राधेय – भाग १४

🚩 *राधेय/१४* 🚩

खांडवप्रस्थ म्हणजे कौरव युवराजांची मृगयेची भूमी. घनदाट अरण्यांनी आणि नाना वन्य श्वापदांनी संपन्न असलेला तो भूभाग. त्या जागेवर पांडवांनी उभारलेली राजधानी पाहून दुर्योधना बरोबर गेलेला कर्ण चकित झाला. यमुनेच्या किनाऱ्यावर ती नगरी उभी होती. मंदिरे, राजवाडे, गोपुरे यांची शिखरे आकाशात झळाळत होती. भव्य तटाच्या प्रवेशद्वारातून इंद्रप्रस्थात जात असता त्या द्वाराशीच एकशे एक हत्ती स्वागतासाठी उभे होते. चंद्राप्रमाणे शुभ्रधवल हवेल्या त्या नगरीचे सौंदर्य वाढवीत होत्या. यज्ञासाठी पाचारण केलेल्या राजांसाठी प्रासाद उपलब्ध होते. चारी वर्णांसाठी मोठमोठ्या अतिथिशाला निर्माण केल्या होत्या. त्यांच्या मनोरंजनासाठी नट-नर्तकांचे, वादक-गायकांचे वास्तव्य त्या नगरीत घडवले होते.

यज्ञशाळेच्या द्वारी मंगल वाद्ये वाजत होती. या यज्ञभूमीत मध्यभागी कुशल शिल्पकारांच्या साहाय्याने श्रेष्ठ यज्ञवेदी स्थापिली होती. कुंडे आणि यज्ञशाला सिद्ध झाल्या होत्या.

यज्ञभूमीचे सर्व व्यवहार यथासांग व्हावेत, म्हणून युधिष्ठिराने कामे वाटून दिली होती. यज्ञसमारंभावर लक्ष ठेवण्याचे काम द्रोणाचार्यांवर सोपवले होते. भोजनविभाग दुःशासन सांभाळीत होता. यज्ञासाठी आलेल्या ब्राह्मणांचा व नृपांचा सत्कार अश्वत्थामा आणि संजय करीत होते. दक्षिणा कृपाचार्यांच्या हस्ते दिली जात होती. यज्ञासाठी होणाऱ्या अफाट खर्चावर विदुरांचे लक्ष होते आणि दुर्योधन करभार घेण्यात गुंतला होता.

शेकडो ब्राह्मणांच्या तोंडून मंत्रोच्चार उठत होते. यज्ञातल्या आहुतींनी तृप्त झालेल्या यज्ञकुंडातून उठणारे धुराचे लोट आकाशात चढत होते.

इतर सर्व यज्ञकर्मे पार पाडल्यावर शेवटी सोमयागाचा दिवस उगवला. अग्रपूजेचा मान कोणाला जातो, इकडे सर्व नृपांचे लक्ष लागले होते. भीष्मांनी वसुदेवपुत्र कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला. युधिष्ठिराने कृष्णपूजा केली. ते पाहून शिशुपाल संतापला. भर सभेत त्याने कृष्णाची नालस्ती केली. कृष्णाने खूप संयम दाखविला, पण शिशुपालाने मर्यादा ओलांडताच कृष्णाने आपल्या सुदर्शनाने शिशुपालाचा वध केला. यज्ञभूमीत झालेला तो वध पाहून साऱ्या राजांची मने भीतीने थरारली.

यज्ञाच्या शेवटच्या दिवशी नृपांची एकच पंगत बसली होती. चंदनअगरूचा सुवास सर्वत्र दरवळत होता. शेकडो सुवर्णासनांनी ती पंगत सुशोभित केली होती. पंक्तीच्या अग्रभागी भीष्म, द्रोण दिसत होते. विदुरांच्या शेजारी कर्ण बसला होता. पंक्तीमधून कृष्ण फिरत होता. पंक्तीमध्ये वाढण्यासाठी आलेल्या दासीसमुदायाच्या अग्रभागी द्रौपदी दिसत होती.

विदुर कर्णाला म्हणाला, ‘राधेया, जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.’

‘कशामुळं?’

‘असा अलौकिक यज्ञ योजणं आणि पार पाडणं ही का सामान्य गोष्ट आहे! पूर्वसंचिता खेरीज ही गोष्ट घडत नाही. तू कधी असा यज्ञ पाहिला होतास?’

‘दुर्योधनामुळंच हा यज्ञ पाहण्याचं भाग्य लाभलं.’

‘पूर्वपुण्याई! दुसरं काय!’

कर्णाच्या पानाजवळ सुकुमार पावले आली, नकळत कर्णाची दृष्टी वर गेली. समोर द्रौपदी उभी होती. दोघांची दृष्टी एकमेकांना भिडली होती. द्रौपदीच्या हाती पक्वान्नांचे तबक होते. पदर ढळला होता. तो ध्यानी येताच वाढण्यासाठी वाकलेली द्रौपदी न वाढताच उभी राहिली. कर्णाची दृष्टी पानाकडे वळली आणि त्याच वेळी त्याच्या कानांवर शब्द आले, ‘याचकानं दात्याकडं पाहू नये,’

कर्णाने संतापाने मान वर केली.

द्रौपदी पंक्तीमधून भरभर जात होती.

कृष्ण सामोरा आला होता. कृष्णाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य कर्णाला क्षणभर दिसले, कारण दुसऱ्या क्षणी कृष्ण द्रौपदीच्या पाठोपाठ जात होता.

द्रौपदी हातांतील तबक सावरीत पंक्तीबाहेर आली. तिने आतल्या महालात प्रवेश केला, तोच तिच्या कानांवर हाक आली, ‘द्रौपदी ऽऽ’

द्रौपदीने मागे वळून पाहिले, कृष्णाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.

‘कृष्णा, मला हाक मारलीस?’

‘हो!’ कृष्णाने आजूबाजूला कोणी नाही, याची खात्री करून घेतली. तो म्हणाला, ‘त्या कर्णाचा असा अपमान करण्याची काही आवश्यकता होती का?’

‘मग त्यानं पाहावं कशाला?’

‘तुझा पदर ढळला, हा त्यांचा दोष नव्हे. तो आपला अतिथी आहे, एवढंही भान तुला राहू नये?’

‘कृष्णा, त्याला पाहिलं, की माझा संताप उसळतो. का, कुणास ठाऊक!’

कृष्ण कठोर हसला. म्हणाला, ‘तुला कारण माहीत नसलं, तरी मला आहे. पदर ढळला, तो दोष तुझा; पण पातक त्याच्या माथ्यावर. गुन्हा काय, तर त्यानं दृष्टी उंचावली. कृष्णे, रूपाच्या गर्वानं आणि कुलाच्या खोट्या अहंकारापायी एक चूक केलीस, त्याचं पातक त्याच्या माथी कशाला घालतेस? तो पती लाभला नाही, याचा आता पश्चात्ताप होतो ना?’

‘कृष्णा S S’ द्रौपदी ओरडली; पण तिचे बोलणे ऐकायलाही कृष्ण थांबला नाही.

कृष्ण पंगतीत आला, तेव्हा पंगत उठत होती. जाणारा कर्ण कृष्णाला पाठमोरा दिसला. कृष्ण जवळ गेला आणि त्याने हाक मारली, ‘राधेया S S’

कर्ण वळला.

कृष्णदर्शनाबरोबर त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

कृष्णाने विचारले, ‘मुक्काम आहे ना?’

‘नाही! आज आम्ही जाणार! युवराज दुर्योधन अन् शकुनिमहाराज थोडे दिवस राहून येणार आहेत.’

‘भोजन व्यवस्थित झालं ना?’

‘अगदी व्यवस्थित! मी तृप्त आहे. पक्वान्नांनी पोट भरलं, तरी ज्या हातांनी पक्वान्नांचा स्वाद घेतो, त्या हातांना उच्छिष्ट लागतंच. तेच धुवायला निघालो होतो.’

डाव्या हाताने उत्तरीय सावरीत कर्ण चालू लागला.

कृष्ण पाठमोऱ्या कर्णाकडे पाहत होता. मुखावर चिंता प्रगटली होती.

✍️ *क्रमश* ✍️