राधेय – भाग ३७

🚩 *राधेय/३७* 🚩

सकाळी कर्ण बाहेर जाण्याच्या तयारीत होता. वृषसेन त्याच वेळी आला. त्याने कर्णाला वंदन केले. त्याने विचारले, ‘आपण कृष्णमहाराजांना पोहोचवायला जाणार ना?’

‘हो!’

‘आपली आज्ञा असेल, तर…’

‘जरूर ये. माझा रथ तयार आहे…’

‘हो खाली चक्रधर रथ तयार करतो आहे…’

‘मग, वसू, असं कर. तू घोड्यावरून सरळ नगरसीमेवर जा. मी विदुरांच्या गृही जाऊन द्वारकाधीशांबरोबर येईन.’

‘जशी आज्ञा!’ वृषसेनाने गळ्यातला मोत्यांचा सर काढला. मोती टपोरे तेजस्वी होते. त्यांच्या शुभ्रपणावरही एक निळसर झाक प्रगटत होती. तो सर कर्णापुढे करीत वृषसेन म्हणाला, ‘कृष्णमहाराजांनी काल हा मला दिला, आपल्या आज्ञेप्रमाणे मी काल तिथं गेलो होतो.’

कर्ण तो सर निरखीत होता. वृषसेन सांगत होता, ‘आपल्या गळ्यातला सर काढून त्यांनी माझ्या गळ्यात घातला आणि ते म्हणाले, ‘वसू, हे जातिवंत मोती आहेत. खाऱ्या पाण्यात समुद्राच्या तळाशी वाढलेले. हे मोती अत्यंत कठीण असतात. त्यांना जे वेज पाडलं जातं, ते केव्हाही लहान-मोठं होत नाही.’

वृषसेन हसला.

‘का?’ कर्णाने विचारले,

‘कृष्णमहाराज म्हणाले, हे मोती तुझ्या सारखे आहेत- तेजस्वी! अन्, तात, तिथं राजमाता कुंतीही होत्या. त्यांना मी वंदन करावयास गेलो, तर त्यांनी मला जवळ घेतंल आन् माझ्या मस्तकाचं अवघ्राण केलं

‘मोठी माणसं ती मोठीच असतात नं, वसू! तो साध्या मोत्यांचा सर नाही, तो एका मोठ्या माणसाचा आशीर्वाद आहे. तो श्रद्धेनं गळ्यात बाळगीत जा. चल, जाऊ आपण…’

वृषसेन नगरवेशीबाहेर गेला, तेव्हा तो भाग नागरिकांनी आधीच भरून गेला होता. सारे आतुरतेने कृष्णाची वाट पाहत होते. थोड्याच वेळात शिगांचा आवाज गोपुरद्वारातून घोडेस्वार दौडत आले. खंदकाच्या फळीवर त्यांच्या टापा घुमल्या. पाठोपाठ एकएक रथ नगराबाहेर येऊ लागले. भीष्म, विदुर, कृतकर्मा यांच्या रथांमागे कृष्णरथ होता. त्यांच्यामागून कर्णाचा रथ येत होता. जनसमुदायात कर्णाचा जयघोष उठला. कृष्णाने रथ थांबवून सर्वांना दर्शन दिले. वृषसेनाकडे लक्ष जाताच वृषसेनाने वंदन केले. कृष्णाने त्याला जवळ बोलावले. वृषसेन नजीक जाताच कृष्णाने प्रेमभराने त्याचा निरोप घेतला. भीष्म-विदुरांचा निरोप घेऊन कृष्ण रथारूढ होत असता त्याने कर्णाला जवळ बोलावले. ‘अंगराज, माझ्याबरोबर काही अंतर तू यावंस, असं मला वाटतं.’

‘जशी आज्ञा!’ कर्णा म्हणाला.

कृष्णाने सारथी दारुकाकडे पाहिले. सूत उतरला. कृष्णाने सारथ्याची जागा घेतली. मागच्या बाजूला हात करात कृष्ण म्हणाला, ‘कर्णा, बैस.’

‘आपणा सारथ्य करणार?’

कर्ण रथात बसला. शंखनाद उमटला. कृष्णदळ रथाच्या मागेपुढे दौडत होते. रथ वेगाने धावत होता. सूर्यकिरणे आकाशात चढत होती. हळूहळू हस्तिनापूर वाजत होते. रथाला जुंपलेले पांढरे शुभ्र जातिवंत अश्व एका चालीने दौडत होते.

वृक्षहीन, मोकळ्या माळावरून रथ जात होता. चारी बाजूंना दूरवर पसरलेली भूमी दृष्टिपथात येत होती. अचानक कृष्णान मागे पहिले. पाठीमागून येणाऱ्या दळाची धाव मंदावली. कृष्णाने स्मितवदनाने समोर पाहिल. रथाबरोबर दौडणाऱ्या सात्यकीन घोड्याला टाच दिली. क्षणात सात्यकीसह पुढच दळ भरधाव उधळल. काही वेळात कृष्णा-कर्णांचा रथ एकाकी पडला. रथाची धाव अगदी मंदावली, कृष्णाने अश्वांचे वेग रथाच्या सुवर्णदंडाला अडकवले. कृष्णाने तिरकी बैठक घेतली. तो कर्णाला म्हणाला, ‘अंगराज, युद्ध निश्चित झाल्याचं कळलं ना?’

‘हो! आपली शिष्टाई असफल झाल्याचा खेद वाटतो. युद्ध निश्चित झाल्याचा झाल्याचा आनंद आहे.’

‘ते मला माहीत आहे, कर्णा! आता भेट घडेल, ती रणभूमीवरच, शत्रू म्हणून! त्याआधी बोलावं, भेटावं, असं वाटलं, म्हणूनच तुला मी येण्याचा आग्रह धरला.’

‘आपली कृपा!’

‘कर्णा, युद्धात कौरव विजयी होतील?’

‘जयपराजय दैवाधीन! ते माहीत असता, माझ्या मुखातून वदवण्याचं काहीच प्रयाजन नाही.’

‘अन् तरीही तुम्ही युद्ध स्वीकारलंत?’

‘क्षमा! पराजयाच्या भीतीनं मी सत्याकडं कधीच पाठ फिरवली नाही.’

‘काही वेळ सत्यदेखील विदारक असतं, त्याकडं पाहवत नाही.’

‘आपल्या कृपेनं ते बळ माझ्याकडं आहे.’

कृष्ण हसला. कर्णावर दृष्टी टाकीत तो म्हणाला, ‘कर्णा, तू कोण आहेस, माहीत आहे?’

‘मी! सूतपुत्र!’

‘नाही.’

‘ते खोटं आहे.’

‘जन्मतः मला मातेनं टाकलं असलं, तरी पण, माझी कवचकुंडलं माझ्या कुलाची साक्ष आहेत.’

‘कोणतं कुल?’

‘माधवा! ज्या शंकेनं सारं जीवन ग्रस्त झालं, तीच शंका मला कशाला विचारतोस? उभं आयुष्य मी कोण? कुठून आलो? मला का टाकलं गेलं? याच प्रश्नांनी व्यापलंय्. माझ्या ज्ञानानं, तपश्चर्येनं त्याचं उत्तर मिळालं नाही. ते सांगणारा कुणी भेटेल, असंही आता वाटत नाही’

‘सांगणारा भेटेल; पण ऐकण्याचं बळ राहणार नाही.’

‘कृष्णा, तुला माझं जन्मरहस्य माहीत आहे?’

कृष्णाने होकारार्थी मान हलवली.

कर्णाचे सारे अंग रोमांचित झाले.

रथ सावकाश चालत होता. रथाच्या घुंगुरमाळ किणकिणत होत्या.

कर्ण अधीर बनला होता.

‘सांग, मधुसूदना! मी कोण? कोणत्या अपराधास्तव माझ्या मातेनं माझा त्याग केला?’

‘कर्णा, मी सांगतो, ते दृढ मनानं श्रवण कर- तू कौंतेय आहेस!’

‘मी… कौंतेय?? महाराज, थट्टेलासुद्धा मर्यादा असाव्यात.’ कर्ण हसून म्हणाला.

‘कर्णा, मी थट्टा करीत नाही.’ कृष्ण निश्चयी स्वरात म्हणाला, ‘कर्णा, तू कौंतेय आहेस तू माता कुंतीला कौमार्यावस्थेत मिलालेलं सूर्याचं वरदान आहेस हे कर्णा, कन्येला कानीन अन् सहोढ असे दोन प्रकारचे पुत्र मानले जातात. कौमार्यावस्थेत झालेला कानीन ठरतो. विवाहानंतर झालेला सहोढ किंवा औरस ठरतो. शास्त्रानुसार ज्या पुरुषाशी त्या कन्येचा विवाह होतो, त्याचेच ते पुत्र मानले जातात. त्यामुळं तूही पांडवच ठरतोस. सूर्याचा अथवा अधिरथाचा नव्हे.’

कर्णाने पाहिले. भूमी वेगाने मागे सरकत होती. रथाला धक्के बसत होते. रथाच्या चाकांच्या आऱ्यांतून दिसणारी भूमी खंडित भासत होती. कर्णाच्या कपाळावर दरदरून घाम फुटला होता. सारे अंग बसल्याजागी थरथरत होते.

‘मी राधेय नाही… सूतपुत्र नव्हे… वसुषेण नव्हे… मी कर्ण… कौंतेय… पंडुंपुत्र…’

‘कर्णा! सावध हो!’ कृष्णाचे शब्द उमटले.

कर्णाने त्याच्याकडे पाहिले.

‘कर्णा, तू नुसता कौंतेय नाहीस! तू ज्येष्ठ अन् श्रेष्ठ पांडव आहेस. धर्मशास्त्राप्रमाणे पांडवांच्या राज्याचा तूच राजा होशील.’

‘अन्…’

‘कर्णा, तुझं भाग्य मोठं आहे. तुझ्या पितृपक्षाकडं पार्थ आहे व मातृपक्षाकडं वृष्णी आहेत. तुझं स्थान कौरवांकडं नाही.’

‘माझं स्थान!’ कर्ण सावध होत होता.

‘हो! तुझं स्थान पांडवांकडं आहे. मानाचं! ऐश्वर्याचं! हे श्रेष्ठ कौंतेया, तू माझ्याबरोबर पांडवांकडं चल. ते तुझे धर्मनिष्ठ, वीरबाहू पाची भ्राते तुझ्या चरणांना आनंदानं मिठी घालतील. सर्व पांडवपुत्र अन् त्यांचे सहायक राजे तुझ्यापुढ नतमस्तक होतील. अन् द्रौपदी तुला सहावा पती म्हणून स्वीकारील. एवढंच नव्हे, यादवकुलाचा प्रमुख म्हणून मी तुलाच अनुसरीन. दाशार्हांसह दाशार्ण तुझे अनुयायी होतील!’

‘एवढ्याचसाठी मला बरोबर आणलंत?’

‘हो, युद्ध अटळ दिसताच या सत्यामागं दडलेली भयानकता मला जाणवली. कर्णा, तू निव्वळ योद्धाच नव्हेस, तू वेदविद्येतही पारंगत आहेस. सनातन सिद्धांत तुला माहीत आहेत. सूक्ष्म धर्मशास्त्रावर तुझी निष्ठा आहे. उद्या रणांगणात तू उभा राहिलास, तर तुला तुझ्या भ्रात्यांच्याच वधासाठी उभं राहावं लागेल. कदाचित तुझ्या हातून एखाद्या पांडवाचा वध घडला, तर ज्येष्ठाकरवी घडलेली ती कनिष्ठ भावाची हत्या पुत्रहत्येचं महापाप ठरेल. तुझ्या हातून कुलक्षय होऊ नये, म्हणूनच मला तुझं जन्मरहस्य सांगणं भाग पडलं. कर्णा, तुझ्यासारख्या चारित्र्यसंपन्न, दातृत्वशील पुरुषाला…’

‘दातृत्व! माझं? नाही, कृष्णा, तू तरी त्याची थोरवी वर्ण नकोस. मधुसूदना! कंस, जरासंधासारख्या सम्राटांचा तू पराभव केलास. तुझ्या पराक्रमानं, तुझ्या आदेशानं अन्यायी राज्यं उलथून पडली; पण ती राज्यसंपदा, तो अधिकार न स्वीकारता सहजपणे तू ती राज्यं दुसऱ्यांच्या हाती देऊन मोकळा झालास. ते दातृत्व केवढं मोठं! स्वार्थापोटी केलेलं दातृत्व त्यापुढं किती टिकणार?’

‘स्वार्थ?’

‘हो, स्वार्थ! कृष्णा, माझं जन्मरहस्य तू सांगितलंस, तसंच माझं स्वभावरहस्य सांगू दे. ज्याचं जीवन सूतकुलामुळं डागळलंय् व ज्याचा पुरुषार्थ, पराक्रम याच कारणानं सदैव बंदिस्त राहिला, तो दुसरं काय करणार? ती जीवनातली पोकळी भरून काढण्यासाठीच चारित्र्याची जोपासना करावी लागली. तपश्चर्येच्या द्वारे ब्रह्मास्त्राची इच्छा केली. कीर्तीसाठी दातृत्वाचा आधार शोधावा लागला.’

‘कर्णा, पण त्यानंच तुझं जीवन उजळून निघालं. सत्य-असत्याचा विचार करून तू निर्णय घे.’

कर्ण खित्रपणे हसला. म्हणाला, ‘कृष्णा, जे माहीत असतं, ते सत्य मानतो. जे माहीत नसतं, ते असत्य समजतो अन् त्याला मर्यादा स्वत:च्या अनुभूतीची. कैक वेळा असत्य बोलायचं ठरवलं, तरी सुद्धा भविष्यातलं सत्यच वदलं जातं. भगवान परशुरामांनी माझा स्वीकार करावा, म्हणून मी त्यांना भूगुकुलोत्पन्न ब्राह्मण आहे, असं खोटं सांगितलं. ते भृगुकुलच त्या वेळी का आठवावं? पृथ्वीतलावर प्रथम अग्री निर्माण करणारा तो भृगु आज माझ्या हातूनच हे रणकुंड पेटवलं जाणार आहे, हे त्या वेळी असत्य बोलताना माझ्या ध्यानी आलं नाही.’

‘हे रणकुंड पेटणार, की नाही, हे तुझ्याच हाती आहे.’

‘माझ्या हाती?’

‘हो! तू पांडवांना मिळालास, तर युद्धाला उभं राहण्याचं धाडस दुर्योधनाला होणार नाही.’

‘नाही, कृष्णा, ते धाडस माझ्या हातून होणार नाही.’

‘कर्णा, माझं ऐक! अजून वेळ गेलेली नाही.’

‘नाही, रे कृष्णा! ती वेळ केव्हाच हरवली. शस्त्र-स्पर्धेच्या वेळी माझा अपमान झाला. कृपाचार्यांनी माझं कुल विचारलं, तेव्हा कुंती मातेनं सांगायला हवं होतं. ती वेळ होती. भर स्वयंवरात द्रौपदीनं माझा सूतपुत्र म्हणून उपहास केला होता, तेव्हा तू सांगायला हवं होतंस. ती वेळी होती…’

‘पण अजून काही घडलं नाही.’

‘असं आपल्याला वाटतं. पांडवांचं हित पाहत असता, दुर्योधनाकडं मात्र आपलं दुर्लक्ष होतं.’

‘मला त्याच्याकडं पाहायचं कारण?’

‘काही नाही; पण मला तसं वागता येईल? बाळपणापासून स्नेह लाभला, तो त्याचा. त्यात कधीही दुरावा आला नाही. शस्त्र-स्पर्धेच्या वेळी जे मातेला जमलं नाही, ते त्यानं केलं. माझ्या लज्जा रक्षणार्थ अंगदेशाची प्रतिष्ठा त्यानं माझ्या पाठीशी उभी केली. द्रौपदी स्वयंवरात तो माझ्या बाजूनं उभा राहिला. महाराज, घोषयात्रेत गंधर्वांकडून मी पराजित झालो, विराट नगरीत अर्जुनानं माझा पराभव केला, ते माहीत असूनही त्याची माझ्यावरची निष्ठा, प्रेम तसूभरही कमी झालं नाही. जय-पराजयांत ज्याची निष्ठा ढळत नाही, असा तो माझा मित्र! उद्याचा रणयज्ञ त्यानं माझ्याच दिग्विजयाच्या आधारावर रचलाय्. त्या माझ्या मित्राला, सुहृदाला मी कसा विसरू? कोणत्या मोहासाठी?’

‘कल्पिताच्या मोहात पडून सत्याचा विसर पडू देऊ नकोस, कर्णा.? कृष्ण म्हणाला.

‘ते सत्यच मी अधिक निरखून पाहतोय्. मी कौंतेय असेन; पण वाढलो, तो राधाईच्या हातांनी, अधिरथांच्या प्रेमानं. ते सूतकुळाचे संस्कार घेतच मी लहानाचा मोठा झालो. सूतकन्यांनी माझा संसार सावरला, वाढविला. क्षत्रियाचे संस्कार मला कधीच लाभले नाहीत. आता जीवनाच्या अखेरच्या पर्वात ती जाणीव होते, तेव्हा, निदान एक तरी क्षत्रिय-संस्कार मला पाळता येतो का, ते मी पाहतो.’

‘कोणता संस्कार?’

‘क्षत्रिय कधी मैत्रीला पारखा होत नाही, असं म्हणतात. तो संस्कार जपत असतानाच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे.’

कर्णाच्या त्या तेजस्वी दर्शनानं कृष्ण भारावून गेला होता.

कर्ण म्हणाला, ‘कृष्णा, एक विनंती आहे.’

‘बोल!’

‘कृपा करून हे रहस्य असंच राहू दे. त्या युधिष्ठिराला हे सांगू नका. तो धर्मनिष्ठ, भावनाविवश, माझा जुगारी बंधू धर्म, माझं-त्याचं नातं कळलं, तर माझ्यासाठी आपल्या बांधवां सकट सर्वस्व पणाला लावील अन् कृतहस्त, अतिदेवी अशा त्या दैवा च्या अधीन मला एकटयाला करून तो आनंदानं वनवासी होऊन जाईल.’

कर्णाचा आवाज दाटला होता

कृष्णाची तीच स्थिती झाली होती.

कष्टाने कृष्ण म्हणाला, ‘कर्णा, तुझी इच्छा मी आज्ञा समजेन. तुझ्या या उदात्त रूपदर्शनानं तुला तो अधिकार प्राप्त झाला आहे.’

कर्ण एकदम म्हणाला, ‘रथ थांबवा! माझा विवेक आणि विचार जोवर माझ्या कह्यात आहे तोवरच मला रथाखाली उतरू दे.’

कृष्णाने रथ थांबवला, कर्ण रथाखाली उतरला. कृष्ण रथातून जवळ आला. ‘कर्णा, निदान वृक्षच्छाया पाहुन तरी रथ थांबवला असता.’

‘छाया?’ कर्णाने पडलेल्या प्रखर उन्हाकडे पाहिले, ‘महाराज, छाया लाभणं दैवी असावं लागतं. तो अर्जुन इंद्रभक्त ना? त्याला जीवनात आपल्या कृपेची सावली लाभली. मी सूर्यभक्त तेजात होरपळून जाणं, दाहात सदैव उभं राहणं, एकाकी, हेच माझं जीवन. त्यात सावली अवतरेल कशाला?’

‘कर्णा, तुझं लोभस रूप मी कधीही विसरणार नाही. आता भेट घडेल, ती रणांगणी, तुला काही हवं?’

कर्णाने दीर्घ श्वास घेतला. त्याचा आवाज प्रगटला, ‘युद्धभूमीवर अर्जुनाचं सारथ्य करीत आपण सामोरे याल, तेव्हा धनुष्याची प्रत्यंचा खेचण्याचं बळ राहावं.’

‘आणि…’

‘जीवन निष्कलंक राहावं,.. मृत्यू वीरोचित यावा.’

कर्ण कृष्णदृष्टी टाळीत म्हणाला, ‘आप्तस्वकीयांचा वध माझ्या हातून घडू नये…’ काही क्षण उसंत घेऊन कर्ण म्हणून, ‘आणखी एक इच्छा होती…’

कृष्णाच्या गालांवरून अश्रू ओघळले. ते पुशीत कृष्णाने विचारले, ‘कसली इच्छा?’

‘केव्हातरी आपली बासरी परत ऐकायला मिळावी, असं वाटत होतं. पण ते जमायचं नाही.’

‘नाही, कर्णा! तुला जरूर मी बासरी ऐकवीन. त्यात कृतार्थता सामावलेली असेल.’

टापांच्या आवाजाने दोघे भानावर आले. कृष्णदळ आले होते. काही न बोलता कृष्णाने कर्णाला आवेगाने मिठी मारली. दारुकाने सारथ्याची जागा घेतली होती. कृष्ण रथात चढत असतानाच तो दारुकाला म्हणाला, ‘रथाला वेग दे! जेवढया वेगानं जाता येईल, तेवढा वेग दे.’

रथ उधळला. कृष्णरथ दळासह दिसेनासा झाला. दळाबरोबर आलेला कर्णरथ तेवढा उभा होता.

चक्रधर कर्णाची वाट पाहत होता.

✍️ *क्रमश:*✍️