राधेय – भाग 7

🚩 *राधेय/७* 🚩

महालात संपूर्ण शांतता नांदत होती. उंच समयांच्या ज्योतींचा शांत, मंद प्रकाश पसरला होता. समयांच्या काही ज्योती हळूहळू शांत होत होत्या. त्या महालात जाग होती फक्त कर्णाला. कर्णाची वाट पाहून थकलेली वृषाली आपल्या प्रशस्त शय्येवर केव्हाच निद्राधीन झाली होती. कर्ण एकटा मंचकावर बसून होता. दीर्घ, उष्ण नि:श्वास त्याच्या नासिकेतून बाहेर पडत होते. मंचकासमोर रौप्य आसनावर मद्याची झारी ठेवली होती. स्फटिकपात्रातून कर्ण मद्यप्राशन करीत बसला होता. अर्धी रात्र केव्हाच उलटून गेली होती; पण वेळाकाळाचे भान कर्णाला राहिले नव्हते.

मध्येच कर्णाने मान वर केली. त्याची दृष्टी समईवर स्थिरावली. समईची एक ज्योत थरथरत होती. त्या ज्योतीकडे कर्णाचे लक्ष वेधले.

ज्योत! थरथरणारी ज्योत…

ही याज्ञसेनी! यज्ञातून उद्भवलेली ही ज्योत!

थरथरणारी! दाहक!

आपल्या तेजानं दुसऱ्याच्या मनात दाह निर्माण करणारी, स्पर्शानं पेटवणारी ही ज्योत!

याज्ञसेनी! द्रौपदी!

यज्ञ करताना द्रुपदानं यज्ञात कशाची आहुती दिली होती? कोणते मंत्र उच्चारले होते? अस्मिता, अहंकार यांच्या मंत्रांनी आणि काम, क्रोध, मद, मत्सर यांच्या समिधांनी का तो यज्ञ संपन्न झाला होता? नाहीतर त्या यज्ञातून द्रौपदीसारखी भयानक ज्योत कशाला उपजली असती?

‘मी सूतपुत्राला वरणार नाही!’ कोण म्हणतं हे! तर याज्ञसेनी!!

द्रौपदी, माझ्या कुलाचा उच्चार करण्याचा तुला काय अधिकार? हे रूपगर्विते, तुझं तरी कुल कोणतं? तू का द्रुपद राजकन्या? आपल्या गुरुबंधूच्या- द्रोणाचार्यांच्या नाशास्तव द्रुपदानं योजलेल्या यज्ञाच्या राखेतून उद्भवलेलं एक दान. त्या दानानं माझ्या कुलाचा उच्चार करावा कशासाठी?

कर्णाने झारीतले मद्य पात्रात ओतून घेतले. आंबट, उग्र वास दरवळला. ते मद्य ओठांना लावीत तो आसनावर किंचित कलला. डोळे मिटूनही दिसायचे थांबत नव्हते.

मत्स्यभेद करण्यासाठी मी सरसावलो, ते तुझ्या लावण्यानं दिपलो, म्हणून नव्हे. तुझ्या शय्यासुखाचं स्वप्न मनाशी धरून धनुष्याची प्रत्यांची मी खेचली नव्हती. माझ्या जीवनात भोगांना मी फाजील महत्त्व कधीच दिलं नाही.

मग ते आह्वान का स्वीकारलं?

कर्णाचे डोळे खाडकन उघडले. त्या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याची दृष्टी त्या थरथरणाऱ्या ज्योतीकडे गेली.

मग ते आह्वान का स्वीकारलं?

द्रौपदी सुंदर होती, म्हणून नव्हे. दुर्योधनासाठी मी उभा राहिलो. काम जागृत व्हावा, असं रूप तिला लाभलं होतं, म्हणूनही नव्हे. ते सौंदर्याचं आह्वान नव्हतं. पराक्रमाला ते आह्वान होतं; ते स्वीकारणं माझा धर्मच होता. पराक्रमाबद्दल मिळणाऱ्या मोलापेक्षा पराक्रम मला प्रिय होता, म्हणून मी ते आह्वान स्वीकारलं. कुलाचा तिथं काही संबंध असता, तरी मी ते आह्वान स्वीकारलं नसतं. सूतकुलाची अप्रतिष्ठा मी माझ्या हातून करवून घेतली नसती. तो अपमान केवढा तीव्र असतो, ते मी अनुभवलं होतं. तीच चूक परत घडू देईन कसा! पण घडलं ना?

हां! घडलं! त्यात माझा काय दोष?

मग कुणाचा?

द्रौपदीचा?

वर कोणाला निवडावा, हे ठरविण्याचा अधिकार तिचा नव्हता काय?

नव्हता! लाख वेळा सांगेन, नव्हता, म्हणून. ते असतं, तर मत्स्यभेदाचा पण लावण्याचं काहीच कारण नव्हतं. द्रुपदानं स्पष्टपणे सांगितलं होतं. द्रौपदी वीर्यशुक्ला होती. जो पराक्रम करील, त्यालाच ते मोल मिळणार होतं.’

कर्णाने झारीतले मद्य ओतले. ते मद्य घटाघटा पिऊन त्याने ते पात्र आसनावर ठेवले.

मद्यानं बुद्धी मंद होते, म्हणे! अपमानाचा विसर पडतो, असं म्हणतात. मग आज या मद्याला झालंय् काय? मद्यही आपला गुण विसरलं, की काय!!

भर सभेत असा अपमान अन् तोही एका स्त्रीच्या हातून?

स्त्री! स्त्रीसुलभ संकोच तिला वाटला नाही… अन् वीराचा प्रकोप माझ्या ठायी जागृत झाला नाही. कशासाठी मी तो अपमान सहन केला? कोणत्या प्रतिष्ठेपायी? हे घडलं कसं?’

कर्णाने आसनावरचे मद्यपात्र उचलले. मद्य संपवून ते पात्र आसनावर ठेवीत असता कर्णाचा तोल गेला. आसनाच्या आधाराने कर्णाने तोल सावरला.

‘हे घडलं कसं? कसं घडलं?’

त्या विचारचे कर्णाला हसू आले.

द्रौपदी! बोलून चालून याज्ञसेनी. आग लावण्याखेरीज तिला काय येणार? तो तर तिचा धर्मच मुळी!

आणि मी… मी पाण्यावर तरंगणारा, जलात सापडलेला, सोसण्यापलीकडं मी दुसरं काय करणार? सोसणं! येईल, तो अपमान सोसणं… त्याचंच नाव अंगराज… राधेय… सूतपुत्र.

सूतपुत्र…

सूतपुत्र म्हणवून घेण्यात मला अपमान वाटत नाही. त्याचा मला अभिमान आहे. संताप येतो, तो सूतकुलाला हीन समजणाऱ्यांचा! श्रेष्ठ कुलाची केवढी प्रतिष्ठा!

श्रेष्ठ कुल…

हे श्रेष्ठ कुल, म्हणजे आहे तरी काय?

श्रेष्ठ कुलाचा जन्म म्हणजे राजाच्या पोटी जन्म, असा का अर्थ समजायचा? श्रेष्ठ कुलात जन्म, म्हणजे ब्राह्मण कुलातला जन्म, असं का म्हणायचं? बस्स! एवढाच का कुलाचा अर्थ!! यापेक्षा दुसरा अनर्थ कोणता?

ज्या घरात, परंपरेनं सुसंस्कार येतात, चारित्र्य, नीती आणि व्यवहार यांची अखडं सांगड पिढ्यान् पिढ्या घातलेली असते, ते घराणं कुलवंत. करायचा झालाच, तर त्यांनाच कुलाचा उच्चार करायचा अधिकार .

ही श्रेष्ठ कुलाची कसोटी लावायची झाली, तर किती लोकांना कुलचा उच्चार करण्याचं बळ येईल? असल्या अर्थहीन कुलाची प्रतिष्ठा सांगण्यापेक्षा आपल्या परंपरागत उद्योगानं आपली जात सांगणारे सूत, सारथी, कुंभार अधिक प्रामाणिक नाहीत का? पुत्रप्राप्तीसाठी परक्याचा आश्रय घेऊन संतती प्राप्त करून घेऊन कुल राखणाऱ्यांनी तरी श्रेष्ठ कुलाचा उच्चार करू नये.

मद्य घेण्यासाठी कर्णाने झारी उचलली. ती संपूर्ण कलती केली, तरी एकही थेंब पात्रात पडला नाही. त्या रिकाम्या झारीकडे पाहत कर्ण उठला. त्याचे लक्ष समईकडे गेले.

ती ज्योत अद्यापिही थरथरत होती.

कर्णाने संतापाने ती झारी समईवर फेकली. भिंतीवर आदळून ती रौप्य झारी आवाज करीत जमिनीवर कोसळली.

त्या आवाजाने दचकून जागी झालेली वृषाली शय्येवर उठून बसली. तिने पाहिले, तो कर्ण महालात ताठरल्या डोळ्यांनी उभा होता, समईवर लक्ष खिळवून.

कर्णाचे ते विकल रूप पाहून वृषालीचा जीव गुदमरला. तिला हुंदका फुटला. मुसमुसून ती रडू लागली.

त्या रडण्याच्या आवाजाने कर्ण सावध झाला. त्याने वळून पाहिले. ‘वृषालीऽऽ, वसू! रडतेस? माझ्यासाठी? माझा अपमान झाला, म्हणून?’ कर्ण तोल सावरीत एक-एक पाऊल पुढे येत होता. त्या शब्दांनी वृषालीला अधिकच उमाळा फुटला.

आपला तोल सावरीत, कष्टाने स्थिर होत, कर्ण मोठ्याने ओरडला, मदनिकाऽऽ, मदनिकाऽऽ…’

महालाचे दरवाजे उघडले गेले, महालाच्या द्वारी पेंगत बसलेली रूपसंपन्न दासी आत आली. तिच्या डोळ्यांतील झोप उडाली होती. उत्तरीय सावरण्याचेही भान तिला राहिले नव्हते. कंचुकी परिधान केलेली, अर्धवस्त्र नेसलेली मदनिका आपल्या मालकाकडे पाहत होती. तिचे उफाड्याचे तारुण्य, तिचा सुडौल बांधा तिच्या लावण्यात भर घालीत होता. तिच्याकडे बोट दाखवीत कर्ण गरजला, ‘बघ, वृषाली! या मदनिकेचं सौंदर्य बघ. ही मदनिका का कमी लावण्यवती आहे? त्या याज्ञसेनीपेक्षा ही मला शतपटीनं सुंदर भासते. अशा अनेक दासी या प्रासादात आहेत. माझ्या स्पर्शानं ही धन्यता मानील, म्हणून का मी हिला स्पर्श करू? नाही, वृषाली, या कर्णानं दान स्वीकारलं नाही- स्वेच्छेनं दिलेलंही. जा, मदनिके, झोप जा. निश्चिंत मनानं झोप जा.’

मदनिका दरवाजा लावून घेऊन महालाबाहेर गेली.

कर्ण शय्येजवळ आला. आपले थकले शरीर त्याने शय्येवर झोकून दिले. डाव्या हाताने त्याने वृषालीला जवळ ओढले. वृषाली कर्णावर कलंडली. आपले मस्तक कर्णाच्या छातीवर विसावून ती अश्रू ढाळू लागली. कर्णाचा हात तिच्या मस्तकावरून फिरत होता. कर्णाच्या उघड्या छातीवर वृषालीचे अश्रू सांडत होते. कर्ण बोलत होता,

‘वसू… रडू नकोस, वसू. माझ्यासाठी एवढी कष्टी होऊ नकोस. तुझा हा पती महापराक्रमी आहे. जिंकण्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो. त्याला फार मोठं निर्लज्ज मन अन् धाडस लागतं. गुरुदेव भगवान परशुरामांनीच मला वर दिला आहे. माझ्या सारखा क्षत्रिय योद्धा त्रिखंडात होणार नाही. तो वर खोटा कसा ठरेल? जन्मजात सहज कवचकुंडलं लाभली, ती माझी रक्षणकर्ती आहेत. नाहीतर या द्रौपदीच्या घावानं ही छाती केव्हाच उसवली असती. तिच्या त्या दाहक शब्दांनी कान त्याच वेळी फाटले असते. मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबर सुरू झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. येईल, तो अपमान सोशीत राहाराला हवं. त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे. वसू, तू माझ्यासाठी… माझ्यासाठी… अश्रू…’

वृषालीने मान उंचावली, बोलता-बोलताच कर्ण झोपी गेला होता.

✍️ *क्रमश:* ✍️