🚩 *राधेय/३४* 🚩
पांडव प्रगट झाले आणि राजकारणाचे डाव अखंड सुरू झाले. द्रुपदाचा पुरोहित कौरवांच्या सभेत सलोखा करण्यासाठी आला; पण तो हेतू साध्य झाला नाही. पांडवानी मागितलेल्पा अर्ध्या वाटणीचा दुर्योधन, कर्ण यानी अव्हेर केला. पांडवांचा संताप वाढू नये, म्हणून धृतराष्ट्राने संजयाला समझोता घडवून आणण्यासाठी पाठविले; पण तोही हेतू सफल झाला नाही. युद्ध अटळ आहे, हे दिसत असता, एके दिवशी कृष्ण शिष्टाईसाठी हस्तिनापुरात येणार असल्याची वार्ता आली. शिष्टाईसाठी कृष्ण येणार, या वार्तेमुळे भीष्म, द्रोण, विदुर आनंदित झाले होते. कृष्णभेटीमुळे काहीतरी उपाय निघेल आणि युद्ध टळेल, असे धृतराष्ट्रांना वाटले. कृष्णाच्या स्वागतात कोणतीही उणीव राहू नये, म्हणून त्याने आज्ञा दिली. कृष्ण स्वागतासाठी तयारी होऊ लागली.
कृष्ण-आगमनाचा दिवस उजाडला. हस्तिनापूरचे राजरस्ते रांगोळ्यांनी चित्रविचित्र तोरणांनी सुशोभित झाले होते. कृष्णाच्या स्वागतार्थ नगराच्या बाहेर प्रचंड जनसमुदाय तिष्ठत उभा होता. त्यांच्या अग्रभागी भीष्म, द्रोण, विदुर आपल्या रथासहित उभे होते. फक्त त्यात दुर्योधनाची कमतरता भासत होती.
कृष्णाचा रथ हस्तिनापुराच्या परिसरात प्रवेशला. प्रजाजनांच्या मुखांतून कृष्णाचा जयघोष उमटला. भीष्म, द्रोण, विदुरानी कृष्णाचे स्वागत केले. त्या वैभवपूर्ण स्वागताचा स्वीकार करून कृष्णाने नगरप्रवेश केला. सर्वांसह कृष्ण राजप्रसादात गेला. प्रासादाच्या द्वारी दुर्योधनाने कृष्णाचे स्वागत केले. धृतराष्ट्रांची भेट घेऊन प्रासादाबाहेर येत असता दुर्योधनाने कृष्णाला आपल्या आतिथ्याचा स्वीकार करण्याचा विनंती केली ती अमान्य करून कृष्ण विदुरांच्या घरी गेला.
कृष्णा निघून जाताच दुर्योधन संतापाने कर्णाला म्हणाला, ‘मित्रा, पाहिलंस, तातांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कृष्णाचं स्वागत केलं; पण त्यानं माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही.’
कर्णाने दुर्योधनाला शांत केले. तो म्हणाला, ‘युवराज, कृष्णानं सांगितले, ते काही खोटं नव्हे. कृष्ण दूत म्हणून आला आहे. शिष्टाई सफल झाल्याखेरीज दूतानं आतिथ्याचा स्वीकार करू नये, हेच इष्ट. युवराज, या गोष्टीचा विचार करण्याआधी उद्या कृष्ण काय सांगेल, याचा विचार करावा.’
‘त्यात विचार कसला करायचा? आपल्याला कृष्णाची शिष्टाई पटली, तर मान्य करू, नाहीतर…’
‘नाहीतर काय?’ कर्णाने विचारले.
‘नाहीतर कृष्णाला पकडून ठेवू. या खेपेला एवढ्या सहजपणे त्याला कौरवसभेतून बाहेर पडता येणार नाही.’
कर्णाच्या चेहऱ्यावर साक्षात भीती प्रगटली होती; पण कर्णाकडे न पाहताच दुर्योधन वळला आणि राजप्रसादाच्या पायऱ्या चढून गेला.
✍️ *क्रमश:* ✍️
