🚩 *राधेय/ ३६* 🚩
स्वगृही कृष्णाला पोहोचवून विदुर परत आला. धृतराष्ट्र-महालात भीष्म आले होत राजमाता गांधारीदेवी धृतराष्ट्रांपासून थोड्या अंतरावर उभी होती. विदुर आलेले समजताच धृतराष्ट्र म्हणाले,
‘विदुरा, त्या दुर्योधनाची समजूत काढायला हवी. तेही सत्वर व्हायला हवं. तू असाच जा अन् युवराजांना इथं घेऊन ये. कृष्णाच्या मनात काही नाही ना?’
‘श्रीकृष्णाचं मन स्फटिकासारखं निर्मळ आहे. त्याच्या मनात काही वैरभाव नाही; पण झाल्या प्रकाराचं दुःख त्यांना जरूर झालं. हे बंधो, हा प्रकार मला ठीक दिसत नाही. युद्ध बोलण्याइतकं सोपं नसतं, ज्या बाजूला कृष्णाचं नेतृत्व आहे, पाच पांडवांसारखे पराक्रमी, धर्मनिष्ठ आहेत, त्याच बाजूला जय आहे. तू आपल्या पुत्राला आवर घालावा, हेच मला योग्य दिसतं.’
‘ते मलाही कळतं. विदुरा, सत्वर जाऊन त्या दुर्योधनाला इथं घेऊन ये.’
विदुर गेला.
निःश्वास सोडून गांधारी म्हणाली, ‘पितामह, तुम्हीच त्याला आवर घालायला हवा होता. तो तुमचा अधिकार आहे.’
‘वयाचा अधिकार सज्जन जाणतात अन् बळाचा अधिकार गाजवण्या इतपत माझं या सभेत बळ राहिलं नाही. अंध सम्राटांचं युवराजांच्यावरचं अंधप्रेम युवराजांचे दोष पाहत नाही.’
‘पितामह, तुम्ही माझ्यावर राग करू नका. अंध दृष्टीला जेवढं जाणवेल, तेवढंच मी करू शकतो. ती माझी मर्यादा आहे.’
त्याच वेळी दुर्योधन कर्णासह आत आला. दोघांमागून विदुर आत येत होता ते आल्याचं कळताच धृतराष्ट्र म्हणाला, ‘बाळ दुर्योधन, तुझ्या संतापाला थोडा आवर घाल. विवेक जागृत कर अन् तुझी माता काय सांगते, ते ऐक.’
दुर्योधनाचे नेत्र आरक्त झाले होते.
कर्णाने गांधारीकडे पाहिले होते.
निळे रेशमी वस्त्र नेसून ती उभी होती. डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. भव्य, आतिगौर कपाळ, धारदार नासिका, पातळ गुलाबा ओठ, त्या रूपाच सौंदर्य दर्शवीत होते. त्या उंच आकृतीचा हात पुढे झाला. घंटेचा नाद हेलावावा, तशी राजमाता बोलत होती, ‘दुर्योधना, मी आजवर तुला काही सांगितलं नाही. तुझ्या पित्याच्या तुझ्यावरच्या उत्कट प्रेमामुळं ते तुला सदैवच माझ्यापेक्षा जवळचे वाटले. पुत्र म्हणून नव्हे, युवराज म्हणून तू वाढलास, वाढवला गेलास. ज्या राज्याच्या हितासाठा तुला वाढवलं, ते राज्य आज तुझ्या निर्णयामुळं संकटात पडलंय…’
‘माते, तुझी काय आज्ञा आहे?’
‘वत्सा! भीष्म-विदुरांच्या मते कृष्ण व अर्जुन अजिंक्य आहेत. तू युद्ध वचन तू अमान्य कर. तुझ्या पित्यांनी, भीष्मांनी व विदुरांनी गृहकलहाच्या भीतीनं त्यांचा राज्यांश दिला, हे तू जाणतोसच. पंडुपुत्रांचं अर्धं राज्य त्यांना परत दे. अर्ध्या राज्यावर तू सुखानं राज्य कर.’
दुर्योधनाने खित्र हास्य केले. त्याने एकदा भीष्म, द्रोण, विदुर यांकडे पाहिले.तो म्हणाला, ‘माते, निदान तुझ्याकडून तरी ही आज्ञा मी अपेक्षिली नव्हती. एका अंधाबरोबर आपला विवाह होणार, हे ऐकताच जी तेजस्विनी आपल्या नेत्रांना पट्टी बांधते, त्या मातनं असला दुबळा सल्ला द्यावा? राजमाते, प्रत्येक माणसाच्या जीवनात त्यानं अशीच एक पट्टी आपल्या ज्ञानचक्षूंवर बांधलेली असते.’
‘अन् तुझ्या पट्टीचं नाव!’ विदुरांनी विचारले.
‘आहे! युवराज म्हणून ज्या संस्कारानं मी वाढविली, त्या पट्टीचं नाव आहे राजनिष्ठा! माते, आज जे घडलं, त्याबद्दल तू मला दोष देऊ नकोस, या पितामहांना, विदुरांना, आचार्यांना दोष दे. कारण गृहकलहाच्या भीतीपोटी यांनी स्वनिर्णयानं त्या पांडवांना खांडवप्रस्थाचं राज्य दिलं. एकसंध साम्राज्याची प्रतिष्ठा त्यांनीच जाणली नाही.’
‘नुसत्या उदात्त कल्पना बाळगून वास्तवात जगता येत नाही, युवराज!’ विदुर म्हणाला, ‘अजूनही वेळ गेलेली नाही. भगवान श्रीकृष्ण तुमच्या निरोपाची वाट पाहत आहेत. पांडव आता राज्यही मागत नाहीत. त्यांना फक्त पाच गावं हवी आहेत.’
‘याचक म्हणून नव्हे. विदुरकाका, ते मागतात दायाद म्हणून. कौरवसाम्राज्याचे वारस म्हणून. एकदा ती चूक केलीत अन् पांडवांची मजल तात जिवंत असता राजसूय यज्ञ करण्यापर्यंत गेली. तुम्हांला सवड असेल, पण परत ते पाहण्याचं बळ मला नाही.’
‘बाबा, रे! त्या पंडूनं थोर पराक्रम करून माझ्याकरवी अश्वमेध यज्ञ करवला, त्याचंच फळ म्हणजे हे राज्य!’ धृतराष्ट्र म्हणाले.
‘तात, तुम्ही अगदी सत्य सांगितलंत!’ दुर्योधन कर्णाकडे पाहत म्हणाला ‘एवढा पराक्रम काकांनी केला, मग या भीष्मांनी, विदुरांनी त्यांनाच अश्वमेधाचा अधिकार का दिला नाही? या कर्णानं दिग्विजय करून राज्याला कीर्ती प्राप्त करून दिली, म्हणून याला का यज्ञाचा अधिकार नाही?’
‘अरे, त्या थोर पंडुपुत्राची या राधेयाशी तुलना करू नकोस.’ विदुर कळवळले.
‘कोण पंडुपुत्र? विदुरकाका, राजसभेत मी संयम पाळला. खूप पाळला. ते पंडुपुत्र असते, तरी मी त्यांना राजपुत्र संबोधून त्यांचं स्वागत केलं असतं. ते पंडुपुत्र तर नाहीतच, पण ते एका बापाचेही नाहीत. ते राज्याचे वारस कसे होतील?’
‘दुर्योधना ऽ’ गांधारी किंचाळली.
‘क्षमा, माते! या काकांच्या अज्ञाना मुळंच त्याचं स्पष्टीकरण करण्याची पाळी माझ्यावर आली.’
‘कसलं स्पष्टीकरण? नीतीची मर्यादा सुद्धा पाळता येत नाही, त्यानं ज्ञान-अज्ञानाच्या गोष्टी बोलाव्यात?’
‘काका ऽऽ ‘दुर्योधन उसळला. ‘मी बोललो, ते कटू असेल, पण सत्य आहे, हे तुम्हांलाही मान्य करावं लागेल. स्पष्टोती बद्दल आपली भारी ख्याती आहे. सत्यानं व्यापलेली स्पष्टोती केवढी जिव्हारी लागते, याचं प्रत्यंतर तुम्हांला घ्यायचं आहे? ते बळ आहे?’
‘बोल, दुर्योधना, तुला कोण अडवणार?’ विदुर म्हणाले.
कर्ण पुढे झाला. दुर्योधनाच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, ‘युवराज, शांत व्हा!’
त्या स्पर्शाने दुर्योधन शांत होण्याऐवजी जास्तच उफाळला, ‘राधेया, ज्यांना नीतीची बंधने पाळता येत नाहीत, त्यांनी ती नीती दुसऱ्यांना शिकवू नये.’
‘युवराज!’ विदुर ओरडले.
‘शांत बसा.’ दुर्योधनाच्या शब्दांत कठोरता होती, ‘काका, पांडव वनवासी झाले. अज्ञातवासात गेले. या तेरा वर्षांत कुंतीचं तुमच्या घरी वास्तव्य का?’
विदुरांचा चेहरा पडला. त्यांनी दोन्ही हात कानांवर ठेवले, तरी दुर्योधनाचे शब्द कानी आलेच.
‘नीती सामाजिक नियम अनुसरते. त्या नियमात हे बसत नाही.’
‘दुर्योधना! अरे, तू किती जणांना दुखवणार आहेस? तुझ्या हट्टी स्वभावामुळं तू युद्ध उभारलंस, तर पांडवप्रेमानं सदैव त्यांचं हित चिंतणारे हे भीष्म, द्रोण, कृप तुझ्या बाजूनं लढतील का? फार झालं, तर तुझ्या अन्नावर वाढल्यामुळं ते कौरवांच्या बाजूनं आपलं जीवित अर्पण करतील; पण त्या युधिष्ठिराकडं क्रोधानं पाहण्यासही धजणार नाहीत.’
‘माते! अन् त्यासाठी पांडवांना अर्धं राज्य देऊ? नाही, माते! ते माझ्या हातून होणार नाही.’
भीष्म हताशपणे म्हणाले, ‘युवराज! युधिष्ठीर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव पांडव म्हणूनच ओळखले जातात. नसत्या प्रतिष्ठेपायी कुलक्षयाला तुम्ही कारणीभूत होऊ नका.’
‘पितामह! तुम्ही हे सांगता? आश्चर्य आहे! पितामह, कोणत्या थोर कारणासाठी तुम्ही कुरुराज्यावरील तुमचा हक्क सोडलात, ते सांगाल? पितामह, प्रतिष्ठेचा आकार लहान-मोठा नसतो. फक्त तेजस्वी असावा लागतो.’
भीष्म निरुतर झाले. ते म्हणाले, ‘पण, बाबा, रे! निदान या वयानं घेतलेल्या अनुभवाचा तरी विश्वास बाळग. मी सांगतो, ते सत्य आहे. कृष्णाचा पराजय होणार नाही.’
‘ते मला माहीत आहे.’ दुर्योधन म्हणाला.
‘तरीही हा निर्णय घेतलास?’
‘हो! उद्या पांडवांनी जिंकलं, तरी लोक ते कृष्णानं जिंकलं, असं म्हणतील. त्यापेक्षा तुमच्या दैवी गुणसंपत्र कृष्णाशी आम्ही लढलो, हे मला यशापेक्षा जास्त आहे.’
‘पण त्या पांडवांशी स्पर्धा…’
‘पितामह! गवत समानतेनं वाढतं. तालवृक्ष आकाशाला स्पर्श करण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीतच असतात, वाढतात. जे पाच पांडवांना जमतं, ते शत कौरवांना का जमू नये?’
गांधारीने नि:श्वास सोडला. ‘राधेया, हाच तुझाही विचार आहे?’
‘राजमाते! युवराज बोलतो, ते सत्य आहे. माझंही तेच मत आहे.’
धृतराष्ट्र उद्गारले, ‘कृष्ण म्हणाला, तेच खरं आहे सर्वनाशी युद्ध अटळ आहे.’
‘तात, तुम्ही चिंता करू नका,’ दुर्योधन म्हणाला. ‘त्या पांडवांनी रणांगणात पराभव केला, तरी ते तुमच्याकडं सांत्वनासाठी येतील. अश्रु ढाळतील. सम्राट म्हणून तुम्हांलाच गौरवतील.’
‘बोलू नकोस, दुर्योधना! त्या तसल्या सांत्वनाचा मी धिक्कार करीन. दुर्दैवानं तसं घडलंच, तर मी रानावनाचा आश्रय करीन. तसल्या जगण्यापेक्षा ते जीवन मी आनंदानं पत्करीन.’
दुर्योधनाने विदुराकडे तुच्छतेने पाहिले. तो म्हणाला, ‘जा! त्या कृष्णाकडं जा. त्याला सांगा, युद्ध अटळ आहे. हाच माझा अंतिम निरोप आहे.”
विदुर महालातून निघून गेला.
दुर्योधनाने धृतराष्ट्राला वंदन केले. गांधारी चरणाना स्पर्श केला. दुर्योधनापाठोपाठ कर्णाने अनुकरण केले. गांधारी म्हणाली, ‘राधेया, तुझ्या अहंकाराची सोबत माझ्या मुलाला कोणत्या अवस्थेला नेणार आहे, याचा कधी विचार केला आहेस? एकदा तरी डोळे मिटून स्वस्वरूपाची ओळख करून घे.’
कर्ण हसला. तो निर्धारपूर्वक म्हणाला, ‘राजमाते! या कर्णानं उभ्या आयुष्यात कसलीच भीती बाळगली नाही. बाळगली, ती एकाच गोष्टीची! या कर्णाला डोळे उघडे ठेवून हवं ते पाहण्याचं, सोसण्याचं बळ आहे. डोळे मिटून स्वत:कडं पाहण्याचंच तेवढं नेमकं बळ नाही. आपण नेमकं तेच सांगत आहा. येतो मी. आशीर्वाद असावा.’
कर्णा-दुर्योधन महालातून निघून गेले.
गांधारी उभ्या जागी बसली. तिला हुंदका फुटला.
धृतराष्ट्र म्हणाले, ‘दुर्योधनमाते! रडू नकोस. माझं थकलेलं मन तुझ्या अश्रुंनी अधिकच विकल होत आहे.’
गांधारीने श्वास घेतला. अश्रु आवरीत ती म्हणाली, ‘नाथ, अजूनही उशीर झाला नाही. या दुर्योधनाला हवं ते करू दे. आपण पांडवांकडं जाऊ या.’
‘नाही, गांधारी, ते होणार नाही.’ धृतराष्ट्र नि:श्वास सोडून म्हणाला, ‘ज्याला देवानं टाकलं, त्याला मला टाकता येणार नाही. मी बाप आहे ना त्याचा.’
दुर्योधनाचा निरोप घेऊन कर्ण स्वगृही गेला. अधिरथाने विचारले, ‘कर्णा, कृष्णशिष्टाई यशस्वी झाली?’
‘कृष्णशिष्टाई झाली.’
‘कायं झाल? काय ठरलं?’
‘युद्ध! सर्व-विनाशी… युद्ध!’
अधिरथाकडे पाहण्याचे धैर्य कर्णाला नव्हते. तो अधोवदन झाला आणि थकल्या शरीराने पायऱ्या चढू लागला.
✍️ *क्रमश:* ✍️
