🚩 *राधेय/१३* 🚩
सकाळी कर्ण राधाईबरोबर बोलत बसला असता, द्रुम गडबडीने आत आला. तो म्हणाला,
‘दादा, दुर्योधनमहाराज आलेत.’
कर्ण उठण्याआधीच दुर्योधन आत आला. त्याने राधाईला वंदन केले. संकोचलेली राधाई म्हणाली, ‘आयुष्यमान व्हा.’
कर्ण म्हणाला, ‘युवराज!’
कर्णाकडे पाहत दुर्योधनाने म्हटले, ‘मी तुझ्याशी मुळीच बोलणार नाही.’
कर्ण गालांत हसला. तो शांतपणे म्हणाला, ‘अन् हे सांगण्यासाठी युवराज दुर्योधन महाराज सेवकाच्या अंतःपुरापर्यंत धावत आले, वाटतं?’
दुर्योधनाने कर्णाकडे रोखून पाहिले आणि मोठ्याने हसत त्याने कर्णाला मिठी मारली. दोघेही हसत होते. दुर्योधन म्हणाला, ‘मित्रा, काल आलास अन् भेट नाही.’
‘तसं नाही. पण बऱ्याच वर्षांनी आलो, तेव्हा….’
‘ठीक! चल. लवकर तयार हो. मी तुला प्रासादावर नेण्यासाठी आलोय्.’
‘जशी आज्ञा!’
कर्ण तयार होताच दोघे रथातून प्रासादाकडे निघाले.
पांढऱ्या शुभ्र आणि शेंदरी दगडांनी बांधलेल्या भव्य प्रासादासमोर रथ येऊन उभा राहिला. स्फटिकाच्या पायऱ्यांवरून चढत असता रक्षक दुर्योधनाला वंदन करीत होते. अनेक महालांनी सज्ज असलेल्या ऐश्वर्यसंपन्न प्रासादातून दोघे जात होते. अनेक महाल ओलांडून दोघे राजमहालात आले. द्वारावरचे रक्षक अदबीने बाजूला झाले. राजमहालात धृतराष्ट्रमहाराज नक्षीदार उच्च सुवर्ण-आसनावर बसले होते. मस्तकावर त्यांनी रत्नांकित मुकुट धारण केला होता. राजभूषणे, राजवस्त्रांनी त्यांच्या रूपाला वेगळीच भव्यता लाभली होती. डोळे मिटल्यासारखे दिसत होते. महाराजांचे अंधत्व माहीत असूनही ते डोळे कोणत्याहा क्षणी उघडले जातील, असे वाटत होते.
धृतराष्ट्रमहाराजांच्या मागे दोन दासी मंद गतीने चवऱ्या ढाळीत उभ्या होत्या. धृतराष्ट्राच्या उजव्या हाताला त्यांच्या सिंहासनाखाली एका चंदनी आसनावर विदुर बसले होते.
गोल चेहरा, शांत दृष्टी, कपाळावर गंधाची मुद्रा असणाऱ्या विदुरांचे लक्ष महालात येणाऱ्या दुर्योधनाकडे गेले; धृतराष्ट्र महाराजांच्या डाव्या बाजूला आसनस्थ झालेल्या भीष्मांकडे त्यांनी पाहिले.
भीष्माचार्यांनी आपली मान फिरवली.
त्यांच्या रूपाने हिमालयच फिरल्याचा भास झाला. मस्तकावरून अर्ध्या पाठीपर्यंत उतरलेले पांढरे शुभ्र केस, वक्षभागापर्यंत आलेली श्वेत दाढी, पांढऱ्या भुवयांत जडावलेले रत्नांसारखे डोळे, साक्षात भव्यता या रूपाने साकारल्याचा भास होत होता.
वयोवृद्ध, तपोवृद्ध भीष्मांनी दुर्योधनाला येताना पाहिले आणि ते म्हणाले, ‘राजन्, युवराज दुर्योधन येत आहेत.’
कर्णासह दुर्योधन पुढे झाला. वंदन करीत तो म्हणाला, ‘तात, दुर्योधन वंदन करीत आहे.’
‘कल्याण असो!’
कर्ण वंदन करीत म्हणाला, ‘सूतपुत्र राधेय वंदन करीत आहे.’
धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर किंचित स्मित विसावले. ते शांत आवाजात म्हणाले, ‘अंगराजा, तू केव्हा आलास?’
‘काल सायंकाळी.’
धृतराष्ट्र काही बोलणार, तोच खडावांचा आवाज उमटला. द्रोणाचार्य राजमहालात येत होते.
द्रोणाचार्य उंचपुरे होते. तपश्चर्येचे तेज त्यांच्या मुळातल्या गौरवर्ण, पण रापलेल्या शरीरावर दिसत होते. पांढरा शुभ्र जटाभार त्यांना शोभत होता. पांढरी दाढी छातीवर रुळत होती.
द्रोणाचार्य येताना दिसताच विदुराने सांगितले, ‘द्रोणाचार्य…’
धृतराष्ट्राने आज्ञा दिली. ‘विदुरा, आचार्यांना मृगाजिन दे.’
विदुराला कष्ट ध्यावे लागले नाहीत. सेवकांनी आचार्यांना आसन दिले. द्रोणाचार्यांची दृष्टी वळताच दुर्योधन-कर्णांनी वंदन केले.
आशीर्वादाचा हात उंचावून धृतराष्ट्राकडे पाहत द्रोणाचार्य म्हणाले, ‘राजन्! एकशे एक आश्रमांची जागा पाहून मी आलोय्. भीष्ममहाराजांनी जागा पाहून संमती दिली की, आश्रमकार्य सुरू होईल.’
‘मी पाहण्याची आवश्यकता नाही.’ भीष्म म्हणाले, ‘आपण निवडलेली जागा निश्चित योग्य असणार!’
धृतराष्ट्रांनी त्याला अनुमती दिली. त्याने सुखावलेले द्रोण तृप्ततेने म्हणाले, ‘राजन्, आणखी काही वर्षांत ही नगरी साक्षात ज्ञानपीठ बनेल. हिचा लौकिक त्रिखंडात पसरेल. ज्ञानासारखं पवित्र या पृथ्वीतलावर काहीच नाही. राजन्, राजसूय यज्ञाहून येताच मी हे कार्य हाती घेईन.’
‘अद्याप राजसूय यज्ञाला अवधी आहे ना?’
‘अवधी कुठला! युवराज नकुल स्वतः आमंत्रण देण्यास आले असता त्यांनी परत परत सांगितलंय्… भीष्म, विदुर अन् मी तिथं आधी जाणं आवश्यक आहे. ऐन वेळी जाऊन कसं चालेल?’
द्रोणाचार्यांचा आवाज किंचित वाढलेला लक्षात येताच धृतराष्ट्र घाईने म्हणाले, ‘हो! तुम्ही लौकर जाणंच इष्ट! प्रयाणाचा मुहूर्त केव्हा?’
‘उद्याच निघावं लागणार!’
‘जशी आपली इच्छा!’ धृतराष्ट्रांनी आपली संमती दिली.
दुर्योधनाने कर्णाकडे पाहिले, नजरेने खुणावले आणि सर्वांना वंदन करून दोघे महालाबाहेर आले.
दुर्योधनाच्या महालात जाताच दुर्योधनपत्नी भानुमतीने कर्णाचे स्वागत केले. ‘या, भाऊजी! केव्हा आलात?’
‘कालच! आमच्या मित्राला चोरलंत. त्यामुळं यावं लागलं.’
‘चोरलं?’
‘नाही तर काय? स्वयंवर झाल्यापासून आमची आठवण विसरलेत तुमचे पतिराज!’
क्षेम कुशल विचारून भानुमती निघून गेली.
महालात फक्त कर्ण आणि दुर्योधन उरले होते. दुर्योधनाची बेचैनी त्याच्या मुखावर प्रकटली होती. कर्णाने विचारले, ‘मित्रा, सर्व क्षेम आहे ना?’
दुर्योधन हसत म्हणाला, ‘राधेया, क्षेमाखेरीज दुसरं काहीही उरलेलं नाही. पाहिलंस ना, तातांनी केवढ्या प्रेमभरानं माझं स्वागत केलं, ते! केव्हातरी भेट घडते, पण ती अशी!’
‘केव्हातरी’
‘हो, मध्यंतरी तातांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता.’
‘गैरसमज? कशाबद्दल?’
‘लाक्षागृहात पांडव जळून मेले, ती करणी माझी होती, असा तातांचा समज करून दिला होता. समज कसला, सत्यच होतं ते. पांडवांच्या सुदैवानं अन् माझ्या दुर्दैवानं तो बेत फसला. पण, मित्रा, पांडव जळून मेले, हे कळताच पितामह भीष्माचार्य, महात्मा विदुर अन् द्रोणाचार्यांना केवढा शोक झाला, म्हणून सांगू! ते पाहायला तू हवा होतास.’
‘बरं झालं, पांडव वाचले, ते! पांडव वाचल्याचा मलाही आनंद आहे.’
‘आनंद! तू माझा मित्र ना?’
‘युवराज, दुर्दैवानं पांडव लाक्षागृहात जळून मेले असते, तर आयुष्यभर शय्यागृहात निद्रेस्तव जाताना भीती वाटली असती. पराक्रमानं शत्रू जिंकावा, घातानं नव्हे.’
‘ते जाऊ दे! ऐक. मला पुष्कळ सांगायचं आहे. ते जतुगृहप्रकरण झालं आणि त्याची संधी आमच्या ब्रह्मदेवांनी उचलली. तिन्ही मुखांनी सदैव माझ्यावर आग पाखडली जात होती. मी सांगतो, कर्णा, पांडव वाचले, ते त्यांच्या दैवामुळं नव्हे- आमच्याच घरभेदेपणानं. पांडव सुरक्षित आहेत, म्हणून समजलं, तेव्हापासून थोडी धार मंदावली. यापूर्वी तातांच्या दर्शनालासुद्धा जायला भीती वाटत असे.’
‘पण आता सारं निवळलं ना! त्यातच समाधान…’
‘समाधान! या हस्तिनापुरात समाधान पूर्णतया नांदत आहे. ज्या नगरीत भीष्माचार्यांसारखे अजातशत्रू प्रमुख आहेत, महात्मा विदुरांसारखे नीतीचे आदर्श जपणारे सचिव आहेत, ज्ञान आणि वैराग्य बाळगणारे द्रोणाचार्यांसारखे सल्लागार आहेत, तोवर कमतरता कसली? सध्या कौरवसाम्राज्याचा कारभार त्या तिघांच्या हातून चालला आहे. तू ऐकलं नाहीस? आता या राज्यात ज्ञानदान करणारे शेकडो आश्रम निघणार. कौरवेश्वरांची राजधानी हस्तिनापूर ज्ञानपीठ बनणार! एका नव्या विचारानं, नव्या भव्य स्वप्नानं सारे भारले गेले आहेत.’ दुर्योधन हसला. ‘तुला माहीत नाही, कर्णा, राजप्रासादाच्या प्राणिसंग्रहालयात गोळा केलेले वाघ, सिंह, अस्वले अरण्यात सोडून देण्यात आली आहेत.’
‘कारण?’
‘त्यांच्या उपजीविकेसाठी दररोज निष्पाप जनावरांची हत्या करावी लागते ना! आता विदुरांनी दंडक घातला आहे. गरजेइतकीच मृगया केली जाते. आता हस्तिनापूरवासीच नव्हे, तर समस्त प्राणिमात्रांत हे समाधान सुखेनैव नांदत आहे. सारे तृप्त आहेत.’
‘अन्, मित्रा, तू…’
‘माझ्या नशिबी हे सुख नाही. या कुरुसाम्राज्याचा मी वारस. मला शांती लाभेल कशी? या साम्राज्याचं वैभव वाढावं, सत्ता वाढावी, हे राज्य बलशाली व्हावं, इथल्या नागरिकाला निर्भयपणे, स्वाभिमानानं जगता यावं; इथल्या वीरांच्या बाहूंत वज्राचं बळ साठवलेलं असावं, असं इच्छिणारा मी. माझ्या मनाला समाधान कुठलं! मित्रा, मी एकाकी पडलोय्. साऱ्यांनी मला टाकलंय्. मन रमविण्यासाठी मृगयेला जरी गेलो, तरी नौबतीच्या आवाजांनी चौखूर उधळणारी श्वापदं मला भिऊन पळताना दिसतात. एखादं श्वापद गाठलं अन् मारलं, तरी त्याच्या जागी मी दिसू लागतो. मृगयेचा आनंदही उरत नाही.’
दुर्योधनाचे ते व्याकूळ बोलणे ऐकून कर्णाचे मन द्रवले. दुर्योधनाचे असले घायाळ रूप कर्णाने कधी पाहिले नव्हते.
कर्ण म्हणाला, ‘मित्रा, तू असा भयग्रस्त होऊ नकोस. एक काम प्रथम कर.’
‘काय?’ आशेने दुर्योधनाने विचारले.
‘त्या कृष्णाची मैत्री संपादन कर. त्याला आपलासा करून घे.’
दुर्योधन उद्विग्नपणेे हसला.
‘त्याची आता आशा करू नकोस. कृष्ण पांडवांचा बनलाय्. राजमाता कुंती त्याची आत्या आहे. एवढंच नव्हे, तर कृष्णाची बहीण सुभद्रा अर्जुनानं वरलीय्. सर्व राजांकडून करभार गोळा करण्यासाठी कृष्णाची चतुरंग सेना पांडवांच्या मागं उभी होती.’
‘ठीक आहे. त्याचा आपण विचार करू.’
‘मित्रा, तू तरी माझा आहेस का?’ दुर्योधनाच्या नेत्रांत अश्रू तरळल्याचा भास झाला.
‘या कर्णाच्या जीवनात तुझ्या मित्रत्वा इतकं मोठं, काही नाही. मित्रा, मी बोलतो, त्यावर विश्वास ठेव. जोवर कर्ण जिवंत आहे, तोवर स्वतःला एकटा समजू नकोस. तुझी इच्छा पुरी करण्यासाठी हा तुझा मित्र सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे, याचा विसर पडू देऊ नकोस.’
‘वचन!’
‘सज्जनाचा, वीराचा आणि तपस्व्याचा शब्द हाच ग्राह्य धरावा. तेच वचन समजावं.’
दुर्योधनाने प्रेमभराने कर्णाचा हात हाती घेतला. त्या हाताची पकड कर्णाला जाणवत होती. दुर्योधनाचा निरोप घेऊन कर्ण जायला निघाला असता त्याने दुर्योधनाला विचारले, ‘युवराज, राजसूय यज्ञाला मी यायलाच हवं का?’
‘का?’
‘जाऊ नये, असं वाटतं.’
‘मला का जाण्याची इच्छा आहे? पण जावं लागणारच! तू तसं काही मनात आणू नकोस. तू राजसूय यज्ञाला आला नाहीस, तर साऱ्यांच्या ध्यानी तुझी अनुपस्थिती येईल. चर्चेचा विषय होईल अन् आमच्या राजमंडळात त्याबद्दल तुझ्यावर कोप होईल.’
‘जशी आज्ञा!’
‘उद्या पितामह, आचार्य आणि महात्मा राजसूयाला जात आहेत. आपण मागाहून मिळून जाऊ.’
दुर्योधनाला होकार देऊन कर्ण स्वगृही आला; पण राजसूय यज्ञाचा विचार मनातून जात नव्हता.
✍️ *क्रमश* ✍️
