राधेय – भाग ३८

🚩 *राधेय/३८* 🚩

भर उन्हातून कर्णाचा रथ हस्तिनापूरच्या दिशेने जात होता. चारी बाजूंना विस्तीर्ण उघडी भूमी त्या सूर्यदाहात होरपळत होती. चक्रधर सारथ्य करीत होता. काही न बोलता कर्ण आपल्याच विचारात गर्क होता. चक्रधराच्या हाकेने तो भानावर आला. ‘अंगराज!’

‘काय, चक्रधर?’

‘ते पाहा!’

कर्णाने पाहिले, तो एक रथ दौडत येत होता. सूर्यकिरणांत तो सुवर्णरथ झळाळत होता. कर्णाने रथ निरखला. तो म्हणाला, ‘युवराजांचा रथ ना?’

चक्रधराने असूड उंचावला. रथाला गती लाभली. दोन्ही रथ एकमेकांजवळ येऊन पोहोचले. कर्ण रथाखाली उतरला. कर्णाजवळ जाणाऱ्या दुर्योधनाचा चेहरा म्लान होता. ती चर्या पाहून कर्णाच्या चेहऱ्यावर स्मित प्रगटले. जवळ येणाऱ्या दुर्योधनाला तो म्हणाला, ‘युवराज! तेवढी चिंता करण्याचं काहीच कारण नव्हतं. कृष्णानं मला पळवून नेलं नसतं.’

दुर्योधनाने आवंढा गिळला. कर्णाचा दंड धरीत तो म्हणाला, ‘माणसानं पळवलेली माणसं परत प्राप्त करून घेता येतील; पण मृत्युनं पळवलेला माणूस माघारी कसा मिळणार?’

‘मृत्यू? मित्रा S S’

दुर्योधनाचे नेत्र अश्रूंनी भरले. त्याचा श्वास अवघडला. सारे बळ एकवटून त्याने सांगितले, ‘तुमच्या तातांचा… अधिरथांचा काळ झाला.’

‘अशक्य! सकाळी मी त्यांना पाहिलं,..’ कर्ण उद्‌गारला.

‘मित्रा! त्यांना अपघाती मृत्यू आला.’

‘अपघात?’

‘तुम्ही इकडं आलात आणि अधिरथ रथशाळेकडं गेले. तिथं एक नवीन रथ सज्ज झाला होता. त्याची परीक्षा पाहण्यासाठी…’

कर्णाचे उभे अंग शहारले. तो म्हणाला, ‘नको, युवराज, काही सांगू नका. सारं मला माहीत आहे.’

कर्णाच्या डोळ्यांसमोर ते भयानक दृश्य तरळत होते. तो बोलत होता: ‘… तात रथारूढ झाले. रथाच्या कुण्या त्यांनी काढून घेण्याची आज्ञा केली. आसूड उंचावला गेला आणि रथ उधळला. रध भरधाव धावत होता… समतोल धावत होता; पण अचानक रथाचं चाक रस्त्याच्या खड्डयात फसलं. रथ उचलला गेला आणि रथचक्र रथाच्या कण्यापासून वेगळं झालं. रथ कलंडला अन् त्याखाली तात सापडले. उधळलेल्या अश्वांकडून रथ तसाच फरफटत गेला. तेव्हा तातांची प्राणज्योत विझून गेली होती… हेच सांगणार ना, युवराज?’

‘हो!’ चकित झलेला दुर्योधन म्हणाला, ‘पण, मित्रा, हे तुला कसं समजलं कुणी सांगितलं?’

‘हे! तातांच्या रथपरीक्षेची पद्धत मला माहीत नाही, असं कसं होईल? तातांना समतोल रथ सिद्ध करण्याची कला संपूर्ण अवगत होती, पण तेवढंच ज्ञान रथपरीक्षेला पुरं होत नाही, हे कधीच त्यांच्या लक्षात आलं नाही. सुसज्ज, समतोल रथ बलवान अश्वांकडून जरी ओढला जात असला, तरी रथचक्र दैवगतीनंच फिरत असतं, हे कधीच त्यांच्या मनाला स्पर्शलं नाही. जीवनरथाचं सुद्धा असंच असतं. विद्या, व्यासंग आणि अनुभवानं जीवनरथ असाच सिद्ध होत असतो. केव्हातरी अहंकारापोटी संयमाच्या कुण्या काढून रथपरीक्षा करण्याची इच्छा होते; अन् सामान्य मोहाचा खळगासुद्धा जीवनावर मात करण्यास समर्थ ठरतो.’

कर्णाचे मन त्या धक्यातून सावरले गेले. त्याने विचारले, ‘तात कुठं आहेत?’

नदीकडं नेलं आहे. सारे तुझी वाट पाहत आहेत… चल.’

दुर्योधनाच्या आधाराने कर्ण रथात बसला. सारे बळ संपले होते. अधिरथांच्या आठवणी उचंबळत होत्या. कष्टाने आवरलेले अश्रू गालांवरून झरत होते. पाठीवर विसावलेल्या दुर्योधनाच्या हातामुळे ते अश्रू आवरले जाण्याऐवजी वाढत होते.

सर्व क्रियाकर्म आटोपून सारे परत आले. वाडा तोच होता. माणसेही तीच होती. पण एका जिवाच्या जाण्याबरोबर त्या वास्तूवर अवकळा पसरली होती. अश्रू ढाळणाऱ्या द्रुमाला कर्णाने सावरून आत नेले.

मन शक्य तेवढे कठोर करून कर्णाने आत पाऊल टाकले. आत शुभ्र आच्छादन पसरले होते. एका कोपऱ्यात राधाई गुडघ्यांत मान घालून बसली होती. कर्ण येताच वृषाली व इतर स्त्रिया उभ्या राहिल्या. त्यांचे मूक रुदन कर्णाला जाणवत होते. पांढरे अंतरीय धारण केलेला तो कर्ण सरळ आइसमोर जाऊन उभा राहिला. राधाईने गुडघ्यांतली मान वर केली, तिची दृष्टी कर्णावर स्थिरावली.

मातेच्या त्या दर्शनाने कर्णाच्या मनाला तडा गेला. त्या रूपात केवढा फरक पडला होता. कपाळावरची एक कुंकवाची खूण नाहीशी झाली, तर केवढे तेज हरवते! त्या डोळ्यांची वलये उजाड, भकास वाटत होती. त्या दर्शनाने कर्णाच्या पायांतले बळ हरले. तो सावकाश खाली बसला आणि काही न बोलता त्याने राधाईला आपल्या मिठीत घेतले.

✍️ *क्रमश:* ✍️