राधेय – भाग १६

🚩 *राधेय/१६* 🚩

राजगृह अनेक समयांच्या उजेडात उजळले होते. धृतराष्ट्रमहाराजांच्या समोर विदुर बसले होते. त्यांच्यापासून जवळच भीष्माचार्यांचे आसन मांडलेले होते. द्रोणाचार्यांची बैठक मृगाजिनावर स्थिर झालेली होती. अनेक दासदासी आज्ञेसाठी उभ्या जागी तिष्ठत होते.

दुर्योधन आणि कर्ण महालात येताच द्रोणाचार्य म्हणाले, ‘राजन्! युवराज दुर्योधन राधेय कर्णासह येत आहेत. या दोघांची मैत्री अभेद्य आहे.’

दुर्योधनाला ते ऐकून समाधान वाटले.

एरवी दुर्योधन येताच गंभीर मुद्रा धारण करणाऱ्या भीष्म, विदुर, द्रोण यांच्या मुखांवरचे प्रसन्न भाव पाहून दुर्योधनाचे मन मोकळे झाले.

सर्वांना वंदन करून होताच धृतराष्ट्राने विचारले, ‘दुर्योधना, तू आल्याचं समजलं अन् राहवलं नाही. मी तुझ्यावर कितीही रागावलो असलो, तरी या अंधळ्या पित्याच्या मनातलं तुझं रूप सदैव मला सुखावतं. तुझा आवाज ऐकून खूप दिवस झाले, म्हणून तुला तातडीनं बोलावलं.’

‘तात, आपल्याला माझी आठवण झाली, यात सार्थक वाटतं.’

‘ते जाऊ दे! तुझा प्रवास चांगला झाला ना? यज्ञाच्या वातावरणात तुझं मन रमलं ना?’

‘कुणाचं रमणार नाही! तात, असा अलौकिक यज्ञ मी पाहिलाच नाही. योगानं आणि तपश्चर्येनं सिद्ध बनलेल्या शेकडो विद्वानांकडून यज्ञाची देखरेख होत होती. हजारो ब्राह्मणांच्या मुखांतून उठणाऱ्या मंत्रांनी भूमीच नव्हे, तर सारी सृष्टी भारली जात होती. त्या यज्ञभूमीच्या दर्शनासाठी तिथं शेकडो श्रेष्ठ नृपांची रीघ लागली होती.’

‘युवराज सांगतात, ते काहीच खोटं अथवा अतिरंजित नाहीं.’ भीष्माचार्य म्हणाले, ‘त्या यज्ञाच्या रूपानं साक्षात पुण्य भूतलावर अवतरलं होतं,’

‘बाबा, रे, मी आता निर्धास्त झालो.’ धृतराष्ट्र म्हणाले, ‘तुझा संतापी, संशयी स्वभाव. तुला तो यज्ञ खपतो, की नाही, याची भीती वाटत होती. तुम्हांला कसली कमतरता पडली नाही ना?’

‘कमतरता पडली तर!’

भीष्म, विदुर, द्रोणाचार्यांनी एकदम एकाच वेळी दुर्योधनाकडे पाहिले.

दुर्योधनाच्या चेहऱ्यावरचे स्मित तसेच होते. ‘कमतरता पडली, ती आमच्याच बळाची. तात, तो यज्ञ पांडवांनी घडवला, तरी पार पाडला आम्हीच. सारी जबाबदारी आमच्यावरच होती. विदुरकाकांच्या हाती सारा खर्च होता. पितामह आणि आचार्य यांच्यावर सर्व यज्ञसमारंभावर लक्ष ठेवण्याचं काम होतं, भोजनविभाग दुःशासनानं सांभाळला होता. कृपाचार्य दक्षिणादान करीत होते.’

‘अन् तुमच्या…’

‘माझ्या… सर्व नृपांनी आणलेला करभार स्वीकारता-स्वीकारता मी थकून गेलो.’

सारे मोकळेपणी हसले.

‘कर्णा, तुला कोणतं काम दिलं होतं?’ धृतराष्ट्रांनी विचारले.

‘मला काही काम नव्हतं, महाराज. त्यामुळं या सर्वांपेक्षा मलाच अधिक यज्ञसमारंभ उपभोगायला मिळाला.’

‘महाराज!’ द्रोणाचार्य म्हणाले, ‘कर्ण तिथं युवराजांचा स्नेही म्हणून गेला नव्हता. अंगराज म्हणून तो आमंत्रित होता.’

विदुरांचे मन आनंदले होते. ते म्हणाले,

‘बाळा दुर्योधना, मी आज सुखी झालो. तुमच्या अन् पांडवांच्या मनांतलं किल्मिष या यज्ञानं नाहीसं झालं. यज्ञभूमीत घडलेलं तापसांचं दर्शन, मंत्रांचं श्रवण अन् सु-संगत यांचा परिणाम टळेल कसा!’

दुर्योधन पुढे झाला. हातातला कंठा धृतराष्ट्राच्या मांडीवर ठेवीत तो म्हणाला,

‘महाराज, येतांना युधिष्टिरांनी हा कंठा आपणांसाठी दिला आहे.’

तेजस्वी टपोऱ्या नीलमण्यांचा तो कंठा चाचपीत धृतराष्ट्र म्हणाले, ‘कंठा?’

‘हो! अत्यंत मौल्यवान अशा नीलमण्यांचा तो कंठा आहे.’

‘त्यांच्या मनांतला प्रेमभाव हाच मोठा. हा कंठा पाठविण्याची काही आवश्यकता नव्हती.’

‘तात!’

‘बोल!’ धृतराष्ट्रांनी आज्ञा केली.

‘यज्ञभूमी पाहून आल्यापासून मलाही एक इच्छा झाली आहे.’

‘कसली?’

‘असा राजसूय यज्ञ करावा, असं वाटतं.,’

द्रोणाचार्यांच्या हसण्याने दुर्योधनाने मागे वळून पाहिले.

द्रोणाचार्य आपल्या मांडीवरचा हात उंचावून हसत होते.

हसू आवरून होताच दुर्योधनाने विचारले, ‘काही चुकलं का, आचार्य?’

‘युवराज, राजसूय तुम्हांला कसा करता येईल?’

‘का?’

‘युवराज, धृतराष्ट्रमहाराज सम्राट असताना तो यज्ञ तुम्हांला करण्याचा अधिकार नाही. राजसूय सम्राटपदासाठी कराराचा यज्ञ आहे.’

‘दुसरा तसलाच भव्य यज्ञ करता येईल ना?’

‘जरूर!’ द्रोणाचार्यांनी संमती दिली.

‘पण, दुर्योधना!’ भीष्म म्हणाले, ‘एवढया लौकर यज्ञ करण्याचं मनात आणू नकोस.’

‘का?’

‘राजसूय यज्ञात साऱ्यांनी करभार दिला आहे. ते निर्धन झाले आहेत. त्यांना परत करभार सोसणार नाही.’

दुर्योधनाच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य प्रकटले. द्रोणाचार्यांना तो म्हणाला, ‘आचार्य, राजसूयाचा हेतू काय असतो, म्हणालात?’

‘सम्राटपद!’

‘अन् तो यज्ञ पांडवांनी केला? आचार्य, सम्राट किती असतात?’

‘सम्राट एकच!’

‘मग धृतराष्ट्रमहाराज कोण? करभार देणारे पांडवांचे अंकित?’

‘युवराज!’

‘प्रश्रांची उत्तरं द्या, आचार्य! संतापू नका.’

द्रोणाचार्य त्या प्रश्नाने गडबडले. अनपेक्षित आलेला तो प्रसंग कसा टाळावा, हे त्यांना सुचेना. ते कसेबसे म्हणाले, ‘युवराज, गैरसमज होतोय्. खांडवप्रस्थासह अर्धं राज्य त्यांना धृतराष्ट्रमहाराजांनी तोडून दिलं, त्या राज्याच्या आधिपत्यासाठी तो यज्ञ केला.’

‘अन् त्यासाठी कौरवसाम्राज्याशी जे जे राजे एकनिष्ठ होते, त्यांच्यावर हल्ले करून करभार वसूल केला!’

‘यज्ञाच्या पवित्र कार्यासाठी तो करभार दिला होता.’ विदुर म्हणाले.

‘विदुरकाका, बसल्या जागी न्यायनीतीच्या वल्गना करून न्यायनीतीचा विस्तार होत नसतो. कैक वेळा त्याच बुरख्याखाली अनीती नांदत असते. ती आक्रमण करते.’

‘युवराज, कुणाला बोलता हे?’ धृतराष्ट्र म्हणाले.

‘तात, शांतपणे ऐका.’ विदुरावर दृष्टी स्थिरावत दुर्योधनाने मागे उभ्या असलेल्या कर्णाकडे बोट दाखविले, ‘काका, या अंगराजावर भीम का चालून गेला? ते करीत असताना पांडवांना हा माझा मित्र आहे, कौरवांचा अंकित आहे, हे माहीत नव्ह्तं, असं का म्हणाराचं आहे?’

‘सर्व राजांनी करभार द्यावा, विरोध करू नये, असं आम्हीच कळवलं होतं, कुणी आज्ञाभंग केला असला, तर त्याचं प्रायश्चित्त…’ द्रोणाचार्यांना आपलं वाक्य पुरं करता आलं नाही.

दुर्योधन म्हणाला, ‘आचार्य, फार उशिरा निरोप पाठवलात. तोवर तुमचं अर्धं राज्य कृष्णाच्या चतुरंग सेनेच्या पाठबळानं पांडवांनी जिकलं होतं, कौरव साम्राज्याच्या निष्ठेपायी ज्यांनी आपल्या सामर्थ्याचा विचार न करता शस्र हाती धरलं, त्या राजांना अपमानित पराजय सोसावा लागला. पांडवांच्या आज्ञेनं करभार घेऊन यशाला यावं लागलं. राजसूय यज्ञ यापुढं कौरवांना कधीच करता येणार नाही.’

भीष्माचार्य संतापाने उग्र बनले. ‘युवराज, अमंगळ विचारानी तुम्ही भयाव्याकुल झाला आहात. कौरव सम्राज्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी यज्ञाची गरज नाही. हे साम्राज्य स्वयंभू आहे, ते सर्वांना ज्ञात आहे.’

‘एवढं श्रेष्ठ साम्राज्य आहे हे?’ औपरोधिकपणे दुर्योधन म्हणाला, ‘मला माहीत नव्ह्तं, पितामह असलत अर्थहीन शब्दांच्या नादात तातांना डोलवत ठेवलंत. मी अंधपुत्र असलो, तरी डोळस आहे. दिसतं, ते कळण्याइतपत मला शहाणपण निश्चित आहे.’

‘युवराज!’ धृतराष्ट्र शुष्कपणे म्हणाले.

‘ताल, क्षमा! पण विचारा पितामहांना. राजसूय यज्ञात त्या कृष्णाला त्यांनी अग्रपूजेचा मान दिला. कुरुराज्याचा अभिमान त्या वेळी कुठं गेला होता? कुरुसम्राज्याचा युवराज त्यांच्या दृष्टीला का दिसला नाही?’

‘अग्रपूजेचा मान बलानं तोलला जात नाही. तो अधिकार धारण करणाऱ्या पुरुषांच्या ठायी सत्वगुणांचा अधिकार असावा लागतो.’ द्रोणाचार्यांनी निर्णय दिला.

‘अन् तो त्या कृष्णाच्या ठायी तुम्हांला दिसला? आचार्य, त्या सभेत कृष्णाचा पिता वृद्ध वसुदेव होता; कृपाचार्यांची आठवण व्हायला हवी होती. भीष्मकासारखे अनेक राजे योग्यतेचे होते. त्यांची योग्यता तुमच्या ध्यानी आली नाही. अन् तो कृष्ण ऋत्विज नसता, आचार्य नसता व राजाही नसता त्याला अग्रपूजेचा मान देऊन मोकळे झालात.’

‘दुर्योधना, त्या महापुरुषाला तू ओळखलं नाहीस. तो दैवी गुणांनी संपन्न आहे. तो भगवान आहे. तो ईश्वरी अवतार आहे.’ द्रोणाचार्यांनी सांगितले.

दुर्योधनाच्या हसण्याने सारे सभागृह दणाणून गेले. तो म्हणाला, ‘आचार्य, हा साक्षात्कार केव्हा झाला? ही तुमच्या अंतर्ज्ञानाची साक्ष, वाटतं! केव्हा पासून कृष्ण भगवान झाला? तुमचा, पितामहांचा अन् त्याचा परिचय केव्हा पासून? केव्हा पासून त्याच्या अलौकिक गुणांची साक्ष तुम्हांला पटली? शिशुपाल वधापासूनच ना?’

‘हं!’ विदुर खिन्नपणे हसले, ‘तो शिशुपाल असंच काहीतरी यज्ञसभेत बोलत होता.’

‘अन् त्याच कारणास्तव सर्व राजांच्या देखत शिशुपालाचा वध झाला… अन् साऱ्यांनी तो उघड्या डोळ्यांनी पाहिला.’

‘तुला विरोध करायला कुणी हरकत केली होती?’ भीष्म गरजले.

‘एकाला ठेच लागली की, पाठीमागच्यानं शहाणं व्हावं. तेवढं शहाणपण बाळगलं, म्हणून बरं झालं. नाहीतर शिशुपालाचं जे झालं, तेच माझं घडलं असतं. पितामह, मी विरोध केला नाही, त्याचं. एक कारण होतं, कौरवान्नवर पोसलेले तुम्ही सारे त्या पांडवांचे लाचार होता…’

‘दुर्योधना!’ संतप्त भीष्माचार्य उभे राहिले.

‘स्वस्थ बसा.’ दुर्योधनाचा आवाज तेवढाच चढला, ‘ही पांडवसभा नाही. कौरवांची सभा आहे. साम्राज्याच्या युवराजाला बोलण्याचं इथं काहीच प्रयोजन नाही. लाचार म्हटलं, म्हणून राग येतो? लाचार नाही तर काय? कोणत्या मानानं त्या यज्ञाला गेलात, ते तरी आठवा! सम्राट धृतराष्ट्र महाराजांना यज्ञाचं आमंत्रण द्यायला स्वत: युधिष्ठिरानं यायला हवं होतं; पण आमंत्रण पाठवलं नकुलाच्या हस्ते. तो अपमान जाणूनबुजून केला होता. तुमचा नव्हे, कौरवसाम्राज्याचा!’

‘दुर्योधना, शांत हो! संयमाला विसरू नकोस.’ धृतराष्ट्र म्हणाले.

‘संयमाच्या कक्षा यांनीच ओलांडल्या, तिथं मी त्यांचं पालन काय करणार? ज्या जरासंधाचं पाठबळ सदैव कौरवांच्या पाठीशी होतं ज्याच्या पराक्रमापुढं कृष्णाला हार घेऊन द्वारकेला पळालं लागलं, त्या जरासंधाचा वध कपटानं एकाकी गाठून त्या कृष्णानं करवला… अन् ज्या शिशुपालानं भीमाच आपल्या राज्यात स्वागत केलं, आदरानं करभार दिला, त्याचा सत्यावक्तेपणापायी गेलेला बळी या आमच्या थोर महात्म्यानं पाहिला. कौरवांच्या प्रतिष्ठेपायी चेदिराज शिशुपालावा वध झाला अन् कौरवांच्या साम्राज्याची धुरा वाहणाऱ्यात या आपल्या तिघां सल्लागारांनी ते चुपचाप सहन केलं. पांडवांच्या साम्राज्यापदाला आचार्य द्रोणांनी आशीर्वाद दिले. कौरवसभेत अभिमानानं, निष्ठेनं प्रवेश करणाऱ्या आपल्या राजांनी नतमस्तक होऊन आणलेला अपमानित करभार या कौरवांच्या युवराजानं स्वीकारला अन् कौरवांच्या महामंत्र्यानं नि महात्मा विदुरानं तो करभार पांडवाच्या प्रतिष्ठेसाठी खर्च केला. धन्य त्या पांडवांची आणि त्यांच्या बुद्धीची! कौरवश्रेष्ठांकडूनच आपला राजसूय यज्ञ पार पाडणारे पांडव खरोखरच धन्य होत. तात, त्या पांडवांच्या यज्ञकुंडात कौरवांच साम्राज्य जळत असताना पाहिलं.’

‘काय बोलतोस तू हे!’ धृतराष्ट्र पुरे बेचैन होऊन म्हणाले.

‘त्या दाहानं माझ्या डोळ्यांतले अश्रू केव्हाच आटून गेले. तुमचे नेत्र कधीच उघडणार नाहीत अन् तुमच्या या सल्लागारांचे उघडे डोळे तुमच्यासाठी द्रवून कधीच मिटणार नाहीत. कृष्णाच्या नादानं अन् पांडवाच्या प्रीतीनं धुंदावलेल्या या भुंग्यांनी कौरवसाम्राज्य केव्हाच पोखरून टाकलंय्. ते कोलमडून पडताना तुम्हांला पाहावं लागणार नाही, एवढंच तुमचं भाग्य आहे. त्या भाग्याचा मला हेवा वाटतो.’

‘बस्स कर, दुर्योधना. वाटलं, म्हणून हवं ते बोलू नकोस. ज्या पितामहांनी अपरंपार कष्ट घेऊन हे साम्राज्य उभं केलं, ज्या विदुरानं आपलं बुद्धिसामर्थ्य ज्या राज्याच्या वैभवासाठी वेचलं, ज्या या हातांनी सारी शस्त्रविद्या तुम्हांला दिली, त्यांच्या सेवेबद्दल एवढे अनुदारपणाचे उद्‌गार! साधी कृतज्ञता तरी बाळग!’ द्रोणाचार्य म्हणाले, ‘म्हणे, आम्ही साम्राज्य पोखरून टाकलं!’

‘हो तुम्ही अन् तुमच्या सद्‌भावानं. एक पडले पितामह. त्यांना दोघे सारखेच. दुसरे महात्मा, आम्ही सदैव जवळ असतो, म्हणून आमचे दुर्गुण त्यांना अधिक दिसतात अन् पांडव दूर असल्यानं ते सद्‌गुणी भासतात. तुमचा तर प्रश्नच नाही. तुम्ही सदैव धर्मनिर्णयालाच बसलेले. तुम्हां तिघांच्या थोरपणात साम्राज्य तेवढं ढासबलं.’

‘काय झालं साम्राज्याला?’ भीष्मांनी विचारले.

‘काय झालं उघड्या डोळ्यांनी पाहा ना! श्राद्ध-पक्षांसाठी पिंड घालावेत, तसे साम्राज्याचे तुकडे केलेत. माझा विरोध मानला नाहीत. तातांना घरी बसवून त्या युधिष्ठिरावर राजमुकुट चढविला असता, तरी साम्राज्य एकसंध राहिलं असतं. स्वत:च्या हातून तुकडे पाडायचे अन् नंतर भेद घडला, म्हणून हळहळायचं.’

‘संघर्ष टाळायला तेवढा एकच उपाय होता.’ विदुर म्हणाले, ‘राज्य तोडण्याची कुणाला हौस नव्हती.’

‘राज्य वाटून देऊन शत्रू तृप्त होत नसतात, पण तुम्हांला तसं वाटलं. कुरुसाम्राज्याची प्रतिष्ठा असा लौकिक असणारी ही हस्तिनापूर नगरी. शत्रूंना भयभीत करणारी, वीरांना आह्वान देणारी तुमच्या खोट्या स्वप्नापायी या नगरीला निस्तेज, निष्प्रभ करून टाकलंत. ज्या नगरीच्या आश्रमांतून शस्रविद्येचे धडे दिले जायचे, भूमिरक्षणार्थ वीर तयार व्हावयाचे, जी भूमी खऱ्या अर्थानं वीरप्रसू बनायची, त्या आश्रमांतून तुमची ज्ञानगंगेची सत्रं सुरू झाली. जितेपणी मृत्यूनंतरच्या स्वर्गाची चित्रं रंगविण्यात वीरांची मनं रमली. रथशाळांतून नवे नवे तेजस्वी रथ निर्माण होण्याऐवजी त्या निष्णात कलावंतांकडून शत्रूची घरंदारं उभी केलीत. ज्या मत्त गजांनी सुवर्ण-अंबाऱ्या तोलल्या ज्यांच्या पावलांनी रणभूमीला धडकी भरली त्या गजेंद्रांना सागाचे सोट वाहून आणण्याचं काम दिलंत. शांतीच्या वेडापोटी तुमचं साम्राज्य चिरशांतीची वाटचाल करति आहे हे कसं तुम्हांला दिसत नाही?’

‘याला उपाय…’ कंपित सुरात धृतराष्ट्रांनी विचारले.

‘मी शोधला आहे.’ दुर्योधन म्हणाला.

‘कोणता?’

‘आत्मघात!’

‘आत्मघात?’ धृतराष्ट्र उद्‌गारले.

‘हो! आत्मघात! त्याखेरीज दुसरा मार्ग नाही. तात, तो विचार मनात आला, तरी मनातच ठेवा. त्याचा उच्चार करू नका. या तुमच्या विश्वसनीय राजसभेत बोलली जाणारी प्रत्येक गोष्ट पांडवांच्या महालात प्रतिध्वनीच्या रूपानं उमटते. इथं तुमच्या बाजुचं कोणीच नाही. ज्यासाठी तुमचा माझ्यावर कोप झाला होता, ती गोष्ट आज मी सांगतो. राज्याची वाटणी अटळ दिसली, तेव्हा मीच पांडवांना जतुगृहात जाळून मारण्याचा कट रचला. पुरोचनाकरवी मी लाक्षागृह उभारलं, पण ज्या दिवशी पांडव त्या घरात प्रवेश करते झाले, त्याच दिवशी त्यांना सावध करणारे संदेश याच प्रासादातून गेले.’

‘युवराज!’ विदुर कासावीस झाले.

त्यांच्याकडे पाहत दुर्योधन हसला.

‘काका! मी तुम्हांला काही बोललो नाही. माझ्या योजनेनुसार लाक्षागृह पेटलं; पण घरभेद्यांच्या साहाय्यानं पांडव सुरक्षित राहिले. भररात्री गंगेच्या काठी एक सुसज्ज नौका पांडवांना तारण्यासाठी उभी होती. काका, आपल्या ज्ञानचक्षूंना भूत-वर्तमान दिसत असेल. तेवढी माझी शक्ती नाही; पण मी युवराज आहे. युवराजाची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असते. जेव्हा ती वेध घेते, तेव्हा सावज निश्चितपणे पंजात सापडलेलं असतं. तात, येतो मी.’

‘निघालास कुठं?’

‘कुठंही! पण या भूमीतून दूर… जिथं मानानं जगता येईल, युवराजपदाचा विसर पडेल, तिथं. पांडवांनी टाकलेल्या भिक्षेला साम्राज्य समजून जगण्याचं बळ माझं नाही.’ दुर्योधनाने पाहिले. बेचैन झालेले धृतराष्ट्र हातातल्या कंठयाशी चाळवाचाळव करीत होते.

‘ताल, हा कंठा नीलमण्यांचा आहे. जातिवंत मणी आहेत ते. ते आपला गुण दाखविल्या खेरीज राहणार नाहीत. तुम्ही तो कंठा जरूर परिधान करा. नागाच्या विळख्या सारखा तो शोभून दिसेल. नीलमण्यांचा गुणप्रत्यय पाहाराला फार काळ वाट पाहावी लागणार नाही. दीड प्रहर, दीड दिवस, दीड सप्तकात तो प्रत्यय येतो. नील प्रसन्न झाला, तर साम्राज्य पायी चालत येतं, नाहीतर साम्राज्याची धूळधाण उडून जाते. आता साम्राज्य नाहीच. यायचं झालं, तर कदाचित या कंठ्याच्या गुणानंच येईल. जरूर त्याची परीक्षा बघा. येतो, तात!’

दुर्योधनाने पाठ फिरवली अन् तो महालाबाहेर निघून गेला.

कर्ण त्याच्या पाठोपाठ जात होता.

दुर्योधन-कर्ण निघून गेले आणि राजसभेत एकच शांतता पसरली. काही बोलण्याचे कुणाला भान राहिले नाही. घसा खाकरून विदुराचे शब्द उमटले, ‘भारीच संतापी, असंयमी. असल्या वर्तनाचा परिणाम…’

‘विदुर, थांब! काही बोलू नकोस.’ धृतराष्ट्रांचा आवाज उमटला.

विदुराने पाहिले, तो धृतराष्ट्र थरथरत उभे होते. त्यांचे ओठ क्षणभर थरथरले. आणि शब्द उमटले, ‘एकदा तरी मला सत्य ऐकू दे S S…’

हातातला नीलमण्यांचा कंठा धृतराष्ट्राने फेकून दिला. अंधहाताने फेकलेला तो कंठा स्फटिकाच्या फरशीवरून दूरवर जाऊन भिंतीला आदळला.

धडपडत धृतराष्ट्र चालत होते. त्यांना आधार देण्यासाठी दासी धावत होत्या.

✍️ *क्रमश* ✍️