🚩 *राधेय/८* 🚩
थंडीचे दिवस संपले. नाजूक पावलांनी वसंत अवतरला. सर्व सृष्टीचे रूप नव्या पालवीने बहरले. अंगबोचरा गारवा विरून गेला. पहाटेच्या गार वाऱ्याने प्रसन्नता लाभू लागली.
आपली! नित्योपासना संपवून नदीकिनाऱ्यावरून परतत असता कर्ण ते बदलणारे सृष्टिरूप पाहत होता. कर्ण प्रासादात आला, तेव्हा सामोऱ्या आलेल्या वृषालीने चक्रधर आल्याची बातमी सांगितली. त्याने कर्णाच्या मनाची प्रसन्नता आणखीच वाढली.
महालात येताच कर्ण चक्रधराला भेटला. त्याने विचारले, ‘मित्रा, केव्हा आलास?’
‘तुमच्या पुढं थोडा वेळ.’
‘गोशाला…’
‘सर्व क्षेम. फक्त एक बैल या क्षणी कमी आहे.’
‘म्हणजे’
‘तो तुमच्या समोर उभा आहे.’
वृषाली, कर्ण हसले. कर्ण म्हणाला, ‘बैलाबरोबर स्वतःची तुलना करणं हे शहाणपणाचं नव्हे.’
‘थोरांचं अनुकरण माणसानं करावं.’
‘कोण थोर?’ कर्णाने विचारले.
‘सारेच!’ चक्रधर अर्धवट बोलत होता. हसू आवरण्याचा प्रयत्न करीत होता.
वृषाली म्हणाली, ‘भाऊजींच्या मनात काहीतरी खुपतंय्!’
‘काही नाही.’
‘बोल, मित्रा! एकदा सांगून टाक.’
‘त्या द्रुपद राजकन्येचं काय झालं, माहिती आहे?’
द्रौपदीच्या आठवणीबरोबर कर्ण सावध झाला. उत्सुकता न दाखवता त्याने विचारले, ‘काय झालं?’
‘आपण स्वयंवर-मंडपातून बाहेर पडल्यानंतर एका विप्रानं मत्स्यभेद केला. द्रौपदीनं त्याला वरलं.’
‘विप्र!’
‘ती तर गंमत आहे. तुला आठवतं? स्वयंवराच्या मंडपात अग्रभागी ऋषिजनांच्या बरोबर ब्राह्मण मंडळी बसली होती. त्यांत पाच ब्राह्मणांचा एक मेळ होता. ते ब्राह्मण दुसरे कोणी नसून, पाच पांडव होते.’
‘काय सांग्तोय्स!’ कर्णाच्या चेहऱ्यावर आश्चर्य प्रकटले.
‘हो! आपल्या रथशाळेचा दंडक दुर्योधन महाराजांना हस्तिनापूरला पोहोचवायला गेला होता. तो माघारी आला आहे. त्यानंच ही इत्थंभूत माहिती आणली आहे.’
‘पण पांडव तर लाक्षागृहात भस्मसात झाले, असं दुर्योधन सांगत होता.’
‘साऱ्यांची ती समजूत होती; पण पांडव त्यातून सुरक्षित बाहेर पडले. आपला शोध लागू नये, म्हणून ब्राह्मणवेषानं ते फिरत होते.’
‘अन् मत्स्यभेद केला कुणी?’
‘त्या अर्जुनाखेरीज दुसरं कोण करणार?’
चक्रधर परत हसू लागला. किंचित संतापाने कर्ण बोलला, ‘त्यात हसण्यासारखं काय आहे? अर्जुनासारखा वीर धनुर्धर पती लाभला, हे खरोखर द्रौपदीचं भाग्य!’
‘तिचं भाग्य त्याहूनही मोठं! एका पुरुषाशी संसार करून ती सुखी होईल कशी?’
कर्ण संताप आवरत उठला. आपली दृष्टी चक्रधरावर रोखीत त्याने बजावले, ‘चक्रधर! द्रौपदी परिणीता आहे. परस्त्री बद्दल असले उद्गार तुला शोभत नाहीत. मला खपत नाहीत.’
‘पण तिला खपतात ना! त्याला मी काय करणार?’
‘चक्रधर! पुरे कर. एक शब्दही बोलू नकोस. थट्टेलासुद्धा मर्यादा असतात.’
चक्रधरावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. उलट, त्याचे हसू वाढले. न आवरता येणाऱ्या त्या हसण्याने त्याच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले होते.
कर्ण आणि वृषालीवर आश्चर्य करण्याची पाळी आली होती. ‘हसतोस का? कशासाठी?’
‘सांगतो…’ हसू आवरत चक्रधर म्हणाला, ‘ऐक, मित्रा, आजवर कधी कुठं घडलं नाही, असं अघटित ऐक. स्वयंवर जिंकल्यानंतर पांडव ज्या कुंभाराच्या आश्रयानं राहत होते, तिथं द्रौपदीसह गेले. अर्जुनानं बाहेरूनच माता कुंतीला हाक दिली, ‘माते, आम्ही भिक्षा आणली आहे.’ घरकार्यात मग्न असलेल्या मातेनं भिक्षा न पाहताच ती पाच जणांत वाटून घेण्याची आज्ञा केली.’
‘आणि?’ कर्णाने विचारले.
‘आणि आज्ञाधारक बालकांनी पाच जणांत भिक्षा वाटून घेतली.’
‘खोटं!’
‘अगदी खरं! पांडव प्रकट झाले असून, द्रौपदीनं पाची पांडवांबरोबर विवाह केला आहे.’
‘द्रौपदी पाच पांडवांची पत्नी!’ कर्णाच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली. ‘पराक्रमाचा अपमान केवढं भयानक पाप असतं. अखेरीस याज्ञसेनी द्रौपदी पाच पांडवांची भिक्षा ठरली.’
‘भिक्षेची सारी कथा बनावट आहे. असं बोललं जातं की, द्रौपदीचं सौंदर्य पाहताच पांडवांचा काम उफाळून आला. तो अनर्थ टाळावा, म्हणून माता कुंतीला ती आज्ञा करावी लागली.’
‘ते काहीही असो; पण ती पाचांची पत्नी बनली, हे खरंच ना! पांडव हस्तिनापुरालाच आहेत?’
‘नाही. त्यांचं वास्तव्य इंद्रप्रस्थात आहे.’
‘इंद्रप्रस्थ?’
‘द्रुपदाच्या घरी पांडव प्रकट झाल्याचं कळताच धृतराष्ट्र महाराजांनी विदुरांना त्यांच्याकडं पाठविलं. विदुरासह पांडव हस्तिनापुरात आले. कौरवेश्वरांनी पांडवांना खांडवप्रस्थासह अर्धं राज्य दिलं. खांडवप्रस्थामध्ये पांडवांनी जी नगरी उभारली, त्या नगरीचं नाव इंद्रप्रस्थ आहे. त्या वैभवशाली नगरीमध्ये पांडव, माता कुंती, द्रौपदी राहत आहेत.’
कर्णाने तो वृत्तांत ऐकून दीर्घ नि:श्वास सोडला. का, कुणास ठाऊक, त्याचे मन अशांत बनले. कर्णाच्या डोळ्यांसमोर दुर्योधन दिसत होता. कर्ण उद्गारला, ‘हे घडत असता, मी हस्तिनापुरात असायला हवं होतं, निदान दुर्योधनानं तरी मला हे कळवलं असतं, तर फार बरं झालं असतं.
✍️ *क्रमश* ✍️
