी कर्णाने रथाची पूजा करून, त्याला प्रदक्षिणा घातली. एकाग्र चित्ताने सूर्याचे स्मरण करून तो शल्यराजाला म्हणाला, ‘शल्यराज, प्रथम आपण रथारूढ व्हावं.’
शल्याने दुर्योधनाकडे पाहिले. दुर्योधन शल्याला म्हणाला, ‘हे मद्रेशा, कर्णाच्या दिव्य रथाचं तू सारथ्य कर. तुझं पाठबळ असेल, तर कर्ण धनंजयाला सहज जिंकील.’
दुर्योधनाची आज्ञा स्वीकारून शल्य रथावर आरूढ झाला. त्यापाठोपाठ कर्ण रथावर आरूढ झाला. शल्याने वेग हाती घेतले आणि रथ रणभूमीकडे चालू लागला. कर्ण स्तब्ध बसलेला पाहून शल्य मागे वळून म्हणाला, ‘हे सूतपुत्रा, युद्धाच्या कल्पनेनं घाबरला तर नाहीस? अद्याप सूर्योदयाला खूप अवधी आहे. तोवर निर्णय बदलला, तर सांग. मी तुला आनंदानं शिबिरावर नेईन. त्यातच तुझ हित आहे.’
संयमपूर्वक कर्ण म्हणाला ‘शल्यराज, आज रणांगणावर मी माझ्या धनुष्याला प्रत्यंचा जोडीन, तेव्हा तुला माझं शौर्य दिसेल. माझ्या दर्शनानं आज पांडव भयभीत झालेले तुलाच दिसतील. ते पाहीपर्यंत थोडी उसंत घे.’
त्या बोलण्याचा शल्यावर काहीच परिणाम झाला नाही. तो मोठ्याने हसला. कर्णाने विचारले, ‘हसायला काय झालं? माझा पराक्रम सिद्ध करण्याइतपत निश्चित माझं बाहुबल आहे.’
‘राधेया, मृगेंद्राची आणि कोल्ह्याची गाठ पडल्या नंतर कोल्हा जिवंत सुटल्याचं मी ऐकलं नाही. महाधनुर्धर अर्जुन भेटेपर्यंत त्या वल्गना चालतील बरं!
‘शल्यराज, तुम्ही माझे सारथी आहात.’
‘सारथ्य मी करतोच आहे.’
‘अन् अपमानही!’
‘त्या एकाच अटीवर मी सारथ्य स्वीकारलंय्.’
कर्ण उद्विग्नपणे हसला. न राहवून तो म्हणाला, ‘आपण मद्रराज ना! त्या देशाच्या कीर्तीनुसारच आपण वागता आहात. ज्या देशामध्ये व्यसन श्रेष्ठ मानलं जातं, अनीती हीच नीती मानली जाते, पापाचरण हाच तिथला धर्म आहे, त्या मद्रदेशाचे आपण सुपुत्र. आपल्याकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणंच चूक,’
‘तसं नाही हं! काही वेळा चांगल्या गोष्टीही मला सांगता येतात. एकदा समुद्रतीरावर एक संपत्र वैश्य राहत होता…’
‘शल्यराज, मला कथा ऐकायची नाही. रथ हाका.’
‘रथ नीट जाईल. त्याची चिंता नको. पण कथा तर ऐक.’ शल्य सांगू लागला, ‘त्या वैश्याच्या घराशेजारी असलेल्या एका झाडावर एक कावळा राहत होता. वैश्याघरचं उच्छिष्ट खाऊन तो भलताच माजला होता. एकदा मानससरोवराकडं जाणारा एक हंस त्या झाडावर विसावला. त्या हंसाला पाहून वैश्यपुत्र थट्टेनं कावळ्याला म्हणाले, ‘बाबा, रे! या हंसापेक्षा तूच आम्हांला श्रेष्ठ वाटतोस.’
‘परान्नावर वाढलेला तो मूर्ख कावळा. त्याला ते खरंच वाटलं. त्यानं सरळ हंसाला उड्डाणाचं आह्वान दिलं. हंस हसून म्हणाला,
‘बाबा, रे! खरंच तू श्रेष्ठ आहेस. ते आम्हांला मान्य आहे.’
‘पण कावळा कुठलं ऐकायला! तो म्हणाला, ‘ते उड्डाणानंच सिद्ध झालं पाहिजे.’
‘कावळ्याच्या मूर्ख आग्रहास्तव हंसानं पंख पसरले अन् आकाशात झेप घेतली. कावळा त्याच्या पुढं नाना तऱ्हांनी उडू लागला. हंस राजगतीनं उडुाण करीत होता. पुढं समुद्र लागला. समुद्राचा काठ दिसेनासा झाला. कावळ्याच्या पंखांतलं त्राण कमी होत होतं. लाटांवर हेलावणारा तो सागर पाहून त्याचं बळ खचत होतं. शेवटी कावळा अगदी पाण्याच्या पृष्ठभागावरून थकलेले पंख फडफडवीत जाऊ लागला. हंसानं विचारलं, ‘कावळ्या, तू अनेक उड्डाणं दाखवलीस; पण या उड्डाणाचं नाव नाही सांगितलंस. असं पंखांनी पाणी फडफडवीत पाण्यावरून चालल्यासारखं उड्डाण करणं अलौकिक आहे. या उड्डाणाचं नाव काय?’
कावळा प्राणभयानं म्हणाला ‘हे उड्डाण नाही. ही माझी दैवगती आहे. माझ्या मृत्यूनंच माझ्या पापाचं प्रायश्चित मला घडेल.’
‘हंसाला कावळ्याची दया आली. आपल्या पंखावर कावळ्याला घेऊन हंसाने त्याला परत त्याच्या ठिकाणी आणून सोडलं.
कथा संपवून शल्य म्हणाला, ‘कौरवांच्या अन्नावर वाढलेला तू कावळा. तुला ही कथा सांगणं आवश्यक होतं.
‘शल्यराज! हंस ते, की, जे बुडणाऱ्याला आपल्या पंखांवर तोलतात. पैलतीरावर नेऊन सुरक्षित पोहचवितात आपल्या म्हणण्याप्रमाणे मी कावळा असेनही; पण त्याचबरोबर बुडत असलेल्याला वाचविणारा हंस मला दिसत नाही.’
कर्णाचा रथ युद्धभूमीवर आला. तेव्हा, वृषसेन-चक्रधरांनी त्याचे स्वागत केले. कर्णाचा आशीर्वाद घेऊन वृषसेन आपल्या गोटाकडे चक्रधरासह गेला. पूर्वेला उजाडू लागले होते. कर्णाने सेनेची पाहणी केली. तोवर तेथे दुर्योधन येऊन पोहोचला. सूर्योदयाबरोबरच कर्णाने युद्धाला सुरुवात केली. कर्णाचा रथ आपल्या सेनेला आपला पराक्रम दाखवून उत्साहभरित करीत रणांगणावर संचार करीत होता. त्याच्या रूपाने रणांगणावर सूर्य प्रकटल्याचे भासत होते.
अचानक शल्यराजाने रथाला गती दिली. रथ भरधाव सुटला. शल्याने रथ त्वरेने का हाकारला, याचा विचार करणाऱ्या कर्णाला त्याचे उत्तर गवसले. त्याच्यासमोर युधिष्ठिराचा रथ येत होता. शल्याने त्या रथासमोर आपला रथ थांबवला. युधिष्ठिराच्या सुवर्णमय ध्वजावर नंद-उपनंद नावाचे दोन मृदंग लावलेले दिसत होते. युधिष्ठिराकडे बोट दाखवीत शल्य म्हणाला, ‘कर्णा, हा बघ प्रथम पांडव. ज्येष्ठ कौंतेय…’
कर्णाच्या मुखावर स्मित उमटले.
तो प्रथम पांडव…ज्येष्ठ कौंतेय. मग मी कोण?
कर्ण शल्याला म्हणाला, ‘शल्यराज, रथ वळवा. मला याच्याशी युद्ध करायचं नाही. मला फक्त अर्जुन हवा.’
‘राधेया! या युधिष्ठिराला पाहून…’
पण शल्याला पुढं बोलायला अवसर मिळाला नाही. एक बाण घोंगावत आला आणि जेथे कर्णाचा हात रथाच्या कडेवर विसावला होता, त्यापासून थोडया अंतरावर रुतून बसला. कर्णाने संतापाने पाहिले. युधिष्ठिर प्रत्यंचेला दुसरा बाण जोडीत होता. कर्णाची नजर वळताच तो उच्चरवाने म्हणाला, ‘सूतपुत्रा कर्णा, मी तुलाच पाहत होतो. आज तुझा वध करून तुझी युद्धपिपासा मी नष्ट करीन. युद्धाला तयार हो ’
युधिष्ठिराच्या शरवर्षावाला कर्ण सहजपणे उत्तर देत होता. बराच वेळ दोन्ही वीर एकमेकांना पराभूत करण्यासाठी झुंजले.
शेवटी कर्णाने युधिष्ठिराचे धनुष्य तोडले. त्याचे रक्षक मारले, सारथी मारला आणि युधिष्ठिराचा रथ उद्ध्वस्त केला.
त्या कर्णपराक्रमाने भ्यालेला युधिष्ठिर नजीक आलेल्या दुसऱ्या रथाच्या आश्रयाने पळून जाऊ लागलेला पाहताच कर्ण त्वरेने धावत जाऊन त्या रथावर चढला. युधिष्ठिराच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, ‘युधिष्ठिरा! निश्चिंत मनानं परत जा. ही युद्धभूमी आहे. द्यूतपटाइतकी ती सोपी नाही. रण हे तुझं क्षेत्र नव्हे. परत या युद्धभूमीवर पाऊल टाकू नकोस. टाकलंस, तरी माझ्यासमोर येऊ नकोस.’
कर्ण समाधानाने रथातून उतरला आणि परत आपल्या रथावर चढला.
कर्णपराक्रमाने चकित झालेल्या शल्याने विचारले, ‘कर्णा, अरे, त्या युधिष्ठिराला सोडलंस, तेच बरं केलंस! तू त्याला सोडशील, असं वाटलं नव्हतं.’
‘शल्यराज मी कावळा नाही राजहंस आहे असं मला वाटू लागलंय् शल्यराज, अर्जुनाचा रथ गाठू दे. त्या रथाला भिडण्यासाठी माझा जीव उतावीळ झालाय्.’
मध्याह्न उलटली, तरी रणांगण तसेच चालू होते. कर्णपराक्रमाने पांडवसेना अस्थिर बनली होती. युद्धाचा निर्णय लागत नव्हता. असंख्य वीरांच्या विखुरलेल्या प्रेतांतून युद्धाचा धुमळा चालू होता. रथांच्या आणि बाणांच्या आवाजांनी कान बधिर होत होते. हत्तींच्या पायांनी भूमी कंप पावत होती. कपिध्वजांकित अर्जुनरथ शोधीत असता कर्णाचा रथ थबकला. मध्याह्न टळत आली होती. गदाचिह्न धारण केलेला भीमाचा रथ समोर येताना दिसला. ते पाहताच कर्ण शल्यराजाला म्हणाला, ‘शल्यराज, भीम चालून येतोय्, आपला रथ बगल देऊन बाजूला काढा.’
‘भीमापुढं निभाव लागणार नाही, म्हणून? त्याचं नाव कशाला घेतोस? भीमाच्या दर्शनानं एवढं गर्भगळीत व्हायला होतं, तर अर्जुनाचं नाव घेतोस कशाला?’
‘शल्यराज, ते क्षणभर गृहीत धरा; पण त्याच बरोबर आपण माझं सारथ्य करीत आहा, हे कृपा करून विसरू नका. रथ बाजूला घ्या.’
शल्याने रथ वळवला. कर्णाचा रथ वळत आहे, हे पाहताच भीमाने आपल्या सारथ्याला सावध केले. भीमाच्या रथाला गती लाभली आणि भीमरथ कर्णाच्या मागे लागला. ‘कर्णा, भिऊन पळून जात होतास? अरे, कौरवांचा सेनापती ना तू!’
कर्णाने तशा स्थितीत एक श्वास सोडला. कर्ण भीमाला पाहत होता.
ज्याचे बाहू स्फुरण पावत आहेत, वीरश्रीने ज्याच्या चेहऱ्यावरचे तेज शतपटींनी वाढले आहे, असा तो शक्तिशाली भीम पाहून कर्णाचे नेत्र तृप्त झाले. त्याचे कवच रुधिराने डागळले होते. नेत्र आरक्त बनले होते. दाट वनातून मत्त गजराज वृक्षशाखा मोडीत बाहेर यावा, तसा तो रणांगणावर भासत होता.
द्रौपदीवस्त्रहरणाच्या वेळी प्रतिज्ञाबद्ध हाेणारा हाच एक पांडव. द्रुपदाच्या शीलरक्षणार्थ यानेच कीचकाचा वध केला. भीमाचे दर्शन म्हणजे साक्षात पुरुषार्थाचे दर्शन, असे कर्णाला वाटले.
कानाजवळून घोंगावत गेलेल्या बाणाने कर्ण भानावर आला. त्याने पाहिलं, भीम शरवर्षाव करीत होता. कर्णाने आपल्या बाणांना हात घातला. भीम-कर्ण प्राणपणाने लढू लागले. जणू रणभूमीवर साक्षात अग्री आणि सूर्यच प्रगटले होते. कर्ण प्रतिकारापुरतेच बळ वापरीत होता; पण भीम प्राणपणाने लढत होता. भीमाच्या आघातांनी कर्ण थकत होता. भीमाला कसा आवर घालावा, हेच कर्णाला कळत नव्हते. कर्णा थकत आहे, हे ध्यानी येऊन भीम अधिक उत्साहभरित होऊन लढत होता. एक उग्र बाणा सणसणत आला आणि कर्णाच्या खांद्यात रुतला. त्या वेदनेने कासावीस हाेऊन कर्णाने रथाच्या हस्तकक्षाचा आधार घेतला. शल्य चिंतातुर होऊन म्हणाला, ‘कर्णा, रथ माघारी नेऊ?’
आपल्या डाव्या हाताने रुतलेला बाण काढत कर्ण म्हणाला, ‘नको! साऱ्याच इच्छा सफल होतात, असं नाही. या भीमाच्याच हातून ते होणार असेल, तर होऊ दे.’
कर्णाने आपले धनुष्य उचलले आणि परत युद्धाला सुरुवात केली. त्याच वेळी मध्यान्ही टळू लागलेली होती. भीमाला आवर घालण्यासाठी कर्ण आपल्या प्रत्यंचेला हात लावीत असतानाच त्याच्या कानांवर हाक आली,
‘मित्रा, अंगराज…’
युद्धाच्या कोलाहलातून उठलेली ती आर्त हाक ऐकून कर्णाने मागे वळून पाहिले. दूरवरून चक्रधर हात उंचावून येत होता. चालतांना अडखळत होता, आपला रथ सोडून पायी येणारा चक्रधर दिसताच कर्ण शल्याला म्हणाला, ‘शल्यराज, रथ वळवा.’
‘हौस फिटली?’
‘शल्यराज, तू माझा सारथी आहेस. मी सेनापती आहे. मुकाटयानं रथ वळवा.’
कर्णाचे ते उग्र रूप पाहून शल्याने रथ वळवला. रथ वळलेला पाहताच भीमाने आवाज टाकला, ‘भ्याडा! रणातून पळून जातोस?’
उद्विग्नपणे हसून कर्णाने उत्तर दिले, ‘आपल्या सारख्या पराक्रम योद्धयासमोर कोण टिकेल?’
भीम काय म्हणाला, ते कर्णाला ऐकू आले नाही. रथ वळला होता.
चक्रधर जवळ येताच कर्णाने रथ थांबवला. रथाखाली उडी टाकून तो धावत चक्रधराकडे गेला. चक्रधराच्या चेहऱ्यावर वेदना प्रगटली होती. त्याच्याजवळ जात कर्णाने विचारले, ‘मित्रा…’
‘अंगराज, दुःशासनाचा वध झाला.’
‘कुणी केला?’
‘ज्याच्याशी युद्ध करीत होतास, तोच भीम. दुःशासनाचा वध करूनच तो आला होता.’
‘ते सांगण्यासाठीच आलास? अन् तुझा रथ कुठंय?’
‘आहे तिकडं, मित्रा, दु:शासनाचा वध विचित्रपणे झाला.’
‘बोल!’
‘दुःशासन भीमाच्या गदाप्रहारानं रणांगणावर पडला असता, भीम त्याच्याजवळ गेला, अत्यंत विकल अवस्थेत पडलेल्या दुःशासनाला ‘द्रौपदीच्या वस्त्राला कोणत्या हातानं स्पर्श केलास’ म्हणून विचारलं. त्या प्रश्नानं सावध झालेल्या दु:शासनानं तशा स्थितीतही आपला उजवा हात उंचावला अन् म्हणाला, ‘हाच तो हात! भीमा, हाच तो हात, की ज्या हातानं मी सहस्र गाईंचं दान केलंय्. हाच तो हात की, ज्यानं खड़्ग पेललं. रमणींच्या वक्षस्थळांना स्पर्शलं. याच हातानं याज्ञसेनीचे केस मी तुम्हां सर्वांदेखत ओढले. नाही, भीमा, या हातांनी कधीही परघरच्या उच्छिष्टांनी लिप्त झालेली पात्रं विसळली नाहीत. हाच तो विजयी हात!’
‘दुःशासनाच्या उत्तरानं अधिकच क्रोधिष्ट झालेल्या भीमानं दुःशासनाच्या छातीवर पाय देऊन तो उंचावलेला हात आपल्या बळानं उखडून काढला अन् छातीवर बसून आपल्या नखांनी दु:शासनाचं वक्षस्थळ विदारून सर्व वीरांदेखत भीम त्याचं रक्त प्याला.’
कर्णाच्या अंगावर शहारे आले. ‘मित्रा, जातो मी…’ म्हणत चक्रधराने पाठ फिरवली अन् कर्णाचे नेत्र उभ्या जागी विस्फारले गेले- चक्रधराच्या पाठीत उभी कुऱ्हाड रुतली होती. चक्रधराने चार पावले टाकली आणि तो पालथा पडला. कर्ण धावला. चक्रधराला आपल्या हातांनी सावरीत तो ओरडला, ‘मित्रा, हा पाठीत वार कुणी केला?’
चक्रधराने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
‘दुःशासनाला वीरशय्या देत होतो. त्याच्यावर शेला झाकीत असता कुणीतरी मागून हा वार केला. कर्णा, हे रणांगण खरं नाही. इथं धर्माला, नीतीला अवसर नाही. इथं धर्माची वल्गना चालते. कृती अधर्माचीच असते. भीष्म द्रोण, साऱ्यांची कथा तीच. या रणभूमीत तुला यश नाही. मित्रा, सावध राहा. जप. मी जातो.’
बोलता-बोलता चक्रधराचा मान कर्णाच्या मांडीवरून कलंडली. कर्णाला श्वस घेणेसुद्धा जड वाटत होते. डोळ्यांत भरलेल्या अश्रूंमुळे चक्रधर दिसत नव्हता. कर्णाने डोळे पुसल. तो सावकाश उठला. चक्रधराकडे पाहत त्याने आपल्या कमरेचा शाला काढला. तो चक्रधरावर झाकून, कर्ण आपल्या रथाकडे आला. रथावर चढत तो म्हणाला, ‘शल्यराज! या रणभूमीपासून रथ दूर न्या. निदान या क्षणी तरी मला या रणभूमीकडे पाहवणार नाही.’
शल्याने कर्णाचा रथ सरळ शिबिराकडे नेला.
✍️ *क्रमश:* ✍️
