🚩 *राधेय/९* 🚩
चंपानगरी सुखाने नांदत होती. कर्णासारख्या दातृत्वशील राजाच्या आधिपत्याखाली नागरिक तृप्त होते. आपल्या प्रजेचे कल्याण चिंतणारा कर्ण राज्यकारभारात मग्न होता, पण उलटणाऱ्या वर्षांबरोबर त्याचे समाधान ढळत होते. हस्तिनापुराहून येणाऱ्या वार्तांनी तो गोंधळात पडत होता. पांडवांनी इंद्रप्रस्थ नगरी उभारली होती. मयसभेसारख्या अलौकिक सभेचे वर्णन कर्णाच्या कानांवर येऊन गेले होते. वर्षे उलटत होती. हे सारे घडत होते. पण हस्तिनापूरची वार्ता कळत नव्हती. दुर्योधनाचा कोणताच निरोप कर्णाला आला नव्हता.
या चिंतेने ग्रस्त असतानाच एके दिवशी पांडवदल अंगराज्यावर चालून येत असल्याचे कर्णाला समजले. कर्णाने आपली सारी सेना गोळा केली. रथशाळेतून घरघराट करीत रथ बाहेर धावू लागले. चंपानगरीच्या राजरस्त्यांवरून टापांचा आवाज करीत अश्व धावू लागले. आपल्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन नाना शस्त्रे धारण करणारे वीर आपापल्या दळात सामील होऊ लागले.
आपल्या सेनेसह कर्ण अंगदेशाच्या सीमेवर उभा राहिला. जेव्हा त्याला पांडवसेनेचे दर्शन घडले, तेव्हा कर्णाच्या आश्चर्याला सीमा राहिल्या नाहीत. ग्रीष्मकाळात धरतीवर मेघांची सावली फिरावी, तसे पांडवांचे चतुरंग अफाट दळ पुढे सरकत होते. ज्यांनी इंद्रप्रस्थ निर्माण करून काही वर्षे झाली नाहीत, तेच पांडव एवढ्या सैन्यानिशी येतात, यावर कर्णाचा विश्वास बसत नव्हता.
दोन्ही दळे एकमेकांना भिडली आणि तुंबळ युद्ध सुरू झाले. हत्तींचा चीत्कार, चाकांचा आवाज, शंख व रणनौबतींच्या आवाजाने पृथ्वी धुंदावून गेल्याचा भास होत होता.
कर्ण रथदळाच्या अग्रभागी उभा होता. आपल्या सेनेचा पराक्रम तो पाहत असता कर्णाचे सारथ्य करणारा चक्रधर म्हणाला, ‘कर्णा, ते बघ.’
कर्णाची दृष्टी वळली. सूर्योदयाला आरक्त्त सूर्यबिंब क्षितिजावर प्रकटावे आणि पाहता-पाहता त्याने पूर्ण आकार धरावा, तसा एक सुवर्णरथ दौडत कर्णदिशेने येत होता. ते सिंहचिन्ह पाहताच तो भीमाचा रथ आहे, हे कर्णाने ओळखले, कर्णाचा रथ भीमाला सामोरा गेला.
भीमाचा रथ कर्णाजवळ आला. भीम आपल्या रथात सारथ्यामागे उभा होता. रथाच्या हालचालींबरोबर तोल सावरीत असलेला भीम आपल्याच गर्वात उभ्या जागी डुलणाऱ्या मत्त हत्तीसारखा भासत होता. तप्त सुवर्णाप्रमाणे शुद्ध गौर वर्णाचा, विशाल व दीर्घ स्कंध असलेला आणि पुष्ट व दीर्घ बाहूंचा तो भीम कर्णाकडे पाहत होता.
कर्णाने आपल्या धनुष्याला बाण जोडलेला पाहताच, त्वेषाने भीमाने त्याचे अनुकरण केले आणि तुंबळ युद्धाला सुरुवात झाली.
सूर्यास्तापर्यंत ते भयानक युद्ध सुरू होते; पण जय-पराजयाची निश्चिती सांगता येत नव्हती. सूर्यास्त होताच दीर्घ शंखनाद रणभूमीवर उमटला आणि त्या दिवसाचे युद्ध थांबले.
भीमाने तिरस्काराने कर्णाकडे दृष्टिक्षेप केला आणि तो गरजला, ‘राधेया… सूतपुत्रा… उद्या रणभूमीवर तुला एवढे कष्ट पडणार नाहीत. स्वगृही जाऊन विश्रांती घे, पृथ्वीतलावरची शेवटची विश्रांती मनसोक्त भोग.’
हेच ते शब्द. शस्त्रस्पर्धेच्या वेळी याच भीमाने असाच उपहास केला होता. वयाबरोबर रूपात फरक पडला, पण वृत्ती तीच राहिली- असंयमी, संतापी, गर्विष्ठ.
कर्णाने चक्रधराला रथ वळवायला सांगितले. रथ चंपानगरीच्या दिशेने दौडत होता. कर्ण प्रासादात आला, तेव्हा पालिते घेतलेले सेवक धावले. प्रासादात जाताच हस्तिनापुराहून अश्वत्थामा आल्याचे कळले. त्या बातमीने कर्णाच्या उद्विग्न मनाला थोडी शांतता लाभली. अधीऱ्या पावलाने तो अश्वत्थाम्याला सामोरा गेला. दोघांची भेट झाली.
‘गुरुबंधो! हे घडतंय् तरी काय? काही अपराध नसता पांडवांचं सैन्य माझ्या राज्यावर चालून येतं आणि कौरवेश्वर गंमत पाहत बसतात.’
‘मी ऐकलं की, युद्ध सुरू झालं.’
‘हो! ज्याचा निर्णय, हेतू निश्चित नाही, असं युद्ध करून मी माघारी परत आलो.’
‘निर्णय, हेतू?’
‘नाहीतर काय! ज्या पांडवांचं धृतराष्ट्र महाराजांनी स्वागत केलं, खांडवप्रस्थासह अर्धं राज्य दिलं, त्या पांडवांवर मी शस्त्र धरू? भीमाचा पराभव झाला, तर त्याबद्दल माझं कौतुक केलं जाणार होतं, की निंदा, हे सांगणार कोण?’
‘मी सांगतो, अंगराज! त्या भीमाचा पराभव केलात, तर तुम्ही दोषी ठराल.’
‘अं…?’
‘अपेक्षेपेक्षा मला थोडा वेळ झाला. नाहीतर आजचं रणांगणही चुकलं असतं. कौरवांचे मुख्य मंत्री, सल्लागार विदुर अन् पितामह भीष्मचार्यांचा आज्ञेनं मी इथं आलो आहे.’
‘काय आज्ञा आहे.’
‘कौरवांशी एकनिष्ठ असलेल्या राजांनी पांडवांना विरोध करू नये. पांडव राजसूय यज्ञ करण्याच्या इच्छेनं करभार गोळा करीत आहेत. दिग्विजयासाठी ते पाच वाटांनी निघाले आहेत. तेव्हा सर्वांनी पांडवांना करभार द्यावा, सख्य राखावं, अशी आज्ञा आहे.’
‘अन् युवराज दुर्योधन…’
‘ते या मसलतीत नाहीत.’
‘म्हणजे! काही मतभेद झाले?’
‘मला माहीत नाही.’
‘गुरुबंधो! असत्य भाषण करू नकोस. युवराज दुर्योधनाचा तू माझ्याइतकाच जवळचा मित्र.’
अश्वत्थामा त्या उद्गाराने चपापला; पण आपला आवाज स्थिर ठेवीत तो म्हणाला, ‘मला काही माहीत नाही. सेवकाला आज्ञापालन एवढंच माहीत असतं. मी जातो.’
‘अशा अपरात्री?’
‘मित्रा, जे तुझं घडलं, तेच इतरांचं, पांडवांच्या प्रचंड ताकदीला रानाच्या आश्रयानं राहणारे हे राजे कसे सामोरे जाणार? ते घडण्याच्या आधी जेवढ्यांना सावध करता येईल, तेवढं केलं पाहिजे. तू सामोपचार कर. येतो मी.’
कर्ण अश्वत्थाम्याला पोहोचवायला राजप्रवेशद्वारी गेला. द्वारापाशी पावले थांबली. तो वळला.
‘मित्रा, दूताचं कर्तव्य संपलं. हस्तिनापुराला सारं क्षेम आहे. युवराज दुर्योधन तुझ्याविना एकाकी आहे. अन्…’
‘आणि…’
‘अधिरथ, राधाई तुझी आठवण काढतात. येताना काही निरोप असला, तर पाहावा, म्हणून गेलो होते. तेव्हा अधिरथांनी एक निरोप सांगितला.’
‘कोणता?’
‘ते म्हणाले, आम्ही थकलो. फार पाहावंसं वाटतं.’
‘एवढाच….’ कर्णाला बोलवले नाही.
‘हो! शक्य झालं, तर सहकुटुंब ये, म्हणून सांगितलंय्.’
अश्वत्थाम्याने कर्णाचा निरोप घेतला. फरफरणाऱ्या पालित्यांच्या उजेडात अश्वत्थाम्याचा रथ रात्रीच्या काळोखात दिसेनासा झाला. टापांचा आवाज त्या शांततेत बराच वेळ एकू येत होता.
✍️ *क्रमश:* ✍️
