राधेय – भाग 6

🚩 *राधेय/६* 🚩

कर्ण आल्याचे कळताच वृषाली धावत प्रासादद्वारी गेली. प्रासादासमोर उभा राहिलेला रथ मोकळा होता. कर्ण महालात गेल्याचे कळताच वृषाली तिकडे वळली. महालात कर्ण आणि चक्रधर उभे होते.

वृषालीला पाहताच कर्णाच्या मुखावर उसने हास्य उमटले.

वृषालीने विचारले, ‘स्वयंवर झालं?’

‘हं!’

‘मग एकटेच आलात?’

‘दुर्योधन मागं राहिलाय्.’

‘दुर्योधनांबद्दल विचारीत नाही मी.’

‘मग कुणाबद्दल?’

‘राजकन्या घेऊन येणार होता ना?’

‘जमलं नाही.’

‘पण अवघड होता?’

चक्रधर पुढे सरसावला. ‘वहिनी, त्याला विचारू नका. मला विचारा, काय झालं, ते.’

‘चक्रधर!’ कर्णाने दटावले.

पण चक्रधराने तिकडे लक्षही दिले नाही. तो बोलत होता. ‘वहिनी, पण अवघड होता. मत्स्ययंत्राचा भेद करायचा होता. पणाचं धनुष्य पेलण्याचं बळ एकाही राजाला लाभलं नाही. मग प्रत्यंचा जोडून मत्स्यभेद दूरच राहिला.’

‘यांनी भाग घेतला नाही?’

‘घेतला तर! हा सरळ धनुष्याजवळ गेला. धनुष्य सहज उचललं. समर्थपणानं वाकवून प्रत्यंचा जोडली.’

‘खरं?’ कौतुकाने वृषालीने विचारले.

‘हो! अन् वेध घेत असतानाच धनुष्य जिथल्या तिथं फेकून हे महाराज माघारी आले… मत्स्यभेद न करता.’

‘का?’

‘का? कारण भेद याचाच झाला होता. मत्स्ययंत्राच्या भेदाच्या आधीच याच्यावर घाव घातले गेले.’

‘घाव?’ वृषालीच्या चेहऱ्यावर भीती तरळली.

‘हां! कधीही न बुजले जाणारे! वहिनी, यानं धनुष्य पेललं अन् ती उन्मत्त रूपगर्विता भरसभेत कडाडली, ‘मी सूतपुत्राला वरणार नाही. कावळ्यानं राजहंसीकडं पाहू नये.’

चक्रधराच्या मुठी आवळल्या गेल्या. कंठ दाटला होता. वृषालीचा चेहरा प्रेतवत पांढरा फटफटीत पडला होता.

‘सांगा, भाऊजी, पुढं काय झालं?’

‘खूप झालं. या तुझ्या पतीनं सारं चुपचाप ऐकून घेतलं. वेध घेण्यासाठी प्रत्यंचा खेचलेलं धनुष्य तसंच जमिनीवर टाकून हे स्वयंवर-मंडपातून बाहेर निघून आले. इथवर येईपर्यंत त्यानं मागंही पाहिलं नाही.’

कर्ण ताठरल्या अंगाने सर्व ऐकत होता.

वृषाली त्याच्याकडे धावली.

तिने विचारले, ‘खरं हे?’

‘अं…?’

एक विकल स्मित करीत कर्ण म्हणाला, ‘त्यानं सांगितलं, ते अक्षरन् अक्षर खरं आहे. त्यात खोटं असं काहीच नाही.’

वृषालीचा सारा संताप उफाळला. केतकी रंगाचा गौरवर्ण असलेली ती मुद्रा तप्त बनली. धारदार नासिकेचा अग्रभाग, कानाच्या पाळ्या तांबड्या बुंद बनल्या. सदैव हसणाऱ्या डोळ्यांत अगतिकतेची लाट उसळली. ‘कशासाठी हे सारं सहन केलंत? असला अपमान सहन करून परतण्यापेक्षा ते स्वयंवर उधळून, त्या उन्मत्त राजकन्येला फरफटत इथवर घेऊन आला असता…’

‘वहिनी, युवराज दुर्योधनांनी हेच सुचवलं; पण तेसुद्धा यानं मानलं नाही.’

‘चक्रधर, वृषाली… ते मला करायचं असतं, तर त्यासाठी युवराजांच्या मदतीची मला काहीच गरज नव्हती. वृषाली, विसरू नकोस, चित्रांगद राजाची राजकन्या माझ्या सल्ल्यानं दुर्योधनानं स्वयंवर-मंडपातून पळवून नेली, तेव्हा मी एकट्यानं सर्व नृपांना थोपवून धरलं होतं. तो पराक्रम मी एकदा केलाय्. मनात असतं, तर मी तो याही वेळी केला असता.’

‘मग थांबलात का? त्या राजकन्येचं हरण का नाही केलंत?’

‘तिचं मी हरण केलं असतं, तर ती माझी स्वामिनी बनली असती; तिची ती योग्यताच नव्हती.’

‘मी समजले नाही…’

‘त्यात समजायचं काय अवघड आहे? द्रौपदी मला रूपसंपन्न भासली खरी; पण ती फक्त रूपसंपन्नच होती. पुरुषार्थापेक्षा कुलाचा आणि गुणापेक्षा रूपाचा जिला मोह आहे, त्या स्त्रीला माझ्या जीवनात जागा नाही. या घरची दासी म्हणूनसुद्धा तिची येण्याची पात्रता नव्हती. म्हणूनच तो संयम पाळावा लागला.

✍️ *क्रमश:* ✍️