राधेय – भाग १५

🚩 *राधेय/१५* 🚩

दुर्योधन आपल्या महालात येरझारा घालीत होता. महालातल्या आसनावर दुर्योधनाचे मामा शकुनि बसले होते व आपल्या घाऱ्या डोळ्यांनी दुर्योधनाची हालचाल पाहत होते. इंद्रप्रस्थाहून येताच दुर्योधनाने कर्णाला आणण्यासाठी आपला रथ पाठविला. कर्णाची भेट घेण्यासाठी तो उतावीळ बनला होता. रथाचा आवाज कानी येताच सौधाकडे धावत तो म्हणाला, ‘आला, वाटतं.’

प्रासादासमोर उभ्या असलेल्या रथातून उतरणारा कर्ण पाहून दुर्योधनाला समाधान वाटले. तो महालात येत म्हणाला, ‘मामा, कर्ण आला.’

‘युवराज, तुम्ही आज्ञा केल्यावर कोण येणार नाही?’

कर्ण महालात प्रवेश करताच दुर्योधन म्हणाला, ‘ये, मित्रा, मी तुझीच वाट पाहत होतो.’

‘केव्हा आलात?’

‘आम्ही नुकतेच आलो.’

‘अन् तातडीनं मला बोलावलंत?’

‘तुला भेटावंसं वाटलं, हा काय गुन्हा? तसं वाटलं असलं, तर बोलावल्याबद्दल क्षमा कर.’

दुर्योधनाचे ते उद्‌गार ऐकून कर्णाला आश्चर्य वाटले. दुर्योधनाजवळ जात तो म्हणाला, ‘मित्रा, तुला भेटण्यात मला आनंद नाही का? तातडीनं बोलावलं, म्हणून मी चिंतेत होतो, त्यामुळं मी विचारलं.’

दुर्योधनाचा राग थोडा शांत झाला. तो म्हणाला, ‘बैस.’
कर्णाची दृष्टी शकुनीकडे गेली. शकुनीला वंदन करीत कर्ण म्हणाला, ‘क्षमा असावी. मी आपल्याला पाहिलं नाही. प्रवास चांगला झाला ना?’

‘उत्तम!’

‘अन् इंद्रप्रस्थाचं वास्तव्य?’
‘अप्रतिम!’ शकुनि म्हणाला. ‘कर्णा, तुमच्यापेक्षा आम्ही सुदैवी. तुम्ही लौकर निघून आलात; पण आम्हांला आग्रहामुळं राहावं लागलं.’

‘बरं झालं, राहिलात, ते. युवराजांवर करभार स्वीकारण्याची जबाबदारी असल्यानं यज्ञ संपेपर्यंत त्यांना विश्रांती नव्हती. अनायासं श्रमपरिहार झाला असेल.’

‘झाला, तर! कर्णा, पांडवांनी बांधलेली मयसभा या पृथ्वीवरचं आश्चर्य आहे. अरे, पाणी म्हणून वस्त्रं सावरून चालावं, तो पाणी नसून स्फटिकभूमी आहे, हे ध्यानी येई. स्फटिकभूमी म्हणून निःशंकपणे पाय टाकावा, तो पाण्यात गटांगळ्या खाण्याचा प्रसंग यायचा. दरवाजा समजून जायला लागावं अन् भिंतीवर आदळावं. भिंत समजून थांबावं, तो तिथंच द्वार असावं. छे, छे! कर्णा, तू ती मयसभा पाहायला हवी होतीस.’

‘त्यासाठी ती मयसभा कशाला हवी, मामा! हे जीवन हीच एक मयसभा नाही का? स्नेहाचा ओलावा शोधायला जावं, तिथं स्नेहाऐवजी कटुता पदरात पडावी, ज्याला मित्र मानावं, तोच वैरी बनावा, वरासाठी तपश्चर्या करावी अन् पदरात शाप पडावेत, भाग्याचा दिवस समजावा अन् तोच जीवनाचा अंत ठरावा. या जीवनाच्या मयसभेचा प्रत्यय हरघडी येत असता त्या मयसभेला कसलं महत्त्व!’

शकुनि हसत म्हणाले, ‘कर्णा तुझ्या मित्राचं हेच झालं! ती मयसभा पाहायला गेलं असता वस्त्रं भिजली, पाय घसरून ते पडले, भिंतीवर आदळले.’

‘मामा!’ दुर्योधनाने दटावले.

‘हे एकटेच नव्हे. माझी पण तीच अवस्था होती; पण त्यामुळं पांडवांची भरपूर करमणूक झाली.’

दुर्योधन काही बोलणार, तोच महालात विकर्ण आला. साऱ्यांचे लक्ष त्याच्यावर खिळले. आपल्या भावाला- दुर्योधनाला- तो नम्रतेनं म्हणाला, ‘दादा, तातांनी बोलावलंय्.’

‘आता?… आम्ही तर नुकतेच आलो!’

‘ते तातांना कळलं आणि त्यांनी मला पाठवलं.’

‘तिथं कोण आहे?’

‘कोणी नाही. फक्त पितामह आचार्य आणि विदुरकाका आहेत.’

खिन्नतेनं हसत दुर्योधन म्हणाला, ‘आणखी कोण असायला हवं! ठीक आहे, येतो; म्हणावं.’

विकर्ण गेला.

दुर्योधन म्हणाला, ‘बहुतेक नवे प्रमाद हातून घडले असावेत.’

‘कुणाच्या हातून?’ कर्णाने विचारले.

‘दुसऱ्या कुणाच्या? माझ्या! नाहीतर तातांनी एवढया तातडीनं माझी आठवण काढली नसती.’

‘दुर्योधना, चुकतोस तू.’ शकुनि म्हणाला, ‘सम्राटांचं तुझ्यावर केवढं प्रेम आहे, हे मी जाणतो. ते अंधळे असतील; पण डोळस दृष्टीला ते समजायला हवं.’

‘ते मलाही माहीत होतं. ते दिवस गेले, मामा. ते दिवस परत यायचे नाहीत.’

‘मला तसं वाटत नाही. त्यांचं तुझ्यावरचं वेडं प्रेम मी जाणतो.’

‘मग माझ्याबरोबर चलता?’

गडबडीने उठत शकुनीने विचारले, ‘कुठं?’

‘तातांकडं! त्या प्रेमाचा प्रत्यय तुम्हांलाही येईल.’

‘आलो असतो. पण हा प्रवास… भारी थकवा आलाय्.’

‘तेच! आपण विश्रांती घ्या! कर्णा, तू येणार?’

‘जशी आज्ञा!’

दुर्योधन क्षणभर थांबला. त्याने महालातली संदूक उघडली, त्यातला एक कंठा हाती घेऊन संदूक बंद केली. कर्णासह तो धृतराष्ट्रांच्या दर्शनाला जाऊ लागला.

महालात समया पेटवण्यात सेवक गर्क झाले होते.

✍️ *क्रमश* ✍️