राधेय – भाग ३९

🚩 *राधेय/३९* 🚩

कुरुक्षेत्र ही युद्धभूमी ठरली. पांडव आणि कौरव आपापली दळे एकत्रित करू लागले. कौरवसेने कडील राजे आपापल्या सैन्यानिशी हस्तिनापुराकडे येत होते. कौरव-पांडव दोन्ही पक्षांकडून कुरुक्षेत्रावर भव्य शिबीरे उभारली जात होती. कुरुक्षेत्रावरचे जुने प्रासाद सर्व सुखसोयींनी तयार झाले होते. कुरुक्षेत्राकडे जाण्यासाठी निघालेल्या पांडवांच्या प्रबळ चतुरंग सेनेचा तळ हस्तिनापूरच्या नदीच्या पैलतीरावर विसावला होता. त्या सेनेची भव्यता पाहून, कर्ण, दुर्योधन अधिक जबाबदारीने तयारी करीत होते. कर्णपुत्र शत्रुंजय, वृषकेतु, वृषसेन आणि कर्णबंधू द्रुम, द्रोण आधीच आपल्या दळासह कुरुक्षेत्राकडे गेले होते.

रात्रीच्या वेळी राधाई दासीसह घराबाहेर जात असलेली पाहून कर्णाला आश्चर्य वाटले. अधिरथ गेल्यापासून ती आपल्या खोलीतून बाहेर पडली नव्हती.

कर्णाने विचारले, ‘आई, बाहेर निघालीस?’

‘हो! नदीची पूजा करावयाची आहे.’

‘मी येऊ?’

‘नको! काही व्रतं अशी असतात, की ती एकांतामध्येच पुरी केली जातात.’

कर्णाकडे न पाहता राधाई वाडयाबाहेर पडली. दासीसह ती नदीकिनारी आली. रात्र काळोखी होती. चांदण्या लुकलुकत होत्या. नदीकाठावर एक नाव उभी होती. नावेच्या पलित्याचे प्रतिबिंब नदीच्या पाण्यात थरथरत होते. राधाईची नजर पैलतीराकडे गेली. पांडवांच्या शिबिरावरच्या शेकोटया, पलिते दृष्टीत भरत होते.

राधाईने विचारले, ‘तीच ना नौका?’

‘हो!’

‘चल.’

दोघी त्या नौकेजवळ गेल्या. त्या चढताच नौका हळूहळू पैलतीराकडे जाऊ लागली.

कृष्ण-शिबिरात कृष्ण एकटाच उभा होता. चंदनाचा सुवास सर्वत्र दरवळत होता. भावी युद्धाच्या विचारात कृष्ण शिबिरात नकळत येरझारा घालू लागला, त्याच वेळी सेवक आत आला. कृष्णाने त्याच्याकडे पाहिले. सेवकाने सांगितले, ‘एक वृद्धा आपल्या दर्शनाच्या इच्छेनं आली आहे.’

‘या वेळी?’

‘हो! आपल्याला भेटणं आवश्यक आहे असं म्हणते ती.’

‘पाठव तिला आत.’ कृष्णाने अनुमती दिली.

अशा भररात्री कोण आले असावे, याचा विचार कृष्ण करीत होता. विदुराघरून कुंती कालच शिबिरात आली होती. ती या वेळी भेटावयास येणे शक्य नव्हते. कृष्ण विचार करीत असतानाच राधाई शिबिरात प्रवेश करती झाली.

राधाईने कृष्णाला एवढया जवळून कधीच पाहिले नव्हते. राधाईने अत्यंत नम्र भावाने कृष्णाला वंदन केले. हात जोडीत कृष्ण म्हणाला, ‘मातांनी आशीर्वाद द्यावा. वंदन करू नये.’

‘कृष्णमहाराज, आपण राजा म्हणूनच नव्हे, तर गुणांनीही श्रेष्ठ आहात. आपल्याला वंदन करणं ह साझा धर्मच आहे.’

‘माते, कोण तू? तुझा परिचय…’

‘सामान्याचा परिचय कसला? मी एक माता. स्त्रीला जीवनात पतीचा आधार असतो. दुर्दैवानं मी तो नुकताच गमावला आहे. बालपणीच माझा विवाह झाला. बाल्य सरलं. तारुण्य आलं. तेही हळूहळू उलटू लागलं, पण माझी कूस उजवली नाही. पुत्रप्राप्तीसाठी पूजाअर्चा, उपासतापास सारं केलं. तीर्थयात्रा केली. नवससायास केले; पण काही फळाला आलं नाही… अन् एके दिवशी भल्या पहाटे गंगेच्या काठावर स्नानासाठी आम्ही पति-पत्नी गेलो असता त्या नदीतून वाहत जाणारी एक पेटी माझ्या दृष्टीला पडली. त्या पेटीच्या संरक्षणार्थ तिला दूर्वा-कंकणादिरूप नाडा-दोरा बांधला होता. ती पेटी कुंकुमाच्या हातांनी चिह्नित केली होती. कुतूहलाने मी ती पेटी धरून ठेवली. माझ्या पतीने ती पेटी अलगद किनाऱ्यावर आणली. ती पेटी जेव्हा उघडली, तेव्हा त्यात नवजात अर्भक दिसलं. पुत्रहीन आम्हांला ते परमेश्वरी दान वाटलं.’

‘पुढं काय झालं?’ कृष्णाने विचारले.

‘खरोखरच तो मुलगा वरदान होता. त्याच्या पावलांनी आमचं जीवन आनंदित बनलं. जीवनात दुःख उरलंच नाही. तो मुलगा घरी आला अन् त्यानंतर मलाही मुलं झाली. तो मुलगाही मोठा गुणसंपन्न. विद्याव्यासंगांत त्यानं खूप कीर्ती मिळवली. ज्ञानी, वीर, योद्धा, दाता म्हणून त्याची कीर्ती त्रिखंडात पसरली…’

‘दाता!’ कृष्ण सावध झाला. ‘माते, तू कोणाबद्दल बोलत आहेस? कोण तू?’

‘मी राधा, महारथी, दात्या कर्णाची आई.’

‘तुला काय हवं, माते?’ कृष्णाने विचारले.

राधा हसली. ती म्हणाली, ‘महाराज, ज्या मातेच्या कपाळी सौभाग्य-लेणं राहिलं नाही, जिचा मुलगा उद्या रणांगणावर जाणार आहे ती माता दुसरं काय मागणार? मला माझा मुलगा हवा-सुरक्षित.’

‘आणि त्यासाठी तू माझ्याकडं आलीस?’

‘नाहीतर कुठं जाणार?’ राधाईने विचारले, ‘कृष्णा, माझ्या मुलाच्या तोंडून मी अनेक वेळा तुझ्या अलौकिक गुणांची, स्नेहशील भावाची, तुझ्या ठायी वसत असलेल्या दैवगुणसंपन्न योगाची अनेक वर्णनं ऐकली आहेत. कर्ण नेहमी म्हणतो, ‘पांडवांची शक्ती एकच आहे: कृष्ण!’ आपली कृपा झाली, तर माझा मुलगा सुरक्षित राहील, हे मला माहीत आहे.’

‘नाही, माते, ते आता माझ्या हाती राहिलं नाही.’

‘मग कुणाच्या?’

‘नियतीच्या!’

राधाईच्या मुखावर उमटलेले स्मित पाहून कृष्णाला नवल वाटले. त्याने विचारले, ‘खोटं वाटतं?’

‘नाही.’

‘मग हसलात का?’

‘महाराज, माझा मुलगा कर्ण एक सामान्य मानव, सूतकुलात वाढलेला; पण त्याचं दातृत्व एवढं मोठं की, आजवर त्याच्याकडून कोणीच याचक विमुख परत गेला नाही. पांडवांच्या विजयासाठी साक्षात इंद्र त्याच्याकडं कवचकुंडलं मागावयास आला. भावी पराजय पत्करून, आपल्या वचनाला कलंक लागू नये, म्हणून ती कवचकुंडलं आनंदानं त्यानं इंद्राला दिली. ही सामान्य मानवाची कथा. आपण तर दैवी गुणसंपन्न, आपण नियतीचा विश्वास द्यावा!’

कृष्णाला काही सुचेनासे झाले. त्याचे प्रसन्न हास्य विरले. कृष्णाचा चेहरा व्याथित बनला. तो म्हणाला, ‘माते, तुझा भाव मला कळतो. त्या कर्णावर माझाही लोभ आहे. पण…’

‘नको, कृष्णा, तू आमच्यासाठी व्यथित होऊ नकोस. मीही दात्या कर्णाचीच आई आहे. जे दान देत असता दुःख होतं, ते दान कितीही श्रेष्ठ असलं, तरी याचकानं ते स्वीकारू नये, असं कर्ण नेहमी सांगतो. तू आमच्याकरिता कष्टी होऊ नकोस. त्या पेक्षा जे दैवी लिहिलं असेल, ते आनंदानं आम्ही सहन करू.’

‘माते! संतापात…’

‘नाही, कृष्णा! मी संतापले नाही. तो आमचा अधिकार नाही. येते मी.’

राधाईचे सारे बळ संपले होते. थकल्या पावलांनी आणि थकल्या मनाने ती नौकेत बसली.

पांडवांचे पसरलेले शिबिर बसल्या जागेवरून दिसत होते. असंख्य शेकोटयांचे अस्तित्व पृथ्वीतलावर अवतरलेल्या अग्निकुंडांप्रमाणे भासत होते.

किनारा सुटला होता. नाव हेलकावे घेत होती..

✍️ *क्रमश:* ✍️