🚩 *राधेय/११* 🚩
करभार घेऊन भीम निघून गेला आणि त्याबरोबर कर्णाच्या मनाची शांतताही हरवली. अकारण झालेल्या अपमानाने त्याचे मन पोळून निघाले. उलटणारा दिवस अधिकच मनस्तापाचा जात होता नित्यसूर्योपासनेसाठी कर्ण नदीकडे जायला सिद्ध झाला होता. रथ सज्ज करण्याची त्याने आज्ञा दिली होती.
वृषालीने विचारले, ‘अजून पुष्कळ वेळ आहे.’
‘मानलं, तर आहे, मानलं, तर नाही. वसू, हरवलेली मन:शांती परत मिळवायला एवढी एकच वाट आता या कर्णाजवळ आहे. ईश्वरचिंतनात मन हलकं होतं.’
वृषाली काही बोलली नाही. कर्णरथ प्रासादाबाहेर पडला. राजरस्त्याने रथ जात होता. वाटेने काही घरांसमोर माणसांचे थवे गोळा झालेले दिसत होते. त्या घरांतून उठणारा रडण्याचा आवाज कानांवर येई. रथाचा आवाज ऐकून घरापुढे गोळा झालेले लोक मागे वळून पाहत आणि परत त्यांची दृष्टी खाली वळे. नगरीत नांदणारी चमत्कारिक शांतता कर्णाला सहन करणे अशक्य झाले. त्याने आपल्या सारथ्याला रथाला वेग देण्याची आज्ञा केली. रथ भरधाव सुटला. नदीकाठी वृक्षराईत रथ थांबताच कर्ण रथातून उतरला व नदीकडे चालू लागला.
नदीकाठी त्याची पावले थांबली. नदीचे विस्तृत वाळवंट अगदी मोकळे होते. सूर्यकिरणांच्या दाहात सारे वाळवंट प्रखर बनत होते. त्या प्रवाहातून वाहणाऱ्या नीलवर्णीय प्रवाहाचे तेवढे सुख नेत्रांना वाटत होते. त्या गूढ शांततेत कर्णाचे मन शांत झाले. कर्णाची पावले करकरत, वाळूत रुतत पुढे जात होती.
नदीजवळ जाताच कर्णाने पादत्राने काढून ठेवली, हातातले कोरडे अंतरीय आणि अंगावरचे उत्तरीय वाळूवर ठेवून त्याने जलात प्रवेश केला. पायाच्या तळव्यांना तो गार स्पर्श सुखकारक वाटत होता. कर्णाने सूर्याला वंदन केले. किरणांनी सूर्याचे मुख उजळले होते. कर्ण थोडे अंतर चालत गेला आणि त्या प्रवाहित जलाशयात आपले शरीर त्याने झोकून दिले. एक कासावीस करणारी शिरशिरी त्याच्या अंगावर उमटली; पण क्षणभरच. कर्ण अगदी मोकळ्या मनाने नदीत पोहत होता. मनसोक्त पोहून होताच तो काठावर आला आणि जलात उभा राहून, हात उंचावून तो सूर्योपासनेत मग्न झाला. पाहता-पाहता त्या चिंतनात त्याचे भान हरपून गेले.
त्याची सूर्योपासना संपली, तेव्हा सूर्याचे किरण त्याच्या पाठीवर आले होते. लांब मानेवर रुळणारे काळेभोर केस कोरडे होऊन त्याच्या मानेवर चिकटले होते. सूर्यकिरणांनी त्याचे अंग कोरडे केले होते.
कर्णाने शांतपणे गंगेतील जल हाती घेतले आणि त्या पाठोपाठ त्याचा आवाज प्रगटला, ‘कोणी याचक आहे?
मागून प्रतिसाद आला नाही.
कर्णाने समाधानाने परत विचारले, ‘कोणी याचक आहे?’
‘आहे’ कोमल आवाज आला.
कर्णाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. तो मागे न वळता म्हणाला, ‘हे याचका, माझा धर्म आणि माझं पौरुष वगळून जे तुझं मनोवांछित असेल, ते पूर्ण करण्यास मी वचनबद्ध आहे.
‘कर्णाने हातांतले जल साडले आणि तो याचकाचे दर्शन घण्यासाठी वळला.
नदीकाठावर एक चंद्रकळा नेसलेली एक स्त्री उभी होती. काळे वस्त्र परिधान केलेली ती स्त्री अधोवदन उभी होती. माथ्यावरचा पदर पुढे ओढल्याने तिचे रूप दिसत नव्हते.
कर्णाने विचारले, ‘माते! तुझी इच्छा बोल. ती पुरी करण्यात मला धन्यता वाटेल.’
पण ती आकृती काही बोलली नाही.
‘बोल, माते, संकोच करू नकोस. आजवर कोणत्याच याचकानं संकोच दाखवला नाही, ना माझ्या दातृत्वावर अविश्वास दाखवला. तुला काय हवं?’
‘माझा पुत्र मला हवा.’ शुष्क शब्द उमटले.
‘पुत्र! मी समजलो नाही, माते!’
‘कालच्या रणांगणावर माझा मुलगा अकारण बळी गेला, तो माझा एकुलता एक मुलगा मला हवाय्.’
‘मातेऽ ऽ’
‘आपल्या दातृत्वाबद्दल मी खूप ऐकलंय्… कोणीही याचक विमुख माघारी जाता नाही, असा आपल लौकिक.’
‘पण माते याचनेलाही रूप असावं लागतं.’
‘कसलं रूप?’
‘घन रूप! रात्रीचा अंधार आणि दिवसाचा प्रकाश मागितला, तर तो देणं कसं शक्य आहे? त्या घटना फक्त सूर्यतेजाला बद्ध असतात, जन्म-मृत्यू, मानवाच्या अधीन नसतात.’
‘पण कारण अधीन असतं ना! माझ्या मुलाच्या अपमृत्यूला तुम्हीच कारण नाही का?’
‘मी?’ कर्ण उद्गारला.
‘हो! क्षमा असावी, राजन्. पुत्रहीन संकोच पाळता येत नाही…’
‘माते, स्पष्ट बोल. केवढंही कटू असेल; पण ते सत्य असेल, तर मी ते आनंदानं सहन करीन. ‘
‘ते सत्य आहे. रणांगणावर माझ्या मुलाचा मृत्यू घडला.’
‘रणांगणाचा निर्णय कुणी सांगावा!’
‘तेही मी जाणते. रणांगणावर जाणाऱ्या वीरास मृत्यूचं आह्वान स्वीकारावंच लागतं; पण माझ्या मुलाचा मृत्यू एका वांझोट्या, असफल रणांगणी झाला, त्याचं मला दु:ख आहे!’
‘असफल ?’
‘हां! राजा, तुझ्याच आज्ञेनं ते रणांगण घडलं ना! ज्या रणभूमीवर जय अथवा पराजय याचा निर्णय लागणार नव्हता, त्या रणभूमीवर माझ्या मुलाला पाठवण्याचा अधिकार काय होता? करभार द्यायचाच होता, तर ते युद्ध कशासाठी केलं? हौस म्हणून, की प्रजानिष्ठेचा भार कमी व्हावा, म्हणून?’
अपराहण काळाच्या उन्हापेक्षाही ते शब्द दाहक होते.
‘त्यात माझा दोष नव्हता.’
‘हां, मग माझ्या मुलाचा दोष? खरं आहे… दोष त्याचाच. राजा म्हणून निष्ठा ठेवली, योग्य-अयोग्य याचा विचार न करता, दाखवला तो शत्रू मानला आणि कर्तव्याचं पालन करण्यासाठी अखेरच्या क्षणा पर्यंत तो लढला. दोष त्याचा. आपला नाही. आपल्या निष्ठेपायी बळी जाणारे गेले आणि ज्यांनी ते बळी घेतले, त्यांना करभार देऊन आपण संकटापासून स्वत:ला सुरक्षित राखलंत.’
‘बोल, माते! थांबलीस का? गेले दोन दिवस जे माझ्या मनात खुपत आहे, तेच तू बोलते आहेस. ते सारं मला ऐकू दे.’
‘मला काही नको, मला माझा मुलगा हवाय्.’
‘मा! ढळलेली मनःशांती, हरवलेलं स्वप्न आणि गेलेला जीव प्रयत्नसाध्य नसतो.’
‘तो विचार मी कशाला करू? दानाला उभं राहणाऱ्यानं तो करावा, जिवाचं मोल द्यायला वीर रणांगणावर जातात. राजाचा विश्वासघात ते जाणत नाहीत.’
त्या शेवटच्या वाक्यानं कर्णाचं अंग काष्ठवत झालं. निश्चयी स्वरात तो म्हणाला, ‘ठीक आहे मते तुझा पुत्र तुला मिळेल. यापुढं रणांगणी जो वीर गेला, त्याचं नाव कर्ण होतं. तुझा मुलगा यापुढं माझ्या रूपानं जिवंत आहे, असं समज.’
‘मातेच्या मनाला फसवणूकीची फुंकर घालता येत नाही.’
‘ही फसवणूक नाही, माते! मला दोन दिवसांचा अवधी दे. या दोन दिवसांत चंपानगरीचा दुसरा अधिपती बनेल आणि मी कर्ण तुझ्या घरी, तुझा पुत्र म्हणून सेवेला येईन. तुझ्या मुलानं जे सुख दिलं असेल, तेच सुख अखंड देण्यासाठी मी माझी सारी तपश्चर्या पणाला लावीन, यात तिळमात्र शंका धरू नकोस. ती प्रतिज्ञा…’
कर्णाच्या त्या शब्दांबरोबर ती व्यक्ती भर वादळात एखादी वेल थरथरावी, तशी कापू लागली पाळलेला संयम, कठोरता कुठच्या कुठे गेली ती किंचाळली, ‘नको! राजन् ती प्रतिज्ञा करू नका. माझं दुःख मी सहन करीन. पुत्रहीन मातेपेक्षा पुत्रवान मातांचं संरक्षण करायला तुझ्यासारखा राजा मिळायचा नाही.’ उभ्या जागी ती स्त्री अश्रु ढाळू लागली.
कर्णाचे मन त्या बोलांनी विद्ध झाले. तो शांत पावले टाकीत तिच्या समोर गेला. आपल्या निश्चयी हातानी त्याने अवगुंठन उचलले. त्या रूपदर्शनाबरोबर कर्णाचा चेहरा फटफटीत पडला. चक्रधराची पत्नी अवंती समोर उभी होती.
‘अवंती! तू S S, तुझा कौस्तुभ….!’
‘भाऊजी S S, माझा कौस्तुभ हरवला. कायमचा…’ अवंती बोलता-बोलता वाळूवर ढासळली.
कर्ण पुढे झाला. हातांच्या आधाराने त्याने अवंतीला कष्टाने उभे केले. अवंतीचे सांत्वन करायला कर्णाजवळ अश्रुंखेरीज काहीही राहिले नव्हते. अवंतीला सावरून तिला आधार देत तिच्यासह कर्ण रथाजवळ आला. अवंतीला स्वगृही पोहोचवून कर्णाचा रथ प्रासादाकडे वळला. आपल्याच विचारात प्रासादाच्या पायऱ्या चढून कर्ण आत प्रवेश करणार, तोच त्याची पावले दाराशी थांबली. आतून हसण्याचा आवाज येत होता. कोणीतरी धावत येत होते.
महालाच्या आतल्या द्वारातून चक्रधर धावत बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ वृषसेन धावत येत होता. वृषसेन उंबऱ्यावर येताच त्याने धनुष्याला प्रत्यंचा जोडल्याचा आविर्भाव केला. बाण सुटताच चक्रधर महालात कोसळला व हसत म्हणाला, ‘मेलो S S’
‘व्वा!’ वृषसेन नाराजीने म्हणाला. ‘एका बाणानं कधी मरतात का?’
पडल्या जागेवरून डोळे किलकिले करीत चक्रधर म्हणाला, ‘युवराज! शेकडो बाण लागले, तरी जीव जातो एकाच बाणानं… जो काळजात घुसतो, त्यानं.’
त्याच वेळी संतापलेली वृषाली आत आली. ‘हे काय, भाऊजी, लहान का आहात मुलाबरोबर खेळायला!’
चक्रधर गडबडीने अंग झटकीत उठला आणि त्याचे लक्ष दारात उभ्या असलेल्या कर्णाकडे गेले. कर्ण धावला. चक्रधर त्याच्याकडे पाहत होता. कर्णाच्या काळ्याभोर नेत्रांत, खडकातून पाझर फुटावा, तसे पाणी गोळा झाले आणि क्षणात पापण्यांवरून ते गालांवर ओघळले. गुदमरलेल्या स्वरात कर्ण म्हणाला, ‘मित्रा S S’
कर्णापासून दूर होत चक्रधर म्हणाला, ‘मित्रा, बाण आरपार निघून गेला. विसरलोच, बघ. हस्तिनापुराला जाण्यासाठी रथ आणि दल तयार आहे. केव्हाही मुहूर्त ठरव. येतो मी.’ चक्रधर तसाच निघून गेला.
वृषाली जवळ आली. कर्ण आपले डोळे टिपीत होता.
वृषालीने विचारले, ‘काय झालं?’
‘वसू S S, चक्रधराचा कौस्तुभ परवाच्या रणांगणावर हरवला. कायमचा…’
– आणि वृषसेनाला छातीशी कवटाळून कर्णाने आवरलेल्या अश्रूंना वाट करून दिली.
✍️ *क्रमश* ✍️
