🚩 *राधेय/१२* 🚩
हस्तिनापूर दिसू लागले, तसा वृषसेनाचा आनंद वाढला. आसुसल्या नजरेने तो नगरी पाहत होता. दोनप्रहराच्या वेळी गंगेच्या विशाल प्रवाहाच्या काठावर हस्तिनापूर शुभ्र कमळाप्रमाणे उमलले होते. त्या नगरीची गोपुरे, आकाशात उंचावलेली भवने कमलदलासारखी भासत होती.
कर्ण वृषसेनाला म्हणाला, ‘वसू ती बघ कौरवेश्वरांची राजधानी हस्तिनापूर.’
‘तात, तिथं खूप गंमत असेल, नाही?’
‘खूप!’ निराळेच स्वप्न कर्ण पाहत होता. ‘तिथं तुझे आजोबा, आजी वाट पाहत असतील. तुझे भाऊ शत्रुंजय अन् वृषकेतु तुझी आठवण काढीत असतील. अन् तुझा काका द्रूम, तू केव्हा येतोस अन् आपल्या रथातून तुला केव्हा प्रासादावर नेतो, असं त्याला झालं असेल.’
‘प्रासादावर?’
‘हो! तुझा काका दुर्योधन महाराजांच्या बरोबर असतो ना?’ कर्णाचे मन राधाई-अधिरथांना पाहण्यासाठी उतावीळ झाले होते.
हस्तिनापूच्या द्वारात रक्षकांचे अभिवादन स्वीकारून कर्माचा रथ प्रवेश करता झाला. अधिरथाच्या वाड्यासमोर कर्णरथ थांबला. वाड्यातून वृषकेतु बाहेर आला. कर्णाला रथात पाहताच तो तसाच माघारी वळला आणि वाड्यात एकच धावपळ उडाली.
कर्ण, वृषाली, वृषसेन वाड्यात आले. शत्रुंजय, वृषकेतु पुढे झाले. त्यांनी कर्णाला वंदन केले. द्रूम सामोरा येताच कर्णाने त्याला वंदन करण्यासही अवसर दिला नाही. त्याला आपल्या मिठीत घेतले. सर्वांनी वाड्यात प्रवेश केला. द्रुमपत्नीची भेट झाली. कर्णाची नजर आतल्या द्वारातून येणाऱ्या राधाईवर स्थिरावली. कर्ण पुढे झाला. मातृवंदना करून उठत असता राधाईचे शब्द कानांवर पडले, ‘बरं झालं, आलास, ते. फार पाहावंसं वाटत होतं…’
कर्ण वार्धक्याने थकलेल्या राधाईकडे पाहत होता. राधाई म्हणाली, ‘केवढा उंच झाला आहेस, रे! जरा वाक ना!’
कर्ण वाकला. राधाईने त्याच्या कानशिलांवरून बोटे उतरून माया घेतली. ती शुष्क बोटे कट्कट् वाजली. राधाईने कर्णाला मिठीत घेतले. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू होते. कर्ण म्हणाला, ‘आई, सारे हसतात, बघ.’
‘हसू देत! ती काय बेडकीसारखी आकाशातून पडली होती काय? मायेखालीच तीही मोठी झालीत.’
‘हो, पण दादा मोठा झालाय् ना!’ द्रुमाने राधाईला चिडवले.
‘गप, रे. माहीत आहे मोठा! मला तेवढाच आहे तो.’
राधाईचे लक्ष वृषसेनाकडे गेले. तिने वृषसेनाला जवळ ओढले.
साऱ्या घरात एकच आनंद वावरत होता. घर गजबजून उठले होते. पण कर्णाचे मन अस्वस्थ होते. तो उठत म्हणाला, ‘आई, तात कुठं आहेत?’
‘रथशाळेत गेलेत.’
‘मी तातांना भेटून येतो.’
‘अरे, पण येतील ना एवढ्यात…’
‘नको. मी भेटून येतो.’
कर्ण जायला निघाल्याचे पाहताच द्रुम उठला. द्रुम सारथ्य करीत होता. कर्णाला साऱ्या घटना सांगत होता. रथशाळेकडे रथ धावत होता. चारी बाजूंनी तटांनी बद्ध झालेली रथशाळेची भव्य वास्तू दिसू लागली. रथशाळेच्या द्वाराशी कर्ण, द्रुम उतरले आणि त्यांनी रथशाळेत प्रवेश केला. आत मोठा, भव्य उघडा चौक होता. डाव्या हाताला घोड्यांची भव्य पागा लागत होती. पागेतून नाना लाकडांच्या राशी एका भागात रचल्या होत्या. समोर दूरवर रथशाळा दिसत होती. रथशाळेकडे जात असता अर्धवट राहिलेले काही रथ नजरेत येत होते.
कर्ण चकित होऊन रथशाळेचे रूप पाहत होता. पूर्वी याच रथशाळेत शेकडो कारागिरांची वर्दळ असे. नाना आवाजांनी ही शाळा गजबजून गेलेली असे. याच रथशाळेत आता आश्रमाची शांतता नांदत होती. कर्णाने तो विचार झटकला. त्याचे लक्ष जवळ येणाऱ्या रथशाळेकडे लागले होते.
रथशाळेसमोर एक सुर्वणरथ एका चाकावर उभा होता. दुसरा भाग लाकडी ओंडक्यावर स्थिरावला होता. रथापासून थोड्या अंतरावर जमिनीत रोवलेल्या कण्यावर एक सुरेख रथचक्र फेरे घेत होते. त्या फिरत्या चाकाजवळ एक व्यक्ती बसली होती. शुभ्र, विरळ केस मानेवर पसरले होते. सावळ्या छातीवर शुभ्र उत्तरीय विसावले होते. आपल्या तीक्ष्ण नजेरेने ती व्यक्ती ते फिरते चाक पाहत होती. कर्ण जवळ आल्याचे भानही त्या व्यक्तीला नव्हते.
‘तात!’
‘अं!’ म्हणत त्या वृद्धाने मान वर केली.
कर्णाला पाहताच ती व्यक्ती हर्षाने उठली.
कर्ण वंदन करून उठत असतानाच अधिरथाने त्याच्या पाठीवरून हात फिरवीत विचारले, ‘कर्णा, केव्हा आलास?’
‘थोडा वेळ झाला.’
‘क्षेम आहे ना!’
‘आपल्या आशीर्वादानं…’
‘एकटाच आलास?’
‘नाही. आम्ही सर्वजण आलो आहोत.’
अधिरथाने त्याच्याकडे पाहिले आणि सेवकांना म्हटले, ‘चक्र रथाला जोडा.’
चक्र रथाला जोडले गेले.
अधिरथासह कर्ण तो सुवर्णरथ पाहत होता. रथ दृष्ट लागण्याइतका सुरेख सज्ज झाला होता.
कर्णाने विचारले, ‘कुणाचा रथ?’
‘दुर्योधन महाराज राजसूय यज्ञाला जाणार आहेत ना! त्यांच्यासाठी रथ मुद्दाम तयार केलाय्’
‘रथ अप्रतिम झालाय्.’
‘मनाजोगं काम करायला उसंत मिळते, म्हणून एवढं सुबक काम करता येतं’
‘आता रथाचं काम फारसं दिसत नाही.’
‘असलं, तर दिसणार! पूर्वीचे सज्ज झालेले रथ विपुल आहेत. त्यांची मोडतोड पाहणं एवढंच काम आता आहे. जुने जाणकर कलावंत आहेत. त्यांच्यासाठीच विदुरांनी रथशाळा चालू ठेवली आहे, म्हटलं, तर फारसं वावगं होणार नाही.’
‘पण इथं तर शेकडो कारागीर होते. आपल्या चंपानगरीहूच…’
‘ते सारे इंद्रप्रस्थाला आहेत. नवी राजधानी उभारली जाते ना! पांडवांची रथशाळा सज्ज करण्यासाठी भीष्माचार्यांनी त्यांना इंद्रप्रस्थाला पाठवलंय्. पांडवांनी उभारलेल्या राजधानीमुळं हस्तिनापुराच्या साऱ्या कलावंतांना, शिल्पकारांना चांगले दिवस आलेत.’
‘इंद्रप्रस्थ एवढं भव्य आहे?’
‘त्यापुढं हस्तिनापूर काहीच नाही. रथशाळा सज्ज करण्यासाठी मीच गेलो होतो ना! कर्णा, पांडवांनी उभारलेली मयसभा पाहून तू थक्क होशील. देवांनीसुद्धा हेवा करावा, अशी ती मयसभा आहे. आपली गजशाला त्याच कामावर होती.’
‘गजशाला?’
‘नाहीतर एवढा भव्य प्रासाद, गोपुरं, मयसभेसारखी सभागृहं उभी करायची, तर त्याला लाकूड नको? देवदार, साग, तालवृक्षांचे प्रचंड सोट ओढून आणणं हे का माणसांचं काम? त्यासाठी आपली गजशाळाच नव्हे, तर आपलं चतुरंग दळही राबत होतं. कर्णा, आकाशात सूर्य-चंद्र शोभावे, तसं हस्तिनापुर आणि इंद्रप्रस्थ या भूमीवर शोभतात.’
रथाचं चाक रथाला जोडलं होतं. उमदे अश्व रथाला जुंपले होते. रथ तयार झालेला पाहून अधिरथ कर्णाला म्हणाला,
‘चल, कर्णा! रथाची परीक्षा पाहू अन् मग घरी जाऊ.’
कर्ण रथारूढ झाला. अधिरथाने वेग हाती घेतले. मंदगतीने रथ रथशाळेबाहेर आला. रथाबरोबर द्रूम सेवकांसह आला होता. अधिरथ कर्णाला म्हणाला, ‘कर्णा, उतर.’
‘मी येतो ना!’
‘कर्णा, हा युवराजांचा रथ आहे. त्याची जोखीम मोठी. कौरवसाम्राज्याच्या युवराजांचा रथ सर्व गुणानी श्रेष्ठ असला पाहिजे. या रथाची परीक्षा वेगळी आहे.’
‘वेगळी?’
‘हो! रथ समतोल धावला पाहिजे. ते पाहायचंच झालं, तर रथाला वेग देण्याआधी मी रथाच्या कुण्या काढून घेतो अन् रथ पळवतो. दोन्ही चाकांच्या समतोल वेगानंच रथाला आवळणी लागायला हवी. चाक न सोडता रथ धावायला हवा. तू उतर. बघ.’
कर्ण उतरला. अधिरथांनी क्षणभर डोळे मिटले. रथाला वंदन केले. वेग हाती घेऊन ते रथावर उभे राहिले. समोर दूरवर गेलेला रस्ता निरखला आणि सेवकांना आज्ञा केली, ‘कुण्या काढा.’
रथाला लावलेल्या कुण्या काढल्या गेल्या. कर्णाचा श्वास रोखला गेला. आसुडाचा आवाज उठला. रथ भरधाव सुटला. काही वेळातच वळणावर रथ दिसेनासा झाला.
त्या मोकळ्या रस्त्याकडे कर्णाचे लक्ष लागले होते.
हळूहळू रथाचा आवाज ऐकू येऊ लागला. रथ दिसू लागला. भरघाव वेगाने रथ दौडत येऊन थांबला. घोड्यांची ओठाळी फेसाळली होती.
अधिरथ समाधानाने खाली उतरला व अभिमानाने म्हणाला, ‘रथ सिद्ध झाला.’
‘कुण्या काढून रथ कुणालाही चालवता येईल?’
अधिरथ हसला, ‘कुणालाही नव्हे! ज्याला रथपरीक्षा आहे, त्यालाच हे जमेल. अन् कर्णा, कुण्या काढून रथ चालवणं हा काही रथाचा गुण नव्हे. ती परीक्षेची पद्धत आहे माझी.’
सेवकांनी रथ रथशाळेत नेला अन् कर्ण-द्रूमांसह अधिरथ आपल्या रथातून स्वगृही परतला.
✍️ *क्रमश* ✍️
