राधेय – भाग 5

🚩 *राधेय/५* 🚩

द्रुपद राजकन्येच्या स्वयंवराची तयारी द्रुपदाकडून भव्य प्रमाणात करण्यात आली होती. स्वयंवरासाठी येणाऱ्या नृपांच्या वास्तव्यासाठी भव्य नगर आयोजित केलं होतं. पांचाल देशीचे निष्णात कारागीर ती नगरी सुशोभित करण्यासाठी, अलौकिक असा स्वयंवर-मंडप तयार करण्यासाठी ते कारागीर कैक महिने अहोरात्र मेहनत घेत होते. त्या नगरीला यक्षनगरीचे रूप प्राप्त झाले होते.

नगरीत येणाऱ्या नाना देशींच्या नृपांना पाहण्यासाठी प्रजाजनांची राजरस्त्यांवर अखंड गर्दी दिसत होती. कामरूप, मगध, गांधार, सौराष्ट्र, आनर्त, कांबोज वगैरे देशींचे राजे आपल्या ऐश्वर्यासह नगरीत आले.

एके दिवशी दुर्योधन कर्णासह द्रुपदनगरीत प्रवेश करता झाला.

सर्व आमंत्रित नृपांचे आगमन झाल्याचे पाहून द्रुपदाने स्वयंवराचा दिवस निश्चित केला. त्या दिवसाकडे साऱ्यांचे लक्ष वेधले होते.

स्वयंवराचा दिवस उजाडला. नगराच्या ईशान्येला सभामंडप उभारला होता. प्रवेशद्वारी गगनाला भिडलेले गोपुर उभे केले होते. रत्नांकित सुवर्णासनांनी, तोरणांनी सभास्थान अलौकिक बनले होते. द्रुपदांची सचिव मंडळी आलेल्या नृपांचे स्वागत करीत होती.

दुर्योधनासह कर्ण सभामंडपात आला. कर्णाला पाहताच जरासंध आपल्या आसनावरून उठून सामोरा आला. दुर्योधनाला वंदन करीत जरासंध म्हणाला,

‘कौरवाधिपती युवराज दुर्योधन महाराजांचा विजय असो.’

आपली मान नम्रतेने झुकवीत दुर्योधन म्हणाला, ‘आशीर्वाद असावेत.’
जरासंधाने कर्णाचे अभिवादन स्वीकारले. जरासंध प्रेमाने, म्हणाला, ‘अंगराज, क्षेम आहे ना!’

‘आपली कृपा!’

‘आता स्वयंवराची चिंता नाही. युवराज, या अंगराजांच्या उपस्थितीनं स्वयंवराचा निर्णय निश्चित झाला आहे. अंगराज, तुमची मनोकामना पूर्ण होवो!’

दुर्योधनासह कर्ण आसनस्थ झाला. कर्णाचे लक्ष साऱ्या नृपांवरून फिरत असता कृष्णावर स्थिरावले. बलरामाच्या शेजारी बसलेला कृष्ण कर्णाकडेच पाहत होता. कर्णाने बसल्या जागेवरून आपले मस्तक नम्र केले. कृष्णाने स्मितवदनाने त्या अभिवादनाचा स्वीकार केला. कर्णाचे लक्ष मत्स्ययंत्राकडे वळले.

सभास्थानाच्या मध्यभागी जागा मोकळी होती. तेथे मत्स्ययंत्र टांगलेले होते. यंत्राच्या मध्यभागी एक छिद्र होते. यंत्रावर एक मत्स्याकृती फिरत होती. मत्स्ययंत्राखाली एक द्रवाने भरलेले सुवर्णपात्र ठेवलेले होते. त्या पात्रात मत्स्ययंत्र प्रतिबिंबित झाले होते.
सभागृहात शांतता पसरली. कर्णाने पाहिले, द्रुपदराजा मत्स्ययंत्रा जवळ येत होता. हात जोडून तो उभा राहिला. त्याचे शब्द सर्वांच्या कानांवर पडू लागले.

‘वीरहो! द्रौपदी ही यज्ञकुंडातून उत्पन्न झालेली माझी तेजस्वी अशी कन्या असून, तिला मी वीर्यशुक्ला ठरवलं आहे. तरी या यंत्राजवळ ठेवलेलं धनुष्य सज्ज करून, जो या मत्स्याचा वेध घेईल, त्याला माझी सुता वरील. स्वयंवरासाठी तोच माझा पण आहे.’

पण ऐकताच राजे लोकांत कुजबूज सुरू झाली. साऱ्यांचे लक्ष त्या मत्स्ययंत्राकडे व नंतर तेथे ठेवलेल्या धनुष्याकडे जात होते. अचानक कुजबूज थांबली.

सभागृहात राजकन्या प्रवेश करीत होती. द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न पुढे चालला होता. त्यामागून राजकन्या जात होती. मत्स्ययंत्राजवळ चौरंग मांडला होता. द्रौपदी हाती वरमाला घेऊन त्या आसनावर उभी राहिली. कर्ण राजकन्येकडे पाहत होता. तिच्या रूपाबद्दल जे ऐकले होते, त्यात तसूभरही कमतरता नव्हती. किंबहुना त्या वर्णनातच कमतरता होती. द्रौपदीच्या त्या सावळ्या रूपाने साऱ्यांनाच भारावून टाकले.

तिचे नेत्र कमलदलासारखे होते. धनुष्याशी स्पर्धा कराव्यात, अशा वक्र भुवया तिला लाभल्या होत्या. साक्षात दुर्गा मानवी रूपाने प्रगटली, की काय, असा भास साऱ्यांना होत होता.

स्वयंवर सुरू झाले. मत्स्यभेदाचे आह्वान स्वीकारायला एखादा नृप उठला की, तिचा भाऊ धृष्टद्युम्न उच्चरवाने त्या राजाची, त्याच्या शौर्याची ओळख करून देत असे. अनेक राजे उठले, पण त्या महाधनुष्याला प्रत्यंचाही त्यांना जोडता आली नाही. स्वयंवराचा पण पुरा होतो, की नाही, याची शंका सर्वांना वाटू लागली. अग्रभागी बसलेल्या तापसांच्या, ब्रह्मवृंदांच्या चेहऱ्यांवरून चिंतेचे ढग सरकू लागले.

दुर्योधनाने कर्णाकडे पाहिले. कर्ण उठून उभा राहिला.

‘राजकन्ये, तुझ्यासाठी स्वयंवर जिंकण्यासाठी उठलेला जो वीर आहे, त्याच्या पराक्रमाला या पृथ्वीवर तोड नाही. आपल्या पराक्रमानं त्यानं अनेक नृपांना जिंकलंय्. ज्याच्या अलौकिक दातृत्वाची ख्याती त्रिखंडात पसरली आहे, असा अंगराज महारथी कर्ण मत्स्ययंत्राचा भेद करण्यासाठी सभास्थानात अवतरत आहे.’

नृपाचे नाव ऐकताच, मान वर न करता चोरून पाहणारी द्रौपदी, कर्णाचे नाव ऐकताच धीट दृष्ठीने कर्णाकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांत वेगळाच अंगार उसळला. हातची वरमाला थरथरू लागली. ती जवळ येणाऱ्या कर्णाकडे पाहत होती. कर्णाने एकदा द्रौपदीकडे पाहिले आणि त्याने धनुष्याला हात घातला.

द्रौपदीच्या साऱ्या अंगावर काटा उभा राहिला- जणू त्या हाताचा स्पर्श तिलाच होत होता. द्रौपदीचे डोळे विस्फारले गेले. जे धनुष्य अनेकांना पेलता आले नाही, ते कर्णाने लीलया उभे केले होते. वायुवेगाने तालवृक्ष लवावा, तसे कर्णाने धनुष्य वाकवले आणि प्रत्यंचा चढवली. सभागृहातून कौतुकाचे शब्द उमटू लागले; पण कर्णाचे लक्ष तिकडे नव्हते. त्याने ते धनुष्य उचलले. आसनावर ठेवलेला बाण घेऊन, तो धनुष्यावर ठेवून, कर्णाने बैठक घेतली. पात्रातल्या प्रतिबिंबाकडे तो पाहत असता धनुष्य उंचावले जात होते. क्षणभर त्या प्रतिबिंबात दिसणाऱ्या याज्ञसेनीचे दर्शन त्याला झाले. कर्णाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. उजवा गुडघा भूमीवर रोवून, डाव्या गुडघ्यावर हाताचा कोपरा स्थिर करून कर्णाने धनुष्याची पकड घेतली आणि बाणासहित प्रत्यंचा आकर्ण खेचून, एकाग्र मनाने तो मत्स्ययंत्राचा वेध निश्चित करू लागला. मत्स्ययंत्रावर टांगलेला मत्स्य वेगाने फिरत होता. प्रत्यंचा आकर्ण ताणली गेली. साऱ्यांचे श्वास अवरोधले गेले असता, बाण सुटण्याआधीच, त्यापेक्षाही वेध घेणारे तीक्ष्ण शब्दरव राजमंडळात उठले :

‘मी सूतपुत्राला वरणार नाही.’

कर्णाच्या कानांत ते शब्द तप्त रसासारखे पडले. खेचलेल्या प्रत्यंचेचे बळ सरले. कर्णाने संतापाने द्रौपदीकडे पाहिले. द्रौपदीच्या मुद्रेवर तेवढाच संताप स्थिरावला होता.

चकित झालेल्या धृष्टद्युम्नाने विचारले, ‘राजकन्ये, तू काय म्हणालीस?’

‘हो!’ निश्चयी सुरात द्रौपदी उद्‌गारली, ‘सूतपुत्राला मी वरणार नाही, असं सांगितलं. असले दहा मत्स्यभेद यानं केले, तरी मी त्याला कधीही प्राप्त होणार नाही. दादा, सांग त्याला. म्हणावं, कावळ्यानं राजहंसीकडं पाहू नये.’

कर्ण उठून उभा राहिला. हातचे धनुष्य त्याने फेकून दिले. आपली घायाळ दृष्टी त्याने उंचावली. सूर्यदर्शन घडताच, क्रोधाने जळत असताही त्याच्या मुखावर एक विकट हास्य प्रगटले. तो सूर्याकडे पाहून हसला. ते हसणे त्याच्या क्रोधाहून तीव्र होते. द्रौपदीकडे न पाहता कर्ण माघारी येत होता. त्या घटनेने साऱ्या सभेचे भान हरपले होते.

कृष्ण, जरासंध आपापल्या आसनांवरून उठून उभे राहिले होते. दुर्योधन आपले खड़्ग सावरीत आवेशाने सामोरा आला. कर्णाने आपला डावा हात भक्कमपणे दुर्योधनाच्या खड़्गावर ठेवला आणि त्याला बरोबर येण्याची खूण केली. पाहता-पाहता कर्ण दुर्योधनासह स्वयंवर-मंडपाच्या बाहेर आला. शक्यतो लौकर त्या जागेपासून जितक्या दूर जाता येईल, तेवढे जावे, असे कर्णाला वाटत होते.

कर्णामागून येणाऱ्या दुर्योधनाने कर्णाला गाठले. त्याच्या हाताला धरून त्याला थांबवीत दुर्योधन म्हणाला, ‘मित्रा, कशासाठी मला बाहेर काढलंस? त्या राजकन्येचं हरण…’

‘युवराज, ते मला नकोय्.’

‘कर्णा, माझं ऐक! अजूनही वेळ गेली नाही. या राजसभेत जरासंधासारखे माझे अनेक मित्र आहेत. हे स्वयंवर उधळून लावता येईल.’

‘सांगितलं ना, युवराज? मला तसं काही करायचं नाही. ती राजकन्या कुणालाही माळ घालो, मला त्याची चिंता नाही.’

कर्णाच्या उद्‌गारांनी दुर्योधनाला काय बोलावे, हे सुचेना. तो म्हणाला, ‘मित्रा, मी काय करू?’

‘खूप करता येईल. या नगरीत क्षणभरही थांबण्याची माझी इच्छा नाही. मी चंपानगरीला जातो. तेवढी परवानगी द्या. मला आता एकांताची गरज आहे. मी येतो.’

दुर्योधनाला वंदन करून चक्रधर कर्णामागोमाग जाऊ लागला.

त्यानंतर थोड्याच वेळात एक सुवर्णरथ आपल्या अश्वदलासह द्रुपदनगरीतून बाहेर जाताना दिसला.

✍️ *क्रमश:* ✍️