राधेय – भाग ३५

🚩 *राधेय/३५* 🚩

विदुराच्या प्रासादाला उत्सवाचे स्वरूप लाभले होते. प्रासादाबाहेर कृष्णाचा सुलक्षणी रथ उभा होता. कृष्णाबरोबर आलेल्या सात्यकी व इतरजनांचे आदरातिथ्य करण्यात विदुर-प्रासाद गुंतला होता. कृष्ण आपली पूजा आटोपून कौरव सभेकडे जाण्यास तयार झाला होता. त्याच वेळी युवराज दुर्योधन तेथे गेला. त्याच्या बरोबर कर्ण, शकुनीही होते कृष्णाने प्रेमभराने तिघांचे स्वागत केले.

‘दुर्योधना, तुझ्या आतिथ्याचा स्वीकार केला नाही, म्हणून तू रुष्ट तर झाला नाहीस ना?’ कृष्णाने विचारले.

‘रुष्ट होण्याचे काहीच कारण नाही.’ दुर्योधन विदुराकडे पाहत म्हणाला. ‘काकांच्या घरचं आतिथ्य मी माझ्याच घरचं समजतो. त्यात काही कमतरता पडली नाही ना?’

कौतुकाने दुर्योधनाकडे पाहत कृष्ण म्हणाला, ‘दुर्योधना, जिथं प्रेम, विश्वास अन् स्नेह असतो, तिथं कमतरता कसली? अंगराज, क्षेम आहे ना?’

‘हो!’

‘अन्, अंगराज, वृषसेन कुठाय्? त्याची आठवण मला नेहमी येते.’

‘ते त्याचं भाग्य! वृषसेन इथंच आहे. सायंकाळी आपल्या दर्शनास पाठवून देतो.’

महाराज!’ दुर्योधन म्हणाला, ‘भीष्मादी कौरव तातांसह सभेत उपस्थित झाले आहेत. स्वर्गीचे देव इंद्राची प्रतीक्षा करतात, तशी ते सर्व तुमची वाट पाहत आहेत.’

आपले उत्तरीय सावरीत कृष्ण उठला. विदुरांना म्हणाला, ‘सभा तिष्ठत ठेवणं योग्य नव्हे. विदुरा, चल, आपण जाऊ.’

विदुरासह कृष्ण प्रासादद्वारी आला. द्वारात कृष्णाचा शुभ्र रथ उभा होता. विदुरासह कृष्ण त्या रथात बसला. दुर्योधन, कर्ण, इत्यादी कृष्णाच्या मागोमाग दुसऱ्या रथातून निघाले. त्यांच्या मागून सात्यकी, कृतवर्मा व इतर लोक रथ, गज, अश्व, इत्यादी वाहनांतून अनुसरत होते.

कौरवांनी परिवेष्टित असलेला रथ, यादववीरांकडून अभिरक्षित होता. प्रजाजनांचा आनंद पाहत, नगरशोभा निरखीत कृष्ण सभाद्वारी येऊन पोहोचला. मंगलवाद्यांच्या आवाजांनी सर्व दिशा व्यापल्या. कृष्णाच्या आगमनाची आकांक्षा बाळगणारी अमित तेजस्वी राजांची ती सभा हर्षाने रोमांचित झाली. कृष्ण, विदुर आणि सात्यकी यांचे हात धरून प्रवेश करता झाला. त्यांच्यापुढे दुर्योधन, कर्ण होते. कृष्णामागे कृतवर्मा व वृष्णिवीर होते.

कृष्णाचे आगमन कळताच सम्राट धृतराष्ट्र उभे राहिले. ते पाहून सर्व राजांनी कृष्णाला उत्थापन दिले. कृष्णासाठी अष्टकोनी सुवर्ण-सिंहासन ठेवले होते. कृष्ण त्या आसनावर आरूढ झाला. कृष्णाजवळ एका विशाल आसनावर कर्ण व दुर्योधन बसले. सर्व सभा आसनस्थ झाली. सर्वांचे लक्ष कृष्णाकडे लागले होते. कृष्णाने पीतांबर परिधान केले होते. त्याची अंगकांती अतसी पुष्पाप्रमाणे नीलवर्ण होती. राजसभेत पूर्णपणे शांतता पसरली होती.

कृष्ण उभा राहिला. धृतराष्ट्राकडे पाहून तो बोलू लागला, ‘हे भारता! आज या सभेत मी द्वारकाधीश म्हणून आलो नाही. मी पांडवांच्या वतीने दूत म्हणून या राजसभेत उभा आहे.

‘पांडवांचा अज्ञातवास संपला आहे. ते विराटाघरी प्रगट झाले आहेत. यापूर्वी या राजसभेत दुपदपुरोहित पांडवांचे दूत म्हणून येऊन गेले. तसेच, पांडवांकडं कौरवांकडून संजयही दूतकार्य करून गेले; पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. ते पाहून मला राहवलं नाही. शक्य तो भावी अनर्थ टाळता आला, तर पाहावा, म्हणून मी इथं आलोय्.’

दुर्योधनाच्या चेहऱ्यांवर स्मित पाहून कृष्णाचा आवाज किंचित चढला.

‘हे कौरववीरहो! या युद्धामध्ये पांडवांचा पराजय होईल, ही भीती माझ्या मनात नाही. पराजयापासून तुम्हांला वाचवण्याचाही माझा प्रयत्न नाही. उद्या हे युद्ध उभं राहिलं, तर त्यात पांडव आणि कौरव या दोघांचाही सर्व बलानिशी झालेला सर्वनाश मला स्पष्टपणे दिसतोय्. तो विनाश टाळता आला, तर टाळावा, हा माझा हेतू आहे. तेव्हा, हे भारता, अन् या सभेतल्या वीरश्रेष्ठांनो, मी सांगतो, ते मोकळ्या मनानं श्रवण करा अन् माझ्या विचारांचं सत्य जाणून घ्या.’

‘एके काळी हे कौरवराज्य पंडूनं आपल्या चारित्र्यसंपन्न राजनीतीनं जपलं, त्यांचा वाटा त्यांना मिळून, त्यांचा अधिकार त्यांना प्राप्त व्हावा, हे योग्य आहे.’

‘अधिकार !’ दुर्योधन उठत म्हणाला, ‘अधिकार कसला? एखाद्या गोष्टीचा कौरवश्रेष्ठ धृतराष्ट्र महाराज हेच राज्याचे वारस.’

‘पण ते अंध…’ कृष्ण म्हणाला.

‘अंध असल्यामुळं राज्याचा अधिकार नष्ट होत नाही. तसं असतं, तर पंडूंनी जे राज्य सांभाळलं, ते राज्य अंध तातांच्या हाती देऊन, मृगयेच्या निमित्तानं वनवास गाठला नसता. कृष्णा, नम्रतेनं सांगावंसं वाटतं. गोकुळात नंदाची निवड केली जाते, त्या पद्धतीनं राज्याचा वारस निवडला जात नाही. शतकौरव असले, तरी साम्राज्याचे शत तुकडे पडत नाहीत. ते एकसंधच राहतं.’

‘हो ना! मग त्या शतकौरवांच्या पोषणाची जशी कौरवसाम्राज्याची जबाबदारी आहे, तशीच त्याच कुलात जन्मलेल्या पाच पांडवांचीही.’

‘पाच पांडव!’ दुर्योधन हसला. ‘कृष्णा, या राजसभेतल्या अनेक श्रेष्ठांना तुझ्या सामर्थाचं कौतुक वाटतं. ते तुला देवगुणसंपत्र मानतात. निदान तू तरी असत्याची कास धरू नकोस. ते पाचजण फारतर कौंतेय असतील; पांडव खास नाहीत. निदान या सभेत तरी त्याचा उच्चार मला करावयास लावू नकोस.’

कृष्णाने संताप आवरला. दुर्योधनावरची दृष्टी त्याने धृतराष्ट्राकडे वळवली. ‘हे भारता! मी इथं वादंग माजविण्यासाठी आलो नाही. त्या धर्माचरण करणाऱ्या पाच पांडवांचा तुझे पुत्र सदैव द्वेष करतात. विश्वासानं आलेल्या त्यांना तुझ्या पुत्रांनी लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला. पुढं त्यांना तुम्हीच खांडवप्रस्थाचं राज्य दिलंत, ते त्यांनी बाहुबलावर वाढवलं. कीर्तिरूप केलं. त्या पांडवांचं वर्धमान होणारं वैभव तुझ्या पुत्रांना सहन झालं नाही. त्यासाठी त्यांनी कपटद्यूताचा अवलंब केला. त्यासाठी गर्ह्य आचरण केलं. एवढंच नव्हे; तर पांडवपत्नी पांचाली हिचाही करू नये तो अपमान केला; पण सत्यवचनी पांडवांनी ते सारं सहन केलं. प्रतिज्ञेप्रमाणे बारा वर्षं वनवास अन् एक वर्षाचा अज्ञातवास पुरा केला, त्यांचा धर्मबुद्धीवर विश्वास आहे. हे राजा, त्यांनी तुला अत्यंत नम्र भावानं वंदन करून सांगितलंय् की, ‘आम्हांला राज्य नको! वैभव नको! आमच्यांत सामर्थ्य असेल, तर गतवैभव आम्ही जरूर मिळवू. आम्हांला फक्त पाच गावं दायभाग म्हणून तू दे.’

‘धृतराष्ट्रा! त्यांच्या विनयाची, धर्मबुद्धीची प्रशंसा करावी, तेवढी थोडीच आहे. पांडव दायभाग मागतात फक्त पाच गावांचा! त्यात धर्मबुद्धी कसली? त्यात तर कपटनीती आहे. दायाद म्हणजे वारस… अन् वारस म्हणजे अधिकार! कृष्णा, शिष्टाईसाठी आलेल्या दूतानं एकांगी विचार करून चालायचं नाही. मी तुझं स्वागत करीत असता, तू मात्र माझी कठोर निंदाच करतोस. कारण पांडवांची श्रद्धा तुझ्यावर असल्यानं तुला आम्ही सदैव दोषी दिसतो.

‘आम्ही प्रगट सभेत द्यूत खेळलो. त्यात पांडव हरले. हा आमचा अपराध? वैष्णव हा यज्ञ मी केला, तेव्हा वैर विसरून यज्ञाचं आमंत्रण मी त्या पांडवांना पाठविलं. त्या वेळी भीमानं काय निरोप पाठविला, माहीत आहे? सर्व कौरवांची रणयज्ञात आहुती पडेल, तेव्हाच पांडव हस्तिनापुरास येतील! असा तो निरोप होता. कर्मानं मी भिणारा नव्हे. युद्धाच्या वल्गना तेच करीत आहेत, तर मग त्यांचीच इच्छा पुरी होऊ दे.’

‘त्याचा परिणाम माहीत आहे?’ कृष्णाने विचारले.

‘परिणाम कसला? फार तर युद्धात मरेन मी! एवढंच ना? क्षत्रियाला त्याहून श्रेष्ठ मृत्यू नाही. युद्धात अस्त्रांनी जर मरण आलं, तर आम्ही स्वर्गालाच जाऊ. कृष्णा, वेळूप्रमाणं अस्थानीही भग्न व्हावं, पण कुणापुढं नम्र होऊ नये, हे श्रेष्ठ वचन आहे. माझ्या पित्याकडून जो राज्यांश मला मिळालाय्, तो मी जिवंत असेपर्यंत कुणाला परत देणार नाही. जोवर राजा धृतराष्ट्र प्राण धारण करीत आहेत, तोवर आम्ही व ते पांडव यांतील कोणत्या तरी एका पक्षानं क्षत्रिय धर्माचा त्याग करून, भिक्षुकाप्रमाणं आयतं सिद्ध असलेलं अत्र भक्षण करूनच जिवंत राहिल पाहिजे.’

‘कृष्णा, मी बाल असल्यामुळं पराधीन होऊन पूर्वी अज्ञानानं पांडवांना अदेय असलेलं राज्य देऊ दिलं; परंतु आता परत तीच चूक करणार नाही. ते राज्य परत पांडवांना प्राप्त होणार नाही. कृष्णा, त्या पांडवांना माझा एकच निरोप सांग. म्हणावं, मी जिवंत असेपर्यंत पाच गावंच काय, पण सुईच्या तीक्ष्ण अग्रानं छेदली जाईल, एवढी मातीही मी पांडवांना देणार नाही.’

कृष्ण दुर्योधननिर्णयाने संतप्त झाला. धृतराष्ट्राकडे पाहत तो म्हणाला, ‘हे सम्राट! तुझ्या पुत्रानं घेतलेला निर्णय तू ऐकला आहेसच. आता अदृष्टातला विनाश टाळायचा एकच मार्ग तुला उरला आहे.’

‘कोणता?’ धृतराष्ट्राने विचारले.

दुर्योधनाकडे बोट दाखवीत कृष्णाने स्पष्ट शब्दांत सांगितले, ‘तो म्हणजे दुर्मती पुत्र दुर्योधन अन् त्याचे सल्लागार शकुनि, कर्ण अन्! दु:शासन यांना बद्ध करून पांडवांच्या स्वाधीन कर.’

कृष्णाचे ते शब्द ऐकून दुर्योधन चकित झाला.

दुःशासन त्वेषाने उठला आणि तो गरजला, ‘अन् हेच युवराजांनी तुमचं करायचं ठरवलं, तर?’

कृष्णाच्या हास्याने सारे सभागृह भरून गेले. कृष्णाचे हास्य थांबले. आपली कुद्ध दृष्टी सभागृहावर टाकीत कृष्ण म्हणाला, ‘दुःशासना, दुर्योधनाला ते करायला जरूर सांग. मूर्ख, अशा प्रसंगी शिष्टाईसाठी जे दूत येतात, ते कधी एकटे आणि असावधपणे शत्रुगोटात शिरत नाहीत. आपल्या सर्व बळानिशीच ते आलेले असतात.’ दु:शासनाकडे तुच्छतेने पाहत तो बोलला.

‘कसलं बळ?’दुर्योधनाने तुच्छतेने विचारले.

‘बळ? माझं! दुर्योधना, शिष्टाईसाठी येताना हस्तिनापूरच्या सीमेवर माझं चतुरंग दळ उभं करूनच मी इथं आलोय्. या क्षणी हस्तिनापूर कृतवर्म्याच्या सेनेनं वेढलं आहे. या राजसभेत सात्यकी, कृतवर्मा माझ्या बाजूनं उभे आहेत. एवढंच नव्हे, तर माझ्यासह आलेलो हजारा वृष्णिवीर आपल्या बाहुबलाच्या प्रत्यंतरासाठी उभे आहेत. मला बद्ध करण्याचा जरूर प्रयत्न कर. जे युद्ध उद्या होणार आहे, ते याच क्षणी उद्भवेल अन् अपरिमित विनाश न होता याच क्षणी संपून जाईल.’

कृष्णाने आपल्या शक्तीचे केलेले ते विराट दर्शन पाहून दुर्योधन क्षणभर भान हरपला. अपमानाने त्याचा संताप उफाळला आणि काय घडते, ते समजायच्या आत तो सभागृहाबाहेर निघून गेला. त्याच्या पाठोपाठ कर्ण, शकुनि आणि दु:शासन बाहेर पड़ले.

सभा नि:स्तब्ध, शांत होती. कृष्ण उभा राहिला. शांत भाव ढळू न देता तो म्हणाला, ‘हे भारता! तुझ्या पुत्रानं सभात्याग केलाय्. मी तो अपमान मानीत नाही. युद्ध तर अटळच दिसतंय्. तुझ्या पुत्राला या अविवेकापासून वाचवता आलं, तर पाहा. मी आज विदुराघरीच आहे. सामोपचार झाला, तर मला आनंद आहे. नाहीतर युद्ध निश्चित आहे, असं समजून मी माघारी जाईन.’

कृष्ण सभेबाहेर जात होता.

त्याच्यामागून विदुर, कृतवर्मा, सात्यकी जात होते.

कृष्ण गेला आणि सभागृहात एकच कुजबूज सुरू झाली.

✍️ *क्रमश:* ✍️