🚩 *राधेय/१०* 🚩
भल्या पहाटेची वेळ होती. अद्यापि सूर्योदयाला बराच वेळ होता. सर्वत्र नीरव शांतता पसरली होती. रणवेश परिधान केलेला कर्ण आपल्या रथात आरूढ झाला होता. चक्रधर रथ चालवीत होता. कर्णाने चक्रधराला संकेत केला आणि रथ चालू लागला. रथाच्या पाठोपाठ अश्वदळ दौडत होते.
कर्णाचे शिबिर दिसू लागले. शिबिरावर असंख्य शेकोट्या पेटल्या होत्या. कर्णाचे दल त्या पहाटेच्या काळोखात सज्ज होत होते. पांडवसेनेचा तळ तिथून दिसत होता. रानामध्ये वणवा लागावा, तशी त्या शेकोट्यांची मालिका दिसत होती.
सूर्योदयाची वाट पाहत कर्ण त्या शेकोटीजवळ उभा होता. त्याच्या मुखावर ज्वालांचा उजेड खेळत होता. उठणाऱ्या ज्वालांवर धरलेल्या हातांच्या बोटांची चाळवाचाळव होत होती. ज्वालांचा दाह त्या बोटांना झाला की, हात मागे येत होते. ज्वालांचे ते अग्निनृत्य कर्ण एकटक पाहत होता. पहाटेचा उजेड फाकू लागला. दोन्ही दळांतून नौबती वाजू लागल्या.
तळावर एकच धावपळ सुरू झाली. हळूहळू सूर्योदयापूर्वीच दळ सज्ज झाले.
‘अंगराजऽऽ’
‘अं…’ कर्णाने वळून पाहिले. चक्रधर उभा होता.
दीर्घ नि:श्वास सोडून कर्ण म्हणाला, ‘चल.’
कर्ण रथारूढ झाला. पण नेहमीप्रमाणे रथात ठेवलेले धनुष्य त्याने हाती घेतले नाही. दलांच्या मध्यभागी रथ उभा राहिला. हळूहळू सूर्यबिंब क्षितिजावर उमटले आणि भीमाच्या रथातून शंखनाद उमटला; पण कर्णरथातून त्याला प्रत्युत्तर गेले नाही. चक्रधराने पाहिले, तो कर्ण शांतपणे रथात उभा होता. भीमाचे परत आह्वान आले आणि कर्ण म्हणाला, ‘मित्रा, भीमाच्या भेटीला आपण जाऊ.’
सारे सैन्य सोडून एकाकी कर्णरथ येताना पाहून भीमाला नवल वाटले. रथ नजीक येताना पाहताच भीमाने आपल्या धनुष्याला प्रत्यंचा जोडली. कर्णरथ स्पष्ट दिसू लागला. कर्णाच्या हाती धनुष्य नव्हते. शस्त्ररहित तो रथामध्ये उभा होता. रथ जवळ येताच भीमाच्या कानांवर शब्द पडले.
‘पंडुपुत्र भीमाचा विजय असो. अंगराज कर्ण आपलं स्वागत करीत आहे.’
भीमाने ते अपेक्षिले नव्हते. कर्णाचा अहंकार, त्याचे रौद्र रूप भीमाला माहीत होते. सावधपणे त्याने विचारले,
‘कोणत्या हेतुनं हे स्वागत होत आहे?’
‘राजसूय यज्ञाच्या पवित्र कार्यास्तव बाहेर पडलेल्या वीरांना मी विरोध करीत नसतो.’
‘हे काल सुचलं असतं, तर पटलं असतं. अंगराज, पराजयाची भीती वाटली?’
‘मुळीच नाही.’ आपला संताप आवरीत कर्ण म्हणाला, ‘आपण राजसूय यज्ञाचं आमंत्रण देण्यासाठी आला आहात ना?’
‘हो! जे करभार देऊन सत्ता मान्य करतात, त्यांना आमंत्रण दिलं जातं अन्…’
‘आणि काय?’
‘आणि जे मान्य करीत नाहीत, त्यांचा पराजय करून राजसूय यज्ञाला येण्याची आज्ञा दिली जाते. आपल्याला आमंत्रण हवं, की आज्ञा, ते आपणच ठरवावं. दोन्हीला माझी तयारी आहे.’
‘आपल्याला इच्छित करभार देऊन आपल्या राजसूय यज्ञाच्या सोहळ्यात भाग घेण्यात मला आनंद वाटेल.’
‘पराजय स्वीकारलात ना?’
‘त्यामध्येच समाधान असेल, तर तसं मानावं. मी आपल्याला चंपानगरीला न्यायला आलो आहे.’
‘आपली इच्छा!’
कर्ण आपल्या रथातून उतरला. भीमाच्या रथावर आरूढ होण्याआधी त्याने भीमाच्या सारथ्याला उतरण्यास सांगितले. सारथी उतरताच कर्णाने त्याची जागा घेतली. आश्चर्यचाकित झालेला भीम म्हणाला,
‘अंगराज, आपण सारथ्य करणार?’
मागे वळून न पाहता कर्ण म्हणाला, ‘आपण चंपानगरीत येणार. आपलं सारथ्य मी करणं अधिक योग्य आहे. अधिक सुरक्षित आहे.’
भीमाच्या रथापाठोपाठ कर्णाचा मोकळा रथ आणि भीमाचे रक्षकदळ येत होते. कर्णाच्या तळावर कर्णाचे रक्षकदळ रथाच्या अग्रभागी दौडू लागले. चंपानगरीच्या दिशेने धुरळ्याचा लोट दिसू लागला.
चंपानगरीच्या भक्कम तटांच्या द्वारात रथ थांबला. खंदकावर फळ्या सोडण्यात आल्या. कर्णासह भीमाने चंपानगरीत प्रवेश केला.
भीम चंपानगरीच्या सौंदर्याने चकित होऊन गोपुरे, पुष्करणी, उद्यानांनी नटलेली ती चंपानगरी पाहत होता. रुंद राज रस्त्यांवरून अश्वदळापाठोपाठ रथ दौडत होता. एरवी कर्णरथ दिसताच कर्णदर्शनाने आनंद होऊन त्याला वंदन करणारे लोक राजरस्ता टाळण्याच्या प्रयत्नात गुंतलेले दिसत होते. त्या सुंदर वैभवसंपत्र नगरीतील ते खिन्न रूप भीमाला जाणवले. तो न राहवून म्हणाला, ‘अंगराज, यक्षनगरी सारखी तुमची सुंदर नगरी आहे; पण यक्षनगरीचा भोग घेण्याइतके आपले प्रजाजन अद्याप सुजाण झालेले दिसत नाहीत. त्यांची उदासीनता…’
कर्ण खिन्नपणे हसला. तो म्हणाला, ‘हे महाबाहो भीमा, सर्वसामान्य माणसाला पराजय सहजपणे पचवता येत नसतो.’
भीमाच्या भुवया वक्र झाल्या. त्याने उत्तर दिले, ‘खरं! अगदी खरं! पराजय पचवायला मन कोडगं असावं लागतं. आपली ताकद त्या सर्वसामान्यांत असेल कोठून!’
कर्णाने मागे पाहिले नाही. त्याच्या हातातला अासूड उंचावला गेला. आसुडाच्या वेदनेबरोबर रथ उधळला, रथाच्या खांबाचा आधार घेऊन उभा असलेला भीम मोठयाने हसत होता.
प्रासादामध्ये सुवर्णासनावर भीम बसला होता. कर्णाचे सचिव त्याच्या मागे उभे होते. भीमासमोर उंची मद्याची सुरई, पेला ठेवला होता, पण भीमाचे तिकडे लक्ष नव्हते. भीम बसल्या जागेवरून कर्णप्रासादाचे वैभव निरखीत होता. तो काय बोलतो, इकडे सर्वांचे लक्ष लागले होते, भीम परत मोठयाने हसला व म्हणाला, ‘अंगराज, तुमचा प्रासाद मला आवडला. ही भूमी एवढी संपन्न असेल, असं मला वाटलं नव्हतं.’
‘परमेश्वरकृपेनं ही भूमी आजवर सुरक्षित होती.’
‘पुढंही राहील… आमच्या कृपेनं. अंगराज, हा प्रासाद तुम्हीच बांधलात की, पूर्वी होता?’
‘मी बांधला.’
‘सुरेख! अंगराज, तुम्ही तो पराक्रम केला नसता, तर कदाचित आज मी या चंपानगरीचा स्वामी बनलो असतो.’
‘कसला पराक्रम?’
‘जरासंधाचा मल्लयुद्धात तुम्ही पराभव केला होता ना! त्यानंच ही नगरी तुम्हांला दिली ना?’
‘हो!’
‘त्याच तुमच्या मित्राचा- जरासंधाचा युद्धात वध करून मी दिग्विजयासाठी बाहेर पडलोय्.’
‘जरासंधाचा वध झाला? युद्धात…’
‘हो, मी केला. मल्लयुद्धाचं, त्याचं आह्वान मी स्वीकारलं. त्यातच त्याचा वध झाला.’
जरासंधाच्या मृत्यूच्या बातमीनं कर्णाच्या मनाला वेदना झाल्या. मनमोकळा, औदार्यशाली जरासंध कर्णाच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. शेवटची पेट घडली होती द्रौपदीस्वयंवर प्रसंगी. कर्णाला पाहताच प्रेमभराने त्याने स्वागत केले होते.
‘का? बोलत का नाही?’ भीमाने विचारले.
‘वार्धक्यापुढं इलाज नसतो.’
भीम मोठयाने हसला. सारा महाल त्याच्या हसण्याने भरून गेला. ‘अंगराज! आपण जेव्हा मल्लयुद्धाचं आह्वान स्वीकारलंत, तेव्हा जरासंध तरुण नव्हता. तो वृद्धच होता.’
‘ते मला माहीत होतं, म्हणूनच मी त्याला सोडलं, पंडुपुत्रा! मानवाच्या वाढत्या जीवनाबरोबर त्याच्या इच्छा-आकांक्षा वाढत जातात. फक्त दोनच गोष्टींचं भान त्याला कधी येत नाही.’
‘कोणत्या?’
‘वार्धक्य! त्याची जाणीव त्याला केव्हाही होत नाही.’
‘आणि?’
‘मृत्यू! तो अटळ आहे. केवढाही दिग्विजय केला, तरी एक ना एक दिवशी सारं मिळवलेलं जिथल्या तिथं टाकायला लावणारा. निर्जीव बनवणारा तो मृत्यु! त्याचं अस्तित्व कधीच जाणवत नाही.’
मृत्यूच्या भीतीने भीमाचे अंग शहारले. विजयी हसणे मावळने, तो रूक्षपणे म्हणाला, ‘जन्म-मृत्यूच्या निर्णय ऐकायला पाठशाला, आश्रम उदंड आहेत. त्यासाठी आम्ही इथं आलो नाही. अंगराज, आमचा करभार…’
‘सर्व व्यवस्था केली आहे.’
सचिवांनी तबकांवरची आच्छादने काढली. अनेक सुवर्णतबकांत नाना तऱ्हेची रत्ने ठेवली होती. त्या रत्नांवर दृष्टी ठरत नव्हती. भीमाला काही बोलायला सुचत नव्हते.
कर्ण म्हणाला, ‘पंडुपुत्र, आपलं समाधान होतं नसेल, तर आणखी…’
‘नको! एवढयावर मी तृप्त आहे. ठीक आहे. आम्ही येतो. माझ्या भ्रात्यांच्या वतीनं मी आमंत्रण देत आहे ते स्वीकारावं.’
‘ही विनंती, की आज्ञा?’
भीमाला उत्तर सुचले नाही. त्याने पाहिले. कर्णाच्या नजरेत एक वेगळाच शांत भाव प्रगटला होता. त्या दृष्टीला दृष्टी भिडवण्याचे सामर्थ्य भीमाच्या ठायी नव्हते. भीम अगतिक बनला. कर्णाची नजर चुकवीत तो म्हणाला, ‘अंगराज, मी विनंती करतोय् आम्ही येतो.’
‘क्षमा!’ कर्ण म्हणाला, मध्याह्नकाळ जवळ येतोय् इथंच आपलं भोजन झालं, तर…’
पुढे कर्णाला बोलावे लागले नाही. पाठमोऱ्या भीमाचे शब्द स्पष्टपणे कानांवर आले, ‘शरणागताच्या गृही क्षत्रिय अन्नग्रहण करीत नसतात.
✍️ *क्रमश* ✍️
